Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Tuesday, July 18, 2023

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा..!!

तू फक्तं अवती भोवती रहा कान्हा. तेवढं पुरे.. तुझं अस्तित्व जाणवतं राहतं.. तेवढी जाणीव पुरे.. डोळे भरून तुला पाहताना माझे स्त्रीत्व उमलत राहते.. तू डोळे भरून पाहिलेस की माझे मीत्व खुलत राहते.. या कळीचं फुल होताना तू केसर बनून साथ दे.. तेवढा तुझा वास पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. सारे सूर कानात फेर धरून घुमत राहतात.. पंचप्राण पांचजन्य शंख फुंकत राहतात.. माझा कोमल निषाद ही तूच कान्हा आणि माझा तारसप्तकाचा शडज ही तूच कान्हा.. ग्रीष्मात तू पाहिलेस तरी मनात मेघमल्हार वाजायला लागतो कान्हा.. तेवढा तुझा ताल पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. तुझी रणनीती एकलव्यासारखी शिकावी वाटते.. सगळ्या अडचणी सोप्या वाटायला लागतात.. आपसूक मार्ग निघत जातात.. माझे प्रश्न ही तुझ्यामुळेच आणि उत्तर ही तूच कान्हा.. मी कणखर झाले तुझ्यामुळे.. लढायला शिकले तुझ्यामुळे.. विराट दर्शन झाले तुझ्यामुळे.. माझ्या आयुष्याचा अठरावा अध्याय बनून माझ्या शरीरात भिनत रहा.. तेवढी तुझी शिकवण पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. तू प्रत्येक वेळा वेगळ्या व्यक्तीत वेगळ्या रूपात भेटत राहतोस.. आणि माझी रूप बदलत नेतोस.. कधी मी तुझी रास रचणारी राधा होते.. कधी तुझी मरेपर्यंत साथ देणारी रुक्मिणी होते.. कधी लेकराला मायेने लोणी साखर भरवताना यशोदा होते.. कधी अडचणीत सापडलेली द्रौपदी होते.. कधी तुझ्याच अनंतात विलीन झालेल्या जीवलगांची आठवण आळवणारी मीरा होते.. तू बदलत जातोस आणि मीही.. प्रत्येक टप्प्यावर त्या त्या रुपात भेटत रहा कान्हा.. तेवढी तुझी ओढ पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!

तुझ्या पांचजन्य शंखात.. तुझ्या मुरलीत.. तुझ्या मोरपिसात.. तुझ्या नीलवर्णात.. तुझ्या गीतेत.. तुझ्या विराट रुपात.. तुझ्या रासलीलेत.. हे मोहना .. हे कान्हा.. हे कृष्णा.. हे मधुसूदना.. हे माधवा.. माझे अस्तित्व तुलाही जाणवत असेल का.. माझा अध्याय संपवताना मी येईन.. समुद्राच्या दिशेने चालत राहीन आत आत.. तेव्हा शेषशाही रुपात तू भेटशील ना मला.. तेवढं अंतिम भेटणं पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!!


Wednesday, March 31, 2021

नावात काय आहे?

शेक्सपियर म्हणून गेला मंडळी, नावात काय आहे? पण आमच्याकडे नावात खूप काय काय आहे. 

किस्सा एक - 
माझ्या सासूबाईंच एक छोटंसं ऑपरेशन झालं मध्यंतरी. नंतर फॉर्म ऑफिस मध्ये सबमिट करायची वेळ आली. पेशंट चे नाव वैशाली टेकाळे आणि डॉक्टर चे नाव वैशाली टेकाळे. पहिल्या फटक्यात Direct reject झाला ना फॉर्म. पेशंट नी काय आपली आपली सर्जरी केली का काय? असं कुठे असतं का? आता यांना पटवायचे कसे? माझी चुलत जाऊ लातूर मधली नामांकित gynac डॉक्टर. वैशाली टेकाळे. आणि पेशंट म्हणजे माझ्या सासूबाई त्यांचे पण नाव वैशाली टेकाळे. आता आमची तिसरी वैशाली टेकाळे म्हणजे माझी दुसरी चुलत जाऊ कुवेत ला होती म्हणून बरे. नाहीतर अजून ती फॉर्म घेऊन फिरली असती ऑफिस मध्ये तर अजून घोळात घोळ. 
आता काय सांगायचे यांना. आमच्याकडे दोन स्मिता टेकाळे. तीन वैशाली टेकाळे. दोन अवनी टेकाळे. माहेरी दोन मेधा गोखले. सासर माहेर ची नुसती नाव बघितली तर अजून वाढत जाईल ही लिस्ट. दोन वर्षा. दोन इंद्रायणी. दोन गजानन. दोन विक्रम. दोन धनश्री. दोन ज्योती. दोन प्रसन्न. प्राजक्ता दोन. अजून मित्र परिवार यात लिहायला बसले तर मग कागदच अपुरा पडेल. 
आमच्या वर्गात दोन कांचन कुलकर्णी होत्या. मग त्यांना हाक मारताना मधल्या नावाचा जास्त उपयोग व्हायचा. कांचन प्र. कुलकर्णी आणि कांचन वि. कुलकर्णी. त्या प्र आणि वि च्या आयांनी त्यांचे नाव एक नाही ठेवले हे मोठेच महत्त्वाचे. 
त्यामुळे मोबाईल मध्ये नाव आणि पुढे reference असे सेव्ह केले आहे. 

