Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Monday, June 26, 2023

ऊर्वी ची आई.. ऊर्वी चे बाबा..!!

खरं सांग.. तुझ्या मुलीचं नाव पण तू उर्वी का ठेवलं असशील? माझ्याच मुलीचं नाव सापडलं का तुला? ती परत परत विचारत होती त्याला. तो.. तिचा जुना मित्र.. दहा वर्षाची घट्ट मैत्री.. शेवटी तो म्हणाला.. मुलीचं नाव ठेवायचं म्हणल्यावर तूच आलीस डोळ्यासमोर.. मग ठरवल.. तुझ्या मुलीचं नाव पण ऊर्वी आहे ना.. आपण पण तेच ठेवायचे.. !!
आयुष्यातला एक मोठा प्रश्न.. त्याचे उत्तर असे शोधावे कोणीतरी? ते पण "त्याने".. ती मोहरुन गेली.. थरारली.. अचानक त्याच्या आवाजातून.. त्याच्या बोलण्यातून.. तिला ते जाणवलं.. जे तिला इतक्या दिवसात कळलं नव्हतं.. त्याच्या आवाजातला कंप तिला सगळ काही सांगून गेला.. आणि तिला एक एक संगती लागायला लागली.. 
तसा तो आवडायचा तिला.. पण हे फक्त तिच्या मनाला माहित होत.. उंच, गोरा, घारा, सरळ नाक आणि राखाडी केस.. नजरेत भरेल असाच होता तो.. ती तर त्याला कायम चिडवायची.. बघ तू manager असावा म्हणून नवस बोलत असतील मुली.. तोही तिला कधीतरी complement द्यायचा सहज.. दोघांच्या बोलण्यात खूप सहजता होती.. मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलायचे, एकमेकांसमोर सुख दुःख व्यक्त करायचे.. त्या मैत्रीपुढे ते आवडणे मागे पडत गेले.. तिला सवय होऊन गेली त्याची.. त्याच्या बोलण्याची.. रोज एकत्र जेवण करायचे.. चहा घ्यायचे.. 
तिला आठवले.. तिचा वाढदिवस होता.. तिने केक कापला आणि तो पटकन पुढे आलेला भरवायला.. तिने मात्र संकोच वाटून त्याच्या हातातून तिच्या हातातच घेतला केक.. अर्धा घेतला अर्धा त्याला ठेवला.. सगळे लोक त्या दोघांना हसले होते त्या दिवशी.. काय प्रसाद आहे का तो म्हणून.. तिला नकळत हसू आले आठवून.. असे खूप प्रसंग तिला दहा वर्षातले आठवत गेले एक एक करून.. त्याला तिचे आवडलेले कानातले.. त्याने बोलून दाखवले.. तिने ते तुटेपर्यंत रोज घातले.. असे किती तरी छोटे सुखावणारे प्रसंग.. 
त्याला पण आपण आवडत होतो हे कळायला मात्र तिला दहा वर्ष उलटून जायला लागली.. हा प्रसंग यायला लागला.. तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले.. आता ते भेटत पण नाहीत.. फोन मात्र चालू असतात.. त्याच्या मनातले जर तिला आधी कळले असते तर?  समोरासमोर असताना तिला हे समजून आले असते तर? इतकी सहजता राहिली असती का?  त्याला कळले होते का, की तिला पण तो आवडायचा? कितीतरी प्रश्न.. उत्तर नसलेले.. 
तरीही.. ते अजूनही रोज बोलतात.. तितक्याच सहजपणे.. मनातल्या गोष्टी मनात ठेऊन.. काही अवघडलेपण नाही आले त्यांच्यात अजून पण.. हे महत्त्वाचे.. त्याच्या बायकोने तेच नाव ठेऊ दिले हेही महत्त्वाचे.. कोणीच कधी विषय काढला नाही.. हेही महत्त्वाचे.. दोघांनी आपापल्या पार्टनर ला आणि मुलींना घेऊन एकदा भेटायचे ठरवले आहे आता.. दोघांच्या उर्वि ची मैत्री झाली तर चांगलंच आहे.. बघू काय होतं पुढे..!!

Thursday, August 18, 2022

उर्वी ची गोष्ट..

