Showing posts with label hobbies. Show all posts
Showing posts with label hobbies. Show all posts

Tuesday, April 12, 2022

Intraday Options Trading- अर्थातच!!! 📉📈

To be or not to be. Buy call or sell put? Bullish or bearish? Blog चा आजचा विषय "अर्था"तच. जगातली super charming गोष्ट. nifty index candles.!! Intraday options trading.!!!

तर. Derivatives या शब्दाने जो अकरावी मध्ये पिच्छा पुरवायला सुरुवात केली ते कॉलेज च्या शेवटच्या वर्षा पर्यंत. आणि आता मात्र ट्रेडिंग करायला लागल्यावर वाटतंय आपणच त्याचा पिच्छा पुरवावा. जगण्याचा "अर्थ". पैसा. अनेक हौशींपेकी एक intraday trading आणि आता रोजचा अविभाज्य भाग. पैसा कमवायचा. मध्यम वर्गीय माणसासारखा हळूहळू साठवायचा. मान्य. ते तर होत राहीलच. पण या वयात vibrant, most volatile market मध्ये हात नाही धुतले तर काहीतरी adventure miss केल्यासारख आहे.

Intraday options trading. Technical analysis सोबतच तोंडी पाढे, तोंडी बेरीज वजाबाकी, ग्राफचा व्यवस्थित अभ्यास, डायरेक्ट प्रपोर्शन वरती पकड जर असेल तर आणि तरच इकडे घुसायला हरकत नाही. नाहीतर मग तळ न सापडणारी खोल विहीर म्हणून सोडून द्यावे. किती गर्तेत जायला लागेल सांगता येत नाही. पण ज्याला maths  आवडते अशा माणसाने नक्की प्रेमात पडावे असा खूप सुंदर प्रकार म्हणजे derivatives - options. 

Trading चे ढोबळ मानाने प्रकार दोन. Equity आणि Derivatives. Derivatives मध्ये प्रकार दोन options and futures. Options म्हणजे थोडक्यात समजून उमजून अभ्यास करून मग केलेले technical prediction. खतरों के खिलाडी फक्त इथे पोचतात. 

एखाद्या share ची किंमत 900 रुपये आहे आपल्याला वाटत आहे की येणाऱ्या expiry cycle पर्यंत हा share 950 रुपये होईल तर तो झाला 950 call option. आणि किंमत उतरून 850 होईल तर तो झाला 850 put option. जर आपले prediction बरोबर दिशेने गेले तर त्या proportion मध्ये आपल्याला profit होतो.

काही लोक म्हणत असतात की मार्केट उतरल्यावर आम्हाला फायदा झाला ते put option घेतलेले लोक असतात. हे लोक जेव्हा संख्येने वाढतात तेव्हा मार्केट bearish दिशेने जायला लागते. (For same index, if open interest put / open interest call ratio greater than one then - market going into bearish direction)

Thumb rule एकच. कोणाचाच सल्ला ऐकायचा नाही. वेगवेगळे YouTube वाले, ब्लॉग वाले, न्यूज वाले. हे फक्त त्यांचा trp वाढवत असतात. आपला प्रॉफिट नाही. आपला प्रॉफिट वाढवायला फक्त option chain, open interest चा chart, आणि candles graph 📈 📉 हे आणि हेच साथ देतात. दुसरा thumb rule आपला एक ट्रेड 2-5 मिनिटात संपवून टाकायचा. शेवटचा thumb rule. सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे ही. पण ती एका दिवसात मारून चिकन तंदुरी करून खाऊन नाही टाकायची. आणि ती सारखेच अंड देईलच अशी पण अपेक्षा नाही करायची. तिचा पण mood आणि fertile period असतोच की. बाकी सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

यात शिकण्यासारखे खूप काय काय आहे. Head and shoulder pattern आणि butterfly Technique आपले सोपे सोपे आणि त्यातल्या त्यात खात्रीशीर. Support, resistance, premium, time value, monthly expiry, weekly expiry, lot size. बरच खोलात सांगण्यासारख आहे. पण सगळे एकदम एका ब्लॉग मध्ये लिहिले तर उद्या काय लिहू?  

कुठला ट्रेड टाकायचा ते आपला आपला अभ्यास करून ठरवा. पण जाता जाता एकच माझा स्वतः चा अनुभव. Income च्या पाच टक्के ट्रेडिंग आणि Portfolio च्या दहा टक्के फक्त ऑप्शन मध्ये खेळवायला ठेवायचे. आपल्या पगारात होम लोन , शाळेची फी भरायची आहे आणि सोबतच पूर्ण घर चालवायचे आहे हे लक्षात ठेऊन काय ते खेळायचे म्हणजे झालं. पण तेवढे मात्र करून बघायचेच. केक वरची चेरी नाही खाल्ली तर केक खाण्यात काय मजा!!! 