किस्सा दोन -
एक जमाना होता. मुलींचे लग्न झाल्यावर नाव बदलायचे. मग एक जमाना आला. मुली लग्नानंतर नाव न बदलता राहू लागल्या. हा किस्सा त्या पुढचा. 
मी लग्नानंतर नाव नाही बदलले. प्रश्न तत्वाचा नाही तर आळशी पणाचा कदाचित. कारण माझे आधार, pan card, driving license, passport, bank documents, office documents सगळेच अवनी गोखले नावाने होते. एका ठिकाणी बदलले की सगळीकडे बदलत बसायचे. ते पण working day ला सुट्टी काढून जाऊन काम करायचे. त्यापेक्षा आहे तेच नाव ठेवले कागदोपत्री. कार घेतली तेव्हाची गोष्ट.महिला दिनाची ऑफर होती त्यामुळे घेतली अवनी गोखले नावावर. कागदपत्र सगळे त्याच नावाने होते. त्यामुळे काहीच अडचण आली नाही. फॉर्मलिटी पूर्ण करायला देवेंद्र सेंटर वर गेला. कॉन्टॅक्ट नंबर त्याचा दिलेला. त्याला आता गाडी servicing साठी फोन येतात. "Hello गोखले सर" म्हणून सेंटर वाले बोलायला लागतात. त्याला म्हणलं अरे एकदा सांग ना त्यांना की गोखले बायकोचे माहेर चे आडनाव आहे. तो म्हणतो जाऊ दे ना. आपल्याला काय servicing झाल्याशी मतलब. आता सांगा. नावात काय आहे?

किस्सा तीन -
माझी एक मावशी ट्रीप ला निघालेली. एअरपोर्ट वर पकडले. तुमच्या नावाने क्रिमिनल केस आहे म्हणे. आता ही बिचारी कानाशी गुणगुण करणारा डास मारायला घाबरणारी. आणि डायरेक्ट असे आरोप. आता काय करा. बऱ्याच चर्चे नंतर कळले की तिच्या इंग्रजी नावामुळे गडबड झालेली. म्हणजे कसे उर्जित गोखले आणि उर्जिता गोखले या नावाचे स्पेलिंग सारखे असते ना तसे काहीसे. या गडबडीत समजले की "तो मी नव्हे" तरी तिला एअरपोर्ट वरून घरी परत पाठवले. घेणं ना देणं पण बिचारी ची ट्रीप कॅन्सल झाली. आता सांगा नावात काय आहे? 
तिचे नाव काही उर्जीता नाही बरं. पण तिचे खरे नाव लिहायला घाबरले मी. कोणी सांगावे पोस्ट वर नाव वाचून "तो" यायचा आपल्या मागे तर काय घ्या?

आता सांगा मंडळी. नावात काय आहे? तुमच्याकडे आहेत का असे गमतीदार किस्से? असतील तर नक्की शेअर करा. कमेंट्स मध्ये लिहा.

-- अवनी गोखले टेकाळे
(हे नाव महत्त्वाचे. काय आहे हल्ली नावात काय आहे म्हणत म्हणत आमचे लेख आमचे नाव काढून स्वतः च्या नावावर किंवा निनावी forward करणारे महाभाग पण आलेत या सोशल मीडिया वर. तेव्हापासून जास्तच पटले. नावात खूप काही आहे. अख्ख आयुष्य, अख्खा माणूस, त्याची ओळख सगळेच!!!)

Friday, October 23, 2020

श्रीशक्ती चा जागर

काही लोकांसाठी स्त्रीशक्ती हा बोलण्याचा विषय असतो.. काहींसाठी तो लिखाणाचा.. तर काहींसाठी तो जगण्याचा.. 
खाचखळगे कोणाला चुकले आहेत.. काही जणी त्या वेळी थकतात, काही रडतात, काही थांबतात पण काही जणी त्यातून उभारी घेतात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे.. कुठल्याही तक्रारी न करता, प्रत्येक प्रसंगांवर हसत मात करत काही स्त्रिया आपले विश्व स्वतः उभे करतात.. आजच्या स्त्रिया काय करू शकतात? वाचा.. आजच्या स्त्रिया हे करू शकतात.. स्वतःच्या नावाची पाटी अभिमानाने झळकवत स्वतःच्या हिमतीवर समर्थपणे पाय रोवून उभे राहण्याची हिम्मत करणाऱ्या या मुली.. घर संसार सांभाळत बाहेरच्या जगात आभाळाला गवसणी घालू बघणाऱ्या या मुली.. धोपटमार्ग सोडून बिकट वाट वहिवाट करणाऱ्या या मुली.. त्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष लिहावेसे वाटले.. रोजच्या जगण्यात प्रेरणा मिळेल अशा या नवदुर्गा.. स्त्री शक्ती चा जागर करायला आले आहे या नवदुर्गा ना घेऊन..

