Wednesday, September 28, 2022
वेल्हाळ .. शब्दाचे रसग्रहण
Monday, June 13, 2022
शब्द संचय - घर
घराचे प्रकार
घर - आलय, गृह, सदन, निकेतन, निवास, भवन, धाम
झोपडी - खोपा, कुटी
पर्णकुटी - बांबू, काठ्या, पाने यांनी बनवलेली झोपडी, कुडाची घरे
इमारत - अनेकमजली वास्तू
गगनचुंबी इमारती - गगनाला भिडतील अशा शहरातील उंच इमारती
कौलारू घरे - जास्त पावसाच्या प्रदेशातील उतरत्या छपराची घरे
माळवदाची घरे - सपाट छप्पर असलेली कमी पावसाच्या प्रदेशातील घरे
चौसोपी वाडा - चारी बाजूंनी व्हरांडे असलेला वाडा
चिरेबंदी वाडा - चिरांचे बांधकाम असलेला वाडा
घराचा बाह्यभाग -
ओसरी - घराच्या पुढच्या बाजूला असणारी बांधलेली जागा. हिला समोरून भिंत नसते. शेतातले गडी माणसांचे चहा पाणी करायची जागा. आल्या आल्या विसावा घ्यायची जागा
माजघर - ओसरी आणि मूळ घर याच्या संबंधित असणारी बांधलेली जागा.
बाळद / लादणी - धान्य साठवणी ची जागा
सोपा - व्हरांडा
अंगण - घरासमोरची मोकळी जागा
वृंदावन - तुळशीची रोपे लावायला बांधलेली जागा
सोपं - घरासमोरच्या पायऱ्या
पडवी - मागच्या बाजूचा बांधलेला व्हरांडा
परस - घरामागची रिकामी जागा
वाडी - परसाच्या मागे असलेली मोठी बाग
आड - घराच्या बाह्य भागात असलेली छोटी घरगुती विहीर
पोहरा - विहिरीतून पाणी शेंदायला गोल बुडाची बादली सारखी वस्तू
रहाट गाडगे - विहिरीवर बसवलेले गोल चक्र म्हणजे रहाट आणि गाडगे म्हणजे मडके. मडके दोरीला बांधून ते चक्राला बांधलेले असते. पाणी शेंदायला उपयोग होतो
दोण - विहिरीतले पाणी लाटून यात साठवले जाते.
कुंपण - घराची वेस ठरवणारी अंगणाच्या भोवतीची रचना. काटेरी/बांधीव/झुडूप किंवा बांबू पासून बनवलेली
परसदार - परसाच्या मागचा दरवाजा
दिंडी दरवाजा - घराच्या समोरचा दरवाजा
वेगवेगळ्या खोल्या
बैठक - घरातल्या आणि आल्या गेल्याला ऊठ बस करता येईल अशी पहिली खोली
शयनागार - शयन कक्ष
स्वयंपाक घर - मुदपाक खाना, भटार खाना
देवघर - देवासाठीची स्वतंत्र खोली
विटाळशी/बाळंतिणीची खोली - बाजूला बसलेल्या किंवा बाळंतीण बायकांसाठी ची खोली
न्हाणीघर - स्नानगृह
तळघर - घराच्या खाली असलेली खोली. साठवणी चे सामान ठेवायला. हल्ला झाला तर लपून बसायला किंवा तिथून दुसऱ्या गल्लीत बाहेर पडायचे गुप्त रस्ते काढलेले असायचे.
मोरी - धुणं भांडी करायची जागा
कोठीघर - स्वयंपाक घराला लागून असलेली खोली. जास्तीचे साठवणी चे सामान ठेवायला
पोट माळा, माळा - खोलीच्या वर काढलेली जागा. जास्तीचे सामान ठेवायला
घरासंबंधित रचना
कोनाडा - माजघर आणि शयन गृह याच्या भिंतीत केलेली, छोट्या गोष्टी ठेवायला केलेली जागा.