Inspire होऊन करून बघा. तुमचे experience share करत रहा. एकमेकांना सावध करत रहा. अनुभव सांगत रहा. टिप्स देत रहा. तुम्हाला काय वाचायला आवडेल ते सांगत रहा. आणि पैशाचे नीट नियोजन करायला विसरू नका. Basic आहे ते..!!

ता. क. ट्रेड हुकला तर त्या दिवशी असे ब्लॉगिंग मधून पैसे वळते करायला काही हरकत नाही 😅 ब्लॉगिंग मधून पैसे कसे मिळतात? ते पुढच्या वेळी..  

-- अवनी गोखले टेकाळे



Wednesday, January 12, 2022

"अर्थातच" Bullish!!!

Share market ची ऐशीतैशी. ब्लॉग च नाव? "अर्थातच" Bullish!!!

ही "त्यांची" गोष्ट. त्यांना नाव नाहीच काही. तुमच्या आमच्यातलेच ते. सामान्य, मध्यम वर्गातले. टुकीने संसार करणारे. त्यांचीही काही स्वप्न आहेत. छोटीशी. आणि ती स्वप्न पूर्ण करायला धावणाऱ्या त्यांचीही गाठ पडते अर्थातच "अर्थाशी". वित्त, अर्थ हे झाले मोठ्या माणसांचे शब्द. त्यांना कळतो तो सामान्य बोलीभाषेतला शब्द - पैसा!!

ते शिकत असतात ना शाळेत, कॉलेज मध्ये. तेव्हा त्यांचे सगळ्यात कुठल्या विषयाशी वाकडे असते तर ते अर्थशास्त्र या विषयाशी. Debit credit हे शब्द त्यांना दुरून पण ऐकले की पळून जावे वाटते. असे ते. आणि मग शिक्षण संपल्यावर त्यांच्या लक्षात येते ज्याच्यापासून इतके दिवस पळत होतो त्याच्यापासून सुटका नाहीच आता. आणि मग बरेच पर्याय हिंडून फिरून कधी ना कधी येतातच ते इकडे. Share Market!! ९ ते ३.३० मध्ये चालणारी ही झगमगती जादुई दुनिया.

एका रेषेत चालणाऱ्या दोन मुंग्या समोरासमोर आल्यावर काहीतरी बोलून पुढे जातात. तसे दोन ट्रेडर्स समोरासमोर आल्यावर bullish, bearish, nifty, sensex, put, call, options, futures, ipo, दोन लॉट- चार लॉट अशा अगम्य भाषेत काहीतरी बडबड करतात. त्याच्यासोबत सतराशे साठ कंपन्यांची नावं घेतात. आणि बाकीचे त्यांच्याकडे एलियन कडे बघावे तसे तसे बघत असतात. 

त्यांना वाटत असतं. shares म्हणजे पैसे बुडाले. shares म्हणजे फार वेळ देऊन करायची गोष्ट. आमच्याकडे तेवढा वेळ नाही. सकाळी ना मला डबे करायचे असतात. सकाळी ना मला आवरून ऑफिस ला पोचायचे असते. सकाळी ना मुलाला शाळेत सोडायचे असते. आमच्याकडे गुंतवायला तेवढे पैसे नाहीत. आमच्याकडे ना आज पैसे आहेत पण उद्या मला ते लगेच परत लागू शकतात मी पाच पाच वर्ष लॉक करून ठेऊ शकत नाही पैसे. आम्हाला ना त्यातले काहीच कळत नाही. आमचे हे करतात बाई असलं काहीतरी, मी नाही लक्ष घालत. असे एक नाही अनेक मुद्दे. अनेक कारणं ते देत असतात. कधी दुसर्यांना. कधी स्वतः ला. पण तरी त्या प्रत्येक वेळेला मनातून एक सुप्त इच्छा असतेच. काय आहे तरी काय हे प्रकरण. 

आणि मग हिम्मत करून, याला त्याला विचारून, सतरा लोकांचे डोके खाऊन, गुगल करून शेवटी उतरतातच ते ही मैदानात. काठाकाठाने चालत चालत कधी ते धापकन पाण्यात पडतात त्यांना पण कळत नाही. गटांगळ्या खात खात शेवटी जीव मुठीत धरून पोहतातच ते. आणि मग काही दिवसांनी ते पण intraday, equity, derivatives, small cap, mid cap असे शब्द बोलायला लागतात. 

जाणकारांच्या सोबत बसून अवश्य शिकून घ्यावे अशी गोष्ट. वेळ नाही म्हणून share market बघत नाही म्हणणार्यांनी फक्त डिमॅट अकाऊंट काढून घ्या. app mobile मध्ये टाकून घ्या. whats app जितक्या वेळा दिवसभरात उगाचच ओपन करतो तितक्या वेळा उगाचच ते app उघडून बघा. निफ्टी ला परत एकदा वयात आलेलं पाहून पाहून एखादा ट्रेड करायची आपोआप इच्छा होईल. झालीच इच्छा तर तुम्हीही या गोष्टीचा आणि पर्यायाने "त्यांचा" आपोआप एक भाग बनत जाल. 