१. डॉ. वैशाली टेकाळे - चपळगावकर (आकार हॉस्पिटल)
कठीण परिस्थितीवर मात करत रात्रीचा दिवस करून केलेले कष्ट, आणि मग त्या कष्टांना आणि स्वप्नांना आलेला "आकार". अजूनही अभ्यास करणाऱ्या, कधी नाटक अभिनय चित्रकलेत मन रमवणाऱ्या, नात्यांची वीण घट्ट जपून ठेवणाऱ्या, व्यायामाचे सातत्य जपणाऱ्या आमच्या संतूर गर्ल. आकार फर्टिलिटी क्लिनिक ची सर्वेसर्वा आणि आमची लाडकी चुलत जाऊ वैशाली टेकाळे - चपळगावकर.  
त्यांच्याबद्दल एक ब्लॉग लिहिलेला काही महिन्यांपूर्वी त्याची लिंक सोबत  देत आहे. 
https://avanigokhale.blogspot.com/2020/04/blog-post_28.html

२. स्नेहल घुबे (GTRIBE)
IT कंपनी मधला secured जॉब सोडून स्वतःचे विश्व उभे करायचा ध्यास घेतलेली ही सखी. कोण म्हणते एक आई तिच्या लहान मुलांना घेऊन ट्रेकिंग करू शकत नाही? हिने तर अशा असंख्य आयांना एकत्रित आणले आणि त्यांना त्यांच्या मुलांसहित ट्रेक ला घेऊन जायचे ठरवले..तेही स्वतःच्या लहान मुलीसहित.. नर्सरी मधल्या मुलीला रॉक क्लाइंबिंग चे धडे देण्यासाठी घरातली भिंत अनुरूप करून घेणारी ही सखी.. आपल्या छंदाला आपले करिअर करणारी ही सखी. इनडोअर, आऊटडोअर इव्हेंट्स मॅनेज करणारी ही सखी. GTRIBE ची सर्वेसर्वा आणि आमची कॉलेज मधली मैत्रीण स्नेहल घुबे - घेराडे. तिच्या website ची लिंक सोबत देत आहे. 
https://www.gtribe.in/

३. अपर्णा चोथे(त्या तिघी)
स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा; आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणाऱ्या सावरकर घराण्यातील "त्या तिघी". एक अनोखी संकल्पना घेऊन येणारी, स्वतः संहिता लेखन आणि एकपात्री सादरीकरण करणारी, "त्या तिघी" या रंगमंचावरील कलाकृतीची सर्वेसर्वा असणारी ही सखी. एक वेगळा प्रयोग करणारी हरहुन्नरी कलाकार. ही आमची शाळेतील सखी अपर्णा चोथे. सोबत पेज लिंक देत आहे.  
https://www.facebook.com/aparna.chothe

४. संजना इंगळे (ईरा)
आपल्या लेखणीला तळपत ठेऊन त्याच सोबत आपल्या इतर लेखक मित्रमंडळींना प्रोत्साहन देत एक स्वतंत्र विश्व तयार केले. ईरा. नवोदित लेखकांना मुक्त व्यासपीठ मिळवून दिले, वाचक मिळवून दिले, त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्याचसोबत नवोदित लेखकांना मानधन देऊन अभिमानाने पायावर उभे केले. ही आमची ब्लॉगर सखी संजना इंगळे. सोबत ईरा वेबसाइट ची लिंक देत आहे. 

५. नेहा बोरकर देशपांडे (अक्षरधागा)
लिहायला लागल्यापासून खूप गोड मैत्रिणींची ओळख झाली त्यातली ही एक. मुंजीचा नाजूक कशिदा काम केलेला अंतरपाट पहिला फेसबुक वर आणि मी पूर्ण फॅन झाले हिच्या एम्ब्रॉयडरी ची. हॅन्ड एम्ब्रॉयडरी, कशिदा, patch work, hair एम्ब्रॉयडरी या सगळ्याला ग्लॅमरस स्वरूप देऊन नवीन ओळख निर्माण केलेली, नावीन्यपूर्ण कल्पना राबविणारी आमची ब्लॉगर सखी नेहा बोरकर - देशपांडे. लेख आणि एम्ब्रॉयडरी यांचा कॉम्बो पॅक तिच्या अक्षरधागा या पेज मध्ये पाहायला मिळेल. पेज ची लिंक देत आहे. 
https://www.facebook.com/BorkarN

६. सोनिया केतकर (पपेट शो)
गेले २८ वर्ष सातत्याने पपेट शो करणारी, बोलक्या बाहुल्यांच्या खेळाला ग्लॅमरस रूप देऊन youtube channel वरती ही लहान थोरांना खिळवून ठेवणारी;पपेट बनवणे, voice modulation, script writing सगळ्यामध्ये हातखंडा असणारी ही आमची वाहिनी सोनिया केतकर. 
youtube channel - https://www.youtube.com/channel/UCZWSXolAILMEtG0LRJSaB7g
तिचा हा प्रवास थोडक्यात वाचा तिच्याच शब्दात 
https://www.facebook.com/soniya.ketkar.9/posts/1171246726591441

