Tuesday, May 19, 2020

महालक्ष्मी अष्टकम - स्वैर मराठी अनुवाद

संस्कृत भाषेचे माधुर्य, गोडवा, अचूक व्याकरण, शब्दसंपदा हे नेहमीच मोहून टाकते.. आस्तिक नास्तिक च्या वादात न पडता गीर्वाण भाषेवरील प्रेम या स्तोत्रांपर्यंत आणून पोचवते.. अमृतवाणीच्या लेखमालेतील हे पुढचे स्वैर भाषांतर.. महालक्ष्मी अष्टकम.. जेवढे समजले उमजले तेवढे तुमच्या समोर मांडत आहे.. विद्यार्थी अजून शिकत आहे त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी.. 

अष्टक हा शब्दच आठ कडव्यांविषयी सूचित करतो.. तर ही महालक्ष्मी चे वर्णन करणारी, गौरव करणारी आठ कडवी आहेत.. 

नमस्तेSस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते
शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोSस्तुते ।।१।।


हे जगत जननी देवी महामाया तुला माझा नमस्कार असो. श्रीपिठामधील देवता जिचे पूजन करतात अशा हातात शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोSस्तुते  ।।२।।

कोलासुराचा नाश करणाऱ्या, गरुडावर आरूढ देवीला माझा नमस्कार असो. सर्व लोकांचे पापक्षालन करणाऱ्या देवी महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

सर्वज्ञे सर्ववरदे सर्व दुष्टभयंकरी 
सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोSस्तुते ।।३।।

सर्व जाणणारी, सर्वांना वर देणारी, दुष्टांना भयभीत करणारी, सर्व दुःखाचे निवारण करणारी देवी महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

सिद्धीबुद्धीप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी 
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोSस्तुते ।।४।।

यश आणि बुद्धी देणारी, भौतिक सुखे आणि मोक्ष देणारी, मंत्रोच्चाराने सिद्ध देवी महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी 
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोSस्तुते ।।५।।

अनादी अनंत देवी, आदिशक्ती माहेश्वरी (देवी दुर्गा) , योगाचे मूळ असणारी आणि योगापासून बनलेली देवी महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे 
महापापहरे देवी महालक्ष्मी नमोSस्तुते ।।६।।

विराट रूप धारण करणारी आणि त्याच बरोबर सूक्ष्म रूपात अस्तित्वात असणारी, रौद्ररूपातील महाशक्ती आणि जगाची भरभराट करणारी, सर्व पापक्षालन करणारी देवी महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी 
परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोSस्तुते ।।७।।

कमळावर विराजमान ब्रह्मांड स्वरूप, आदिदेवी, जगन्माता देवी महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

श्वेतांबर धरे देवी नानालंकारभूषिते
जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोSस्तुते ।।८।। 

श्वेतवस्त्र धारण करणारी, अनेक अलंकार विभूषित, चराचरात अस्तित्व असणारी, जगन्माता देवी महालक्ष्मी ला माझा नमस्कार असो. 

**************************************************

(फलश्रुती)

महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं यः पठेभक्तीमान्नरः 
सर्वसिद्धीवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ।।९।।

हे महालक्ष्मी अष्टक  भावाने पठण करतील त्यांना नेहमी यश व कीर्ती प्राप्त होईल. 

एककाले पठे नित्यं महापाप विनाशनं 
द्विकालं यः पठे नित्यं धनधान्य समन्वितः ।।१०।।

रोज एकदा पठण केल्याने सर्व पापक्षलन होते. रोज दोन वेळा पठण केल्याने धनधान्य प्राप्ती होते. 

त्रिकालम यः पठे नित्यं महाशत्रू विनाशनं 
महालक्ष्मीर्भवेनित्यं प्रसन्ना वरदा शुभा ।।११।।

रोज तीनवेळा पठण केल्याने शत्रूंचा विनाश होतो. देवी महालक्ष्मी प्रसन्न होते. वर आणि शुभ आशीर्वाद देते.  


मनापासून गीर्वाण भाषेवर प्रेम करणारी - अवनी गोखले - टेकाळे 

No comments:

Post a Comment