Saturday, October 19, 2024

ठेहराव

ठेहराव..!!

दिवस charming असायला हवा तर ठेहराव हवाच. असं एक वाक्य सहज मागच्या ब्लॉग मध्ये लिहिलं होतं तर वाटलं की विषय मोठा आहे. या शब्दावर वेगळा ब्लॉग लिहायला पाहिजे. दिवसभरात एक तरी गोष्ट जी घर, ऑफिस, सणवार, लग्नकार्य, मुलांच्या परीक्षा, मोठ्यांची आजारपणं, पाहुणे या आपल्या day to day routine ला tangent गेली पाहिजे. जी आपल्याला प्रचंड energy देऊन जाते. ती गोष्ट म्हणजे ठेहराव. जगण्यातला आनंद परत मिळवून देतो तो ठेहराव. कशात असतो तो? एकदम छोट्या छोट्या क्षणात. मोठे काही मिळवायच्या नादात तो फक्त निसटून जायला नको. 

बुद्धिबळाचा डाव हरत आलेला असतो पण एक प्याद जे शांतपणे सात घर चालत जात ना, ते न मरता शेवटी नव्याने जिवंत होऊन वजीर बनतं आणि मात करतं. त्या नव्या वजीरात, त्या हुकुमाच्या एकक्यात तो ठेहराव असतो. कधी तो डोळे मिटून शांत बसल्यावर गुलजार च्या लिखाणात सापडतो तर कधी लताच्या आवाजात. कधी मेघमल्हार रागात तर कधी गिटार च्या बेस मध्ये. नारळी पौर्णिमेला कोकणात उधाण आलेल्या समुद्राची गाज ऐकताना खड्या आवाजात शिवतांडव म्हणताना तो असतो तर कधी लोहगडाच्या विंचू काट्यावर गारव्याने शहारताना हळुवार सुप्रभात म्हणताना तो असतो. कधी खिद्रापूर च्या कोरीव मंदिरात किरणोत्सर्ग बघताना तर कधी आकाशात चंद्राचे खळे पडताना. कधी पहाटेच्या दवात गवतात अनवाणी फिरताना तर कधी संध्याकाळी अनपेक्षित संधिप्रकाश पडल्यावर आकाशात जी रंगाची उधळण होते त्यात तो भेटतो.

घामाने चिंब भिजल्यावर नकोसे होते ना आणि मग एकदम ट्रेन मध्ये सोनचाफा दरवळतो, त्या गंधात तो असतो. कधी तो सोनसळी अमलताश उमलताना असतो तर कधी रात्रीच्या ब्रम्हकमळात. कविता लिहिताना वृत्तात बसत नाही म्हणून कमी जास्त शब्द करताना मूळ भाव पोचेनासे होतात कागदावर आणि मग शेवटी त्या बंधातून मुक्त होऊन मनातले विचार नकळत एकसंध उतरत जातात ना त्या गद्य मुक्तछंदात तो असतो. उन्हाने तगमग होत असताना एकदम श्रावणसर येऊन इंद्रधनुष्य उमटते आणि मागून मातीचा जो सुवास येतो ना त्यात तो असतो. अस्वस्थ चाललेल्या दिवसात झोक्यावर बसल्यावर तो जी लय देतो ना मनाला त्यात ठेहराव असतो आणि तोच मोटारसायकल चा speedometer गरकन फिरला की पण मिळतो. कधी तो भरतकामाच्या कशिदा टाक्यात मिळतो, कधी water colour च्या pallet मध्ये. कधी तो गावी अंगणात लावलेल्या आंब्याच्या झाडाखाली मिळतो तर कधी मुंबईच्या गॅलरी मधल्या छोट्याश्या कुंडीतल्या मधु मालती च्या रोपात सुध्धा उमलतो. कधी रवाळ तूप कढत आल्यावर तर कधी तो बरक्या फणसाच्या सांदणात असतो. ओवाळणी चे पैसे जमवून छोटा गल्ला साठविण्यात पण तो असतो आणि शेअर मार्केट मधल्या बेलगाम नशेत पण तो असतो. 

मित्रांसोबत गप्पांची रंगलेली मैफिल म्हणजे ठेहराव. आपल्याकडे निरखून बघताना त्याच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव मनात साठवून ठेवणं म्हणजे ठेहराव. पोटातून पहिल्यांदा बाळाने लाथ मारल्यावर झालेली जाणीव म्हणजे ठेहराव. लहानपणी भावंडांबरोबर गच्चीत भुताच्या गोष्टी ऐकताना न घाबरल्याची acting करणं म्हणजे ठेहराव. सोवळ्यात नैवेद्य केल्यावर सासूच्या चेहऱ्यावरचे सात्विक समाधान म्हणजे ठेहराव. पळती लोकल पकडणं आणि रात्री घरी पाऊल टाकल्यावर नवऱ्याने गरम ताट हातात देणं म्हणजे ठेहराव. गावच्या अंगणात हळव्या झालेल्या सासर्यांच्या मनाला जपण म्हणजे ठेहराव. आजीच्या पैठणी सोबत टपोऱ्या नथीच्या आकड्यात तो आजही गुंतलेला असतो. हे असे छोटे छोटे क्षण जगायला शिकवलं त्या घरच्यांचे संस्कार म्हणजे ठेहराव. 

नवरंग, नवरस, मन, भावना, निसर्ग, छंद, मित्रपरिवार, आप्तेष्ट या सगळ्याचा मिळून जो अर्क आपल्यात झिरपत असतो. तोच तो. आपला ठेहराव. पैशात न मोजता येण्यासारखा. निखळ. निर्मळ. आतल्या आवाजाचा ठाव घेणारा. ठेहराव.  

तुमच्यासाठी काय आहे या शब्दाचा अर्थ? कमेंट मध्ये लिहून सांगा आणि एकदा आपल्या आतल्या आवाजाला सांगा, रोजच्या धावपळीत त्याला सांभाळायचे फक्त. बाकी पुढच्या ब्लॉग मध्ये कुठला विषय वाचायला आवडेल तेही सांगा. भेटत राहूच माझ्या ब्लॉग पेज वर.
 
-- अवनी गोखले टेकाळे

Sunday, August 13, 2023

एकदा मागे वळून तर बघ..!!

एकदा मागे वळून तर बघ..

एक उनाड, खळखळून हसणारी..
मनमोहक अन् खट्याळ डोळ्यांची..
स्वतः वर भक्कम विश्वास असणारी..
हिंमत आणि धडाडी असणारी.. ती..
ती.. मागे राहिली आहे नदीच्या पल्याड..
एकदा तिच्याकडे वळून तर बघ..!!

नदीच्या अल्याड पोचली ती.. मोठं जंगल..
घनदाट.. निबीड अरण्यात हरवलेली ती..
बावरलेली.. अडखळलेली.. भेदरलेली..
सतत वाट चुकणारी.. धडपडणारी.. ती.. 
ती.. अजूनही.. मनाने नदीच्या पल्याड..
एकदा तिच्याकडे वळून तर बघ..!!

चालता चालता.. एक मध्येच पाणवठा..
तिला वाटले थोडेसे थबकावे मध्येच तर..
तिला वाटले थोडेसे विसावावे तिथे तर..
रस्ता चुकणार नाही.. थोडा मोकळा श्वास फक्त..
तिच्यातल्या तिला.. पुढची वाट चालण्यासाठी..
अग बयो, थांब थोडी.. त्या पाणवठ्याकडे..
एकदा त्याच्याकडे वळून तर बघ..!!



Tuesday, July 18, 2023

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा..!!