७. कविता सुरासे (Owner Operator at AUS Advisory LLP)
लिहायला लागल्यापासून खूप प्रगल्भ मैत्रिणी भेटल्या त्यातली ही एक. ही शब्द सखी आत्तापर्यंत पाच कंपन्यांची डायरेक्टर झाली आहे हे कळल्यापासून ठरवले होते कधीतरी ते सगळ्यांना सांगून आपण पण हवा करावी की अशी मुलगी आपली मैत्रीण आहे. ती संधी आज मिळाली. या व्यतिरिक्त पुस्तक वाचायची प्रचंड इच्छाशक्ती आणि इच्छा तेथे मार्ग याप्रमाणे त्यासाठी वेळ काढणारी ही मुलगी. तसेच तिचे लेखणीवरील प्रभुत्व आणि प्रगल्भता तुम्हाला तिच्या ऑनलाईन प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळेल.. 

८. मंजिरी तांबे (Owner at independent practicing chartered accountant)

येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर खंबीरपणे मात करणारी ही मुलगी. स्वतःची CA firm काढून ती समर्थपणे चालवणारी independent internal auditor. ही आमची family friend मंजिरी तांबे. निर्मळ हसणे आहे तुझे ते तसेच जपून ठेव कायम. 

९. शुभदा घाणेकर 
माझी सख्खी शेजारीण शुभदा घाणेकर. यांच्यामुळे मी आळशी होण्याचे chances वाढणार आहेत.. कारण कुठलीही गोष्ट फक्त नाव घ्या ती यांच्याकडे मिळते. मग ते स्वयंपाकात वापरायचे मसाले असो, पापड असो, वेगवेगळी पिठं असो, मुलीच्या वाढदिवसाला कापायचा केक असो, रविवारी झटपट नाश्त्याला इडली पीठ असो, ओटी भरायला छोट्या पर्स असो किंवा आत्ता sanitizer आणि मास्क असो. all in one package म्हणजे शुभदा. 

ता. क. यातल्या कोणीही मला लिखाण करून promotion कर अशी सुपारी दिलेली नाही बरं का.. स्वतःला सिद्ध करत त्या समर्थपणे उभ्या आहेतच.. त्यांच्याकडून थोडी प्रेरणा घ्यावी, इतरांना द्यावी म्हणून एक छोटा प्रयत्न.. कसंय अचानक आणि अनपेक्षित आपल्या कामाची कोणी नोंद घेतलेली पहिली की अंगात दहा हत्तींचे बळ येते.. ते बळ या सगळ्यांना मिळो आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख असाच चढता राहो हेच आजच्या आठव्या माळेला महागौरी कडे मागणे. 

-- अवनी गोखले टेकाळे 

Thursday, October 22, 2020

आरशात दिसणाऱ्या नवदुर्गा

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चंद्राघंटेति कूष्मांडेति चतुर्थकं ।
पंचमं स्कंदमातेति षष्ट्म कात्यायनी च ।
सप्तमम् कालरात्रेति महागौरीति च अष्टकं ।
नवमम् सिध्दीदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तीता: ।
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हण्य एव महात्मना ।।

देवी असते का खरंच? तिने खरंच महिषासुराचा वध केलेला का? माहित नाही.. पण देवीची नऊ नावे नीट वाचल्यावर प्रत्येक स्त्री च्या आयुष्याचा सोहळा नऊ भागात कथन केल्यासारखा वाटतो.. आपल्या भोवती फेर धरणाऱ्या, रोज भेटणाऱ्या, आरशात दिसणाऱ्या या नवदुर्गा.. माझ्यासाठी नवरात्रीचा उलगडलेला अर्थ तुमच्यासमोर मांडत आहे..  बाकी ओटी भरणे, नमस्कार, पूजन, हळदी कुंकू हे सगळे त्या स्त्री च्या प्रती आदर व्यक्त करण्याचे साधन आणि निमित्त फक्त. 

१. शैलपुत्री - पर्वतराज हिमालयाची कन्या. एका बापाची नवजात कन्या 
२. ब्रह्मचारिणी - ब्रह्मपद प्रदान करणारी. ब्रह्मचर्याचे पालन करणारी शिक्षण घेणारी कन्या. 
३. चंद्रघंटा - माथ्यावर चंद्र धारण केलेली, सुगंध आणि चेतना लहरींची अनुभूती देणारी लग्नाची आस लागलेली चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी 
४. कुष्मांडा - आपल्या हसण्याने ब्रह्मांड निर्माण करण्याची इच्छा असणारी स्त्री. मातृत्वाची चाहूल लागलेली स्त्री 
५. स्कंदमाता - कार्तिकेय / स्कंद याची माता. मातृत्वाचा सोहळा अनुभवणारी स्त्री 
६. कात्यायनी - धर्म, काम, मोक्ष सर्वांची अनुभूती देणारी प्रगल्भ स्त्री 
७. कालरात्री - असत्य, पापी लोकांविरूद्ध निडरपणे आवाज उठवणारी, मर्दन करायला सज्ज झालेली चामुंडारूपातील स्त्री 
८. महागौरी - संसार समर्थपणे करून मोहत्याग केलेली सफेद वस्त्र परिधान केलेली मोक्षाच्या दिशेने निघालेली स्त्री
९. सिध्दीदात्री - सर्व सिद्धी देणारी. स्त्रीचे सोहळे अनुभवून सिद्धी प्राप्त झालेली अंतिम सोहळ्याच्या दिशेने निघालेली स्त्री 

