Showing posts with label आवाज. Show all posts
Showing posts with label आवाज. Show all posts

Wednesday, June 3, 2020

मी एक डॉक्टर .. करोना patients ला treatment देतो..

माझ्या डॉक्टर मित्रांचे अनुभव ऐकून त्यांचा आवाज होण्याचा प्रयत्न केला आहे.. रेड्यावर आरूढ यमदेवाला रोखून धरण्याचे कार्य करणाऱ्या या योध्यांना समजून घेऊया.. त्यांना सहकार्य करूया.. अवनी गोखले टेकाळे   

*************************

मी एक डॉक्टर .. मला नाव नाही.. आहे फक्त माझ्या कामाचा परिचय.. करोना patients ला मी रोज treatment देतो.. नेमके काय आणि कसे व्यक्त करू कळत नाहीये.. नेमकी होणारी जीवाची घालमेल कशी मांडू कळत नाहीये.. 

रोज येणारे patient, त्यांच्या मनातली भीती कशी कमी करू कळत नाही.. कित्येक patient ठणठणीत बरे केले याचा आनंद मानावा का कित्येक व्हेंटिलेटर स्वतःच्या हातानी काढल्याचे दुःख व्यक्त करावे.. एक डॉक्टर म्हणून शरीरात असलेले मन कुलुपात बंद करून फक्त बुद्धीचा कस लावावा का अशा वेळेला? खरंच इतकं सोपं आहे का हे? फक्त positive विचार करावे असे स्वतःच्या मनाला आणि घरच्यांना समजवणारा मी किती वेळेला एकटा बाथरूम मध्ये जाऊन ढसाढसा रडलो असेन हे कसे आणि कोणत्या शब्दात सांगावे.. 

रोज PPE kit अंगावर वागवत असताना काही खाता पिता येत नाही.. अगदी लघवी ला सुद्धा कित्येक वेळा जाता येत नाही.. आठ आठ तास घशाला पडणारा शोष फक्त थुंकी गिळून कमी करावा लागतो.. कधी हे किट मिळतात तर कधी मिळत सुद्धा नाहीत.. मग येणारी संसर्गाची भीती त्यापेक्षा किट चा जीवघेणा त्रास पत्करावा वाटतो.. हे सगळे तुम्हाला सांगू का नको तेही कळत नाही.. 

कामाचा तणाव रोजच्या दिवसाला वाढत आहे.. माझ्या घरात सुद्धा वयस्कर आई वडील, लहान लेकरे, माझी सतत काळजी करणारी माझी बायको आहे.. कित्येक वेळा विलगीकरणाच्या नावाखाली यांना लांबून बघावे लागते तर कधी फक्त फोन वर बोलून समाधान बाळगावे लागते तर कधी फक्त आठवणीत दिवस काढावे लागतात.. जवळचे लोक सुद्धा हल्ली लांबच राहतात कारण मी एक डॉक्टर आहे.. हे सगळे तुम्हाला सांगावे का नको हे पण कळत नाही.. 

कित्येक वेळा लोकांचे वेगवेगळे challenge चालू असलेले कानावर येतात.. lockdown डायरी वाचायला मिळतात.. वेळेअभावी कधी स्वतःला या सगळ्यात भाग घेता आला नाही.. पण या सगळ्याला विरोध पण नाही.. जनतेने आम्हा करोना योध्यांसाठी ५ मिनिट टाळ्या वाजवल्या तेव्हा मन गदगदून आलं.. एक टाळी मी सुद्धा वाजवली माझ्यासाठी, माझ्या मित्रांसाठी.. एक टाळी नशिबाने दिली आम्हाला.. मी सुद्धा जमेल तेव्हा कविता करतो, चारोळ्या करतो, चित्र काढतो, गातो, कधी नाचतो.. लोक म्हणतात डॉक्टर बरे वेळ काढतात या सगळ्यासाठी.. सध्याच्या दिवसात मन प्रसन्न ठेवण्यासाठी ज्याला जे आणि जसे जमेल त्याने तसे करावे.. बाकी अजून काय बोलावे काहीच कळत नाही..  

माझ्याच कित्येक डॉक्टर मित्रांना, sisters ला quarantine होताना पहिले..स्वतः quarantine झालो.. कधी परिस्थितीशी दोन हात करत परत कर्तव्यावर रुजू झालो.. औषधे दिली.. घेतली.. माझ्या कित्येक covid positive मित्रांना प्राण गमवावे लागले.. या सगळ्यात नेमके मन, बुद्धी सगळ्याचा ताळमेळ घालत कसे रोज उभे राहावे कळत नाही.. 