त्यांची गोष्ट तर सांगितली. पण मी कोण? "त्यांच्यातलीच" एक. 

"अर्थातच" अवनी गोखले टेकाळे 

आज काही जागतिक ट्रेडर्स डे वगैरे नाही बरं. असले डे बी आपण पाळत नसतो. खूप दिवस या विषयवार ब्लॉग लिहायचा होता. आज वेळ मिळाला इतकंच. 


Tuesday, May 25, 2021

छंदासाठी वेळ कसा काढायचा? - "Defragmentation of time"

ही आपली नेहमीची तक्रार. दैनंदिन रोजची कामे करून आपल्याला छंद जोपासावे वाटतात. पण वेळ मिळत नाही. तो कसा काढायचा ते कळत नाही. मग आपले नेहमीचे बहाणे सुरु होतात. पाहुणे, आलंगेलं, जॉब, मुलांच्या परीक्षा, सणवार, लग्नकार्य. हे बहाणे आपणच देत राहतो स्वतः ला. एवढ्यावर पण थांबत नाही आपण, आपल्या ओळखीत कोणी तिचे छंद आवडीने जोपासत असेल तर "तिचं बरंय ग, तिला काय जातंय असल्या गोष्टी करायला, तिला काय काम असतंय" असे टोमणे मारायला पण कमी करत नाही. पण हा विचार करायला पाहिजे खरं तर, की तिला हा वेळ कसा मिळत असेल? आपण जर दिवसातला थोडा वेळ स्वतःच्या छंदासाठी दिला तर आपण दिवसभरातील रोजची कामे पण उत्साहात करू शकतो. 

ज्यांना छंद या शब्दाचा अर्थ कळला त्यांना लॉकडाऊन मध्ये कंटाळा आला नाही, ते डिप्रेशन मध्ये गेले नाहीत. बाकी जर नसतील काही छंद तर वेळेत सावध व्हायला पाहिजे. नाहीतर संदीप खरे ची "कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो, आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो" हे विधान आपल्या आयुष्याची टॅग लाईन व्हायला वेळ लागणार नाही. 

डिफ्रॅगमेंटेशन आपल्या भाषेतला शब्द. एखादी गोष्ट सेव्ह करायची असते पण मेमरी फुल्ल असा मेसेज येतो. म्हणजे ती मेमरी नसतेच का? तर तसे नाही. पण ती तुकड्या तुकड्यात विखुरलेली असते. एकदम छोटे निरुपयोगी तुकडे. मग डिफ्रॅगमेंट हे बटण दाबले कि असे सगळे तुकडे एकत्र येतात आणि हार्ड ड्राईव्ह वरती स्पेस तयार होते. आपले काम आहे त्याच जागेत व्यवस्थित पणे होऊन जाते. 

आपल्या रोजच्या आयुष्यात पण असे खूप तुकडे तुकडे असतात वेळेचे. जे आपण एकत्र केले तर त्यातून आपल्याला "वेळ" मिळू शकतो. आपल्या रोजच्या रुटीन मधले असे हाशहूश करताना चे पाच पाच मिनिट गोळा करायला सुरुवात केली तर त्याचा एकत्रित पणे थोडा वेळ तयार होऊ शकतो आणि तो आपल्याला आपल्या छंदांसाठी वापरता येऊ शकतो.

लिहायचे आहे पण वेळ होत नाहीये? मग भाजी चिरताना, अंघोळ करताना, प्रवास करताना ज्या विषयांवर लिहायचे आहे, त्याचा विचार सुरुवात करायची. हळूहळू दिवसभरात पाच पाच मिनिट करत त्या विषयावर विचार करायला वेळ सापडायला लागतो. विचार करून पूर्ण होणं ही लिखाणातली महत्वाची गोष्ट. अशी तुकड्या तुकड्यात विचार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की रात्री सगळे झोपल्यावर काही कळायच्या आत आपला लेख कागदावर उतरलेला असतो आणि शांत झोप लागते. हीच गोष्ट एखाद्या प्रोफेशनल प्रेझेंटेशन ची. 

आधीच्या बायकांकडून ही management आपल्या पिढीने शिकण्यासारखी आहे. Multi tasking. tv समोर बसल्या तरी हात चालूच. मग एखादी स्वेटर साठीची सुई विणून होईल, गवार मोडून होईल, वाती वळून होतील, गव्हले काढून होतील. व्हाट्स ऍप चे फॉरवर्ड सतत वाचण्यापेक्षा मोबाइल मध्ये जर किंडल वरती एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक डाउनलोड करून ठेवले तर दोन दोन पान करत कधी पुस्तक वाचून संपेल कळणार पण नाही. पाहुणे राहायला आल्यावर वेळ होत नाही म्हणल्यापेक्षा रात्री जेवण झाल्यावर गप्पा मारता मारता त्यांनाच समोर बसवायचे. त्यांचेच एखादे स्केच करायचे किंवा त्यांना पियानो वाजवून दाखवायचा. तेही खुश आपण पण खुश. 