उर्वी. रोज भेटायची सकाळी. आठ तेवीस लोकल ला. कायम कुठल्या तरी टेन्शन मध्ये. चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. कधी ऑफिस च टेन्शन.कधी घरातलं. कधी जाता जाता भाजी घेऊन जायचं डोक्यात. कधी मुलीला ताप आलेला असताना सुट्टी मिळाली नाही म्हणून अर्ध लक्ष घरात ठेऊन निघायला लागायचं. एक ना दोन. घर म्हणाल्यावर शंभर गोष्टी चालू. घड्याळाच्या काट्यावर घरातले आवरून धावत पळत एकदा आठ तेवीस पकडली की गंगेत घोड न्हायल. मग ती सुटकेचा श्वास सोडायची. त्या गर्दीत. घुसमटलेला. तरीही मोकळा श्वास. आणि मग हमसून हमसून रडून घ्यायची. का रडू यायचं ते तिला पण नाही कळायचं. आम्ही रोज बघायचो. कधी विचारायचो. कधी पाणी द्यायचो. कधी नुसते हसायचो तिच्याकडे बघून. आधार द्यायचो.
तिला वाटत राहायचं. कशा या मुंबई च्या बायका. इतकी धावपळ करून पण टापटीप. नीटनेटक्या. कायम हसऱ्या कशा काय राहू शकत असतील. तिला आठवायच. तिचं गाव. रत्नागिरी जवळ च छोटंसं गाव. तशी कष्टाची सवय होती तिला. मेहनती, काटकसरी. टुकीने घर चालवणारी. ती गावाकडे असताना कशी होती. उत्साही. हसतमुख. सणवार गाणी म्हणत हसत खेळत करणारी. प्रसन्न. वक्तृत्व स्पर्धेत नंबर एक. निबंधात नंबर एक. गाण्यात नंबर एक. लग्न ठरलं. मुंबईची फॅमिली. गिरगावातल्या जुन्या वस्तीत सासर. मुंबई मध्ये नोकरी ही एक स्वतंत्र संस्था. पायाला भिंगरी लागलेलं आयुष्य. ही मुंबईची धावपळ नशिबी आली आणि सगळं बंद पडलं. हौस मौज. घड्याळाच्या काट्यावर चालणारी बाहुली झाली तिची. परत एक हुंदका अनावर झाला तिला. 
या सगळ्या गडबडीत एक दिवस ट्रेन मध्ये मोबाइल बघता बघता, तिला ऑनलाईन होत असलेल्या एका लेखकांच्या स्पर्धे बद्दल कळलं. आणि तिनी हिम्मत करून नाव नोंदवलं. बास! एक छोटीशी घटना पण तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. स्पर्धेसाठी कथा लिहायची म्हणाल्यावर ती ट्रेन मध्ये त्या दृष्टीने विचार करू लागली. तिथेच उभ्या असलेल्या तिच्याच डब्यात तिला रोज भेटणाऱ्या मुली तिच्यासमोर कथेतले एक एक पात्र बनून फेर धरू लागल्या. ती निरीक्षण करायला लागली. Footboard वर उभी राहणारी, तरीही मस्त मजेत वाऱ्यावर केस भुरुभुरू उडू देणारी श्वेता. रोज ट्रेन मध्ये भाजी निवडणाऱ्या सुलक्षणा काकू. उतरायच्या एक स्टेशन आधी पासून केस सारखे करून, मेक अप करून मग टापटीप ऑफिस ला जाणारी HR department head प्रिया. पाचवा महिना लागलेली, खिडकीत राखीव सीट पटकवलेली स्नेहल. या सगळ्यांशी गप्पा मारून त्यांच्यासाठी नवीन नवीन कानातले गळ्यातले विकायला घेऊन रोज त्याच ट्रेन मध्ये येणारी छोटी बिझिनेस वाली लक्ष्मी. ताजे मासे विकायला आणणाऱ्या कामत काकू. आणि सगळ्यांना सुगंधाने बांधून ठेवणारी सोनचाफा आणि मोगऱ्याचे गजरे विकणारी चंपा. अशा कितीतरी बायका तिचेच प्रतिरूप घेऊन तिला भोवती फिरताना दिसायला लागल्या. 
या प्रत्येकीला निरखून बघताना तिला जाणीव व्हायला लागली. तिच्या सोबत अशा खूप बायका आहेत. ज्यांचे आयुष्य घड्याळाला बांधले गेले आहे. तरीही त्या आनंदात जगत आहेत. तिची घुसमट हळू हळू कमी व्हायला लागली. हळू हळू ती या सगळ्याचा आनंद घ्यायला लागली. प्रत्येकाशी संवाद साधू लागली. सुखदुःख वाटून घेऊ लागली. एकीकडे तिची कथा उमलत चालली होती. शाळेत वकृत्व देताना आत्मविश्वासाने उभी राहणारी उर्वी तिला परत सापडायला लागली होती. तिच्या कलेने तिला जगण्यातली गंमत परत एकदा उलगडून दाखवली होती. रोज ती ऑफिस ला जाताना एक भाग लिहायची. परत येताना तोच भाग व्याकरण तपासून सुधारून घ्यायची. असे करत करत तिची दीर्घकथा आकार घ्यायला लागली. आणि तिच्यातली उर्वी नावासारखी पूर्णाकार घेऊ लागली. कधी चंद्राच्या शीतल छायेत. कधी सूर्याच्या प्रखर किरणात. कधी कोसळणाऱ्या श्रावण सरींमध्ये. सोनचाफा, त्याचा घमघमाट तिला मोहून टाकू लागला. हळूहळू रमली ती. संसारात. मुंबईत. ट्रेन च्या विश्वात. 
नियती नियती म्हणतात ती काय असते? एक वीत फक्त. मनगटात असलेली ताकद. तिथून ती तळहातावर येते. त्यावर असलेल्या रेषा. त्यातून ती अडखळते. ठेचकाळते. दुखावते. सुखावते. नाचते. गाते. बागडते. आणि मग ती अजून थोडी पुढे येते. हाताच्या बोटांचा मोर करून त्यात पकडलेली तिची लेखणी त्यात जाऊन विसावते. तिची ताकद. तिचा आनंद. तिचे सृजन.
तळहातावरच्या च्या रेषांमध्ये धावताना तिने शोधली तिची कला. जोसापली तिची आवड. आणि ती भरभरून हसली. दिलखुलास. मोकळेपणाने. आता ती सज्ज झाली. आवाहनांना तोंड द्यायला. तिची कथा मालिका तर पूर्ण झालीच. आणि तिनी पुढची लेखमाला लिहायला घेतली नकळत पणे. जगण्यातले कलेचे महत्त्व..!! 

-- अवनी गोखले टेकाळे 

Friday, March 20, 2020

ते घरून काम करत आहेत..

राजेश.. एका मोठ्या IT company मध्ये project manager म्हणून काम करत होता..चालू प्रोजेक्ट वरती साधारण ५०० माणसं काम करत होती.. २७ मार्च ला project deploy करायचा होता त्याला.. आणि अचानक काही अत्यावश्यक कारणांमुळे त्याला सांगण्यात आले की १७ मार्च ते २७ मार्च सगळ्या टीम ला घरून काम करावे लागेल.. 
ढीगभर प्रश्न होते त्याच्या समोर.. security issues मुळे याआधी प्रत्येक व्यक्तीला घरून काम करण्याचा access दिलेला नव्हता.. बऱ्याच लोकांचे approval घेतल्यावर शेवटी त्याला परवानगी मिळाली आणि मग लोकांच्या access request raise करण्यात आल्या.. high priority वरती त्या approve करण्यात आल्या.. आणि मग खरा खेळ चालू झाला.. 
एकीकडे client मानगुटीवर बसलेला.. काही नवीन नवीन कामावर आलेली मुलं गायबच झाली.. त्यांचे फोन लागेनात, ते कुठे online दिसेनात.. delivery hamper व्हायला लागलेली.. त्यांच्याकडून फक्त फोन वरती काम करून घेता घेता त्याचा २५ वर्षाचा अनुभव पणाला लागत होता.. कधी कधी त्याला स्वभावाच्या विरुद्ध जाऊन कठोर बोलून काम करून घेणं भाग होतं.. अशा वेळेला तर त्याला खलनायक ठरवून त्याच्यावरती जोक पण पसरायला लागले होते.. 
आणि दुसरीकडे बायको पण घरून काम करत होती.. दोन्ही मुलांना सुट्ट्या लागलेल्या.. नाही म्हणलं तरी त्याच्या कामावर सुद्धा परिणाम होतंच होता.. घरच्यांना पण वेळ द्यावा वाटायचा.. काम पण सोडता येत नव्हतं.. घरातल्या मावशी बाई पण गावी गेल्या होत्या.. मी पण जाते बरका थोडे दिवस work from home म्हणून.. मावशी बाई पसार झाल्यावर बायको ने फक्त त्याच्याकडे पाहिलं.. आणि मग त्याला संभाव्य धोक्यांचे इशारे मिळायला लागले..  मधूनच "तुमची काय मजा चालू आहे घरी बसून.. करा करा मस्त अराम करा" असे दुरून डोंगर साजरे वाटणारे लोक बोलायला लागले होते त्याला.. 
पण काही सिनियर लोक स्वतःची जबाबदारी समजून जास्त काम करत होती.. त्यांच्यामुळे थोडी तरी राजेश ला आशा होती.. दिवस रात्र जसे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे लोक काम करत होते.. काही लहान मुलं असलेले लोक रात्री मुलांना झोपवून काम करायला बसत होते उशिरापर्यंत.. काही बायका कुकर च्या शिट्या मोजत मोजत कोडींग करत होत्या.. काही लोक सकाळी मुलं उठायच्या आत मांडीवर लॅपटॉप घेऊन बसायचे.. कुकर च्या शिट्या, मुलांचे रडणे, समजावणे हे पाठीमागे चालू असलेले आवाज नित्याचे झाले होते.. पण काही म्हणा लांब बसून सगळे जवळ यायला लागले होते.. थोडी कामासोबतच एकमेकांच्या घरची चौकशी करायला लागलेले.. 
सगळ्या धुमश्चक्रीमधून त्याच्या टीम ने project केला deploy अखेर दिलेल्या वेळेला आणि मग सुटकेचा श्वास घेतला सगळ्यांनी.. आणि कधी नाही ते सगळेच वाट बघू लागले.. रात्र संपण्याची.. नव्याने उगवणाऱ्या सूर्याची.. !!!