या प्रत्येक रूपावर लिहिण्यासारखे खूप आहे. पण कधी कधी सगळेच लिहिण्यापेक्षा वाटते वाचताना प्रत्येक रूपापाशी थबकावे.. थोडे भोवती फिरून बघावे कोणी सापडते का? हा सोहळा नऊ वाक्यात संपणारा नाही आणि नऊ दिवसात पण संपणारा नाही.. आयुष्य पुरून उरेल.. 

-- अवनी गोखले टेकाळे 

Friday, December 20, 2019

तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे..

रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याचं ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे.. 
तशी मी जाते एक दोन महिन्याला.. शनिवारी सकाळी उठायचं.. बॅगेत सापडतील ते दोन ड्रेस घालायचे आणि निघायचं.. एक रात्र राहायचं आणि रविवारी संध्याकाळी परत.. येताना एक बॅग ektra हातात.. (कारण काय सांगायचे वेगळे.. आठवा फक्त तुमचीही माहेरून निघताना सामानाची कथा.. ) तर हि कहाणी या दीड दिवसाची.. तुमची माझी नावं वेगळी.. गावं वेगळी.. पण ही कहाणी थोडी फार तुमचीही तितकीच जितकी माझी..!! ही जेवढी एका लग्न झाल्यावर दुसऱ्या गावीसासर असणाऱ्या मुलीची तितकीच मूळ गाव सोडून नोकरीला दुसऱ्या गावी गेलेल्या मुलांची सुद्धा.. 
फक्त माय चे घर म्हणजे माहेर एवढी सोपी सरळ व्याख्या नाही ती.. फारच कंगोरे आहेत याला.. लहानाचे मोठे झालो ते घर, तिथल्या आठवणी, सगळे माहेरचे नातेवाईक, सासरचे खूप सारे नातेवाईक, भरपूर मित्र.. सगळेच आहेत इथे माहेरच्या गावाला.. शाळा, कॉलेज, ऑफिस, क्लास आणि गप्पांचे कट्टे सगळेच आहे इथे.. इथल्या हॉटेल मधील जेवण चविष्ट कि गप्पा चविष्ट हा एक जागतिक चर्चेचा विषय आहे.. जी कथा हॉटेल ची तीच शॉपिंग ची.. एवढंच काय माझा शिंपी, डेंटिस्ट, पार्लरवाली आणि असे बरेच "वाले" अजूनही इथेच आहेत.. या सगळ्यांना बसवायचं असत दीड दिवसात.. काही भेटतात, काही रुसतात, काही समजून घेतात.. कोणाला भेटायचं असा प्रश्न आयुष्यात पडण्यापेक्षा वेळ कमी पडला म्हणून भेटता आलं नाही हे जास्त छान.. कशाला अली भेटायला असं वाटण्यापेक्षा भेटायला आली नाही म्हणून रुसणारे आहेत हे जास्त छान.. आपण जमेल तेवढं जमवत रहायचं.. बाकीच्यांना next time म्हणत राहायचं.. दीड दिवसाचं माहेर मिरवत राहायचं.. 
आपला जीव सगळीकडेच अडकतो.. हेही सोडवत नाही आणि तेही.. सासरचे पण इतके आहेत माहेरच्या गावात कि कधी कधी गावी जाऊन पण "घरी" जायलाच होत नाही.. घरचे उलट खुश होतात म्हणतात रुळली सासरी अजून काय हवं.. तरीही मन हुरहूर लावतच.. अशावेळी डोळ्यातला चुकार थेंब जाताना गल्लीत सोडून जायचं.. तीन तास मनात घर आठवत राहायचं.. अशावेळी माहेरच्या गल्ल्या सुद्धा आधार देतात.. जुने क्षण आठवून उगाच हसवून जातात..
इथले रस्ते सांगताना मी नेहमी गोंधळात पडते.. सगळे चिडवतात कि इतकी वर्ष गेली तुझी इथे, इतकी फिरलीस बाईक वर पण तुला रस्ते कसे सापडत नाहीत.. काय सांगू इथल्या रस्त्यावर ढीगभर आठवणी सोडल्या आहेत.. त्या आठवणींच्या पाठीमागे जाताना चार गल्ल्या पुढे गेलेले असतो आणि मग सगळंच हरवल्यासारखं वाटत.. रस्ताही आणि आठवणीही.. आणि मग मी एकच पुणेरी वाक्य बोलते फक्त.. पुणे फार बदललं ना अशात.. 
आपलं म्हणजे कसं दीड दिवसाच्या गणपती सारखं.. एकच आरती.. त्यातच सगळ्यांना बोलवायचं.. तेव्हाच वाटायचा प्रसाद, तेव्हाच दाखवायची आरास, बाप्पाला मनात साठवायचं ते पण तेव्हाच आणि पुढच्या वर्षीची आरतीची स्वप्न रंगवायची ती पण तेव्हाच.. 
तसं सुखासुखी चालू असतंच कि सासरी.. काही तक्रारी करायला जायचं नसतं ,माहेरी.. महत्वाचं असं काहीच काम नसतं.. पण उगीच थोडं पाय पसरून सुस्त व्हावं असं वाटत.. हातातलं घड्याळ थोडं काढून ठेवावं वाटत.. तेवढंच समाधान वाटत मनाला कि रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याचं ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे.. 

