Showing posts with label Mumbai Local. Show all posts
Showing posts with label Mumbai Local. Show all posts

Thursday, June 20, 2019

Knitting.. विस्मृतीतील तिसरा छंद..

एक दिवस असा येतो कि नावीन्य संपून ही लोकल train आपल्या सवयीची होते.. ७. ५९ म्हणजे ८ नाहीत हे लक्षात येत.. रोज ८० मिनिटाचा ट्रेन चा प्रवास.. जाताना ४० येताना ४० .. एवढा वेळ रिकामा मिळायला लागतो अचानक.. bike चालवताना traffic, clutch, break यामध्ये गुंतलेलं असतं डोकं.. इथे ट्रेन ला कितीही गर्दी असो पण एकदा तिच्या पोटात शिरलं कि आपण रिकामेच..  आपल स्टेशन येईपर्यंतचा हा वेळ फक्त आपलाच हक्काचा.. 
मग एक दिवस दोन सुया आणि एक दोन लोकरीचे गुंडे घातले लॅपटॉप बॅग मध्ये.. खूप वर्षात हातात सुया घेतल्या नव्हत्या.. त्यामुळे काही वेळ nostalgia मध्ये गेला आणि काही वेळ सुईवर पहिला टाका कसा घालायचा हे आठवण्यात गेला.. साधा सोपा आणि traditional प्रकार म्हणजे ताटावरचा रुमाल करून बघायचा ठरवलं.. एकदा सुईवर टाके विणले आणि कधी त्यात रमले कळलंच नाही.. ट्रेन मध्ये जोपासता येणारा तसा हा सोपा छंद आहे.. जास्त फापट पसारा नाही.. पाहिजे तेव्हा सुई काढली आपला स्टेशन आला कि लगेच भरून टाकला परत बॅग मध्ये.. 
कधी ladies compartment मध्ये गप्पा मारत मारत तर कधी बाहेर बघत स्वतःच्या विचारात हरवत एक एक पाकळी आकार घेऊ लागली.. या सुयांनी सगळ्या महिला मंडळाला बोलतं केलं.. कोणी आपण कसे काही वर्षांपूर्वी शिवणकाम विणकाम वगैरे करत होतो पण आता कामाच्या गडबडीत कसं होत नाही ते सांगितलं.. कोणी वेगळे वेगळे पॅटर्न share केले.. तर कधी मोठे मोठे sweater, शाली विणणार्या बायका पण भेटल्या.. एका काकूंनी commit केला कि हे झाल्यावर त्या मला crochet शिकवणार आहेत.. बघू कधी योग येतो ते.. 

लहानपणी खेळताना पळून पळून दमलो कि मूठ पालथी करायचो.. त्याला थुंकी लावून म्हणायचं time please .. धापा टाकून दम खायचा आणि परत पळायला लागायचं.. खऱ्या आयुष्यात हे time please इतकं सोपं असतं का माहित नाही.. पण आपणच थोडा आपल्या धावपळीला छेद द्यायचा.. आपलंच मन थोड गोंजारायच .. digital world ला थोडा वेळासाठी म्हणायचं time please.. आणि मग आपलं station आलं कि पालथी मूठ सरळ करायची.. आणि परत एकदा आपल्या तळहातावरच्या रेषांमागे पळायला तयार व्हायचं..