मी एक हुशार डॉक्टर आहे.. माझा हातगुण चांगला आहे.. मी एक समजूतदार कुटुंबीय आहे.. असे माझे मलाच वाटत होते इतके दिवस.. परखड आणि स्पष्ट बोलणाऱ्या माझी जीभ आज मात्र चाचरत आहे.. स्वतःवर विश्वास आहे पण आणि नाही पण.. यमदेवाशी रोजच्या दिवसाचे भांडण घेतलेला मी एक डॉक्टर.. काय बोलावे.. बोलावे का नाही.. काहीच कळत नाहीये.. माझी बायको पण डॉक्टर आहे.. मानसोपचार तज्ज्ञ.. लोकांना वाढलेल्या मानसिक तणावामुळे सध्या तिच्याकडच्या appointment सुद्धा प्रचंड वाढत आहेत.. ती पण तणावाखाली आहे.. या परिस्थितीत मला तिची किंवा तिला स्वतःची "appointment" घ्यायला लागू नये.. एवढीच काय ती इच्छा.. बाकी काय बोलू..  काहीच कळत नाहीये.. 

सध्या कळते एवढे आणि एवढेच.. घरच्यांचे आणि स्वतःचे मन आपण सगळ्यांनी प्रसन्न ठेवूया.. डॉक्टर, nurse, सफाई कामगार, पोलीस यांच्याबद्दल कृतज्ञता ठेऊया.. देव, विज्ञान, संशोधन यांवर विश्वास श्रद्धा असू द्या.. आपण  सगळे झुंज देत आहोतच..  एका नवीन पहाटेची वाट बघणारे आपण एकाच नावेचे प्रवासी.. एकमेकांना साथ देत, सहकार्य करत मार्गक्रमण करू या.. 

-- अवनी गोखले टेकाळे 


Sunday, May 17, 2020

मी Dr वैशाली बोलतेय..

मी Dr वैशाली बोलतेय..

मी स्वतः स्त्री रोग तज्ञ.. शहरातील नामांकित डॉक्टर.. डॉक्टर वैशाली बोलतेय.. मास्टर्स पूर्ण झाले आणि मग लग्न होऊन या घरात आले.. नवऱ्याची भक्कम साथ आणि मला इथेच लातूर शहरात practice करायची होती म्हणून नवऱ्याने माझ्यासाठी मुंबईतून इकडे राहायला यायचा निर्णय घेतला.. आणि मी इकडे मनापासून रमले..  दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये कधी डे शिफ्ट कधी नाईट शिफ्ट करत होते.. माझा स्वतःच्या हॉस्पिटल आणि घरासाठीचा साठीचा प्रवास हळूहळू सुरू होता.. तिथल्याच क्वार्टर मध्ये आमचा संसार फुलायला लागला होता..

मोठे होत चाललेले पोट सावरत, कधी दुसऱ्याच्या delivery करत, कधी ओपीडी सांभाळत मध्येच स्वतःच्या सोनोग्राफी ची स्वतःलाच आठवण करून देत होते.. दुसऱ्याला व्यायाम आणि आहार याबाबत सांगत असताना मध्येच बाळ आतून भूक लागल्याची जाणीव करून देत होते.. माझ्या डिलिव्हरी च्या थोडा वेळ आधी मी दोन डिलिव्हरी केल्या होत्या.. आणि मग मला पण टेबल वर घ्यायची वेळ आली..

हर्ष .. माझ्या मुलाचे नाव.. त्याच्या पाठीचा कणा विकसित झाला नव्हता.. आणि त्यामुळे तो चालू शकणार नव्हता, जागेवरून उठू शकणार नव्हता.. खूप लोकांनी मला अडून अडून विचारले.. तुम्हाला डॉक्टर असून आधी समजले नव्हते का? पण मी काहीच बोलत नव्हते.. रडत नव्हते.. व्यक्त होत नव्हते.. कोशात जाणे म्हणजे हेच ते..  आज सांगते चौदा वर्षानंतर.. त्याच्या जन्मानंतर ४-५ महिन्यांनी आम्हाला हे समजले होते.. आम्ही स्वीकारले होते.. त्याला त्याच्या शरीरा सहित, त्याच्या बुध्दी सहित, त्याच्या मर्यादित हालचाली सहित.. आम्ही त्याचे अस्तित्व जपले त्याच्या मर्यादित भावनांसहित.. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी दुःखाची झालर येते.. दुःखापासून पळ काढायचा का त्याच्याशी समर्थपणे लढाई करायची यामध्ये आम्ही दुसरा मार्ग निवडला.. आपल्या शरीराच्या अस्तित्वासारखीच ही झालर आम्ही स्वीकारली.. मनापासून.. आणि आमचा लढा सुरु झाला स्वतःशी.. समाजाशी.. कष्टांशी.. मनाशी.. पैशाशी.. भावनांशी.. 