Tuesday, February 11, 2020

एक गुपित.. एक वचन.. आणि रोजचीच night shift..

मध्यरात्री उषा किरण सोसायटी च्या दारात ambulance आणि खूप सारे पोलीस जमा झाले.. आतून जखमी निशा ला उचलून सगळ्या पोलिसांनी घरी पोचवले.. आणि सगळे पांगल्यावर सोसायटीला परत एकदा तोंड फुटलं..
"काय करायची काय माहित.. दिवसभर घरीच असायची.. रात्री जायची कुठेतरी..कधी पार्टी ला जातेय वाटायचं.. कधी मोठ्या कंपनी मध्ये निघाली आहे वाटायचं.. तर कधी कधी वेश्या बायकांसारखी फिरायची.."
"घरचे बरे चालू देतात असली थेरं…"
"लहान पोरगी पदरात.. तिचा तरी विचार करायचा रोज रात्री तोंड काळ करताना.."

********************************************

निशा ची फॅमिली काही महिन्यांपूर्वीच रहायला आलेली उषा किरण मध्ये.. जास्त ओळख नव्हती कडेच्या लोकांशी.. निशा, तिचा नवरा, मुलगा, सासू सासरे, लहान दीर जाऊ असा घरी गोतावळा.. सगळे एकमेकांना धरून राहणारे.. कधी घराच्या बाहेर आवाज नाही गेला इतके समजूतदार घर.. निशा घरीच असायची दिवसभर.. संध्याकाळी लहान लेकराला घेऊन खाली फिरायला यायची.. जाता येता बोलायची.. ऑफिस ने मुलगा एक वर्षाचा होईपर्यंत सुट्टी दिली आहे म्हणायची.. इथंपर्यंत उषा किरण मध्ये सगळं सुरळीत चालू होतं.. चाकोरीबद्ध.. मुलगा सहा सात महिन्याचा झाला की निशा ने स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला सुरवात केली.. भरपूर व्यायाम सुरु केला.. आणि इथेच उषा किरण ला पहिल्यांदा तोंड फुटलं.. कोण celebrity लागून गेली ही इतकी तब्बेत सांभाळायला.. !!

मुलगा वर्षाचा झाल्यावर निशा ऑफिस ला जायला लागली.. पण रोजच night shift.. रोज टापटीप तयार होऊन रात्री १० च्या पुढे निशा बाहेर पडे.. लोकांचे observation काही चुकीचे नव्हते.. कधी झगमग तयार होऊन निघायची जसे काही मोठ्या पार्टी ला जात आहे.. कधी मोठ्या कंपनी मध्ये निघाल्यासारखी वाटायची.. तर कधी कधी बघून तर call girl आहे का काय अशी शंका यायची.. उषा किरण नी मग कधी तिच्या सासू कडे तर कधी लहान जावेकडे कानोसा घायला सुरवात केली .. पण त्यांना काही मनासारखी उत्तरे मिळेनात.. आणि मग रोजच चर्चेला ऊत यायचा.. आणि आज अशी दारात ambulance.. !!

निशा ला अलगद घरी नेलं.. आणि घराचं दार बंद झाल्यावर आज पहिल्यांदा त्यांच्या घरातला आवाज बाहेर ऐकू आला.. एक आवाज काळजीचा.. एक आवाज रडण्याचा.. एक आवाज समजावण्याचा.. आणि मग एक खंबीर आवाज.. पण काय झालं चार भिंतीत ते मात्र उषा किरण सोसायटी ला शेवटपर्यंत कळलं नाही.. !!!

********************************

एक दिवस होता जेव्हा निशाचे सगळे कुटुंब निवांत चहा पीत बसले होते.. एकीकडे TV वरच्या बातम्या चालू होत्या.. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या बातम्या बघून निशा म्हणाली.. कोण बदलणार ही परिस्थिती आणि कधी.. त्यावर तिचा नवरा म्हणाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं माझ्यासमोर निवांत चहा पीत बसली आहेत.. निशा ला पहिले समजलं नाही की त्याला काय म्हणायचे आहे.. पण तो बोलायला लागला.. प्रत्येक वेळी आपल्या घरात काही अन्याय झाला तरच आपण जागे होणार का.. घरातल्या सगळ्यांनीच दुजोरा दिला.. सगळे निशाच्या पाठीशी उभे राहिले..  आणि त्यांच्या घरात निवांत एकत्र प्यायला गेलेला तो शेवटचा चहा.. दुसरा दिवस वेगळाच उगवला.. निशा नी अभ्यास करायला, परीक्षा द्यायला सुरवात केली आणि ती उत्तीर्ण होत गेली.. पोलीस खात्यामध्ये तिने स्वतःच स्थान निर्माण केलं.. आणि तिची हिम्मत, जिद्द आणि चातुर्य पाहून तिच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं काम सोपवण्यात आलं.. रोज रात्री एक भरारी पथक निशा च्या नेतृत्वाखाली काम करू लागलं.. पोलीस स्त्रियांचे हे पथक वेगवेगळ्या वेशात रात्री अपरात्री फिरू लागले.. गुन्हेगारांना रंगे हात पकडू लागले.. परिस्थिती बदलण्याचे एक वचन निशाने घरच्यांना दिले.. आणि तिची ओळख लपवण्याचे एक वचन मागूनही घेतले..