तू फक्तं अवती भोवती रहा कान्हा. तेवढं पुरे.. तुझं अस्तित्व जाणवतं राहतं.. तेवढी जाणीव पुरे.. डोळे भरून तुला पाहताना माझे स्त्रीत्व उमलत राहते.. तू डोळे भरून पाहिलेस की माझे मीत्व खुलत राहते.. या कळीचं फुल होताना तू केसर बनून साथ दे.. तेवढा तुझा वास पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. सारे सूर कानात फेर धरून घुमत राहतात.. पंचप्राण पांचजन्य शंख फुंकत राहतात.. माझा कोमल निषाद ही तूच कान्हा आणि माझा तारसप्तकाचा शडज ही तूच कान्हा.. ग्रीष्मात तू पाहिलेस तरी मनात मेघमल्हार वाजायला लागतो कान्हा.. तेवढा तुझा ताल पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. तुझी रणनीती एकलव्यासारखी शिकावी वाटते.. सगळ्या अडचणी सोप्या वाटायला लागतात.. आपसूक मार्ग निघत जातात.. माझे प्रश्न ही तुझ्यामुळेच आणि उत्तर ही तूच कान्हा.. मी कणखर झाले तुझ्यामुळे.. लढायला शिकले तुझ्यामुळे.. विराट दर्शन झाले तुझ्यामुळे.. माझ्या आयुष्याचा अठरावा अध्याय बनून माझ्या शरीरात भिनत रहा.. तेवढी तुझी शिकवण पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. तू प्रत्येक वेळा वेगळ्या व्यक्तीत वेगळ्या रूपात भेटत राहतोस.. आणि माझी रूप बदलत नेतोस.. कधी मी तुझी रास रचणारी राधा होते.. कधी तुझी मरेपर्यंत साथ देणारी रुक्मिणी होते.. कधी लेकराला मायेने लोणी साखर भरवताना यशोदा होते.. कधी अडचणीत सापडलेली द्रौपदी होते.. कधी तुझ्याच अनंतात विलीन झालेल्या जीवलगांची आठवण आळवणारी मीरा होते.. तू बदलत जातोस आणि मीही.. प्रत्येक टप्प्यावर त्या त्या रुपात भेटत रहा कान्हा.. तेवढी तुझी ओढ पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तुझ्या पांचजन्य शंखात.. तुझ्या मुरलीत.. तुझ्या मोरपिसात.. तुझ्या नीलवर्णात.. तुझ्या गीतेत.. तुझ्या विराट रुपात.. तुझ्या रासलीलेत.. हे मोहना .. हे कान्हा.. हे कृष्णा.. हे मधुसूदना.. हे माधवा.. माझे अस्तित्व तुलाही जाणवत असेल का.. माझा अध्याय संपवताना मी येईन.. समुद्राच्या दिशेने चालत राहीन आत आत.. तेव्हा शेषशाही रुपात तू भेटशील ना मला.. तेवढं अंतिम भेटणं पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!!


Monday, June 26, 2023

ऊर्वी ची आई.. ऊर्वी चे बाबा..!!

खरं सांग.. तुझ्या मुलीचं नाव पण तू उर्वी का ठेवलं असशील? माझ्याच मुलीचं नाव सापडलं का तुला? ती परत परत विचारत होती त्याला. तो.. तिचा जुना मित्र.. दहा वर्षाची घट्ट मैत्री.. शेवटी तो म्हणाला.. मुलीचं नाव ठेवायचं म्हणल्यावर तूच आलीस डोळ्यासमोर.. मग ठरवल.. तुझ्या मुलीचं नाव पण ऊर्वी आहे ना.. आपण पण तेच ठेवायचे.. !!
आयुष्यातला एक मोठा प्रश्न.. त्याचे उत्तर असे शोधावे कोणीतरी? ते पण "त्याने".. ती मोहरुन गेली.. थरारली.. अचानक त्याच्या आवाजातून.. त्याच्या बोलण्यातून.. तिला ते जाणवलं.. जे तिला इतक्या दिवसात कळलं नव्हतं.. त्याच्या आवाजातला कंप तिला सगळ काही सांगून गेला.. आणि तिला एक एक संगती लागायला लागली.. 
तसा तो आवडायचा तिला.. पण हे फक्त तिच्या मनाला माहित होत.. उंच, गोरा, घारा, सरळ नाक आणि राखाडी केस.. नजरेत भरेल असाच होता तो.. ती तर त्याला कायम चिडवायची.. बघ तू manager असावा म्हणून नवस बोलत असतील मुली.. तोही तिला कधीतरी complement द्यायचा सहज.. दोघांच्या बोलण्यात खूप सहजता होती.. मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलायचे, एकमेकांसमोर सुख दुःख व्यक्त करायचे.. त्या मैत्रीपुढे ते आवडणे मागे पडत गेले.. तिला सवय होऊन गेली त्याची.. त्याच्या बोलण्याची.. रोज एकत्र जेवण करायचे.. चहा घ्यायचे.. 
तिला आठवले.. तिचा वाढदिवस होता.. तिने केक कापला आणि तो पटकन पुढे आलेला भरवायला.. तिने मात्र संकोच वाटून त्याच्या हातातून तिच्या हातातच घेतला केक.. अर्धा घेतला अर्धा त्याला ठेवला.. सगळे लोक त्या दोघांना हसले होते त्या दिवशी.. काय प्रसाद आहे का तो म्हणून.. तिला नकळत हसू आले आठवून.. असे खूप प्रसंग तिला दहा वर्षातले आठवत गेले एक एक करून.. त्याला तिचे आवडलेले कानातले.. त्याने बोलून दाखवले.. तिने ते तुटेपर्यंत रोज घातले.. असे किती तरी छोटे सुखावणारे प्रसंग.. 
त्याला पण आपण आवडत होतो हे कळायला मात्र तिला दहा वर्ष उलटून जायला लागली.. हा प्रसंग यायला लागला.. तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले.. आता ते भेटत पण नाहीत.. फोन मात्र चालू असतात.. त्याच्या मनातले जर तिला आधी कळले असते तर?  समोरासमोर असताना तिला हे समजून आले असते तर? इतकी सहजता राहिली असती का?  त्याला कळले होते का, की तिला पण तो आवडायचा? कितीतरी प्रश्न.. उत्तर नसलेले.. 
तरीही.. ते अजूनही रोज बोलतात.. तितक्याच सहजपणे.. मनातल्या गोष्टी मनात ठेऊन.. काही अवघडलेपण नाही आले त्यांच्यात अजून पण.. हे महत्त्वाचे.. त्याच्या बायकोने तेच नाव ठेऊ दिले हेही महत्त्वाचे.. कोणीच कधी विषय काढला नाही.. हेही महत्त्वाचे.. दोघांनी आपापल्या पार्टनर ला आणि मुलींना घेऊन एकदा भेटायचे ठरवले आहे आता.. दोघांच्या उर्वि ची मैत्री झाली तर चांगलंच आहे.. बघू काय होतं पुढे..!!

Saturday, May 27, 2023

संकोच

संकोच..

संकोच वाटला पाहिजे थोडा तरी.. त्यालाही.. तिलाही.. आयुष्य सरळ सोपं होऊन जातं.. त्याने तिच्याकडे पाहिले, तो जवळून गेला, त्याचा स्पर्श झाला, तो बोलला, तो हसला, तो चिडला, तो रडला, तो अस्वस्थ झाला.. हे सगळेच तिला जाणवत राहते अनंत काळ.. याच गोष्टी त्यालाही जाणवत राहतात तिच्या बाबतीत आणि मग त्यातून तयार होतो तो त्याचा, तिचा संकोच.. हा संकोच असला पाहिजे.. एका सीमा रेषेवर थबकून राहायला भाग पाडतो तो संकोच.. एका मर्यादेत बांधून ठेवतो तो संकोच.. तो संकोच लांघून पुढे गेले तर शरीर वाहवत जायला वेळ नाही लागणार पण तो लांघायचे प्रयत्न पूर्वक थांबवतो तो त्याचा, तिचा संकोच..!! 