आपलं जग deadline वरती चालते. manager बोलला की हे काम आज सात वाजेपर्यंत पूर्ण करा की दुनिया इधर की उधर हो जाये काम पूर्ण झालेले असते सात वाजता. पण आपल्या छंदांना आपण काही deadline लाऊन घेत नाही. आणि म्हणूनच ते आपल्या मनाच्या काठावर बसून राहतात, वाट बघत. कधी आपण त्यांना वेळ देतो याची वाट बघत. करून तर बघा वेळेचे डिफ्रॅगमेंटेशन. आणि वेगवेगळे छंद जोपासायचा प्रयत्न करून पहा. धावपळीत पण वेळ निघत जाईल. माझा तर झाला ब्लॉग लिहून. तुमचे काय? काढा वेळ तुम्हाला आवडती गोष्ट  करण्यासाठी. आणि जरूर फोटो काढून पाठवा. इतरांनाही प्रोत्साहन देत रहा. 

-- अवनी गोखले टेकाळे  

ता. क. माझे छंदाविषयी बरेच काय काय लिखाण आहे. ते हळूहळू करत एकत्रित करायचा प्रयत्न करत आहे. ब्लॉग च्या उजव्या बाजूला hobbies या लेबल वरती या विषयातील सगळे लेख एकत्रित वाचायला मिळतील. 

Thursday, April 2, 2020

घुंगरू..

आज घराची पहाट थिरकली ती घुंगरांच्या तालावरच.. पलक बेभान होऊन नाचला.. आणि नाचतच राहिला.. एकेकाळी नकार देणारे डोळे आता फक्त भरून वहात होते.. 

*********************

पलक तसा लहान पणापासून अभ्यासात हुशार.. कायम पहिला नंबर गाठणारा.. शिक्षकांचा मान.. घरच्यांना अभिमान.. त्यात दिसायलाही देखणा.. तो जाताना कुठल्या मुलीने नजर वळवून पाहिले नाही असे झाले नाही कधी.. तसे पलक ला छंदही अनेक.. गाणे म्हणू नका, ट्रेकिंग म्हणू नका, swimming म्हणू नका.. सगळ्यात पुढे.. तसं तर नावं ठेवायला कुठे जागा नाही.. पण त्यातल्याच एका छंदाने त्याच्या शांत निवांत आयुष्यात वादळ घोंगावले.. पलक ला नृत्याची अफाट आवड.. नुसती आवड असते की बऱ्याच मुलांना.. गाणी लावून थिरकतात की बरीच पावलं.. पण पलक तेवढ्यावर थांबणार नव्हता.. त्याला पायात घुंगरू बांधून classical dancer व्हायचे होते.. त्यातच carrier करायचे होते.. आणि घरात पहिली ठिणगी पडली ती तिथेच.. "आपल्या घरात पुरुषांनी पायात घुंगरू बांधून नाचायला परवानगी नाही" असे म्हणत घरच्यांनी घुंगरू माळ्यावर टाकून दिले.. 

"हे उसासे तुझे भिंतीत कोंडलेले.. 
हे प्राक्तन तुझे भाळी गोंदलेले…"

पलक चा आक्रोश चार भिंतीत बंद झाला.. आणि शेवटी त्याने जगरहाटी स्वीकारली.. शिकून मोठ्या कंपनी मध्ये नोकरीला लागला.. पुढे जाऊन संसाराला लागला.. पण माळ्यावरचे घुंगरू त्याच्यातल्या कलाकाराला अस्वस्थ करत होते.. 

**********************

अचानक नियतीचे चक्र फिरले.. संचार बंदीने सगळ्यांना महिनाभर घरी बसवले..थोडेच दिवसात पलक ची छोटी मुलगी आराध्या घरी बसून कंटाळली.. तिचे मन गुंतवण्यासाठी पलक हरतऱ्हेने प्रयत्न करत होता.. त्याच्यामधला दबलेला कलाकार हळूहळू जागा होत होता.. आणि त्यात मुलीने एक दिवस माळ्यावर चढण्याचा हट्ट धरला.. तिचे कुतूहल जागृत होत होते माळ्यावर वेगवेगळ्या ठेवलेल्या गोष्टी बघून.. आणि त्यात तिचे लक्ष गेले पलक च्या घुंगरांवर.. भळभळती जखम परत एकदा उघडी झाली.. पलकच्या मनाने परत एकदा बंड पुकारले.. यावेळी त्याला साथ द्यायला सज्ज होती छोटी आराध्या.. आणि परत एकदा हळूच घुंगरू माळ्यावरून खाली आले.. 