Tuesday, November 26, 2019

सामान्य मतदार आणि त्याच मत..

सामान्य मतदार आणि त्याच मत.. अवनी गोखले टेकाळे

निवडणुका जाहीर झाल्यावर तो..
त्याचं असं एक मत असतं.. ते कोणासाठी तेही ठरलेलं असतं.. तो हिरीरीने ते सगळ्यांना पटवून देतो.. मतभेद होतात त्यांच्याशी तो वाद घालतो.. what's app वरती, Facebook वरती.. त्यासाठी तो इकडून तिकडून आलेल्या forwarded posts चा  database तयार करतो.. तो घरी येतो.. शाळेतल्या मुलीचा नागरिक शास्त्राचा अभ्यास घेतो.. नुकतीच १८ वर्ष झालेल्या मुलाचे नाव मतदार यादीत सामील झाल्याची खात्री करून घेतो.. एकूणच काय तो एक सुजाण नागरिक असतो..

निवडणुकीच्या दिवशीचा तो..
तो मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर उठतो.. आपल्या एका मताला सुध्धा खूप किंमत आहे यावर त्याचा विश्वास असतो.. त्यामुळे मतदान न करता long weekend साजरा करायला गोव्याला जायचं तो अजिबात डोक्यात आणत नाही.. दाढी अंघोळ देवपूजा करून बाहेर पडतो..केंद्रावर जाताना आधार card, voter card, pan card जमलच तर एखादा फोटो थोडक्यात काय सापडेल ते सगळ हातात घेऊन खोली नंबर घोकत बाहेर पडतो.. रांगेत ज्येष्ठ दिसले तर हात धरतो.. तरुण मुलांना समजून सांगतो.. हळू हळू रांगेतून पुढे सरकतो.. तो आत जातो बटन दाबतो.. आवाज ऐकतो.. चित्र उमटल्या ची खात्री करतो.. डाव्या हाताच्या तर्जनीचे नख काळे करून बाहेर येतो.. मग चेहऱ्याच्या शेजारी तर्जनी बसवून मोबाईल हवेत तिरका धरून उगाच हसतो.. मग तो फोटो सगळी कडे पाठविल्यावर त्याच कार्य पूर्ण होत.. हे सगळ सकाळी ८ वाजता अावरुन तो घरी चहा पोहे समोर यायची वाट बघत पेपर वाचतो..

रिझल्ट च्याच प्रतीक्षेत तो..
तो ऑफिस मधून घरी येतो.. हात तोंड धुवून टीव्ही समोर बसतो.. तो ठराविक वेळ बातम्या बघतो.. थोडा खुश होतो .. थोडा वैतागतो.. थोडा बडबड करतो स्वतःशीच..
मग शांत होऊन तो किती वाजले ते बघतो.. आजही आठ वाजल्यावर तो शनाया च बघतो..
त्याला खरंच फरक पडतो का? कोण आले कोण गेले.. त्यानी ठरवलं तरच त्याला फरक पडतो.. त्याला सगळं कळतं.. त्याला सगळं समजत.. "हॉटेलिंग" करता येत नाही म्हणून त्याला दुःख नसत.. आपल्या चौकोनी कुटुंबात तो कांदे पोहे खाताना सुध्धा समाधानी असतो.. तो गप्प बसला असला तरी आजही त्याला एक आवाज असतो.. पण तो कधी कुठे कसा कोणासाठी.. त्याच त्याच गणित ठरलेलं असतं!!.. हो, आजही त्याला त्याच एक मत असतं .. पण ते कधी कुठे कस कोणासाठी.. त्याच त्याच गणित ठरलेलं असतं.. !!

