### चला वाचूया - "अजिंठा" - ना. धो. महानोर
एक छोटेसे खंडकाव्य. कवी ना धो महानोर यांचा सुंदर अविष्कार. एकदम छोटे खिशात बसेल असे पुस्तक आहे.. कधीही जाता येता प्रवासात वाचता येईल असे. म्हणले तर तासाभरात वाचून होईल म्हणले तर आयुष्य संपेल तरी वाचन संपणार नाही असे.
शाळेपासून वाचायची सवय लागली. पण सुरवातीला गद्य पुस्तके वाचली खूप. हे पुस्तक तेव्हा हाती लागले जेव्हा नुकतीच आवड विस्तारत कवितांची पुस्तके वाचायला सुरवात केली होती.
नजरेसमोर पूर्ण कथा उभी करण्याचे सामर्थ्य म्हणजे अजिंठा. डोळे मिटून पूर्ण अजिंठा लेणी डोळ्यासमोर उभी करण्याचे सामर्थ्य म्हणजे अजिंठा. मेजर गिल आणि पारो जिवंत समोर उभे राहतात इतके सुंदर वर्णन म्हणजे अजिंठा. गावरान पावसाळी कुंद हवेचे निसर्गरम्य वर्णन म्हणजे अजिंठा.
कोण कुठला मेजर गिल अजिंठ्याच्या वेडाने झपाटलेला. तो भारतात येतो काय. अजिंठ्यातील चित्र काढायचे वेड घेतो काय. त्याला पारो भेटते काय. त्यांच्यात प्रेम होत काय. तो काम संपवून परत तिकडे जाऊन या चित्रांचे प्रदर्शन भरवतो काय. सगळंच भन्नाट. सगळंच passionate. सगळंच स्वप्नवत. चित्र काढत असतो मेजर गिल आणि नजरेसमोर उभं राहत आपल्या महानोर यांच्या लिखाणातून. या कथेसोबत उतरत जाते गावरान नायिका आणि तिथला रम्य निसर्ग. कदाचित ना. धो. महानोर औरंगाबाद जवळच्या गावात राहिले असल्याने जे बघितले ते शब्दात उतरवले असावे. ते लोकांपर्यंत पोचवण्याचा घातलेला घाट म्हणजे अजिंठा.
___________________________________
एकदा गुरु ठाकूर म्हणाला होता मुलाखतीत.. "आजकाल निखळ निसर्ग वर्णन करणाऱ्या कविता फार कमी वाचायला मिळतात." ते वाक्य खरंच खूप पोचले मनापर्यंत. किती खरं बोलून गेला. आपण निसर्गाच्या लांब जात चालल्याने आपल्या लिखाणात निसर्ग वर्णन येत नसेल का? सध्या बाहेर तर जाता येत नाहीये. अनुभवणार काय आणि लिहिणार काय? पण आपल्या नजरेसमोर निसर्गाचे वर्णन उभे करणारे कवी आपल्याला लाभलेत तेवढे तरी भाग्य म्हणायचे.
आत्ता हातात पुस्तक तर नाही पण जाता जाता चार ओळी अजिंठा मधल्या मला पाठ असणाऱ्या तुमच्यासाठी. पाठ याच्यासाठी की कुसुंबी हा शब्द पहिल्यांदा शिकायला मिळाला तो अजिंठा मध्ये. त्यामुळे तो लक्षात राहिला. बाहेर आषाढ सरी चालूच आहेत आणि डोळे बंद करून मनात महानोर यांनी उभा केलेला पावसाळा.. अजून काय पाहिजे.. सध्या तरी एवढे आणि एवढेच!!!
मन चिंब पावसाळी !!
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले !
घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले !
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी !
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी !
घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वाटा !
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा !
मन चिंब पावसाळी !!
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment