Showing posts with label ओव्या. Show all posts
Showing posts with label ओव्या. Show all posts

Friday, March 12, 2021

नाट्य स्पंदन कार्यक्रमासाठी ओव्या

वैशाली वहिनींच्या नाट्य स्पंदन कार्यक्रमासाठी ओव्या लिहिल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचे गुणविशेष त्यांनी लिहून पाठवले होते. 


नमनाची ही ओवी हो, धन्वंतरी साठी हो

स्टेथोस्कोप ला वंदन करून, टाकू पुढचे पाऊल हो


दुसरी आपली ओवी हो, नाट्य स्पंदन जगू हो

छंदाचे हे दळण दळून, जगणे सुंदर करू हो


पुढची आपली ओवी हो, पितृ तुल्य नात्याची 

भक्कम पाया रोवून उभ्या, अरद्वाड सरांची


पुढची आपली ओवी हो, स्पंदनाच्या रथाची

समर्थ पणे रथ चालवी, सारथी साक्षात मुकुंद हो


पुढची आपली ओवी हो, यातच आपले हित हो,

लक्षुमी चे रक्षण करण्या सज्ज हा अमित हो


पुढची आपली ओवी हो, नाट्य क्षेत्र कृपेनं 

प्रेक्षक राजा अनुभव घेई, "संजय" च्या  दृष्टीनं 


पुढची आपली ओवी हो, अन्नपूर्णा गिरीजा हो 

हातात अक्षय थाळी तिच्या, सज्ज आमची ऋतुजा हो 


पुढची आपली ओवी हो, गिरिधरी च्या मायेनं

गोपाळांना अंगण दिले, येलाल्यांच्या कृपेनं


पुढची आपली ओवी हो, सूर ताल जोडीनं

संगीतात प्राण फुंकला, सुधीर च्या नावानं


पुढची आपली ओवी हो, नीर क्षिर विवेक हो

तमातून तेजाला निवडी, हे तर राजहंस हो


पुढची आपली ओवी हो, नाट्यवेडा जोश तो

पुरस्कार मानांकित, आम्हा तुझा संतोष हो


पुढची आपली ओवी हो, रवी तेजाची शान हो

अभिनयाच्या जोडीने, त्या संगीताची जाण हो


(स्त्री आणि पुरुष कलाकारांना पुढील दोन ओव्या समर्पित)


पुढची आपली ओवी हो, नटराजाचे पाईक हो 

रंग मंचा वंदन करती आमचे अष्ट नायक हो 


पुढची आपली ओवी  हो, स्त्रीशक्ती चा आदर हो 

नवरस अंगी लेऊन आम्ही नवदुर्गा या होऊ हो 


निर्वाणी ची ओवी हो, रंग देवता प्रसन्न हो 

डॉक्टर झाले ऍक्टर, आता तू विजयाची गुढी हो 


-- अवनी गोखले टेकाळे 

Monday, March 8, 2021

जातं, स्टेरिंग आणि ओव्या

महिला दिनाचा हा फोटो पाहिला आणि त्यावरून काही ओव्या सुचल्या. देवेंद्र आणि त्याचे पाच चुलत भाऊ अशा आमच्या सहा जोड्यांना एक एक ओवी डेडिकेट केली आहे. ओवी हा लेखनाचा प्रकार पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, फार काही नियम माहित नाहीत. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी. 


पहिली आमची ओवी ग, रामकुंड क्षेत्री ग

टेकाळ्यांचे दळण दळतो, रामाई च्या नावानं ।।१।।


दुसरी तिची ओवी ग, लातूरचा "आकार"

"प्रसन्न"तेने दळण दळते, स्टेथोस्कोप गळ्यात ।।२।।


तिसरी तिची ओवी ग, लंडन ची वारी ग

टेक्निकल दळण दळते, "गजानना"च्या साथीनं ।।३।।


चौथी तिची ओवी ग, शिक्षणाचे माहेर ग

मास्टर शेफ च्या घरात खुलतो रामाईचा "प्रसाद" ।।४।।


पाचवी तिची ओवी ग, उड्डाणाला कुवेत ग

निर्मळतेला कवेत घेतले "सचिन" च्या साथीनं ।।५।।


सहावी माझी ओवी ग, मुंबापुरी माया ग,

"देवेंद्र"चे दळण दळते, सरस्वती हातात ग ।।६।।


सातवी तिची ओवी ग, बंगलोर मेट्रो सिटी ग,

संसाराचे दळण दळते, तिचे मोल "अमोल" ग ।।७।।


आठवी आमची ओवी ग, महालक्ष्म्यांच्या कृपेनं 

ज्येष्ठा कनिष्ठा दळण दळती, गणरायाच्या साक्षीनं ।।८।।


नववी आमची ओवी ग, आता पुढचे पाऊल ग

नवरस अंगी घेऊन आम्ही, नवदुर्गा या होऊ ग ।।९।।


दहावी आमची ओवी ग, हातात आले स्टेरिंग ग

सीमोल्लंघन करू सोबत, विजयाचा हा दसरा ग  ।।१०।।


-- अवनी गोखले टेकाळे