मध्यरात्री उषा किरण सोसायटी च्या दारात ambulance आणि खूप सारे पोलीस जमा झाले.. आतून जखमी निशा ला उचलून सगळ्या पोलिसांनी घरी पोचवले.. आणि सगळे पांगल्यावर सोसायटीला परत एकदा तोंड फुटलं..
"काय करायची काय माहित.. दिवसभर घरीच असायची.. रात्री जायची कुठेतरी..कधी पार्टी ला जातेय वाटायचं.. कधी मोठ्या कंपनी मध्ये निघाली आहे वाटायचं.. तर कधी कधी वेश्या बायकांसारखी फिरायची.."
"घरचे बरे चालू देतात असली थेरं…"
"लहान पोरगी पदरात.. तिचा तरी विचार करायचा रोज रात्री तोंड काळ करताना.."
********************************************
निशा ची फॅमिली काही महिन्यांपूर्वीच रहायला आलेली उषा किरण मध्ये.. जास्त ओळख नव्हती कडेच्या लोकांशी.. निशा, तिचा नवरा, मुलगा, सासू सासरे, लहान दीर जाऊ असा घरी गोतावळा.. सगळे एकमेकांना धरून राहणारे.. कधी घराच्या बाहेर आवाज नाही गेला इतके समजूतदार घर.. निशा घरीच असायची दिवसभर.. संध्याकाळी लहान लेकराला घेऊन खाली फिरायला यायची.. जाता येता बोलायची.. ऑफिस ने मुलगा एक वर्षाचा होईपर्यंत सुट्टी दिली आहे म्हणायची.. इथंपर्यंत उषा किरण मध्ये सगळं सुरळीत चालू होतं.. चाकोरीबद्ध.. मुलगा सहा सात महिन्याचा झाला की निशा ने स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला सुरवात केली.. भरपूर व्यायाम सुरु केला.. आणि इथेच उषा किरण ला पहिल्यांदा तोंड फुटलं.. कोण celebrity लागून गेली ही इतकी तब्बेत सांभाळायला.. !!
मुलगा वर्षाचा झाल्यावर निशा ऑफिस ला जायला लागली.. पण रोजच night shift.. रोज टापटीप तयार होऊन रात्री १० च्या पुढे निशा बाहेर पडे.. लोकांचे observation काही चुकीचे नव्हते.. कधी झगमग तयार होऊन निघायची जसे काही मोठ्या पार्टी ला जात आहे.. कधी मोठ्या कंपनी मध्ये निघाल्यासारखी वाटायची.. तर कधी कधी बघून तर call girl आहे का काय अशी शंका यायची.. उषा किरण नी मग कधी तिच्या सासू कडे तर कधी लहान जावेकडे कानोसा घायला सुरवात केली .. पण त्यांना काही मनासारखी उत्तरे मिळेनात.. आणि मग रोजच चर्चेला ऊत यायचा.. आणि आज अशी दारात ambulance.. !!
निशा ला अलगद घरी नेलं.. आणि घराचं दार बंद झाल्यावर आज पहिल्यांदा त्यांच्या घरातला आवाज बाहेर ऐकू आला.. एक आवाज काळजीचा.. एक आवाज रडण्याचा.. एक आवाज समजावण्याचा.. आणि मग एक खंबीर आवाज.. पण काय झालं चार भिंतीत ते मात्र उषा किरण सोसायटी ला शेवटपर्यंत कळलं नाही.. !!!
********************************
एक दिवस होता जेव्हा निशाचे सगळे कुटुंब निवांत चहा पीत बसले होते.. एकीकडे TV वरच्या बातम्या चालू होत्या.. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या बातम्या बघून निशा म्हणाली.. कोण बदलणार ही परिस्थिती आणि कधी.. त्यावर तिचा नवरा म्हणाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं माझ्यासमोर निवांत चहा पीत बसली आहेत.. निशा ला पहिले समजलं नाही की त्याला काय म्हणायचे आहे.. पण तो बोलायला लागला.. प्रत्येक वेळी आपल्या घरात काही अन्याय झाला तरच आपण जागे होणार का.. घरातल्या सगळ्यांनीच दुजोरा दिला.. सगळे निशाच्या पाठीशी उभे राहिले.. आणि त्यांच्या घरात निवांत एकत्र प्यायला गेलेला तो शेवटचा चहा.. दुसरा दिवस वेगळाच उगवला.. निशा नी अभ्यास करायला, परीक्षा द्यायला सुरवात केली आणि ती उत्तीर्ण होत गेली.. पोलीस खात्यामध्ये तिने स्वतःच स्थान निर्माण केलं.. आणि तिची हिम्मत, जिद्द आणि चातुर्य पाहून तिच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं काम सोपवण्यात आलं.. रोज रात्री एक भरारी पथक निशा च्या नेतृत्वाखाली काम करू लागलं.. पोलीस स्त्रियांचे हे पथक वेगवेगळ्या वेशात रात्री अपरात्री फिरू लागले.. गुन्हेगारांना रंगे हात पकडू लागले.. परिस्थिती बदलण्याचे एक वचन निशाने घरच्यांना दिले.. आणि तिची ओळख लपवण्याचे एक वचन मागूनही घेतले..
*******************************
जखमी निशा अंथरुणात होती.. सेवेला सगळे घरातले.. आणि इकडे निशाची लहान जाऊ निघाली "पार्लर" मध्ये.. "पार्टी" साठी make over करायला.. निशाची तब्बेत सुधरेपर्यंत तिच्या जागेवर रात्री night shift कोण करणार हा प्रश्न आधीच सोडवलेला होता.. पहिले घरातले आवरल्यावर चार भिंतीत दोघी जावा दिवसभर काय करायच्या हे गुपित फक्त त्या घरातल्या चार भिंतींना माहित होते.. रात्री जाऊ निघाली पार्टी साठी आणि उषा किरण ला परत एकदा तोंड फुटलं…!!!!!!
No comments:
Post a Comment