Thursday, June 13, 2019

Window Seat

इकडे मिळणारी ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट..  त्यामुळे जेव्हा ती मिळते तेव्हा जगात भारी असा feel येतो.. एरव्ही चिकट घामट लोंबकळून जाणारे आपण एखाद दिवस तीरासारखे धावत जाऊन window seat पटकावतो तेव्हा स्वतःच अस declare करून टाकायचं कि आपण मुंबईकर झालो.. 
मग गर्मीमुळे बांधून ठेवलेले केस थोडावेळ सोडून द्यायचे मोकळे वाऱ्याची झुळूक झेलायला.. डोकं खिडकी ला लावायचं .. गजातून पलीकडे लांबवर नजर स्थिरावत मनालाही सोडून द्यायचं मुक्त थोडासा वेळ.. 
एकमेकात झपाट्याने मिसळलेले रेल्वे रूळ तितक्याच वेगाने आपला मार्ग वेगळा करून पुढे जात असतात.. त्यांची लांबवर पसरलेली नक्षी .. एखाद्या वळणावर शेवटच्या डब्यातून दिसलेली आपलीच पूर्ण ट्रेन .. आणि एक स्टेशन सोडल कि लगेच लागलेली पुढच्या स्टेशनची चाहूल.. इथे निसर्गालाही घाई .. आपल्या सगळ्या लेकरांना भेटवतो तो तेवढ्या थोडक्या वेळात.. लांबवर पसरलेले डोंगर.. मधूनच डोंगराच्या पोटातून जाणारी आपली ट्रेन.. लांबवर पसरलेल नीळ शार खाडीच पाणी..  त्यात मिसळलेला chemicals चा सुगंध(?) ट्रॅक च्या कडेनी लावलेला भाजीपाला .. खडीतून मान वर काढणारी छोटीशी रोपटी.. वेगवेगळ्या हिरव्या रंगांना छेद देणारा एखादा बहावा नाहीतर गुलमोहर.. यांना tangent जाणारे निळे काळे आकाश आणि त्याचे बदलत जाणारे रंग.. 
अशा वेळी आपणच बादशहा असल्यामुळे जी धावपळ आपणही रोज सकाळ संध्याकाळ करत असतो ती आता त्रयस्थपणे बघता येते.. त्या ३० सेकंदात सगळं जग इकडून तिकडे धावत.. एकाच वेळी platform १ आणि ३ वर आलेली लोकल.. जिवाच्या आकांताने जिने चढून उतरून पलीकडे पोचलेले लोक.. एक मुंगळ्यांसारखी रांग railway track वरून पलीकडे जाणारी.. अर्धी तुळशीबाग इथे डोळ्यासमोर लटकत असते.. ते सगळे व्यापारी उतरून दुसऱ्या ट्रेन मध्ये पोचलेले असतात.. तेवढ्यात एकदम सोनचाफा घमघमतो आणि लक्षात येत चाफ्याची फुलं आणि मोगऱ्याचा गजरा असलेली पाटी घेऊन एक मावशी आत चढलीए.. गर्दी चेंगरा चेंगरी बघत आणि १०- ५ शिव्या ऐकत असतानाच ट्रेन horn मारते आणि अजून धावणाऱ्यांच्या पायाचा वेग वाढतो.. 
Platform वर समाजातली सगळ्या स्तरातली माणसं क्षणात नजरे समोरून जात असतात.. शाळेतून मुलाला घेऊन जाणारी आई, कांगारू बॅग पोटाला लावून मुलाला day care मधून घरी घेऊन जाणारी आई. एखादे धापा टाकत थकून थांबलेले काका, college मधल्या मुलांचा घोळका, पोटाला हात लावून दिवस असताना ट्रेन पकडणारी मुलगी आणि रडणाऱ्या बाळाला पाजायला आडोसा शोधणारी आई सुद्धा.. एकमेकांना मिठी मारून क्षणात वेगळ्या ट्रेन साठी पाळलेले एखादे couple, टाळ्या वाजवत जाणारेही आणि भडक make up केलेल्या बायकाही.. ऑफिस मधून घरी जाणारे चाकरमाने  सुटाबुटातले फक्त वेळ वाचावा म्हणून ट्रेन नि प्रवास करणारेही.. शाळेत एकमेकींचे हात धरून सांभाळून जाणाऱ्या मुली.. एखादे गावाकडून आलेले काका काकू त्या गर्दी कडे आता up down east west कसे ओळखायचे म्हणून हताश होऊन बघत असतात.. सराईत रोज प्रवास करणारे कानात head phone घालून video बघत बघत किंवा mobile वर game खेळात गर्दीतून वाट काढत असतात.. प्रत्येकाचे रंग रूप वय वेगळे.. त्यांचे मार्गही आणि विचारही.. पण एका सामान धाग्यांनी बांधलेले तो म्हणजे समोर आलेल्या ट्रेन मध्ये क्षणात सामावून जाणे.. परत हॉर्न देऊन गचकन धक्का देत ट्रेन आपला स्पीड घेते..
हे सगळं आपल्या समोर दार ३ मिनिटांनी घडत राहतं.. ८-१० वेळा तरी.. आणि मग एक ओळखीचा वास येतो..(आता हे काय प्रकरण आहे ते कळायला गाढ झोपेत हटकून आपल्याच स्टेशन ला जग यायची किमया साधायला लागते.. )आता परत आपले मोकळे सोडलेले मन आपल्या जवळ घ्यायचे.. केसाचा वरती बुचडा बांधून टाकायचा.. लॅपटॉप बॅग पाठीऐवजी पोटाला लावायची.. आपली सीट कोणीतरी बुक केलेलीच असते त्याला खूण करून जागा द्यायची.. आणि गर्दी ला मागे सारत स्टेशन येईपर्यंत दरवाज्यात जाऊन उभे राहायचे.. ट्रेन थांबली कि लगेच या गर्दीचा एक भाग होण्यासाठी..