Friday, October 25, 2019

उद्याने

हो, नाही आवडत आम्हाला अजूनही प्रत्येक रविवार संध्याकाळ मॉल मध्ये घालवायला.. तिथला AC, तिथला food court, तिथले shopping, तिथले game zone यांना काही नावं नाही ठेवायची.. आम्हीही करतो कि हो तिथे shopping, बघतो कि तिथे movies, खातो तिथेही.. नाही असे नाही.. पण फक्त रविवारी संध्याकाळी करायचे काय सुचत नाही म्हणून मुलांना game zone मध्ये खेळायला न्यावे असे नाही वाटत.. given a choice अजूनही मुलांना खेळायला बागेत मोकळ्या हवेत न्यावे असे अजूनही वाटते.. जे बालपण आपण जगलो ते मुलांनी पण जगावं यासाठी अट्टाहास का आपल्याच बालपणात थोडं रमावं त्या निमित्तानी यासाठीची धडपड माहित नाही.. पण हो, अजूनही आमच्यामधला मध्यम वर्ग जिवंत आहे..
अशीच एक रविवार संध्याकाळ.. असेच एक गार्डन.. भरपूर मोठे.. मुलांना खेळायला खेळणी हि भरपूर.. आणि भरपूर मुलेही खेळणारी.. पण बऱ्याच खेळण्यांच्या तर्हा साधारण अशा होत्या.. घसरगुंडीच्या मधल्या पायऱ्या तुटलेल्या.. झोपाळा मधोमध तुटलेला किंवा पकडायची दोरी तुटलेली.. spring लावलेले प्राणी spring खराब झाल्यामुळे मान टाकून बसलेले.. जंगल जिम चे बार मधेच वाकून मोडलेले.. बाकीचे वर्णन जर तुम्ही अशात कुठल्या आसपासच्या बागेत गेला असाल तर तुम्हीच मनाशी करून बघू शकता.. प्रचंड खेळणी असूनही खूप थोडी खेळणी मुलांना खेळायला योग्य होती.. आणि  मुले लहानच.. त्यामुळे खेळणी खराब आहेत हे त्यांना कुठे कळायला.. त्या तुटलेल्या गांजलेल्या खेळण्यांवर मुले तशीच जात होती आणि त्यांच्या मागे त्यांच्या पालकांचा जीव मुठीत.. घरी येईपर्यंत..
आणि मग घरी येताना मन चरकतच क्षणभर.. कि ज्या अट्टाहासाने बागेत घेऊन जातो ते नेमके योग्य आहे ना..
हे कोणालाही दुखावण्यासाठी लिहिलेले नाही.. याचे राजकारण तर नक्कीच होऊ नये.. पण तरीही कुठेतरी व्यक्त व्हावे असे वाटते.. आम्ही कोण? अजूनही मुलांनी मोकळ्या हवेत खेळावं असे वाटणारे पालक.. बाकी नावात काय आहे.. !!

Thursday, October 17, 2019

Same Pinch!!!

बाप म्हणणारा सूरवात करतो ३०० रुपये महिना..
मुलगा म्हणणारा सूरवात करतो ३०००० रुपये महिना..
संसारात पडल्यावर दोघांचा जमाखर्च सारखाच असतो..
मुलगा बापाला चिमटा घेत same pinch म्हणतो..

तसे रोज संध्याकाळी ते सगळे पोळी भाजी वरण भातच खातात अजूनही..
सासू म्हणणारी एखाद्या रविवारी हट्ट करून उडपीची इडली आणि मंगला थिएटर ला dream girl बघायला जाऊ म्हणायची..
सून म्हणणारी आता एखाद्या रविवारी dominos pizza खाऊ आणि pvr ला dream girl बघायला जाऊ म्हणते..
दोन "dream girl" मध्ये फरक असला तरी सासू सुनेचे ड्रीम साधारण सारखेच असते..
सून सासूला चिमटा घेत same pinch म्हणते..

दुसऱ्या शहरात नोकरी लागते. घर घ्यायची वेळ येते..
मुलगा Home loan ची चौकशी करतो..
हप्ते बापाने ही फेडले.. हफ्ते मुलगा ही सुरू करतो..
सून म्हणणारी FD RD मोडते.. दागिने समोर ठेवते..
अजून एका छपराला त्यांचे आडनाव मिळते..
सासू म्हणणारी ३० वर्षांपूर्वीचे पिठाच्या डब्यात लपवलेले पैसे दागिने आठवते..
सासू सुनेला चिमटा घेत same pinch म्हणते..

बजाज स्कूटर साठी बाप म्हणणारा चार खेटे घालतो..
थोडे पैसे साठवतो.. थोडे कर्ज घेतो..
मुलाने wagonR साठी car loan ची चौकशी केल्यावर बाप तेच दिवस आठवतो..
बाप मुलाला चिमटा घेत same pinch म्हणतो..

नवरा म्हणणाऱ्याने चिंतामणी रंगाची कांजीवरम आणि नाग वाकी हेरून ठेवलेली असते बायको साठी.. कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला..
दुसऱ्या नवरा म्हणणाऱ्याने बदामी रंगाचा one piece आणि हिर्याचे पेंडेंट बघितलेले असते बायकोसाठी.. कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला..
पण या पाडव्याच्या ओवाळणीत मात्र तो बंद पाकीट च ठेवतो..
एक नवरा दुसऱ्या नवऱ्याला same pinch म्हणतो..

