जागतिक मैत्री दिन आहे आज. खरे तर मैत्रीला दिन वगैरे साजरे करायची गरजच नसते. ती असते किंवा नसते. असली तर ती आयुष्यभर असते. एका दिवसापुरती नाहीच. पण तरी थोडेसे आज लिहावेसे वाटले मैत्री बद्दल.
कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाटेल ते, वाटेल तेव्हा, वाटेल तेव्हढे बोलता येणे म्हणजे मैत्री.. कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता सतत भेटायची ओढ असणे म्हणजे मैत्री.. रोजच्या संपर्कात नसेल तरी दिल चाहता है बघून ज्याच्या आठवणीने बेचैन व्हायला होत आणि डोळ्यात पाणी दाटत ते पाणी म्हणजे मैत्री.. समोरच्याला अजिबात वाचन लिखाण विषयात interest नाही तरी जो आपले लेख अत्यंत मनापासून ऐकतो ते ऐकून घेणं म्हणजे मैत्री.. आपण अतिशय मोठी अक्षम्य चूक केली तरी पन्नास शिव्या घालेल पण आपल्याला समजून घेईल ते समजून घेणं म्हणजे मैत्री.. आपण खूप दिवसात भेटलो नाही म्हणून जो आपल्यावर मनापासून चिडेल ते चिडणं म्हणजे मैत्री.. सायंकाळच्या कातरवेळेत लागणारी हुरहूर समजू शकते ती मैत्री.. तुम्ही गरज नसताना बेफिकीर हसत असताना तुमच्या मनातली सल ओळखून काय सगळं ठीक ना हा प्रश्न विचारेल कोणी तर तो प्रश्न म्हणजे मैत्री.. तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य तोच तोच सल्ला देईल तो सल्ला म्हणजे मैत्री.. वेळ काळ स्थळ यांचे बंधन घालत नाही ती मैत्री.. वय, स्त्री - पुरुष भेद करत नाही ती मैत्री..
आता स्त्री पुरुष मैत्रीबद्दल थोडेसे.. मला खूप मित्र आहेत लहान पणापासून.. खूप जिगरी मित्र.. आणि हो, ते माझे मित्र आहेत.. मानलेले भाऊ नाहीत.. राखी बांधायला मला हक्काने आणि निसर्गाने खूप रक्ताचे भाऊ दिले आहेत..मैत्री हे पवित्र नाते मला "मानलेला भाऊ" याच्या पदराखाली झाकायला कधीच आवडले नाही.. रात्री एक एक पर्यंत एकत्र गप्पा मारायला कॉफी शॉप मध्ये बसू असे हे मित्र आहेत.. मध्यरात्री सुद्धा कुठल्याही अडचणीला तेवढ्याच हक्काने हाक मारता येतील असे.. ज्यांच्यासोबत मी फिरत असेन तर आई वडील आणि नवऱ्याला निर्धास्त वाटेल असे.. मी सासरी आल्यावर ज्यांना हक्काने सांगून आले की अधून मधून आई बाबांकडे जात राहा ते हे मित्र आहेत.. हे सगळे मित्र माझ्या घरच्यांना ओळखतात.. आणि माझ्या घरचे मला ओळखतात..
मुळात मैत्री ही भावनिक असते.. शारीरिक नाही.. आणि ही सीमारेखा जर तुमच्या मनात अचूक असेल तर कुठलाही मित्र तुमचा गैरफायदा घेऊ शकत नाही.. एक स्त्री म्हणून निसर्गाने माणसं ओळखण्याची, बोलणे ओळखण्याची, नजर आणि स्पर्श ओळखण्याची कला स्त्री ला नकळत दिलेली असते.. पण जर इथे गल्लत केली तर मग मात्र खोल गर्तेत जाण्यापासून तुम्हाला तुम्ही स्वतः देखील अडवू शकत नाही.. ही एक अशी परीक्षा आहे जिथे अभ्यासक्रम पण निश्चित नाही, येणारी प्रश्नपत्रिका पण ठरलेली नाही पण या परीक्षेत तुम्हाला पास होणे सक्तीचे आहे.. बंधनकारक आहे.. एकदा ही परीक्षा पास झाल्यावर मात्र निखळ मैत्रीचा आनंद दुसऱ्या कशातच नाही..
आमच्या मित्र मैत्रिणींच्या मैत्रेया बद्दल वाचायला आवडेल का? बंध मैत्रीचे या लेबल खाली मैत्री चे काही किस्से एकत्रित वाचायला मिळतील.
-- अवनी गोखले टेकाळे !!
No comments:
Post a Comment