आज घराची पहाट थिरकली ती घुंगरांच्या तालावरच.. पलक बेभान होऊन नाचला.. आणि नाचतच राहिला.. एकेकाळी नकार देणारे डोळे आता फक्त भरून वहात होते.. 

Saturday, March 28, 2020

सरगम.. विस्मृतीतील दुसरा छंद ..

विस्मृतीत गेलेला छंद हा विषय डोक्यात घोळत असताना आज अचानक एक शॉर्ट फिल्म बघण्यात आली.. "पहिला पाऊस"..  नायिका मेघा घाटघे हिची.. या शॉर्ट फिल्म चा विषय पण साधारण असाच काहीसा.. म्हणून जास्त भावली.. म्हणून आज त्याच बद्दल थोडेसे.. 

विषय साधासा.. टिपिकल मुंबई मधलं चाकरमानी आयुष्य.. सकाळी गजर होताच तिची एन्ट्री थेट गॅस च्या समोर.. सतत टपटपणारा घाम पुसत घड्याळाच्या तालावर धावत ती आवरते.. धावत पळत ट्रेन पकडते.. ऑफिस मध्ये पोचल्यावर काम सुरु.. तेच तेच चक्र अविरत चालणारं.. तळहातावरच्या रेषांमागोमाग पळणार आयुष्य.. आणि त्यात अचानक तिला एका शाळेतल्या मित्राचा फोन येतो.. साहजिक तिच्या विस्मृतीत गेलेला तो आपली ओळख आणि फोन करायचे प्रयोजन सांगतो.. 

विषय साधासा.. तिनी शाळेत असताना एक गाणं शाळेच्या कार्यक्रमात सादर केलेलं असतं.. " ओ सजना, बरखा बहार आई.." ते गाणं त्याच्या डोक्यात तिच्या आवाजासकट पक्के बसलेले.. आज तेच गाणं त्याच्या कानावर पडत.. त्याला ती आठवते.. अगदी सहजच.. तिचा नंबर मिळवून तो फोन करतो.. फक्त हेच सांगायला की गाणं कधीच बंद नको करू.. 

तिच्या डोळ्यात गंगा जमुना.. घरी जाताना ट्रेन मध्ये भाजी निवडताना ती एकदम भूतकाळात हरवते.. एकही संवाद नसलेला भूतकाळ खूप काही सांगून जातो.. तिच्या गाण्याला घरून असलेला विरोध.. तिनी कपाटात लपवून ठेवलेला लता मंगेशकर चा फोटो.. 

दुसऱ्या दिवशी परत सकाळी गजर होताच तिची एन्ट्री थेट गॅस च्या समोर.. पण आज थोडी थबकते.. ती घसा खाकरते.. "ओ सजना, बरखा बहार आई.." नवरा आणि मुलगा धक्का बसल्यासारखे जागे होऊन स्वयंपाक घराच्या दारात.. तिचे डोळे भरलेले.. काहीसे समजून उमजून तिला space देऊन ते दोघे परत पडदा सरकवून घेतात.. 

ती रमते स्वतःत.. हरवते.  गात राहते.. आणि गातच राहते.. निचरा होत राहतो.. डोळे भरून येतात.. वाहू लागतात आणि मग प्रसन्न हसू पसरत.. तिच्या चेहऱ्यावर.. 

विषय साधासा.. अतिशय कमी संवाद.. पण मनाला भावून गेला.. असे कितीतरी छंद असतात.. आपल्या विस्मृती मध्ये गेलेले..  हीच ती वेळ.. हाच तो क्षण.. त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा.. हे काही दिवस घरी बसून नुसते tv, whats app बघण्यापेक्षा एकदा स्वतः मध्ये डोकावून या छंदांना परत एका साद द्या.. ते वाट बघत आहेत तुमची.. 

ता. क. १.  शॉर्ट फिल्म खरंच भावली म्हणून लिहावे वाटले.. प्रमोशन वगैरे करायचा काही नवीन छंद नाही.. 
ता. क. २.   माझी घुंगरू ही १०० शब्दांची कथा सर्वोत्कृष्ठ कथा ठरली आहे.. ती सुद्धा विस्मृतीतील छंद याच विषयावर आहे.. ती पण वाचून प्रेरणा घ्यावी.. 

-- अवनी 

Tuesday, March 24, 2020

घुंगरू.. विस्मृतीतील एक छंद..

