Showing posts with label पुस्तक वाचन. Show all posts
Showing posts with label पुस्तक वाचन. Show all posts

Monday, July 12, 2021

आषाढस्य प्रथम दिवसे - मेघदूत (महाकवी कालिदास - अनुवाद शांता शेळके)

आषाढस्य प्रथम दिवसे!! हे ऐकल्यावर सगळ्यात पहिले आठवते ते मेघदूत. महाकवी कालिदास यांची अजरामर लेखणी आणि त्याची पहिली ओळ. संस्कृत च्या असलेल्या ज्ञानाप्रमाणे समजून घ्यायचे असे ठरवत होते त्यातच कॉलेज मध्ये असताना शांता शेळके यांचा स्वैर अनुवाद हातात लागला. एक एक संस्कृत चे कडवे आणि मग त्याचा स्वैर अनुवाद. सुख म्हणजे नक्की काय असते, याचा शोध लागला त्यात. 

एक यक्ष. आपल्या पत्नीपासून एक वर्ष दूर राहिलेला यक्ष. त्यातील आठ महिने पूर्ण झाले. आता राहिले शेवटचे चार. त्यात त्याला दिसतो आषाढाचा पहिला मेघ. मग काय. त्यालाच दूत बनवून तो आपले हितगुज सांगतो. आणि मग तो मेघ त्याच्या पत्नी चा माग काढत अलंकापुरी पर्यंत पोहोचतो. आता तो मेघ निघतो. हा मार्ग काव्यात दाखवताना कवीची रसिकता बघा. भौमितिक नकाशा प्रमाणे उज्जैन हे या मार्गात लागत नसून पण तो वाट वाकडी करून त्या मेघाला जाता जाता तिथे जायला सांगतो. हा मार्ग, ते निसर्गवर्णन वाचून असे वाटते की कालिदासाने रामपुरी ते अलंकापुरी हे मार्गक्रमण पावसाळ्यात स्वतः केले असावे आणि तिथले निसर्गवर्णन वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच त्या मेघाची वाट वाकडी करायला लावली असावी. 

प्रियकराचा प्रेयसी ला निरोप म्हणजे मेघदूत. आषाढाचे सृजनाचे निसर्गवर्णन म्हणजे मेघदूत. यक्ष आणि यक्षपत्नी ची विरहात असलेली तळमळ म्हणजे मेघदूत. डोळे मिटून खंडकाव्याचे स्मरण केल्यावर एखादी सहल अनुभवल्यासारखे वाटणे म्हणजे मेघदूत. उज्जैन, अलंकापुरी इथे प्रत्यक्ष फिरून आल्याचा भास निर्माण होणे म्हणजे मेघदूत. भाषेवर प्रभुत्व, चपखल विशेषणे म्हणजे मेघदूत. 

सध्या प्रत्येक मनुष्य मनावर मळभ आलेल्या अवस्थेत आहे. कोणी बोलून दाखवतो, कोणी उसने अवसान आणतो एवढाच काय तो फरक. पण सृष्टी चे सृजनाचे काम थांबलेले नाही. आजही एक मेघ निघाला आहे दूत बनून. आषाढस्य प्रथम दिवसे.! तो निघाला आहे, निसर्गाचा संदेश घेऊन. तरारलेल्या, नव्हाळी आलेल्या पानापानांतून अंकुरणाऱ्या कोंबांतून, उमलणाऱ्या फुलाफुलातून तो साद घालत आहे. हे मळभ लवकर दूर होईल अशी अशा करूया. आणि तोपर्यंत या निसर्गाच्या सृजनाचा आनंद घेऊया. या आषाढ सारी प्रत्येकाच्या मनात एक प्रसन्नता घेऊन येतील, एवढीच प्रार्थना करूया. आजच्या दिवशी. आषाढस्य प्रथम दिवसे.!

-- अवनी गोखले टेकाळे 

ता. क. तुम्हाला जर असेच वेगवेगळ्या पुस्तकांची उजळणी करायची असेल तर पुस्तक वाचन या लेबल खाली असे लेख एकत्र करायचा प्रयत्न करत आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. 


Wednesday, July 22, 2020

Breadwinner (पुस्तक वाचन)

आज अमर ची विश्वस्त बद्दलची पोस्ट वाचली आणि मन एकदम बारा वर्ष मागे गेले.. एक तप झाले या व्यक्तीशी मैत्री होऊन.. gate चा अभ्यास करायला एकत्र जमायचो त्यातला हा एक.. ते सगळे दिवस आठवले.. अमर, दिपाली, दीप्ती, सुभाष, गणेश, मकरंद सगळ्यांचीच आठवण झाली.. वेड लागल्यासारखा एक महिना अभ्यास केलेला तो आठवला.. चार वाजता चा चहा आठवला आणि ब्रेक मध्ये मारलेल्या गप्पा.. तर या गॅंग नी मला भरभरून दिले पण सध्या फक्त पुस्तक वाचन बद्दल.. तर अशाच चर्चांमध्ये ओळख झाली breadwinner ची.. 