*******************************

जखमी निशा अंथरुणात होती.. सेवेला सगळे घरातले.. आणि इकडे निशाची लहान जाऊ निघाली "पार्लर" मध्ये.. "पार्टी" साठी make over करायला.. निशाची तब्बेत सुधरेपर्यंत तिच्या जागेवर रात्री night shift कोण करणार हा प्रश्न आधीच सोडवलेला होता.. पहिले घरातले आवरल्यावर चार भिंतीत दोघी जावा दिवसभर काय करायच्या हे गुपित फक्त त्या घरातल्या चार भिंतींना माहित होते.. रात्री जाऊ निघाली पार्टी साठी आणि उषा किरण ला परत एकदा तोंड फुटलं…!!!!!!

Tuesday, December 10, 2019

छोटी छोटीसी बात

शीर्षक वाचून अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा आठवले ना.. तशीच काहीशी आहे ही गोष्ट.. आमच्या एका मित्राची एक छोटीसी बात..

आजही "तो" ८.०४ ठाणे ट्रेन पकडतो..  पनवेल, हार्बर लाईन चे पहिलेच स्टेशन..  त्यामुळे first class ची window seat फिक्स त्याचीच वाट बघत असते.. या सीट साठी तो आजही लवकर पोचून थांबलेला असतो.. तो गजाला डोके लावतो आणि डोळे खिडकीच्या बाहेर काढतो.. नेरुळ यायची वाट बघत उगाच वेळ काढतो..

नेरुळ ला "ती" चढते.. धावत पळत.. ladies first class मध्ये.. डोक्यावर गुंडाळलेले ओले केस, चिकनकारी फिकट जांभळा कुर्ता, कानात बैंगणी रंगाचे dangler, गळ्यात ऑफिस चे I-card, एका खांद्याला लॅपटॉप बॅग लटकलेली, बॅग च्या पट्ट्याला केसाचे क्लचर लावलेले.. खिडकीच्या बाहेर काढलेले त्याचे डोळे भरून पावतात.. तिला आजही बसायला जागा मिळतच नाही.. ती दारात ओथंबून उभी.. ओले केस झटकून वाऱ्यावर सुकायला मोकळे सोडते.. पायात बॅग सावरून ती बॅग मधून पुस्तक काढून वाचायला सुरवात करते.. त्याची नजर तिच्या कानात हलणाऱ्या लोलकाकडे जाते आणि दवबिंदू सारख्या ओथंबलेल्या केसातल्या थेंबांवर स्थिरावते.. तिला पुस्तक वाचताना बघून त्याला आज परत एकदा साक्षात्कार होतो.. आपण हिच्यासारखे काहीच का वेगळे करत नाही ऑफिस सोडून.. तो आजपण ठरवतो.. उद्यापासून आपण पण तिच्यासारखं पुस्तक वाचायचं.. 

नकळत ती पुस्तकाच्या मागून त्याला बघते.. कडक इस्त्री केलेला शेवाळी शर्ट, रविवारी कोरलेली दाढी बुधवार पर्यंत विस्कटलेली.. रोज बघून सवयीच्या झालेल्या त्याच्या रुंद कपाळावर नजर भिरभिरवत ती एक smile देते आणि परत पुस्तकात डोकं घालते.. तो घायाळ.. आजचा दिवस सार्थकी.. जमेल तेवढा मोठा श्वास घेऊन पोट आत घेत तो return smile देतो आणि परत खिडकीतून बाहेर डोकं काढत रेल्वेचे बदलत जाणारे रूळ बघत राहतो.. आपल्याला अबरचबर खाणे कमी करून पोट कमी केले पाहिजे याचाही साक्षात्कार त्याला परत एकदा होतो.. तो आजपण ठरवतो उद्यापासून gym नक्की.. बास!! एवढीच त्यांच्यामधली काय ती देवाण घेवाण..

ती घणसोली स्टेशन आल्यावर थोडे केस ठीक करते.. मोबाइल adjust करत एकदा थोडा चेहराही ठीक करते.. रबाळे स्टेशन आल्यावर ती उतरते.. ती उतरल्यावर तो भानावर येतो, आता पुढचं स्टेशन आपलं.. कासवासारखं अंग आकसून घेत ऐरोली ला तोही खाली उतरतो.. तिच्या एका smile मुळे घायाळ झालेल्या त्याला सगळी romantic songs एकाच वेळी म्हणावीशी वाटतात.. उगाच गालात हसत तो ऑफिस मध्ये शिरतो.. ऑफिस मध्ये लॅपटॉप बडवताना सुद्धा दिल गार्डन गार्डन.. 

२ वर्ष हे सगळं असंच चालू आहे.. रोज मित्रांना तपशीलवार वर्णन ऐकवत राहतो.. धावपळीत तेवढाच विरंगुळा म्हणत तेही रोज नव्याने ऐकत राहतात.. वर म्हणतातही .. "अरे, आम्हाला सांगण्यापेक्षा एकदा उतर तू पण तिच्या सोबत रबाळे ला.. बोला कि काहीतरी.." पण सांगितलं ना.. तसं केलं असतं त्याने, तर आजच्या जमान्यातला अमोल पालेकर का म्हणलं असतं त्याला..

एक दिवस तो येतो.. resignation देतो.. तीन महिने संपतात तरी सांगत नाही कुठे चालला ते.. आमच्या डोक्यात त्याच्या सोबत, "ती" उगाचच.. उगाचच उदास उदास..शेवटच्या दिवशी निघताना त्याचे डोळे चमकतात.. दिल गार्डन गार्डन.. तो एवढंच म्हणतो आता उद्यापासून प्रवासाचे एक स्टेशन कमी.. आता मी पण रबाळे लाच उतरणार..

आजही "तो" ८.०४ ठाणे ट्रेन पकडतो रोज.. पनवेल, हार्बर लाईन चे पहिलेच स्टेशन.. त्यामुळे first class ची window seat फिक्स त्याचीच वाट बघत असते.. या सीट साठी तो आजही लवकर पोचून थांबलेला असतो.. नेरुळ ला ती आजही ओले केस डोक्याला गुंडाळून आत शिरते.. आता फरक एवढाच की दोघे एकत्र रबाळे ला उतरून स्टेशन मधून बाहेर पडतात.. एकमेकांकडे बघतात.. ओळखीचे smile देतात.. ऑफिस ला वेळेत पोचण्यासाठी भानावर येत परत पावलाचा वेग वाढवतात.. 

बस, बात इतनी ही थी.. छोटीसी..!! आजच्या जमान्यातल्या अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा ची..