"आपल्या घरात पुरुषांनी पायात घुंगरू बांधून नाचायला मान्यता नाही".. असे म्हणत पलक चे घुंगरू घरच्यांनी माळ्यावर टाकले ते आत्तापर्यंत.. शेवटी तोही जगरहाटी जाणून शिकून नोकरीला लागला.. पुढे घर संसाराला लागला.. पण माळ्यावरचे घुंगरू त्याला अस्वस्थ करत होते.. 
अचानक १०-१५ दिवस संचार बंदीमुळे पलक घरी बसला होता.. आणि परत त्याच्या मनाने बंड पुकारले.. या वेळी त्याला साथ द्यायला त्याची छोटी मुलगी आराध्या आघाडीवर होती.. सकाळी सगळे उठायच्या आधी आराध्याने हळूच माळ्यावर चढून घुंगरू काढून दिले बाबांच्या हातात.. आणि घराची पहाट थिरकली ती घुंगरांच्या तालावरच.. 
पलक बेभान होऊन नाचला.. आणि नाचतच राहिला.. एकेकाळी नकार देणारे डोळे आता फक्त भरून वहात होते.. 

Tuesday, November 19, 2019

कलेचा जागर.. कलाकाराचा जागर।।

कलेचा जागर.. कलाकाराचा जागर।। एकदा तूही काहीतरी लिहून तर बघ.. !!
माझे लेख आणि कविता यांचे वाचन करायचा हा नवीन प्रयोग करत आहे.. माझा हा video log बघून तुम्ही तुमच्या छंदांना परत वेळ द्यायला नक्की सुरवात कराल अशी अपेक्षा आहे.. तुमच्या प्रतिक्रिया मला video च्या खाली नक्की द्या.. आणि frequent updates साठी channel ला  like, share, subscribe करायला विसरू नका..

https://youtu.be/CXuycK7EPVw

Tuesday, July 16, 2019

Compost Kitchen

तसं गांडूळ खत लहानपणापासून घरी पाहिलेलं केलेलं असल्यामुळे कचऱ्यात कसा हात घालायचा असे प्रश्न आधीच सुटलेले होते.. आणि सासरी सुद्धा घराभोवती मोकळी जमीन, भरपूर झाडं आणि चहा झाला कि टाका चोथा कढीलिंबाच्या झाडाला असं वातावरण.. त्यामुळे compost ची basket घरी आणायला तसा काही विरोध व्हायचं कारण नव्हतं.. फक्त प्रश्न एवढेच होते.. असल्या गोष्टी ऐसपैस मोकळ्या जागेत करणं वेगळं पण मुंबई सारख्या ठिकाणी जिथे माणसांनाच राहायची जागा कमी पडते तिथे अजून कचऱ्याला राहायला जागा कशी करायची? घरात वासबीस आला तर? रोजच्या रोज उस्तवार होईल का? शेवटी ठरवलं करून तर बघू.. फारतर काय प्रयोग फसला तर फेकून द्यायला लागेल.. big deal .. 
छोटीशी चौकोनी बास्केट .. खेळती हवा रहायला चारही बाजूंनी आणि वरती असे नेट लावलेले(मच्छरदाणी ची असते तशी जाळी), एक छोटी bag compost खत, एका bag मध्ये coco peat (आपल्या भाषेत नारळाच्या शेंडीचं भुसकट) आणि हलवायला एक लोखंडी दांडकं.. बास्केट मध्ये खत पसरायचं आणि रोजचा स्वयंपाक घरातला ओला कचरा घालायला सुरवात करायची.. एकच नियम म्हणजे कचरा बारीक तुकडे करून घालायचा आणि प्रत्येक वेळेला कचरा घातल्यावर हलवायला विसरायचं नाही.. इतकं सोपं होतं ते..  
आता या basket मध्ये काय काय घालू शकतो - जेवण झाल्यावरचं पानातील खरकटं, शिळं अन्न उरलं असेल तर, भाज्यांची देठं, साली, टरफलं, चहाचा चोथा नं धुता.. थोडक्यात पेपर, प्लास्टिक आणि non veg waste सोडून बहुतेक सगळंच..
basket अर्धी भरेपर्यंत सारखी हलवायची तळापासून आणि त्यानंतर फक्त वरवर हलवायचं.. म्हणजे पूर्ण भरेपर्यंत खालचं अर्ध खत तयार असतं.. ते काढून घ्यायचं आणि परत वरती कचरा घालत राहायचं म्हणजे practically basket कधीच complete भरत नाही.. पण मी पाऊण basket भरल्यावर थोडासा ब्रेक दिला होता सरळ.. आणि मग तयार खत झाडात घालून फक्त तळात छोटासा layer ठेऊन परत पहिल्यापासून सुरु केलं होतं..
पहिल्यांदा trip ला जाताना थोडं tension आलं होतं कि आता याचं काय करायचं.. मग तसंच रामभरोसे सोडून गेलो.. आल्यावर बघितलं तर जायच्या दिवशी जसं होतं तसंच होतं.. म्हणजे वास पण येत नव्हता पण decomposition पण झाले नव्हते.. फक्त hang झाली होती system.. एक ढवळी मारून पुढचा कचरा घातल्यावर परत सुरु झाली.. त्यामुळे काही त्रासदायक वाटलं नाही.. 
सुरवातीला हौसेने सुरु केलेला आणि सोपा वाटलेला हा उद्योग तसा तितकाही सोपा नाही असं हळूहळू वाटायला लागलं.. एकतर रोजच्या रोज waste सुद्धा चिरत बसा.. आठवड्याच्या भाजीत २-३ पालेभाज्या आल्या तर खूपच साठतो कचरा.. कधी जास्त पाहुणे असल्यावर, फारच कंटाळा आला तर एखाद वेळा जातोही कचरा डस्टबिन मध्ये.. पण ठिके, जमेल ते दिवस आपले म्हणून सोडून द्यायचं.. असं करत करत दीड वर्ष झालंय आता उत्साह टिकवून ठेवलाय त्याला.. सगळे seasons अनुभवले आता त्या bacteria's नी.. 
तसा सहसा याला घाण वास येत नाही.. बास्केट open केल्या केल्या earthy smell (मातकट वास) आला आणि थोडं गरम जाणवलं कि समजायचं we are on right track .. घरी पूजा करत असतील तर त्याचं निर्माल्य आवर्जून घालावं म्हणजे त्या फुलांमुळे aroma छान येतो.. फक्त याचं एक तंत्र थोडं काळजीपूर्वक सांभाळायला लागतं.. खूप गिच्च ओलं झालं तर वास येऊ शकतो आणि कोरडं झालं तर decomposition होत नाही.. हा balance सांभाळायला coco peat .. खूप ओलं झालं आणि वास येतोय वाटलं तर लगेच घाबरून फेकून द्यायचं नाही.. सकाळ संध्याकाळ coco peat किंवा लाकडाचा भुस्सा घालून हलवायचं.. २ दिवसात back to normal येते.. आणि कोरडं होतंय वाटलं तर पाणी घालायचं.. 
लोकं खरंच खूप काही करतात eco friendly lifestyle maintain करण्यासाठी.. आपण त्यामानानी काहीच करू शकत नाही.. निसर्गाच्या जवळ जायचा आपल्याकडून एवढाच छोटा प्रयत्न..