छत - छप्पर
माळवद - कठडा नसलेले छप्पर
वळचण - छताखालील जागा
रसंधीची जागा - अडचणीची जागा
कडी कोयंडे - साखळीसारखी रचना असलेली कडी आणि ती अडकवायला गोलाकार रचना
कौले - बांबू च्या छतावर घातलेली कौले. साधी/मंगलोरी. मंगलोरी जास्त टिकाऊ आणि मजबूत
पन्हाळे - छतावर पडलेलं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी केलेली जागा
पत्र पेटी - अंगणातील मुख्य दरवाज्या शेजारी लावलेली पेटी
जिना/सोपान - वरच्या मजल्यावर जायला पायऱ्या
गच्ची - छत
गवाक्ष - खिडकी, तावदाने
कवाडं - दार, दरवाजा
झरोका - खोलीच्या वरती खेळती हवा, उजेड यायला केलेली सोय
माडी - वरचा मजला
पहिला माळा, दुसरा माळा - पहिला मजला, दुसरा मजला
अडसर/अडणी - जाड लाकडाचा एका भिंतीतून दुसऱ्या भिंतीत ढकलायचा ओंडका
देवळी - कंदील, दिवे ठेवण्यासाठी खोलीत केलेली सोय
खुंटी - कपडे लटकवायला केलेली दाराच्या मागे सोय
हौद - पाणी भरायला बांधलेली रचना
पावठाण - पायरी
उंबरठा - खोलीच्या दारात प्रवेश करण्याची जागा
*************
ता. क.
स्वयंपाक घर, घरात वापरले जाणारे सामान याचा शब्द संचय खूप मोठा आहे. तो वेगळ्या भागात देण्यात येईल.
-- अवनी गोखले टेकाळे
Friday, July 24, 2020
पुढचा छंद - संस्कृत श्लोकांचे मराठीत स्वैर भाषांतर
Wednesday, May 27, 2020
श्रीसूक्त - स्वैर मराठी भाषांतर
Tuesday, May 19, 2020
महालक्ष्मी अष्टकम - स्वैर मराठी अनुवाद
Monday, April 27, 2020
शिव तांडव स्तोत्राचे मराठी मध्ये स्वैर भाषांतर..
-- अवनी गोखले टेकाळे..
Wednesday, December 4, 2019
व्यंकटेश सुप्रभातम
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्हिकं !!१!!
>> हे श्रीरामा, कौसल्येचा पुत्र पूर्वेकडून पहाटेचे आगमन होत आहे.. हे नरशार्दुला आपली दैनंदिन दैवी कर्तव्य पार पाडण्यासाठी उठा, जागे व्हा..
उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यम मंगलम कुरु !! २!!
>> हे गोविंदा, हे गरुडध्वज उठा, जागे व्हा.. हे कमलाकांता त्रैलोक्याचे मंगल करण्यासाठी उठा, जागे व्हा..
हा झाला या दोन कडव्यांचा शब्दार्थ.. आता भाषेच्या लहेज्याबद्दल आणि व्याकरणाबद्दल थोडेसे..
राम, गोविंद, गरुडध्वज, कमलाकांत या सगळ्या शब्दांचा अर्थ श्री विष्णू .. भगवान विष्णू यांना संबोधून हे लिहिले असल्यामुळे या शब्दांची विभक्ती संबोधन एकवचन ही आहे..
उत्तिष्ठ म्हणजे उत + स्था (तिष्ठ) धातू .. ज्याचा अर्थ उठा असा आहे.
देवांच्या नावांमध्ये बऱ्याच वेळा बहुव्रीही समास वापरलेला आढळतो.. म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन तिसरा शब्द तयार होतो.. जसे की..
गरुडध्वज - गरुड आहे ध्वजावर ज्याच्या असा तो
कमलाकांत - कमला (श्री लक्ष्मी) चा पती
पुढची कडवी लवकरच..