तो लांबून येत असतो.. ती त्याला डोळे भरून पाहत असते.  तो जसा जवळ येतो तशी ती पार भिंतीच्या बाजूला सरकते.. उगाच त्याचा गडबडीत चालताना धक्का लागला तर.. त्यालाही ते जाणवते.. तोही जरा जास्तच जपून पुढे निघून जातो.. चुकून लागू शकणारा धक्का सावरतो तो तिचा संकोच..!!

नेहमी हातवारे करत बोलणारा तो नाजूक क्षण समोर आल्यावर मात्र हात आवरून, बाजूला सरकून, खाली मान घालून तिच्यासमोर उभा राहतो.. हळव्या क्षणी तो अधीर झाला नाही हे पाहून तिचा हरवत चाललेला धीर परत येतो.. त्या हळव्या क्षणाला सावरतो तो त्याचा संकोच..!!

तो तिला निरखून बघताना तिचे लक्ष जाते.. तिची धडधड वाढते.. तो तिचे वाढलेले श्वास मोजत तसाच धीटपणे उभा राहतो आरपार बघत.. समोर उभ्या पुरुषाकडे ती परत बघायचे टाळते आणि तिच्यातली स्त्री मान खाली घालून डोळे मिटून घेते.. तिच्या शांत होत जाणाऱ्या ओलसर धडधडी सोबत त्याचीही नजर परत शांत निर्मळ होत जाते. त्याच्या धीटपणाला सावरतो तो तिच्या मिटलेल्या डोळ्यातला संकोच..!!

पाणी पिताना तिच्या हातातले बाटलीचे झाकण पडते खाली. अशा वेळी लगेच तत्परता दाखवायची असते या नियमानुसार तो लगेच वाकून झाकण उचलतो आणि झाकण धरलेला हात तिच्या पुढे करतो.. ती नजरेने ते झाकण टेबलवर ठेवायचा इशारा करते.. ती गालातल्या गालात हसते.. आणि तो लाजतो.. एक पुरुष आपल्यासमोर लाजतोय हे ती बेभान होऊन बघतच राहते.. तो क्षण निसटत्या स्पर्शाच्या पलीकडे पोचतो आणि कित्येक पटीने अधिक थरारून सोडतो.. त्याच्या लाजण्यातून बहरत जातो, तिचा मोहरणारा संकोच..!!

सगळ्या जगाशी गप्पा मारत सुटणारे, तोंड भरून हसणारे ते दोघं.. सगळ्यांसमोर ते एकमेकांशी बोलतातही पण जुजबी.. दोघेच नेमके एकमेकांच्या समोर आल्यावर मात्र ते काहीच बोलत नाहीत.. ते हसत नाहीत.. ते नजर चुकवत पण नाहीत.. चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेऊन ते फक्त एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत पुढे जातात.. त्या क्षणात काळ थांबलेला असतो त्यांच्यासाठी.. त्या चार नजरांना, त्या शांततेला तेव्हा हजार जिव्हा फुटतात आणि प्रचंड बोलका असतो त्यांचा संकोच..!!

कित्येक लहान मोठे मोहाचे क्षण येत राहतात.. त्याच्या आणि तिच्या आयुष्यात.. संकोच त्या क्षणांना स्पर्शाच्या, शब्दांच्या पलीकडे घेऊन जातो आणि अमर करतो.. शब्द विरतात.. स्पर्श पुसट होतात.. पण त्याच्या पलीकडे पोचलेले उत्कट शाश्वत भाव कायम स्वरुपी सोबत राहतात.. नजरेतून अंतर्मनात कोरलेले अनुभव चिरंतन होतात.. अशा नात्याला नाव द्यावे वाटत नाही.. आणि नाव न मिळाल्यामुळेच ते तुटायची भीती पण राहत नाही.. आणि मग निरभ्र आकाशात, ताठ मानेने उंच भरारी घ्यायचे जो बळ देतो.. तो असतो त्याचा आणि तिचा संकोच!!!

-- अवनी गोखले टेकाळे

Thursday, May 25, 2023

तिचा सोनचाफा.. त्याच्या अंगणातला..!!

तिला आवडते म्हणून..का? तर फक्त तिला आवडते म्हणून..
त्या घराच्या सारिपटावर प्रत्येक दान तिला हवे तसे पडलेले..
नागमोडी वळण, टुमदार घर.. त्यांचे तिच्यावाचून अडलेले.. 
घराचे कौलारू छप्पर पण त्यांनी तिला हवे म्हणून घातलेले..
तिच्या अवखळ अल्लड स्वभावासहित आपलेसे मानलेले..

तिच्या आवडीचा सोनचाफा अंगणात आजही बहरतोय..
बकुळ थकलेला आता, फक्त तिची वाट बघत लगडतोय..
घरातील भिंतीत, परसात अजूनही तिचा श्वास घुमतोय..
त्या वास्तूचा वास्तूपुरुष आजही तिला तथास्तु म्हणतोय..

का? त्या घराने इतका जीव का लावला? अन् तिने घराला? 
का श्वास इतका गंधाळला? का गुंतत, रुतत, बहरत गेला?
ही जीवघेणी थट्टा का? कशासाठी? 
घराला तिची आस अजूनही.. 
तिला घराचे भास अजूनही..
माहित आहे तिलाही.. त्यांनाही..
पण..
हा पण आत खोल जिव्हारी लागलेला.. 
तिला रूतू नये काटा म्हणून गुलाबच लावायचा टाळलेला..
सख्या, ती हरू नये म्हणून डाव मांडायचाच रे तू टाळलेला..

आज..
तिचे पाय थबकलेले.. हात मळवट भरण्यात गुंतलेले..
तिचे प्राक्तन.. तिचे मूळ.. आता पैलतीरावर रुजलेले..
तरी.. ती अढळ.. ती सढळ.. 
ती डोळ्यातला एक चुकार ओघळ..
तिला आठवतेय अजूनही..
चिखल होऊ नये म्हणून अंगणात केलेली ती पन्हळ..

पूर्वी तिच्या स्वप्नातला राजकुमार होता तो.. 
"ते" होते त्याचे घर.. तिचे घर..तिची माणसं..

आता ती पैलतीरावर.. सुखात आहेच ती..
समाधानी.. कारण ती कर्तव्यात चुकली नाहीच.. 
आता तिला या वळणावर मागे बघायचे नाहीच..
आता नाते बदलले.. अर्थ बदलले.. काळ लोटला..
पुलाखालून आता खूप पाणी वाहिले..
आता तर .. तेही माहेरच वाटते तिला..
माहेरी गेल्यावर.. गावच्या गल्ल्यात फिरताना..
एकदा.. फक्त एकदा.. दुरून का होईना..
ते गोकुळ सुखात बघायची फक्त सुप्त इच्छा.. 
तिने लावलेल्या सोनचाफ्याला न्हाऊ घालायची इच्छा..
तो सुगंध ओंजळीत घ्यायचाय तिला फक्त एकदा.. 
त्या मातीला घट्ट मुठीत घ्यायचे आहे फक्त एकदा..
सगळ्या माणसांना डोळे भरून पाहायचे एकदा..
बयो नियती.. तिने शेवटचे श्वास घ्यायच्या आधी.. 
तिची शेवटची इच्छा ललाटावर कोरून ठेव बयो..
एकदा.. फक्त एकदा..!!!

-- अवनी गोखले टेकाळे


Sunday, April 9, 2023

निळसर पक्षी..

कधीचा, कुठेतरी हरवलाय.. आज एक पक्षी निळसर..
ती बावरलेली.. खुळावलेली.. सगळंच धूसर धूसर..
तिची आर्त तगमग, उलघाल.. त्याच्या विरहाचा असर..
डोळे मिटले तरीही, नजरेसमोर.. अवघे शून्य निळसर..

भिनलेले रवीतेज रोमारोमात,  अन् निळी सावळी बाधा..
तो मेघ श्यामल सखा तिचा अन् ती तर बावरली राधा..
नजरेची तहान शमेना तिच्या अन् तो पाणवठाच साधा..
अवचित अवतरला तो समोर अन् तिची उडलेली त्रेधा..