रंग बदल बदल.. मन को मचल मचल..
रहे है चल न जाने क्यू वो अंजान पल.. !!!


Wednesday, September 25, 2019

हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या ..

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत गौरी.. आई सांगायची आपल्याकडे नसला सण म्हणून काय झालं.. गौरी आपल्या पाठीशी वर्षभर उभ्या असतात.. पण एवढ्या उत्तराने तिचे कधी समाधान झाले नाही.. एकदा आजीने बोलता बोलता सांगितले आपल्या गौराया वाघरू घेऊन गेला, म्हणून आपल्याकडे गौरी नसतात.. घरात असेच शिळोप्याच्या गप्पा चालू असताना तिला एक दिवस कळलीच ती गोष्ट.. काही पिढ्या आधी घडलेली गोष्ट.. 

कोकणातले वरच्या आळीमधले ते ऐसपैस घर.. माणसांच्या मनासारखेच मोकळे ढाकळे ..  square foot च्या चौकटी नसलेले..  ओसरी पडवी ओलांडून गेल्यावर कौलारू घर.. मागे परसदार आणि परसातून मागे नजर पोचेल तिथपर्यंत वाडी.. वाडी मध्ये उंचीची स्पर्धा करणारी नारळी पोफळीची झाडं.. त्यामागे आमराई.. त्यात असणारी विहीर आणि तिला लावलेले रहाट गाडगे.. आणि वाडीतून मागे जाणारी पायवाट थेट समुद्रकाठी पोचणारी.. समुद्राची गाज माडाच्या सावलीत निवांत बसल्यावर पण यायची.. आणि नजर उचलल्यावर दिसायचे प्रदूषणाची झालर नसलेले निळेशार आकाश.. 
या निसर्गाच्या कुशीत असणारी माणसं तिथल्या मातीतल्या फणसासारखीच.. तिरकस काटेरी बोलणे पण मनातून गोडवा.. सहज म्हणून २०-२५ माणसं तरी असायचीच घरामध्ये.. त्यावेळी काही त्याला joint-family वगैरे म्हणायची पद्धत नव्हती.. परत माधुकरी साठी वारावर जेवायला येणारे वेगळेच.. आई वडील, त्यांची मुलं, आणि पुढच्या पिढीतले मुलं, सुना आणि नातवंड.. एखादी आलवणामधली आत्या आणि तिची मुलं.. मुली आपापल्या संसारात.. 
बयो हि या घरातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती.. वयाने, मानाने, अधिकाराने आणि कर्तव्याने थोर.. त्यांचं मूळ नाव सुलक्षणा.. त्यांचा उत्साह लहान पोराला लाजवेल असा…आणि त्यात आता तर काय.. गौरी गणपती चा सण म्हणजे उत्साहाला आलेलं उधाण.. गणपती तर रुबाबात बसलाच होता.. आणि गौराई यायचीच वाट बघत होता.. 
तो दिवस गौरी आवाहनाचा.. तिन्ही सांजेला समुद्राकाठी जाऊन खडे आणायचे आणि त्यांची मनोभावे पूजा करायची .. घरात एकीकडे नैवेद्याची तयारी चालू होती.. एकीकडे सजावट चालू होती.. बयो अष्टभुजा असल्यासारखी सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालत होती.. आणि सगळे मार्गी लागल्यावर तिने स्वतःचे आवरायला वेळ काढला.. 
आधीच दागिन्यांची भारी आवड आणि त्यात आज तर गौरी आवाहन करायचा मान त्यांना मिळाला होता.. त्यामुळे अजूनच दुधात साखर.. ठेंगण्या आणि काटक बयो निळीशार नऊवार नेसल्या होत्या.. गोऱ्यापान रंगावर अस्मानी रंग अजूनच खुलून दिसत होता..  नाकात मोठी नथ अर्धे ओठ झाकले जातील एवढी.. लांबसडक केसांचा खोपा घातलेला.. खोप्याच्या मध्यभागात अग्रफूल आणि भरपूर गजरे.. कानात डुलणारी कर्णफूले.. गळ्यात चिंचपेटी, त्याच्या खाली रुळणारा मोत्यांचा लफ्फा, त्याच्या खाली येणारा रायआवळे हार तर त्यांचा खास आवडीचा.. आणि या सगळ्यापेक्षा उठून दिसणारे ठसठशीत डोरले.. दंडात नागवाकी.. कंबरपट्टा आणि मेखला कंबरेवर शोभून दिसत होता.. कष्ट करून मजबूत झालेल्या हातांची शोभा वाढवायला गोठ, तोडे, पाटल्या, बांगड्या, बिल्वर होतेच तर पैंजण, जोडवीं, वीरवली पायाची शोभा वाढवत होते.. नखशिखांत सजलेल्या बयो साक्षात गौरी सारख्या दिसत होत्या.. 
तिन्ही सांजेची वेळ आणि बयो गौरी आवाहनासाठी निघाल्या.. त्यांच्या सोबत त्यांच्या, सासूबाई, जावा, सुना ही निघाल्या.. या वेळी गौरी हळदी कुंकवाच्या पावलांनी येणार का सोन्या चांदीच्या पावलांनी.. याचा विचार चालू होता सगळ्यांच्या मनात.. उखाणे आठवून ठेवा बयो.. घरात जाताना घ्यायला लागेल उखाणा.. वाडीच्या मागच्या पाऊलवाटेने सगळ्या निघाल्या होत्या..  
इतक्यात बायोला  वेगळीच शंका आली.. मगासपासून येत असलेला वास हा जनावराचा असावा असे त्यांना वाटले.. कानांनी देखील चाहूल घेतली पण तेवढ्यात उशीर झालेला होता.. दबा धरून बसलेले जनावर अचानक समोर आले..  आणि बयोच्या किंकाळीने सगळा गाव थरारला.. 
त्या दिवसानंतर बयो आणि गौरी घरासाठी एक आठवण बनून राहिल्या.. घराने परत गौरी आवाहन केले नाही.. कधीतरी घरावर मोठे संकट येते.. प्रयत्नांची शर्थ करूनही मार्ग सापडत नाही.. आणि अचानक फासे पलटतात आणि संकट टळते.. सगळे सुरळीत होते.. तेव्हा आजी आभाळाकडे पाहून हात जोडत म्हणते बयोच आहे बघ आपल्या घराच्या पाठीशी.. घराची आणि आपल्या सगळ्यांची काळजी अजूनही घेत राहते ती.. 



Wednesday, August 14, 2019

माझ्यासाठी श्रावण म्हणजे..

