आयुष्यातला एक मोठा प्रश्न.. त्याचे उत्तर असे शोधावे कोणीतरी? ते पण "त्याने".. ती मोहरुन गेली.. थरारली.. अचानक त्याच्या आवाजातून.. त्याच्या बोलण्यातून.. तिला ते जाणवलं.. जे तिला इतक्या दिवसात कळलं नव्हतं.. त्याच्या आवाजातला कंप तिला सगळ काही सांगून गेला.. आणि तिला एक एक संगती लागायला लागली..
तसा तो आवडायचा तिला.. पण हे फक्त तिच्या मनाला माहित होत.. उंच, गोरा, घारा, सरळ नाक आणि राखाडी केस.. नजरेत भरेल असाच होता तो.. ती तर त्याला कायम चिडवायची.. बघ तू manager असावा म्हणून नवस बोलत असतील मुली.. तोही तिला कधीतरी complement द्यायचा सहज.. दोघांच्या बोलण्यात खूप सहजता होती.. मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलायचे, एकमेकांसमोर सुख दुःख व्यक्त करायचे.. त्या मैत्रीपुढे ते आवडणे मागे पडत गेले.. तिला सवय होऊन गेली त्याची.. त्याच्या बोलण्याची.. रोज एकत्र जेवण करायचे.. चहा घ्यायचे..
तिला आठवले.. तिचा वाढदिवस होता.. तिने केक कापला आणि तो पटकन पुढे आलेला भरवायला.. तिने मात्र संकोच वाटून त्याच्या हातातून तिच्या हातातच घेतला केक.. अर्धा घेतला अर्धा त्याला ठेवला.. सगळे लोक त्या दोघांना हसले होते त्या दिवशी.. काय प्रसाद आहे का तो म्हणून.. तिला नकळत हसू आले आठवून.. असे खूप प्रसंग तिला दहा वर्षातले आठवत गेले एक एक करून.. त्याला तिचे आवडलेले कानातले.. त्याने बोलून दाखवले.. तिने ते तुटेपर्यंत रोज घातले.. असे किती तरी छोटे सुखावणारे प्रसंग..
त्याला पण आपण आवडत होतो हे कळायला मात्र तिला दहा वर्ष उलटून जायला लागली.. हा प्रसंग यायला लागला.. तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले.. आता ते भेटत पण नाहीत.. फोन मात्र चालू असतात.. त्याच्या मनातले जर तिला आधी कळले असते तर? समोरासमोर असताना तिला हे समजून आले असते तर? इतकी सहजता राहिली असती का? त्याला कळले होते का, की तिला पण तो आवडायचा? कितीतरी प्रश्न.. उत्तर नसलेले..
तरीही.. ते अजूनही रोज बोलतात.. तितक्याच सहजपणे.. मनातल्या गोष्टी मनात ठेऊन.. काही अवघडलेपण नाही आले त्यांच्यात अजून पण.. हे महत्त्वाचे.. त्याच्या बायकोने तेच नाव ठेऊ दिले हेही महत्त्वाचे.. कोणीच कधी विषय काढला नाही.. हेही महत्त्वाचे.. दोघांनी आपापल्या पार्टनर ला आणि मुलींना घेऊन एकदा भेटायचे ठरवले आहे आता.. दोघांच्या उर्वि ची मैत्री झाली तर चांगलंच आहे.. बघू काय होतं पुढे..!!
No comments:
Post a Comment