Breadwinner(लेखक - Deborah Ellis) म्हणजे थोडक्यात रोजीरोटीशी असलेला संघर्ष या पुस्तकात दिसतो. याचे अनुवादित पुस्तक पण आहे.. छोटेसे पुस्तक हातात घ्या आणि वाचून पूर्ण करून ठेऊन द्या.. आणि मग प्रत्येक वेळा जेवताना पानावर बसले की आठवण येते ती "परवाना" ची.. अफगाणिस्तान मधील काबूल मध्ये राहणारी ही अकरा वर्षाची मुलगी जगण्यासाठी पैसे कमवायला बाहेर पडायचे ठरवते.. एका मुलीने बाहेर काम कसे करावे.. भोवतालची परिस्थिती मुलीला काम करू देईना आणि दुसरीकडे भुकेले पोट बसू देईना घरी.. आणि मग ती मुलाचे कपडे घालून रस्त्यावर उतरते.. दीडशे दोनशे पानं फक्त जगण्याचा संघर्ष.. जेवणाची सांगड घालायचा संघर्ष.. या संघर्षात तिची मैत्रीण शौझिया. सगळ्यात काय आवडते माहितेय, त्या दोघींचे एकमेकींना दिलेले प्रॉमिस.. अजून वीस वर्षांनी फ्रांस च्या आयफेल टॉवर खाली भेटू असे एकमेकींना दिलेले प्रॉमिस.. जगण्याची जिद्द आणि त्यावर मात करण्याची तयारी.. वेड्यासारखे झपाटलेल्या दोन मुली आणि तो आयफेल टॉवर. दोन्ही दिसते आपल्या डोळ्यासमोर.. नकळत आपण पण प्रार्थना करतो त्यांच्यासाठी.. सोडवा यांना नरक यातनांतून.. अशक्य असणारे पण तरीही त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्य होऊ दे.. 

हे पुस्तक चैन पडू देत नाही की या दोघींचे पुढे काय झाले. कशा जगल्या, कुठे राहिल्या, परत भेटल्या का एकमेकींना.. आणि मग ही उत्तरे शोधायला पुढची दोन पुस्तके नकळत हातात येतात.. "शौझिया" आणि "paravana's journey"

ही तीन पुस्तके तुम्हाला जगण्याचा नवा दृष्टिकोन देतील.. आणि रोजचे जेवण अलगद पानात येते यासाठी, चांगल्या कुटुंबात जन्म झाला यासाठी  मनोमन आभार पण व्यक्त कराल.. 

-- अवनी गोखले टेकाळे 


 

Monday, July 20, 2020

मधुशाला (पुस्तकवाचन)

प्रकर्षाने जाणवलं एक दिवस. मी मराठी वाचते. खूप वाचते. पण हिंदी काहीच वाचले नाही. फक्त बोलते ते पण कामचलाऊ. ऑफिस च्या निमित्ताने एक मैत्रीण मिळाली ती टिपिकल लखनवी हिंदी बोलणारी. तिच्यामुळे हिंदी ची भाषा म्हणून आवड निर्माण झाली आणि मग काय आवड निर्माण झाली की सवड मिळतेच. तिने खरं तर प्रेमचंद पासून सुरवात करायला सांगितली होती पण सगळ्यात पहिले हातात पडलं ते हे - मधुशाला. काही पुस्तकं आपण एकदाच वाचतो. काही पुस्तकांची पारायणं होतात, प्रत्येक वेळी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, भावनेच्या प्रत्येक हिंदोळ्यावर ज्याचा नवीन अर्थ समजतो. हे पुस्तक दुसऱ्या प्रकारातले. त्यामुळे विकत घेऊन संग्रही ठेवावे असे. 

या पुस्तकामुळे हरिवंशराय बच्चन हे मोठे नाव वाचायला मिळाले. कवीसंमेलनांचा मुकुटमणी म्हणजे मधुशाला. मधुशाला म्हणजे दारू असे म्हणणार्यांना मधुशाला वाचून समजलीच नाही. हिंदीवर प्रेम करायला लावते ती मधुशाला. निसर्गावर प्रेम करायला लावते ती मधुशाला. जगण्यावर आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवते ती मधुशाला. जगात जे जे सुंदर, जे जे अटळ ते ते सर्व मधुशाला. "पाठक गण है पिनेवाले, पुस्तक मेरी मधुशाला" असे स्वतःच्या पुस्तकाचे केलेले वर्णन म्हणजे मधुशाला. जातीभेद, वर्णभेद यांवर केलेले भाष्य म्हणजे मधुशाला. निसर्ग, जन्म, मृत्यू, यमदेव, अंत्ययात्रा, प्रेम, विरह, अंधार, गायक, वादक, चित्रकार, भारतदेश, ऋषीमुनी, स्वतःचे आयुष्य सगळीच मधुशाला. आपल्या मृत्यूनंतर लोकांनी आपले वर्णन करावे तर एवढे आणि एवढेच - "कहना सच्ची मधुशाला". 