माझ्या साठी श्रावण म्हणजे.. आसमंतात पौर्णिमेचा चंद्र असावा आणि त्याच्या छातीवरच्या शौर्यपदकांप्रमाणेच तिची राखी त्याच्या पोलादी हातात चमकत राहावी.. ही गोष्ट याच दोघांची आणि त्यांच्या श्रावण सरींची..

हा ऊन सावल्यांचा खेळ त्यांच्या आयुष्याला जोडला गेला तेव्हाच.. जेव्हा त्याने मिलिटरी मध्ये जॉईन होण्याचा निर्णय घेतला.. वाटतो तितका सोपा नाही हा खेळ.. काळजीने अधीर झालेलं तिचं मन आणि भक्कम कणखर उभा तो.. त्याच्यावर मायेची बरसात करणारी ती आणि तिच्या डोक्यावर छत्र धरून स्वतः पाऊस झेलणारा तो.. 

हा सोमवार खास होता.. घरातलं आवरणं, श्रावणी सोमवार त्यामुळे तिची आणि आईची पूजेची लगबग चालू होती.. सगळं पटपट आवरून तिची ऑफिस ला निघायची घाई होती.. उपास करायचा का नाही हे अजून ठरत नव्हतं तिचं.. पण गडबडीत खायला वेळ नाही झाला म्हणून दूध पिऊन निघाली होती ती.. बघू खाऊ ऑफिस मध्ये काहीतरी उपासाचं मिळालं तर ते, नाहीतर जे मिळेल ते.. असं मनाशी ठरवत निघाली ती.. बाहेर चालू असणाऱ्या श्रावणसरी तिचं मन प्रसन्न करत होत्या.. पूर्वी बायकांना या निसर्गाच्या कुशीत शिरता यावं म्हणून तर सुरु झाले असणार हे सणवार त्यांच्या मागे.. आजची स्त्री रोजच बाहेर पडत आहे.. हा श्रावण रोजच अंगावर झेलत आहे.. भरलेलं आभाळ, रिमझिम पाऊस.. हिरव्या रंगाला पण किती वेगळ्या छटा असतात.. नाजूक पोपटी पानांपासून ते गर्द हिरव्या झाडीपर्यंत.. नकळत निसर्ग न्याहाळत तिचे विचार मोकळे धावत होते.. ऑफिस ला जाताना प्रवासातला तिचा आवडता छंद म्हणजे बातम्या ऐकणे.. तिने कानात हेडफोन घातला आणि बातम्या ऐकायला सुरवात केली.. आणि ती ऐकतच राहिली.. मन एकवटून त्याला आठवत राहिली.. 

लहानपणापासून मैदानी खेळाची आवड असणाऱ्या त्यानी जेव्हा मिलिटरी मध्ये जायचा निर्णय सांगितला तेव्हा तिला जाणवलं.. खूप मोठा झाला आपला भाऊ.. तो पर्यंत ती एक अल्लड, हट्टी लाडावलेली छोटी बहीण होती.. पण या एका निर्णयाने ती नकळत समजूतदार झाली.. आई वडिलांबरोबरीनी तीही खंबीर झाली.. घराची जबाबदारी घ्यायला शिकली.. कोणाच्या नकळत डोळ्यातलं पाणी पुसायला शिकली आणि तेव्हाच भेटला तिला हा श्रावण खऱ्या अर्थाने.. कधी काळजी तर कधी आनंदाला उधाण असा त्यांचा श्रावण बहरू लागला.. त्याची शौर्य पदक वाढत होती.. बढती मिळत होती.. आणि घरावर सुखाची बरसात होत होती.. पावसासारखाच यायचा तो अचानक प्रसन्नता घेऊन.. सुखाने भरून जायचे घर.. आणि निघायच्या दिवशी डोळ्यात भरला मेघ फक्त बरसायचा बाकी असायचा..या वर्षीही असाच निघाला तो सुट्टी संपवून.. "दरवषी पोस्टाने येते राखी तुझी.. यावेळी मी नक्की येतो सुट्टी काढून घरीच" असं सांगून मागे न बघता निघाला होता तो.. तो दिवस आणि आजचा दिवस.. या मधल्या दिवसात त्यांचं काहीच बोलणं झालं नव्हतं.. 

आज बातम्या ऐकून परत थरारली ती.. परत एकदा काळजी, अभिमान सगळंच मनात  दाटून येत होत.. परत परत तिचा हात फोन कडे जात होता.. लागणारही नाही आणि उचलणारही नाही हे माहित असूनही.. दिवसभर  बातम्याच बघत राहिली ती.. जेवायचं पण भान नाही राहिलं.. घरी आली तर आईचं ताट पण झाकून ठेवलेलं.. आई डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली अगं श्रावणी सोमवार ना आज.. ताट वाढताना लक्षातच नव्हतं बघ.. कडकडीत उपास घडला होता त्यांना त्यांच्याही नकळत.. तेवढ्यात बाबा महादेवाचा प्रसाद घेऊन आले आणि दोघींना एकच वाक्य सांगितलं..
"आकाशात इंद्रधनुष्य तेव्हाच दिसतं जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो" 

कुठूनतरी आतून बळ आलं तिला बाबांच्या वाक्याने.. आणि दरवर्षीप्रमाणेच भावासाठी घेतलेली राखी पोस्टात टाकायला निघाली ती.. आपल्यासाठी भाऊ सुट्टी घेऊन यावा एवढ्या कोत्या मनाची ती कधीच नव्हती.. 

मेघ भरला, झुरला, ओघळला अंगणी!
मल्हार थिरकला, सर आली ही श्रावणी!!

बहिणीची राखी बघून इकडे त्याचा जीव तळमळत असतो.. हातात पिस्तूल, डोक्यात जोश, मनात घरच्यांना आठवत असतो.. त्यांच्या आठवणीने तोही तितकाच हळवा झालेला असतो.. फार प्रयत्न करून शेवटी घरी संपर्क करण्यात तो यशस्वी होतो.. दर वर्षी प्रमाणेच याही वर्षी सुट्टी रद्द झालेली असते.. मोठ्या उत्साहात सांगितलं होतं बहिणीला कि राखी या वर्षी पोस्टाने पाठवू नको आता तिची समजूत कशी घालायची या विचारात तो शब्द जुळवत असतो..

तिच्या कणखर आवाजात सगळा संयम वहात असतो..
"मी लवकरच परत येईन", त्याचा निःशब्द श्वास सांगत असतो..
शांत करारी चेहरा ठेऊन तो बोलायचा प्रयत्न करत असतो..
त्या दोघांच्याही डोळ्यात  मेघमल्हार बरसत असतो..