हे स्वीकारणे इतके सोपे नव्हते.. मेंदू पोखरून निघायचा.. एका आईची आशा आणि एका डॉक्टर चे प्रयत्न यांचे अविरत द्वंद्व चालू राहायचे.. एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून काळीज पोखारायचे.. अजूनही पोखरते.. सुरवातीला विश्वास असो नसो कोणी सांगतील ते उपाय केले.. अगदी नवस सायास पण केले.. एक आई तेव्हा एका डॉक्टर वर भारी पडत होती.. एक काळ आला जेव्हा खोल नैराश्येच्या गर्तेत गेले.. प्रसन्ना माझा नवरा आणि मी एका नावेचे प्रवासी.. पण मग काही सहकारी डॉक्टर, घरचे कुटुंबीय सगळ्यांनी सावरले..  आम्ही दोघांनी एकमेकांना सावरले.. आणि पुढचा अध्याय सुरू केला हर्ष सहित..

प्रॅक्टिस सुरूच होती.. स्वतःचे हॉस्पिटल, स्वतःचे घर या स्वप्नांनी झपाटले होतेच.. त्यामुळे पायाला भिंगरी लावून काम चालू होते.. नवऱ्याची व्यवसायाची घडी पण बसत चालली होती.. आई, सासूबाई आलटून पालटून येऊन राहायच्या.. कधी हर्ष ला घरी घेऊन जायच्या.. आमची डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी होत होती.. काही नातलग आता अडून अडून परत चान्स घ्यायला सुचवत होते.. पण आता मात्र हिम्मत होत नव्हती पुढे पाऊल ठेवायची.. पण मग खूप विचार केला आणि अवनी चे पाऊल घरात पडले.. आणि खूप वर्षांनी आम्ही खरेखरे हसलो.. मनापासून प्रसन्न झालो.. कुठली तरी निर्वात पोकळी भरून निघाल्या सारखे भरून पावलो आम्ही.. अवनी आणि हर्ष दोघांनी स्वीकारलं एकमेकांना.. जमेल तसे माया व्यक्त करू लागले..

आता आमच्या स्वप्नांना वेग आला.. विचारांना वेग आला.. कृतीला कष्टाला वेग आला.. आणि आज आम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल एवढी वाटचाल केली आहे.. "Dr. वैशाली टेकाळे चपळगावकर" - स्वतःच्या नावाची पाटी असलेला तीन मजली दवाखाना.. त्यावर दोन मजली घर.. आमच्या स्वप्नांना "आकार" आला.. "आकार हॉस्पिटल" - अजून दुसरे कुठले समर्पक नाव सापडले असते आम्हाला.. आजही संध्याकाळी गच्चीत निवांत बसून चहा पिताना कातरवेळ म्हणजे काय त्याचा अनुभव येतो.. रात्रीची झोप अजूनही सलग शांत लागत नाही.. माझ्यातली डॉक्टर अजूनही अभ्यास करत रहाते.. नवीन नवीन उपचार पद्धती शिकत रहाते.. परीक्षा देत राहते.. स्वतःला अद्ययावत ठेवते.. मन गुंतवत राहते.. या सगळ्या धावपळीत नाती जपायचा आटोकाट प्रयत्न करते.. त्यांच्यामध्ये मिसळले की मनावरची मरगळ निघून परत ताजेतवाने होते.. कधी नाटक आणि अभिनयात स्वतःला अजमावते.. कधी व्यायाम आणि डाएट करून स्वतःला कणखर करते.. मैत्रिणी आणि घरचे म्हणतात.. "हिला इतके व्याप सांभाळून कसा काय इतका वेळ मिळतो आवडी निवडी जोपासायला.. फिरायला जायला.. आणि तरीही कधी पण बघा आनंदी असते.." मी आजही त्यांना काहीच सांगत बसत नाही.. मनाला मोकळे सोडणे शक्य तेवढे टाळलेले चांगले.. चार भिंतीत काजळ गालावर उतरले की मग चार माणसात खळखळून हसणे सोपे जाते.. भावना मनाच्या गाभाऱ्यात स्वतः पुरत्या बंद करून जगासाठी सळसळत व्यक्तिमत्व घेऊन मी आणि प्रसन्ना सज्ज आहोत.. कायम.. 

आज हर्ष चौदा वर्षाचा झाला.. या वयात मुलं मित्र बनतात पालकांचे..  खरं तर या मित्रासमोर मन व्यक्त करायचं होत.. पण त्याच मन हळवं आहे खूप.. म्हणून आरशा समोर व्यक्त होतेय.. मी आई बोलतेय.. मी डॉक्टर वैशाली बोलतेय.. वैशाली प्रसन्ना टेकाळे - चपळगावकर!!!


शब्दांकन - अवनी गोखले टेकाळे