Saturday, March 28, 2020

सरगम.. विस्मृतीतील दुसरा छंद ..

विस्मृतीत गेलेला छंद हा विषय डोक्यात घोळत असताना आज अचानक एक शॉर्ट फिल्म बघण्यात आली.. "पहिला पाऊस"..  नायिका मेघा घाटघे हिची.. या शॉर्ट फिल्म चा विषय पण साधारण असाच काहीसा.. म्हणून जास्त भावली.. म्हणून आज त्याच बद्दल थोडेसे.. 

विषय साधासा.. टिपिकल मुंबई मधलं चाकरमानी आयुष्य.. सकाळी गजर होताच तिची एन्ट्री थेट गॅस च्या समोर.. सतत टपटपणारा घाम पुसत घड्याळाच्या तालावर धावत ती आवरते.. धावत पळत ट्रेन पकडते.. ऑफिस मध्ये पोचल्यावर काम सुरु.. तेच तेच चक्र अविरत चालणारं.. तळहातावरच्या रेषांमागोमाग पळणार आयुष्य.. आणि त्यात अचानक तिला एका शाळेतल्या मित्राचा फोन येतो.. साहजिक तिच्या विस्मृतीत गेलेला तो आपली ओळख आणि फोन करायचे प्रयोजन सांगतो.. 

विषय साधासा.. तिनी शाळेत असताना एक गाणं शाळेच्या कार्यक्रमात सादर केलेलं असतं.. " ओ सजना, बरखा बहार आई.." ते गाणं त्याच्या डोक्यात तिच्या आवाजासकट पक्के बसलेले.. आज तेच गाणं त्याच्या कानावर पडत.. त्याला ती आठवते.. अगदी सहजच.. तिचा नंबर मिळवून तो फोन करतो.. फक्त हेच सांगायला की गाणं कधीच बंद नको करू.. 

तिच्या डोळ्यात गंगा जमुना.. घरी जाताना ट्रेन मध्ये भाजी निवडताना ती एकदम भूतकाळात हरवते.. एकही संवाद नसलेला भूतकाळ खूप काही सांगून जातो.. तिच्या गाण्याला घरून असलेला विरोध.. तिनी कपाटात लपवून ठेवलेला लता मंगेशकर चा फोटो.. 

दुसऱ्या दिवशी परत सकाळी गजर होताच तिची एन्ट्री थेट गॅस च्या समोर.. पण आज थोडी थबकते.. ती घसा खाकरते.. "ओ सजना, बरखा बहार आई.." नवरा आणि मुलगा धक्का बसल्यासारखे जागे होऊन स्वयंपाक घराच्या दारात.. तिचे डोळे भरलेले.. काहीसे समजून उमजून तिला space देऊन ते दोघे परत पडदा सरकवून घेतात.. 

ती रमते स्वतःत.. हरवते.  गात राहते.. आणि गातच राहते.. निचरा होत राहतो.. डोळे भरून येतात.. वाहू लागतात आणि मग प्रसन्न हसू पसरत.. तिच्या चेहऱ्यावर.. 

विषय साधासा.. अतिशय कमी संवाद.. पण मनाला भावून गेला.. असे कितीतरी छंद असतात.. आपल्या विस्मृती मध्ये गेलेले..  हीच ती वेळ.. हाच तो क्षण.. त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा.. हे काही दिवस घरी बसून नुसते tv, whats app बघण्यापेक्षा एकदा स्वतः मध्ये डोकावून या छंदांना परत एका साद द्या.. ते वाट बघत आहेत तुमची.. 

ता. क. १.  शॉर्ट फिल्म खरंच भावली म्हणून लिहावे वाटले.. प्रमोशन वगैरे करायचा काही नवीन छंद नाही.. 
ता. क. २.   माझी घुंगरू ही १०० शब्दांची कथा सर्वोत्कृष्ठ कथा ठरली आहे.. ती सुद्धा विस्मृतीतील छंद याच विषयावर आहे.. ती पण वाचून प्रेरणा घ्यावी.. 

-- अवनी 

No comments:

Post a Comment