ती कोण तर तुमच्या माझ्या सारखीच एक महिला.. आणि तो सीमा भागात लढणारा एक जवान.. बाकी  नावामध्ये काय आहे? माझ्यासाठी श्रावण म्हणजे.. आसमंतात पौर्णिमेचा चंद्र असावा आणि त्याच्या छातीवरच्या शौर्य पदकांप्रमाणेच प्रत्येक वर्षी तिची राखी त्याच्या पोलादी हातात चमकत रहावी.. !!!

Tuesday, May 1, 2012

आश्मान.. !!


१ महिन्यापूर्वी..

आज भैरवी-आश्मानच लग्न.. भैरवी माझी शाळेपासूनची मैत्रीण..
त्याच लग्नात एका मुलीशी ओळख झाली.. उर्वी.. 
उर्वी ला बघून काही कळत नव्हतं.. "कोणाची कोण असेल ही ?" भैरवी ची तर मैत्रीण नक्कीच नव्हती.. कारण भैरवीच्या सगळया मैत्रिणींना मी ओळखते..
आश्मान ची मैत्रीण म्हणावी तर त्याच्या मित्रांमध्ये  पण ती सामील होत नव्हती.. आणि नातेवाईकात पण नाही..
लग्न लागल्यावर एक लढाई जिंकल्याच्या आविर्भावात तिनी एक नजर स्टेज कडे टाकली.. आणि ती कार्यालयातून निघून गेली..

आज..

मला उर्वी भेटली अचानक.. वेश्या वस्तीमधील मुलांसाठी ती काम करत होती...हाडाची social worker .. मनापासून लोकांचे problems स्वतःचे समजून handle करणारी.. त्यातच समाधान वाटणारी.. आणि आम्ही आपले office मधून change म्हणून social work करायला गेलेले..
चहा च्या वेळी सहज गप्पा चालू होत्या.. आणि मग त्या गप्पात मला त्या दिवशी पडलेल्या "कोणाची कोण असेल ही?" चा उत्तर मिळालं जे फारच अनपेक्षित होते.. आणि तिच्या साठी ही स्टोरी लिहावीशी वाटली..

१ वर्षापूर्वी..

आश्मान आणि उर्वी दोघं बघाबघी च्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेटलेले.. तिचे आणि त्याचे सगळे विचार, सगळया आवडी निवडी जुळत गेल्या.. अगदी खाण्या पिण्याच्या, झोपण्या उठण्याच्या सवयींपासून family status, hobbies, carrier, job,  friend circle , थोडक्यात म्हणजे पहिल्यांदा भेटण्यात जे जमायला पाहिजे ते सगळ जमल.. पण आश्मान च्या घरून नकार आला.. आणि तो विषय तिथेच थांबला..

(उर्वी हे सांगत असताना मी एकदा परत बघितला तिच्या कडे .. आश्मान दिसायला handsome category मध्ये मोडेल असा.. वागण्या बोलण्यातून एखाद्या मुलीला पटकन आकर्षित करेल असा.. समोरच्या व्यक्तीच्या काळजाचा ठाव घेणारे डोळे, मुलींच्या दृष्टीने स्वप्नातला राजकुमार.. त्याचं लग्न झालं ती माझी मैत्रीण पण लाखात एक दिसेल अशी आणि त्याची जाणीव असणारी.. आम्ही तर भैरवी ला खूप चिडवलं होता लग्नात... भैरवी आणि आश्मान चा जोडा शोभून दिसेल असा.. परत एकदा भैरवी आणि उर्वी ची comparison झाली उगीचच.. त्या मानानी उर्वी अगदीच सामान्य.. डोळे प्रचंड करारी, एका नजरेत तिच्या मधला आत्मविश्वास पोचला होता माझ्यापर्यंत.. पण सावळी.. दिसायला चार चौघींसारखी ..आश्मान ला बघताच क्षणी आकर्षित करेल अशी मुलगी हवी असणार.. नकाराच कारण स्पष्ट माझ्या समोर बसलं होतं..)

तसं पण ती एक स्थळ एवढंच बघत होती त्याच्या कडे.. त्यामुळे तिला फार फरक पडला नव्हता या सगळ्याचा.. नकार आल्यावर ती आपल्या मार्गाला लागली, परत तिचे तेच कांदे पोहे चालू राहिले..

८ महिन्यांपूर्वी..

उर्वी: "आश्मान, तू हे चांगला नाही केलस.. तू मला तेव्हा सांगायला हव होता.. तुझ्या आयुष्याचा खूप गुंता झाला आहे.. निदान मैत्रीण म्हणून तर मला सांगायचं हे सगळं..
आश्मान:  हो, पण उर्वी एक विसरते आहेस तू.. आपण बघाबघी च्या कार्यक्रमात समोर आलो होतो तेव्हा.. तू माझी मैत्रीण असतीस तर हे सगळ तुला आधीपासूनच माहित असत.. सांगायची आवश्यकता पडली नसती.. आणि मी तुला तस पण नंतर सांगणार होतो.. पण मला वाटल नाही आपले लग्नाचे पुढे काही बोलणे होईल.. त्यामुळे नाही सांगितलं.. मला आधीच खूप मनस्ताप झाला आहे, उर्वी.. खूप guilt सहन केला आहे आत्तापर्यंत.. प्रेमभंग झालेला.. मग एक लग्न ठरून मोडलेले.. खूप टोमणे ऐकले आहेत लोकांचे.. खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा.. आता शांतता हवी आहे.. मला आता अजून एक मनस्ताप नको आहे उर्वी.. तुला जो काय त्रास झाला त्याबद्दल माफ कर मला .. आपण नको भेटायला परत..

जेव्हा आश्मान बद्दल उर्वी ला कळल तेव्हा ती थोडी चिडली होती.. आपल्यापासून काहीतरी लपवलं गेल्याची भावना उसळली तिच्या मनात.. आणि तिनी त्याची उलट तपासणी घेण्यासाठी भेटायला बोलावलं होतं.. पण आता मात्र तिच्या नकळत त्याच्या बोलण्यात ती अडकत चालली होती.. त्याच बोलणं तिला पटत होत.. त्याच्या डोळ्यात तिनी खरे पणा तर बघितलाच पण तिला हे कळल कि हा व्यक्ती कोणाला धोका नाही देऊ शकत कधी.. जे त्याच्या मनाला वाटेल तेच तो करत असणार.. खूप हळवा झाला होता तो तेव्हा.. डोळे भरले होते त्याचे.. फक्त तिच्या समोर तो डोळ्यातला पाणी बाहेर येऊ देत नव्हता.. एवढ सगळं होऊन पण त्याच्या मधला माणूस जिवंत होता.. समोरच्याला होण्यार्या त्रासांनी तो स्वताला त्रास करून घेत होता,.. आज त्याचा स्वतःवरच विश्वास राहिला नव्हता.. लग्न वगैरे या सगळ्याचा विचार करायची त्याची आत्ता मनस्थिती नव्हती.. त्याच्या मधला आत्मविश्वास हरवला होता..
तिला त्याही परिस्थितीत याचा आनंद झाला कि आपण माणसाची पारख करायला नाही चुकलो.. या मुलामध्ये खरेपणा आहे.. खरच सुसंस्कारी आणि माणसाच्या भावनांची कदर असणारा.. समोरच्याला समजून घेणारा..  
त्याच बरोबर तो खूप एकटा आहे आणि त्याला आत्ता एका चांगल्या मित्राची गरज आहे हे तिला पहिल्या बघाबघीतच कळल होतं.. पण त्याच कारण तिला तेव्हा कळल नव्हत.. आता ते कळल्यावर तिच्या मधला माणूस तिला शांत बसू देत नव्हता..