तो नसताना किती त्या शंका अन् किती ते अधीर बोल..
अन् आता तर.. भिनलेली नशा, अंतरंग खोल सखोल..
या अवनी च्या सारिपाटावर एक अचूक दान अनमोल..
त्या निळसर पक्षाच्या रंगाने, माखलेला अवघा खगोल..

तानपुऱ्यावर तिची भैरवी, तो तर बहरला निशिगंध..
ती थरारणारी लतिका अन् त्याचा उन्मत्त राकट बंध..
ती आज तलम शांभवी, त्याची नशा हुकमी मुक्तछंद..
पळभर विरह सोसवेना, कसा हा निळसर पक्षी बेधुंद..

-- © अवनी गोखले टेकाळे



Friday, April 7, 2023

वडाचे झाड..

ग्रिष्माचे चटचटते, रखरखते ऊन..
अन् तिच्या समोर एक वडाचं झाड.. 
प्रगल्भ, निर्मळ, डेरेदार, बहरलेलं..
पारंब्या खोल रुजलेलं वडाचं झाड..

तिही मग्नच.. तिच्या धुंदीत गुंगलेली..
फक्त सावलीच्या आशेने विसावलेली..
क्षणभर थबकली.. उलघाल थांबलेली..
अन् तिचा आधार झालेलं वडाचं झाड..

एका चुकार क्षणी एक भोळी भक्कम पारंबी..
कानात बोलून गेली तिच्या, एक दुःख कुसुंबी..
पारंब्या, पांथस्थ, पाळामुळांना सावली देणारं..
अविरत उन्हात तगमगणार.. एक वडाचं झाड..

ती कुठेतरी कमी पडलेली त्याला जाणून घ्यायला..
उशीर झाला.. दोघांचा सूर्य एकच..हे समजायला..
तिला वेळेत कुठे कळतच नाही.. कधीच.. काहीच..
वरून डवरलेलं.. पण पिवळ्या मनाचं, वडाचं झाड..

त्याला सावली द्यायची तिची झेप नाहीच.. ती आरक्त..
सावलीतून बाहेर पडायला ती थोडीशी सरकली फक्त..
दोघांवर ऊन तेच आता.. समांतर चालायचे ठरवले सक्त..
तिने हिमतीने, चुकार फुंकर मारायचे ठरवले. बंधमुक्त..

बयो नियती.. बळ दे तिला.. आणि त्यालाही..
एकमेकांचा दाह समांतर राहून शमवण्याची..
हिंमत दे माय.. बळ दे..  तिला आणि त्यालाही..

तिच्या फुंकरेने त्याची तगमग कमी होईल??
का त्याच्या सावलीने तिची धग कमी होईल??
फुंकरीने सुखावणारे निखळ हसरे वडाचे झाड??
का तिला सावली देणारे भक्कम वडाचे झाड??

-- अवनी गोखले टेकाळे


Tuesday, April 4, 2023

तो.. ती आणि कॉफी..

कॉफी इतकी कधी आवडायला लागली तुला?
नजरेनेच..त्याने विचारलेच शेवटी आज तिला..

कॉफी ची गरम वलये चष्म्यावर.. धुरकट सगळेच..
काढूनच ठेवला मग चष्मा.. मग तर आणखीनच.. 
धुरकट सगळेच..  
कॉफी चा रंग अवघ्या चार डोळ्यात उतरलेला..
एवढे पुरेसे नाही का? एक कॉफी आवडायला.. 

तो हसला नकळत.. खळखळून, निर्मळ, निरागस..
तिही लाजली नकळत.. मनातून, सोज्वळ, राजस..
धुरकट सगळेच..
दिसतोय कॉफी चा घोट घशातून पोटात विरघळताना..
अन् चिरणारे जी मौन पुरेसे त्यांना.. कॉफी सोबत पिताना..

चहा चा बहर तरुणाईची आठवण करून देणारा..
कॉफी चा मोहर प्रगल्भतेची साठवण करून घेणारा..
धुरकट सगळेच..
गरम कॉफी त्यांच्या नजरेनेच पिऊन घेतलेली..
कपामधली वस्तू तशी.. पोरकीच, थंडावलेली..

हिरवे गुलाबी मन.. अन् मनभर पसरलेले मोरपीस..
नजरेनेच घायाळ.. दोन जीव अवघडले कासावीस..
धुरकट सगळेच..
अजूनही कॉफी ची "चव" आवडत नाहीच तिला..
पण "कॉफी" प्यायला आवडायला लागलंय तिला..

-- अवनी गोखले टेकाळे 

Friday, March 17, 2023

राखाडी जाणिवा..!!!

तिची भिरभिरणारी नजर अस्थिर..त्याची करारी नजर स्थिर..
तिच्या डोळ्याखालचे काजळ त्याच्या राखाडी नेत्रात.. 
त्याच्या गालावरची खळी तिच्या स्वप्नातल्या चित्रात.. 
तिने घेतलेला खोल श्वास.. 
त्याने घेतलेला अबोल ध्यास..
तिच्या गळ्यातून तळपायात उतरत जाणारा आवंढा..
त्याच्या नजरेचा पडत चाललेला राखाडी वेढा..
जाणवत राहते खूप काळ.. भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!

तिच्या मनात घातलेला मोरपिशी रंगाचा पिंगा..
नकळत त्याच्या वस्त्रांवर चितारलेला..
तिच्या गालावर घातलेला गुलाबी रंगाचा दंगा..
त्याच्या अनवट राखाडी नेत्रांवर मंतरलेला..
मनभर पसरलेले मोरपीस अन् रंगपंचमी चे उधाण..
देवघरात मंतरली, चंदन उगाळून झिजली सहाण..
जाणवत राहते खूप काळ.. भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!

त्याची राखाडी दाढी.. त्याचे राखाडी केस..
त्याच्या राखाडी नजरेची तिला पडलेली वेस.. 
कसले हे भास? कसले आभास?
मुरल्या सावळ्या नात्याची नवी राखाडी रास..
त्या गुंतलेल्या, चिवट, न विरणाऱ्या उणिवा..
का मोहरणाऱ्या, थरारणाऱ्या राखाडी जाणिवा..
जाणवत राहते खूप काळ.. भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!

त्या सटवाई ने कोरले आहे कधीच..
त्या सावळ्याची ती राधा आधीच..
त्याच्या भाळावर तिचे नाव..
तिच्या तळव्यावर त्याचे गाव..
फाल्गुनात भरून आलेले आभाळ..
अन् अवचित पालवी फुटलेला माळ.. 
जाणवत राहते खूप काळ..
भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!


-- © अवनी गोखले टेकाळे 

Tuesday, January 10, 2023

सुप्रभातम..!!