Wednesday, July 3, 2019

Crafty Dhanee

Crafty dhanee ची सुरवात नेमकी का झाली हे आम्हालाही न उलगडलेलं कोड आहे.. घरी लावायला तोरण करायचं म्हणून पुण्यातल्या रामसूख market मधून मोत्याचे, मण्याचे खूप प्रकार आणले आणि तिथून सुरु झाले आमचे हे  वेड.. उगाच उत्साहानी आणलेल हे सामान खरंतर खूप दिवस कपाटाची धूळ खात पडला होतं.. मग धनश्री नि आणि मी काही pattern करून बघितले.. दरवाज्याचे लटकन, तोरण वगैरे.. त्याच दिवशी भिशी असल्यानी आम्ही गम्मत म्हणून सगळ्यांना ते नमुने दाखवायला नेले.. आणि नेलेले सगळे items तिथेच "खपले".

आपल्या creativity ला मिळालेली पहिली दाद बघून आमचा उत्साह अजून वाढला.. आणि मग आमचा मोर्चा आम्ही Crawford market कडे वळवला.. शनिवारी मोठ्या वाणसामानाच्या पिशव्या घेऊन आम्ही निघालो cst  ला ..  रंगीबेरंगी भुलेश्वर मार्केट हा एक प्रचंड वेड लावणारा प्रकार आहे.. भरलेल्या पिशव्या, रिकामे झालेले खिसे, थकलेले पाय आणि भुकेलेले पोट असे आम्ही थेट संध्याकाळी तिथून बाहेर पडलो.. भगत ताराचंद हे एक तिथे लाभलेलं वरदान आहे.. त्याच्याकडे जेवणात मिळणारी ताकाची बाटली हे energy booster आहे खूप मोठे.. तिथे थकवा घालवल्यावर भरलेल्या पिशव्या घेऊन ट्रेन मधली कसरत करत मानसरोवर ला आलो तर समोर splendor आमच्या वेडेपणावर हसत होती.. कारण हे सगळं bike वर कसं नेणार हा विचार तोपर्यंत केलाच नव्हता.. या सगळ्याला फक्त हौस किंवा अंगात फार खाज आहे असं म्हणू शकतो.. पण मग हळुहळू या प्रवासाची आम्हाला सवय झाली..