प्रत्येक कडवे भरभरून समीक्षण करावे असे. पण सगळे मी लिहिले तर तुम्ही वाचणार ते काय. म्हणून इथे थांबते. श्रावण चालू होतोच आहे तर जाता जाता प्रसन्न करून जाणाऱ्या, वर्षा ऋतूचे वर्णन करणाऱ्या या मधुशाला मधल्या काही ओळी तुमच्यासाठी- 

सूर्य बने मधू का विक्रेता, सिंधू बने जल घट हाला 
बादल बन बन आये साकी, भूमी बने मधू का प्याला 
झडी लगाकर बरसे मदिरा, रिमझिम रिमझिम रिमझिम कर 
बेली, विपट तृण बन मैं पिऊ, "वर्षा ऋतू" हो मधुशाला .. 

शब्दांकन - अवनी गोखले टेकाळे 

Tuesday, July 7, 2020

### चला वाचूया - "अजिंठा" - ना. धो. महानोर

### चला वाचूया - "अजिंठा" - ना. धो. महानोर

 
एक छोटेसे खंडकाव्य. कवी ना धो महानोर यांचा सुंदर अविष्कार. एकदम छोटे खिशात बसेल असे पुस्तक आहे.. कधीही जाता येता प्रवासात वाचता येईल असे. म्हणले तर तासाभरात वाचून होईल म्हणले तर आयुष्य संपेल तरी वाचन संपणार नाही असे.

शाळेपासून वाचायची सवय लागली. पण सुरवातीला गद्य पुस्तके वाचली खूप. हे पुस्तक तेव्हा हाती लागले जेव्हा नुकतीच आवड विस्तारत कवितांची पुस्तके वाचायला सुरवात केली होती.

नजरेसमोर पूर्ण कथा उभी करण्याचे सामर्थ्य म्हणजे अजिंठा. डोळे मिटून पूर्ण अजिंठा लेणी डोळ्यासमोर उभी करण्याचे सामर्थ्य म्हणजे अजिंठा. मेजर गिल आणि पारो जिवंत समोर उभे राहतात इतके सुंदर वर्णन म्हणजे अजिंठा. गावरान पावसाळी कुंद हवेचे निसर्गरम्य वर्णन म्हणजे अजिंठा. 

कोण कुठला मेजर गिल अजिंठ्याच्या वेडाने झपाटलेला. तो भारतात येतो काय. अजिंठ्यातील चित्र काढायचे वेड घेतो काय. त्याला पारो भेटते काय. त्यांच्यात प्रेम होत काय. तो काम संपवून परत तिकडे जाऊन या चित्रांचे प्रदर्शन भरवतो काय. सगळंच भन्नाट. सगळंच passionate. सगळंच स्वप्नवत. चित्र काढत असतो मेजर गिल आणि नजरेसमोर उभं राहत आपल्या महानोर यांच्या लिखाणातून. या कथेसोबत उतरत जाते गावरान नायिका आणि तिथला रम्य निसर्ग. कदाचित ना. धो. महानोर औरंगाबाद जवळच्या गावात राहिले असल्याने जे बघितले ते शब्दात उतरवले असावे. ते लोकांपर्यंत पोचवण्याचा घातलेला घाट म्हणजे अजिंठा. 

___________________________________

एकदा गुरु ठाकूर म्हणाला होता मुलाखतीत.. "आजकाल निखळ निसर्ग वर्णन करणाऱ्या कविता फार कमी वाचायला मिळतात." ते वाक्य खरंच खूप पोचले मनापर्यंत. किती खरं बोलून गेला. आपण निसर्गाच्या लांब जात चालल्याने आपल्या लिखाणात निसर्ग वर्णन येत नसेल का? सध्या बाहेर तर जाता येत नाहीये. अनुभवणार काय आणि लिहिणार काय? पण आपल्या नजरेसमोर निसर्गाचे वर्णन उभे करणारे कवी आपल्याला लाभलेत तेवढे तरी भाग्य म्हणायचे. 

आत्ता हातात पुस्तक तर नाही पण जाता जाता चार ओळी अजिंठा मधल्या मला पाठ असणाऱ्या तुमच्यासाठी. पाठ याच्यासाठी की कुसुंबी हा शब्द पहिल्यांदा शिकायला मिळाला तो अजिंठा मध्ये. त्यामुळे तो लक्षात राहिला. बाहेर आषाढ सरी चालूच आहेत आणि डोळे बंद करून मनात महानोर यांनी उभा केलेला पावसाळा.. अजून काय पाहिजे.. सध्या तरी एवढे आणि एवढेच!!!

मन चिंब पावसाळी !!
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले !
घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले !
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी !
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी !
घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वाटा !
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा !
मन चिंब पावसाळी !!

-- अवनी गोखले टेकाळे