एक गाव. समुद्राकाठी. आपलं वाटणारं. नागमोडी रस्त्यांचं. माडाच्या बनांच. प्रत्येक रस्त्यावर ओळखीचं कोणी साद देईल असं. एक गाव. शांत निवांत. एक पण वाहन नाही. वर्दळ नाही. गोंगाट नाही. आवाज नाहीत. 
अचल. अढळ. निश्चल. एक गाव.
त्या गावात एक उतरत्या छपराच कौलारू घर. त्या घराच्या पाटीवर आपलं नाव. One bhk. two bhk. three bhk. अशा हिशोबात न बसणार घर. master bedroom, kid's room, guest room असलं नाहीच काही. तिथली व्याख्या वेगळीच. ओसरी. पडवी. परसदार. अंगण. वाडी. माजघर. कोठीघर. न्हाणीघर. देवघर. प्रत्येक गोष्टीसाठी एक "घर". घराच्या मागे वाडी. भली मोठ्ठी. आंबा, नारळ, पोफळ, अननस, काजू. आणि वाडीतून चालत शेवटच्या टोकाला पसरलेला घरातलाच असलेला अथांग समुद्र. 
हे सागरा. पहाटे च्या तीन वाजता अवचित आलेली जाग. सहज म्हणून काळोखात तुझ्या काठी पोचायचा पावलांचा प्रयत्न. निर्विकार शून्य. की विराट दर्शन. शेष ही तूच. अनंत ही तूच. डोळे मिटून फक्त ऐकत राहिलेली तुझी गाज. तुझी साथ. तुझ्याशी बोलायचे नाही काही. तुला ऐकायचे पोटभर. पुरते तेवढेच. एक लाट. दुसरी. तिसरी. आठवी लाट सगळ्यात मोठी. भरती कडे घेऊन जाणारी. परत एक लाट.
तूच तो. अगस्तीन्नी गिळलेला. तूच तो. सरीतेला भिडलेला. तूच तो. शशांकाकडे पाहत उसळलेला. तूच तो. नारळी पौर्णिमेला उधाण आलेला. तूच तो. ज्याला बघून स्वातंत्र्यवीरांचा प्राण तळमळला. तूच तो. ज्याने स्वतः ला घुसळून मंथन घडवून आणले. तूच तो. नरहरी आणि श्री लक्ष्मी यांना आसरा द्यायची ताकद असणारा. तूच तो.  
लाटा मोजता मोजता दिसली की उजेडाची एक तिरीप. हे व्यंकटेशा. तुझ्याच दारी येऊन तुलाच सुप्रभात म्हणायचे भाग्य. अजून काय पाहिजे. उत्तिष्ठ.
कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते!
उत्तीष्ठ नरशार्दुल कर्तव्यम् दैवमान्हीकम्!!



Wednesday, November 16, 2022

आरक्त..!!

पाच चाळीस चा त्याचा अलार्म..
पाच मिनिट त्याचा स्नुझ चा चार्म..
मोजून पाच मिनिटातच उरकायची..
उरली स्वप्न गोळा करून ठेवायची..
इतके वर्ष हे रोज असंच घडणार..
रोज तो अचूक सात सतरा पकडणार..
यंत्राने गुरफटलेला यांत्रिक तो..
मांत्रिक? त्याला कुठे आहे का जागा? 
त्याचे त्यालाच अजून माहित नाही..
तसे तर त्याला बरेच काही माहित नाही.. 

बापाने तुळशी च्या लग्नाला गावी बोलावले..
बाळकृष्ण सोबत याला पण बोहल्यावर चढवले..
याच्या आयुष्यात फार फरक नाही पडला..
डबेवाला जाऊन घरचा डबा हातात पडला.. 

आज परत एकदा तेच रहाट गाडगे..
रोजचे तेच वाटेतले खाच खळगे..
पाच चाळीस चा त्याचा अलार्म..
पाच मिनिट त्याचा स्नुझ चा चार्म..
पण तरी..!!
आज पहिल्यांदा लेट मार्क लागला..
आमचा गडी आज धक्क्याला लागला..
निघालाच होता आजही वेळेत..
पण तरी..!! 

आज त्याने पहिल्यांदाच मागे वळून पाहिलेले..
अवघे नभांगण त्याच्या समोर अवतरलेले..
डोळा भरले काजळ तिच्या देहभर पसरलेले..
अंगांगात रोमारोमात चांदणे बहरलेले..
मांत्रिकाने आपले जाळे अचूक फेकलेले.. 

तिची आर्त, निश्र्चयी, नजर सक्त..
तिने नजर उचलून पाहिले फक्त.. 
आरक्त...!!!

Monday, October 17, 2022

तू कधीतरी ये अशी.. !!

तू कधीतरी ये अशी.. 

तळहातावरची रेष बनून.. टाईम प्लीज म्हणणाऱ्या मुठीवरचे शेष बनून.. तू कधीतरी ये अशी..

भरतकामा मधली एकसंध साखळी बनून.. ते करताना उमटणाऱ्या गालावरची खळी बनून.. तू कधीतरी ये अशी.. 

सारीपाट मांडताना फोडलेला चिंचुका बनून.. तो खेळताना झालेल्या गोड चुका बनून.. तू कधीतरी ये अशी.. 

अवकाळी पावसा नंतरचा गारवा बनून.. त्या गारव्यात बहरलेला मारवा बनून.. तू कधीतरी ये अशी.. 

पालवी फुटलेला चैत्र बनून.. त्या चैत्रातले मैत्र बनून..  तू कधीतरी ये अशी.. 

कुठवर शोधू तुला.. तू तर क्षितिजापार गेलीस सखे.. 

बयो कविते.. तू कधीतरी ये अशी..

त्या मोरपंखी दिवसांची आठवण बनून.. त्या लिहिलेल्या ओळींची साठवण बनून.. एकदा.. फक्त एकदा.. भेटायला येशील परत? 

तू कधीतरी ये अशी..!!

-- अवनी गोखले टेकाळे


Wednesday, September 28, 2022

वेल्हाळ .. शब्दाचे रसग्रहण

वेल्हाळ. 

शब्दाची पहिली ओळख. न कळत्या वयात आरती म्हणताना तोंडात बसलेले महादेवाचे समर्थांनी केलेले वर्णन. ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. पण आरत्या समजून घ्यायच्या आत पाठ होतात. आणि एकदा पाठ झाल्या की अंगवळणी पडतात. अर्थ सुंदर असूनही उलगडायचे राहून जाते बऱ्याच वेळा...!!

शब्दाची खरी ओळख. जैत रे जैत. असं एखाद पाखरू वेल्हाळ. ना धो महानोर यांनी ओळख करून दिलेला आणि स्मिता पाटील हिने पडद्यावर प्रत्यक्ष अर्थ उलगडून दाखवलेला. अजून काय पाहिजे. साध्या रुक्ष वेडा या शब्दाला लडिवाळ रूप मिळाले ते इथे. उडणाऱ्या चिमण्यांपेक्षा आणि पळणाऱ्या कोंबड्यांपेक्षा या वेल्हाळ पाखराने आम्हाला तरी जास्त नादावले खरे. अनेक वर्षांनंतर सुधा ऐकावेसे वाटते, पहावे वाटते आणि लिहावेसे वाटले यातच सगळे आले. असो. ज्याची त्याची आवड...!! 

खूप वर्षानंतर या शब्दाला परत जिवंत केले ते सविता दामोदर परांजपे मधल्या वेल्हाळा गाण्यात. कालिंदी च्या तटावरी.. येशील रे.. वेल्हाळा!!.  वैभव जोशी चे कातर शब्द आणि पडद्यावर साक्षात सुबोध भावे. शब्दाचा अर्थ समजायला अजून काय पाहिजे. वेल्हाळा.. तुला पाहते रे..!!

आज इतके विचार यायचे कारण दोन दिवस झाले चित्रचारोळी साठी एक चित्र डोक्यात बसले. त्यात हा शब्द वापरायचा आहे. पण आमच्या अडाणी डोक्याची मजल वेल्हाळ ला पाल्हाळ चे यमक जोडण्या इतपतच. त्यामुळे यमक काही जुळेना. पण त्या नादात या शब्दाभोवती पिंगा घातला गेला हे ही नसे थोडके..!!

-- अवनी गोखले टेकाळे

Thursday, August 18, 2022

उर्वी ची गोष्ट..