आता या आणलेल्या सामनाच करायचं काय आणि main म्हणजे कधी? दिवसभर दोघींना आपापल्या नोकरी/व्यवसायामुळे वेळ नाही आणि सकाळी उठून extra वेळ काढणं बापजन्मात जमलं नाही कधी.. त्यामुळे मग engineering चा formula use केला.. night मारणे.. आम्हाला motivate करत, मदत करत, गप्पा मारत बसायला आमचे नवरे आमच्या आधी तयार.. मग या मदतीत सुईत दोरा ओवण्यापासून, माळा करण्यापासून ते भेळ करेपर्यंत ची सगळी मदत आली.. देवघराची तोरणं, लटकन, दरवाज्याची तोरण, लटकन, मोत्याचे showpiece, तसबिरीचे हार असे अनेक प्रकार या flow मध्ये केले.. गणपतीच्या दिवसात हार करायला तर सगळेच घरातले सुया घेऊन बसलो होतो..

दोन engineer मुली नोकरी/व्यवसाय करून नंतर night out मारून नसते उद्योग का करत असतील हे प्रश्न पडलेही असतील सगळ्यांना. पण आम्ही नाही विचार केला.. ती धावपळ पण आम्ही खूप enjoy केली..   आपली हौस, छंद जेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीत हातभार लावतात .. आपल्या daily routine ला tangent मारून एक वेगळी दिशा देतात.. ते समाधान काही वेगळं असत.. सध्या दोघींना एकत्र वेळ होईपर्यंत आणि नवीन काहीतरी डोक्यात येईपर्यंत time please घेतला आहे.. पण भुलेश्वरच्या तिसऱ्या गल्लीत आम्ही कधीही डल्ला मारताना दिसलो तर time please सुटली अस समजायला हरकत नाही..

ता. क. - आता ही वर उल्लेख केलेली धनश्री माझी जाऊ आहे का बहीण  का partner in crime का मैत्रीण यावरती पुढच्या वेळी.. 

Thursday, June 20, 2019

Knitting.. विस्मृतीतील तिसरा छंद..

एक दिवस असा येतो कि नावीन्य संपून ही लोकल train आपल्या सवयीची होते.. ७. ५९ म्हणजे ८ नाहीत हे लक्षात येत.. रोज ८० मिनिटाचा ट्रेन चा प्रवास.. जाताना ४० येताना ४० .. एवढा वेळ रिकामा मिळायला लागतो अचानक.. bike चालवताना traffic, clutch, break यामध्ये गुंतलेलं असतं डोकं.. इथे ट्रेन ला कितीही गर्दी असो पण एकदा तिच्या पोटात शिरलं कि आपण रिकामेच..  आपल स्टेशन येईपर्यंतचा हा वेळ फक्त आपलाच हक्काचा.. 
मग एक दिवस दोन सुया आणि एक दोन लोकरीचे गुंडे घातले लॅपटॉप बॅग मध्ये.. खूप वर्षात हातात सुया घेतल्या नव्हत्या.. त्यामुळे काही वेळ nostalgia मध्ये गेला आणि काही वेळ सुईवर पहिला टाका कसा घालायचा हे आठवण्यात गेला.. साधा सोपा आणि traditional प्रकार म्हणजे ताटावरचा रुमाल करून बघायचा ठरवलं.. एकदा सुईवर टाके विणले आणि कधी त्यात रमले कळलंच नाही.. ट्रेन मध्ये जोपासता येणारा तसा हा सोपा छंद आहे.. जास्त फापट पसारा नाही.. पाहिजे तेव्हा सुई काढली आपला स्टेशन आला कि लगेच भरून टाकला परत बॅग मध्ये.. 
कधी ladies compartment मध्ये गप्पा मारत मारत तर कधी बाहेर बघत स्वतःच्या विचारात हरवत एक एक पाकळी आकार घेऊ लागली.. या सुयांनी सगळ्या महिला मंडळाला बोलतं केलं.. कोणी आपण कसे काही वर्षांपूर्वी शिवणकाम विणकाम वगैरे करत होतो पण आता कामाच्या गडबडीत कसं होत नाही ते सांगितलं.. कोणी वेगळे वेगळे पॅटर्न share केले.. तर कधी मोठे मोठे sweater, शाली विणणार्या बायका पण भेटल्या.. एका काकूंनी commit केला कि हे झाल्यावर त्या मला crochet शिकवणार आहेत.. बघू कधी योग येतो ते.. 

लहानपणी खेळताना पळून पळून दमलो कि मूठ पालथी करायचो.. त्याला थुंकी लावून म्हणायचं time please .. धापा टाकून दम खायचा आणि परत पळायला लागायचं.. खऱ्या आयुष्यात हे time please इतकं सोपं असतं का माहित नाही.. पण आपणच थोडा आपल्या धावपळीला छेद द्यायचा.. आपलंच मन थोड गोंजारायच .. digital world ला थोडा वेळासाठी म्हणायचं time please.. आणि मग आपलं station आलं कि पालथी मूठ सरळ करायची.. आणि परत एकदा आपल्या तळहातावरच्या रेषांमागे पळायला तयार व्हायचं..