६ महिन्यांपूर्वी..

उर्वी आणि आश्मान ची आता खूप चांगली मैत्री झाली होती.. इतके दिवस ते मित्र पण नव्हते, आणि कुठल्या नात्यात पण नव्हते.. त्या नात्याला काहीच नाते नव्हते..  बोलताना त्यांना कळत नव्हते आपण का बोलत आहोत, का भेटत आहोत.. पण आता त्यांची इतकी चांगली मैत्री झाली होती कि हे सगळे प्रश्न गळून पडले होते.. दोघं शेजारी बसल्यावर काही ना बोलता त्यांना एकमेकांच्या मनातले विचार कळायला लागले होते.. उर्वी त्याला वर्तमानात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत होती..

उर्वी: आश्मान, आता बाहेर यायला पाहिजे यातून.. किती दिवस आता हा ताण घेणारेस डोक्यावर.. आणि घरच्यांचा तर विचार कर.. आता विचार कर लग्नाचा.. मी बघू का मुली तुझ्यासाठी? घरी बोलू का तुझ्या?
आश्मान..आता मला पण वाटत आहे.. खूप झाला एकट जगणं ..  आता आयुष्यात पुढचं पाऊल टाकायची वेळ आली आहे.. 

४ महिन्यांपूर्वी..

उर्वी, आज एका मुलीला भेटलो.. चांगली आहे तशी.. पण माझ परत तोच गोन्धळ होत आहे..  एक दोन भेटीत मी मुलीला ओळखू शकत नाही.. आणि जास्त वेळ पण घेता येणार नाहीये या बघाबघी मध्ये.. काय करू?

उर्वी:  मुलगी कशी आहे? तुला समजून घेईल ना? घरच्यांची काळजी घेईल ना? काय शिकली आहे? कशी आहे दिसायला? कुठे job करते? मला नाव सांग आणि कुठे राहते, काहीतरी सांग मी माहिती काढते.. बघू आपण मुलगी कशी आहे.. वेळ द्या थोडा एकमेकांना.. एक दोन भेटीत ती कशी आहे ते नाही कळणार तुला.. तिला पण वेळ दे तुला समजून घ्यायला.. "तुझा स्वभाव कसा आहे" असं तिला विचारू नको.. ते समजून घ्यायचा प्रयत्न कर.. आणि हे नात फुलायला वेळ द्यायला लागतो.. उगाच घाई करू नको.. जोडण्याची पण आणि तोडण्याची पण.. कमी बोल.. जास्त ऐकून घे.. समजून घे..आणि उगाच काहीतरी भाषण झोडू नको तिला.. पळून जाईल ती..

आश्मान:  उर्वी, अग शांत हो.. तुला जरा पण दम नसतो ना कुठल्या गोष्टीमध्ये? किती बडबड, किती घाई.. स्वस्थ बस ना जरा.. थांब ना सांगत आहे ना सगळे हळूहळू.. 

३ महिन्यापूर्वी..

भैरवी: मी आश्मान कडून तुझ्या बद्दल बरच ऐकल आहे.. तुमच्या मैत्रीबद्दल भरभरून बोलतो तो.. तुझे खूप आभार उर्वी.. तू आश्मान ला जर रूळावर आणलं नसत तर आज आमच लग्न ठरलं नसत.. त्याच्या मधला confidence , decision making power तू परत आणलीस.. आणि हो.. तो माझा नाव का बदलणार आहे? तुला तर माहित असेलच..
उर्वी: मी काहीच केला नाही भैरवी.. आश्मान चा अर्थच मुळात सूर्यासारखा तेजस्वी.. ते तेज होतच त्याच्या मध्ये.. 
त्याच्या मनात झालेला गुंता फक्त मी सोडवला.. त्याच्या गिटार चा ट्युनिंग गेलं होत..  त्यामुळे notations बरोबर असून पण गाण बिघडलं होत.. fine tune केल्यावर आता परत guitar छान वाजायला लागली.. पण मुळात हे विसरू नको.. आश्मान पहिल्यापासूनच उत्कृष्ठ guitar वाजवतो..ते मी नाही शिकवलं.. मी फक्त tuning केलं..
आणि नावाच म्हणशील तर तुझा नाव शाल्मली.. एवढ चांगल नाव बदलून तो भैरवी ठेवणार आहे त्याबद्दल वैतागली असशील ना? चिडू नको.. अर्थ समजून घे म्हणजे राग जाईल तुझा..
भैरवी म्हणजे सगळया रागांमधला शेवटचा राग.. त्याच्या आयुष्यातली तू अशी मुलगी आहेस जी त्याला त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देशील..

आज..

उर्वी, hats off !! .. तू त्याच्या आयुष्याचा गुंता सोडवला.. त्याच तर लग्न लावून दिलास पण तुझ्या लग्नाचं काय? तुझा एकटे पणा?
उर्वी: अग माझा कसला एकटेपणा? मी खूप मजेत आणि समाधानात आहे.. खूप साधं आयुष्य जगतेय.. जे मनाला योग्य वाटेल ते करतेय... आणि लग्नाच्या बाबतीत म्हणशील तर ज्या दिवशी मी एखाद्या स्थळाकडे practically विचार करून फक्त "लग्नाचा मुलगा" म्हणून बघीन आणि माझा social work मध्ये नाही आणणार त्या क्षणाला लगेच माझा लग्न ठरलेला असेल :) आणि हो अवनी,हे सगळं ऐकून तू घरी गेल्यावर लिखाण करशीलच, त्याला नाव पण देशील.. नाव देताना एकच काम कर.. तुझ्या कथेचं नाव "उर्वी" नको देऊ.. कारण या कथेत उर्वी नाहीच कुठे..  ही कथा फक्त "आश्मान" ची आहे..!!!