उर्वी. रोज भेटायची सकाळी. आठ तेवीस लोकल ला. कायम कुठल्या तरी टेन्शन मध्ये. चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. कधी ऑफिस च टेन्शन.कधी घरातलं. कधी जाता जाता भाजी घेऊन जायचं डोक्यात. कधी मुलीला ताप आलेला असताना सुट्टी मिळाली नाही म्हणून अर्ध लक्ष घरात ठेऊन निघायला लागायचं. एक ना दोन. घर म्हणाल्यावर शंभर गोष्टी चालू. घड्याळाच्या काट्यावर घरातले आवरून धावत पळत एकदा आठ तेवीस पकडली की गंगेत घोड न्हायल. मग ती सुटकेचा श्वास सोडायची. त्या गर्दीत. घुसमटलेला. तरीही मोकळा श्वास. आणि मग हमसून हमसून रडून घ्यायची. का रडू यायचं ते तिला पण नाही कळायचं. आम्ही रोज बघायचो. कधी विचारायचो. कधी पाणी द्यायचो. कधी नुसते हसायचो तिच्याकडे बघून. आधार द्यायचो.
तिला वाटत राहायचं. कशा या मुंबई च्या बायका. इतकी धावपळ करून पण टापटीप. नीटनेटक्या. कायम हसऱ्या कशा काय राहू शकत असतील. तिला आठवायच. तिचं गाव. रत्नागिरी जवळ च छोटंसं गाव. तशी कष्टाची सवय होती तिला. मेहनती, काटकसरी. टुकीने घर चालवणारी. ती गावाकडे असताना कशी होती. उत्साही. हसतमुख. सणवार गाणी म्हणत हसत खेळत करणारी. प्रसन्न. वक्तृत्व स्पर्धेत नंबर एक. निबंधात नंबर एक. गाण्यात नंबर एक. लग्न ठरलं. मुंबईची फॅमिली. गिरगावातल्या जुन्या वस्तीत सासर. मुंबई मध्ये नोकरी ही एक स्वतंत्र संस्था. पायाला भिंगरी लागलेलं आयुष्य. ही मुंबईची धावपळ नशिबी आली आणि सगळं बंद पडलं. हौस मौज. घड्याळाच्या काट्यावर चालणारी बाहुली झाली तिची. परत एक हुंदका अनावर झाला तिला. 
या सगळ्या गडबडीत एक दिवस ट्रेन मध्ये मोबाइल बघता बघता, तिला ऑनलाईन होत असलेल्या एका लेखकांच्या स्पर्धे बद्दल कळलं. आणि तिनी हिम्मत करून नाव नोंदवलं. बास! एक छोटीशी घटना पण तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. स्पर्धेसाठी कथा लिहायची म्हणाल्यावर ती ट्रेन मध्ये त्या दृष्टीने विचार करू लागली. तिथेच उभ्या असलेल्या तिच्याच डब्यात तिला रोज भेटणाऱ्या मुली तिच्यासमोर कथेतले एक एक पात्र बनून फेर धरू लागल्या. ती निरीक्षण करायला लागली. Footboard वर उभी राहणारी, तरीही मस्त मजेत वाऱ्यावर केस भुरुभुरू उडू देणारी श्वेता. रोज ट्रेन मध्ये भाजी निवडणाऱ्या सुलक्षणा काकू. उतरायच्या एक स्टेशन आधी पासून केस सारखे करून, मेक अप करून मग टापटीप ऑफिस ला जाणारी HR department head प्रिया. पाचवा महिना लागलेली, खिडकीत राखीव सीट पटकवलेली स्नेहल. या सगळ्यांशी गप्पा मारून त्यांच्यासाठी नवीन नवीन कानातले गळ्यातले विकायला घेऊन रोज त्याच ट्रेन मध्ये येणारी छोटी बिझिनेस वाली लक्ष्मी. ताजे मासे विकायला आणणाऱ्या कामत काकू. आणि सगळ्यांना सुगंधाने बांधून ठेवणारी सोनचाफा आणि मोगऱ्याचे गजरे विकणारी चंपा. अशा कितीतरी बायका तिचेच प्रतिरूप घेऊन तिला भोवती फिरताना दिसायला लागल्या. 
या प्रत्येकीला निरखून बघताना तिला जाणीव व्हायला लागली. तिच्या सोबत अशा खूप बायका आहेत. ज्यांचे आयुष्य घड्याळाला बांधले गेले आहे. तरीही त्या आनंदात जगत आहेत. तिची घुसमट हळू हळू कमी व्हायला लागली. हळू हळू ती या सगळ्याचा आनंद घ्यायला लागली. प्रत्येकाशी संवाद साधू लागली. सुखदुःख वाटून घेऊ लागली. एकीकडे तिची कथा उमलत चालली होती. शाळेत वकृत्व देताना आत्मविश्वासाने उभी राहणारी उर्वी तिला परत सापडायला लागली होती. तिच्या कलेने तिला जगण्यातली गंमत परत एकदा उलगडून दाखवली होती. रोज ती ऑफिस ला जाताना एक भाग लिहायची. परत येताना तोच भाग व्याकरण तपासून सुधारून घ्यायची. असे करत करत तिची दीर्घकथा आकार घ्यायला लागली. आणि तिच्यातली उर्वी नावासारखी पूर्णाकार घेऊ लागली. कधी चंद्राच्या शीतल छायेत. कधी सूर्याच्या प्रखर किरणात. कधी कोसळणाऱ्या श्रावण सरींमध्ये. सोनचाफा, त्याचा घमघमाट तिला मोहून टाकू लागला. हळूहळू रमली ती. संसारात. मुंबईत. ट्रेन च्या विश्वात. 
नियती नियती म्हणतात ती काय असते? एक वीत फक्त. मनगटात असलेली ताकद. तिथून ती तळहातावर येते. त्यावर असलेल्या रेषा. त्यातून ती अडखळते. ठेचकाळते. दुखावते. सुखावते. नाचते. गाते. बागडते. आणि मग ती अजून थोडी पुढे येते. हाताच्या बोटांचा मोर करून त्यात पकडलेली तिची लेखणी त्यात जाऊन विसावते. तिची ताकद. तिचा आनंद. तिचे सृजन.
तळहातावरच्या च्या रेषांमध्ये धावताना तिने शोधली तिची कला. जोसापली तिची आवड. आणि ती भरभरून हसली. दिलखुलास. मोकळेपणाने. आता ती सज्ज झाली. आवाहनांना तोंड द्यायला. तिची कथा मालिका तर पूर्ण झालीच. आणि तिनी पुढची लेखमाला लिहायला घेतली नकळत पणे. जगण्यातले कलेचे महत्त्व..!! 

-- अवनी गोखले टेकाळे 

Saturday, July 16, 2022

शांता प्रिया - ताई आत्या!!!

झाडांना पाणी घातले. थोडी कोरडी चटणी करून ठेवली. थोडे अध्ये मध्ये नातवंडांना खायला लाडू करून ठेवले. बरीचशी तयारी होत आली. चला आता जायला हरकत नाही. ही काही ट्रीप ला जायची तयारी नाही बरं. तिला जायचे होते केमो साठी. मग आल्यावर थकवा येतो. जास्त काही करणे होत नाही. नवरा, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडं सगळे भरपूर करतातच व्यवस्थित. भरपूर काळजी घेतात. पण इतके वर्षाची सवय. ती कुठे चैन पडू देते. म्हणून ही लगबग. पूर्वीच्या बायका म्हणायच्या तसे, नेटका आणि टुकीने संसार केला तिने. ती. आमची थोरली आत्या. ताई आत्या. 

काही व्यक्ती शांत बसल्यावर निवांत असताना आपसूक डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात. अगदी प्रसन्न व्यक्तिमत्वा सहित. शांता आत्या अशीच. एक नाव शांता आणि दुसरे प्रिया. दोन्ही नावे समर्पक. अशीच उभी राहते ती डोळ्यासमोर. चैत्र गौरीसारखी. छोटीशी. गोरी पान. चिरतरुण. गालावर उठून दिसणाऱ्या खळीचा आयुष्यभर पुरेपूर वापर केला तिने. सतत पोट धरून हसत असायची. आणि समोरच्याला पण तेवढेच हसवायची. कानात रिंगा. छोटासा पोनी टेल. चापून चोपून नेसलेली साडी. आणि कपाळावर ठसठशीत टिकली. लगालगा चालायची. रेंगाळलेली सुस्तावलेली चाल कधीच पाहिल्याचे आठवत नाही. पुलं चे म्हैस मधले सुबक ठेंगणी चे केलेले वर्णन ऐकून नेहमी वाटायचे आत्या तरुणपणी अशीच दिसत असेल बहुतेक.

आजारी असताना शेवटी नाकात नळी घातलेली. सलाईन लावलेले. तर त्यावर पण "ही आमची हत्तीची सोंड येते ना मध्ये मध्ये." म्हणत खो खो हसत आपलाच आजार हलका फुलका करण्याची कला कुठून अवगत झाली असेल तिला? मागच्या वर्षी केमकर काकू भेटलेल्या. त्यांनी आत्या ची सांगितलेली आठवण म्हणजे बेड वर असताना शेवटच्या दिवसात रस्त्यावरून जाणाऱ्या काकूंना आवाज देऊन "आमच्या आळूची बागेतली पाने वाढलेली दिसतायत हो भरपूर. घेऊन जा थोडी जाता जाता वड्या करायला" असा आवाज देणारी आत्या. इतकी ती एकजीव झाली होती त्या वास्तूत. 

आत्या आठवते तिच्यासोबत बंगला आठवतो. आम्ही कायम राहायला जायचो ते आठवते. हौद आठवतो. नारळाची झाडं आठवतात. तारेचे कुंपण आठवते. नवीन खोली वाढवल्यावर बांधलेला तिथला कठडा आठवतो. गच्ची आठवते. आणि या प्रत्येक ठिकाणी तिचा असलेला प्रसन्न वावर आठवतो. सुमेध दादाचे लग्न आठवते. तेव्हा खेळलेले जजमेंट आणि त्याचे पॉइंट्स अजून माझ्या शाळेच्या एका वहीच्या मागच्या पानावर आहेत. ती वही मध्ये सापडली आवरा आवरीत आणि आठवणी त्याच्या सोबत. आत्या, काका, दादा, वहिनी सगळ्यांसोबत केलेल्या ट्रीप आठवतात. दिवे आगर ला प्रिया ताक रुचकर आहे ग थोडेच घे, तुमच्याकडे कोकण असून नारळ थोडा कमीच घालतात का म्हणणारे काका. आई उंदीर म्हणत रात्री दचकून उठलेला सुमेध दादा. एकावेळी दोन फुल सुजाता मस्तानी खायची आत्या. वरती म्हणायची धर्मेंद्र म्हणता आले नाही पाहिजे इतकी जीभ आईस क्रीम ने जड झाली पाहिजे. आणि पोट धरून हसायची. भरभरून जगणारी आत्या आठवते.

माणसाची श्रीमंती कशावरून ठरत असेल? या प्रश्नाचे उत्तर आत्या गेली त्या दिवशी मिळाले. स्मशान भूमीत गेल्यावर बाहेर दुसरीच एक अंत्ययात्रा होती. आपण कोणाला काही बोलू नये. वेळ कधी कशी येईल काय सांगावे पण जेमतेम चार दोन माणसे. विधीला आवश्यक तेवढीच. तिथून आतल्या भागात गेलो. आत्या होती तिथे. भलामोठा हॉल गच्च भरून. माणसाला माणूस चिकटून. जागा नसलेले बाहेर थांबलेले. या दोन विरोधी दृश्यात जगाचे अंतिम सत्य कळले. त्या क्षणी आत्या जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होती. भरभरून प्रेम करणाऱ्या तिच्या गोतावळ्यात ती सुखी समाधानी होती.

तशी आठवण खूप वेळा येते. अश्विन च्या लग्नात प्रकर्षाने येत होती. प्रत्येकालाच. आत्या हवी होती. नातवाचे लग्न बघायला. नवीन पिढीचे पहिले लग्न. ती फुलाफुलांनी सजवलेली झालर बघून आत्याने एखादा खतरनाक डायलॉग मारला असता आणि आपण आजे सासू होणार आहोत हे विसरून पोट दुखेपर्यंत हसत राहिली असती. खरंच त्या दिवशी आत्या पाहिजे होती. मन भरून आशीर्वाद द्यायला. सुचेता ताई, अरविंद काकांसोबत त्यादिवशी आत्या हवी होती. 

आठवणी खूप आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा प्रश्न रामदासांना पडला कारण तेव्हा आत्या नव्हती त्यांच्या समोर. तिचे ते पोट दुखेपर्यंत प्रसन्न हसणे पाहून त्यांना असा प्रश्नच पडला नसता. कदाचित एक मनाचा श्लोक कमी असला असता ग्रंथात!!!

*************

ता. क. 
लिखाणात सुसूत्रता, बांधणी नेहमी पेक्षा कमी पडली असेल कदाचित. जसे डोळ्यासमोर येत गेले तसे लिहित गेले. मध्येच नुसतेच विचार करत बसले. परत थोडे लिहिले. म्हणून पण असेल कदाचित. 



Friday, July 8, 2022

ढगाआड च मुक्काम त्याचा..

या पावसाळी सकाळी 

संदेश येईच ना "त्याचा"

ती उर्वी सुस्त निद्रिस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


या पावसाळी सकाळी 

साहवेना दुरावा त्याचा 

उदयाविनाच त्याचा अस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


या पावसाळी सकाळी 

आषाढ साजरा त्याचा 

आसमंतात उधळला हस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


या पावसाळी सकाळी 

थेंबोथेंबी भास त्याचा 

इंद्रधनू उमटता मस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


-- अवनी गोखले टेकाळे 


ता. क. "तो" म्हणजे कोवळ्या उन्हाचा कवडसा.  


Saturday, June 25, 2022

महालक्ष्मी

महालक्ष्मी आवाहनाचा दिवस. घरची महालक्ष्मी साजरी होऊन थटून तयार. आवाहन करायला सज्ज. सोबत तिच्या नवरा, मुलं, सुना, नातवंड सगळेच. गोकुळात समाधानी ती. अहेवपणाचे लेण लेऊन सज्ज ती. ठसठशीत मळवट भरल्यासारखे गोल कुंकवाचे रिंगण कपाळावर. थकवा आहेच तिला थोडा आजही. आजच काय. गेल्या वर्षांपासून वाढतच जाणारा थकवा. पण वर्षातला सगळ्यात मोठा सण. महालक्ष्मी जेऊ घातल्याशिवाय चैन कसे पडावे. तशाही परिस्थितीत प्रसन्न मुद्रा. सण पार पाडण्याची जिद्द. कोथळ्यात गहू, ज्वारी भरून तयार. मखर तयार. चौक तयार. कोथळ्यांना साडी नेसवून तयार. पिलवंड तयार. पावले काढून तयार. मुखवटे परातीत घालून तयार. पूजेची तयारी तयार. तिने सूनांसोबत लक्ष्मी चे आवाहन केले. हळद कुंकू वाहिले. उखाणे घेतले. ती या घरची लक्ष्मी. आज महालक्ष्मी चे आवाहन.

महालक्ष्मी जेवायचा दिवस. घरच्या महालक्ष्मी ची तब्बेत खालीवर. श्वास थोडा थोडा. जीव थोडा थोडा. घर लेकी बाळी, मुलं, सुना, नातवंड यांनी भरलेले. सगळ्यांची लगबग. सुनांचा सोवळ्यात स्वयंपाक चालू. पुरुष मंडळींची पूजेची तयारी. तिचा जीवन साथी. तिच्यासोबत हातात हात धरून. होणार. आजची जेवणं सुरळीत पार पडणार. तिने आज काहीच खाल्लेले नाही. पाण्याचा घोट पण नाही. कुठल्याशा शक्तीला तिची विनवणी चालू. होणार. यथासांग कुलाचार होणार. ती खुणेने विचारत आहे. कुठपर्यंत आले. होतच आले. आता पुरण वरण तयार. खीर कानवला तयार. कढी आमटी तयार. पापड भजी तयार. सोळा भाज्या पाच कोशिंबिरी तयार. बस होतच आले. नैवेद्याची पानं घेतली वाढायला. पूजेची तयारी कुठवर. वस्त्रमाळा तयार. दुर्वा फुले तयार. वाती फुलवाती तयार. पूजेला सुरुवात. आरती. नैवेद्य. 
तिचा जीव अजून थोडा थोडा. बोलायची शक्ती थकलेली. खुणेने विचारणा. सवाष्ण बसली का जेवायला. होणार. यथासांग कुलोपचार होणार. सर्व घरदार मनाने तिच्यासोबत. पण तिच्या निग्रहामुळे देहाने कुलोपचार पार पाडण्यात. सवाश्ण आली. पान सजले. रांगोळी सजली. गोविंद विडा, दक्षिणा ठेवली गेली. गजरा. ओटी. पद्धतशीर. तिच्या इतमामात साजेल असे. ती या घरची लक्ष्मी. आज महालक्ष्मी चा महानैवेद्य. 

महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस. पटापट गाठी घेतल्या. हळद कुंकू वाहिले. सगळे घरदार, गणगोत तिच्या भोवती. ती तृप्त. तिची प्रवासाची तयारी पूर्ण झालेली. आता मात्र तिची लगबग. आता घाई करायला हवी. आता थांबून चालणार नाही. तिच्या पुण्याई च्या जोरावर त्या शक्तीने थांबवून ठेवलेले घटिका पात्र भरत आले आता. त्या अनामिक शक्ती ला तिचा शेवटचा दंडवत. सगळ्या गोताला प्रेम, आशीर्वाद, दंडवत. दारात आलेल्या अतिथी ला अजून किती ताटकळत ठेवणार. अतिथी देवो भव. यावेळेस तर अतिथी साक्षात...!!! 
काल पासून अन्न पाणी त्यागलेल्या तिने अखेरचा श्वास सोडला. त्या अतिथी च्या शक्तीत ती एकरूप झाली. घरची लक्ष्मी महालक्ष्मी मध्ये विलीन झाली. विसर्जित झाली. तिच्या मनाप्रमाणे यथायोग्य कुळाचार झाला. समाधान पावली ती. भरून पावली. अहेवपणी चुडा मळवट भरून निघाली ती. ती या घरची महालक्ष्मी. आज महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस. घरचे सर्व या महालक्ष्मी च्या चरणी नतमस्तक!!!!!

Thursday, June 23, 2022

"अ"लक का लक

मनाच्या तळाशी काहीतरी ढवळून निघत. आणि मग ते कागदावर उतरतं. ते खरं लिखाण. ते भिडत समोरच्याला जाऊन. ते कागदावर उतरताना कधी, कसं, काय रूप घेऊन व्यक्त होईल याची लिहिणाऱ्या व्यक्तीला शेवटचा शब्द लिहून होई पर्यंत शाश्वती नसते. इतकं साधं सरळ सोप असावं. 

आर्त आणि हेलावून टाकणारे काहीतरी हमखास कवितेचे रूप घेऊन येते. पक्की बांधणी असलेले विचार लेखाच्या स्वरूपात येतात. कधी खूप मोठी गोष्ट लिहाविशी वाटते. सुरू होते, होते पण एका भागात संपतच नाही. त्यातल्या पात्रांशी आपण समरस व्हायला लागतो. आपसूक त्याचे एकामागे एक भाग लिहिले जातात. आणि दीर्घकथा होते. लेखणी वर प्रभुत्व मिळाले, कमीत कमी शब्दात अचूक आणि मोठा आशय पोचविण्याची कला अवगत झाली की मग अलक जमून येते. हे सगळे इतके सहज सोपे नैसर्गिक असावे. ओढून ताणून अट्टाहासाने लिहिलेले वाचकाच्या मनाचा ठाव नाही घेऊ शकत. सुगरणीने लोणचे पण घालून बघावे आणि घरी पिझ्झा पण करून बघावा. तसे लेखकाने सर्व लेखन प्रकार हाताळून बघावेत. पण त्यात सहजता असावी. जशी कवितेत गेयता असावी तशी लेखातही लय असावी. ती येते फक्त सातत्य टिकवल्याने. 

रोज जगा. रोज अनुभव घ्या. रोज लिहा. लिहिलेले किमान शंभर वेळा स्वतः वाचा. काना, मात्रा, वेलांटी, व्याकरण, शब्द रचना. आणि मग पूर्ण चिरफाड स्वतः केल्यावर मग इतरांना वाचायला द्या. आपण घराबाहेर पडताना आरशात मागून पुढून बघतोच ना. तसेच असते हे. उगाच सगळी घाई गडबड लिखाणात चांगली नाहीच पण वाचायला देताना तर अजिबातच नाही. 

लिखाणाचा मूळ गाभा दोन भागात असतो. एक आपल्याला आलेले अनुभव. आणि एक म्हणजे आपण वाचलेली पुस्तके. या दोन्हींची छाप आपोआप आपल्या लिखाणात पडते. ती तशीच पडू द्यावी.  बरेच लिहिणारे शून्य वाचन करतात. ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. दुसरे म्हणजे विषयाचे वैविध्य. त्यासाठी स्वतः ला कष्ट करून तसे अनुभव गाठीशी घ्यायला लागतात. मग ते आपसूक उतरतात लेखणीतून. आणि मग अशा वैविध्यपूर्ण लिखाणाला स्त्री, पुरुष, लहान थोर सर्व वयोगटातला वाचकवर्ग आपसूक मिळतो. 

सगळे मोठ्या मोठ्या भाग वाल्या दीर्घ कथा लिहितात तर आपण पण तेच केले पाहिजे असे नाही. सगळे अलक लिहितात म्हणून आपण लिहिले पाहिजे असे नाही. आपले विचार मुक्तछंद उतरू द्यावे एका लयीत. आपल्या ठसक्यात, आपल्या बाजात, आपल्या शब्दात. असे लेख चोरता येत नाहीत. कारण त्यावर आपल्या शैली चा कॉपीराइट असतो. जसे कौस्तुभ केळकर यांचे लेख. पहिल्या वाक्यात कळून जाते हेच ते नगरवाला. छोटी छोटी वाक्य आणि नावीन्यपूर्ण विशेषण वापरलेली. मग खाली नाव लिहा नाहीतर नका लिहू छाप पहिल्या वाक्यात त्यांनी सोडलेली असते. तीच तऱ्हा सोळा डबे वाल्या म्हाळसा कांत यांची. पहिल्या वाक्यात कळते हे प्रशांत कुलकर्णी.

अशी शैली निर्माण करायला खूप चिकाटी लागते. सातत्य लागते. शब्द संपदा. आणि लागतो तो सरस्वती चा वरदहस्त. या साहित्य दिंडीचे आपण सर्वच वारकरी. कोणाला नावे ठेवण्याचा हेतू नाही. मी कोणी लेखक पण नाही. पण वाचक म्हणून काय वाचायला आवडेल याचा अभ्यास पक्का असलेली एक वाचक म्हणून थोडे लिहिले एवढेच. 

-- अवनी गोखले टेकाळे  






Wednesday, June 22, 2022

काय मग, ठरवलं का?

पाऊस बरसायचा आवेगाने
का ओथंबून यायचं नुसतं
काय मग, ठरवलं का?

उधळायचे रंग कुंचल्याने
का चित्रच व्हायचं नुसतं
काय मग, ठरवलं का?

छेडायची तार तानपुऱ्याने
का ऐकत राहायचं नुसतं
काय मग, ठरवलं का?

घेराव वादळ वाऱ्याने
का वल्ह मारायचं नुसतं
काय मग, ठरवलं का? 

बेभान होऊन ध्यासाने
का निपचित कलेवर नुसतं
काय मग, ठरवलं का?

-- अवनी गोखले टेकाळे