फार काही बदलले नाही.. तेव्हाही आणि आत्ताही..
अजूनही जमाखर्च मांडताना महिना अखेर येतेच..
तरीही अजूनही महिना अखेरीला kitchen भरलेले असतेच..
अजूनही कपाटात खाली लपवलेले पाकीट जड असतेच..
काटकसरीच्या मडक्यातून अजूनही बचत झिरपते..
अजूनही बापाला मुलाने गुणल्या नंतर उत्तर चौकोनी कुटुंब हेच येते..
एक पिढी दुसऱ्या पिढीला same pinch म्हणते..

-- अवनी गोखले - टेकाळे

Wednesday, October 16, 2019

काय या आजकालच्या मुली.. !!!

ती लग्नकार्यांना जाते.. आहेर बिहेर करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
पाठ फिरता फिरता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. एक दागिना नको अंगावर यांना.."
ती थोडीशी मिटते..
दसऱ्याच्या वेळचे तिचेच दागिन्यांनी मढलेले रूप आठवते..
नंतर दिवाळी मध्ये book केलेले स्वतःचे घरही आठवते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते..

ती पाहुणेरावळे करते.. स्वयंपाक बिवपाक करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
पाठ फिरता फिरता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. पसारा सुद्धा आवरता येत नाही यांना.."
ती थोडीशी मिटते..
उरलंसुरलं अन्न काढून फ्रिज मध्ये ठेवते.. आणि मागे वळून बघते..
पाहुणचार करून तृप्त घर तिच्याकडे प्रसन्न नजरेने बघत असते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते..

ती जॉबबिब करते.. काम करते.. काम करून घेते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
केबिन च्या बाहेर पडता पडता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. घरचे कारण सांगून मस्त कल्टी मारता येते यांना.. "
ती परत थोडीशी मिटते..
डेस्कवरच डबा खाते.. पटकन काम संपवते..
लायनिंग च्या ड्रेस मध्ये गळणारे दूध सावरते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते..

ती बस ट्रेन पकडते किंवा गाडीला किक मारते.. धक्केबिक्के पचवते..
रस्त्यानी जाता जाता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. नोकरी चे कारण सांगून मस्त फिरता येते यांना.."
ती परत थोडीशी मिटते..
घरी जाऊन फ्रेशबिश होते.. पोरीला दूध पाजते..
हातात आलेला आयता वाफाळता चहा बघून सुखावते.. !!
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते.. !!!

Tuesday, October 15, 2019

Best Friend Forever..!!

बाबी आणि सुधी.. (वय वर्ष ७५+)
संध्याकाळी अचानक फोन खणाणतो.. सुधी मावशी गेली.. आजी आधीच आजारी म्हणून तिला झालेली गोष्ट न कळू देता आई बाबा  वैकुंठावर.. ते बाहेर पडल्यावर आजी म्हणते..तुम्ही जेऊन घ्या अरे.. त्यांना यायला आता रात्रच होईल.. सुधी गेली म्हणून बाहेर पडले ना ते..
अग पण आजी तुला कसं कळलं? तुला तर कोणी काही सांगितलं पण नाही..
बालमैत्रीण होती ना रे माझी.. मग मला सांगायला कशाला पाहिजे.. आतून कळतं!! म्हणजे कसं, काय ते कळायला अजून लहान आहात तुम्ही खूप.. !!
आणि मग काय.. जुन्या आठवणीत पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि आभाळभर हसणं.. !!

मी आणि नेहा.. (वय वर्ष ३०+)
एक निसर्ग वर्णन करणारी कविता वाचून नेहा चा फोन..
नेहा - काय ग, काय झालंय? any problem? तुझी कविता वाचली..
मी - मला काय धाड भरणारे.. मस्त मजेत.. आवडली का कविता? खूप like आलेत त्याला..
नेहा - like करणारे फक्त कविता वाचतात आणि मला त्याच्या मागच्या तुला पण वाचता येत एवढाच काय तो फरक.. बोला आता, काय झालंय..
आणि मग काय ..पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि शेवटी आभाळभर हसणं..!!

तात्या आणि नानी.. (वय वर्ष ९०+)
तात्या आणि नानी म्हणजे खरंतर दीर आणि जाऊ.. पण संसाराच्या उतार चढावांचे त्याच्या पिढीतले आता हेच दोघे साक्षीदार राहिलेले.. आताच्या पिढीला त्यांच्या बोलण्यातले अर्धे संदर्भ कळत नाहीत.. सणावाराच्या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र आले कि हे दोघे तासंतास हातात हात घेऊन बसतात.. जुन्या  आठवणींना उजाळा देत.. आणि मग काय.. पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि शेवटी आभाळभर हसणं..!!

वश्या आणि राजा.. (वय वर्ष ५५+)
निवांत रविवार दुपार.. सगळे घरातले पाय पसरून दिल चाहता है पाहत होते.. picture संपल्यावर बाबा अचानक उठले आणि कपडे बदलायला गेले.. शर्ट चे बटण लावता लावता पायात चप्पल सरकवली देखील.. अहो, आत्ता कुठे अचानक?
आलोच राजेंद्र कडे जाऊन.. म्हणत गाडीला किक मारून निघाले देखील..
आणि मग काय पोटभर बोलणं आणि आभाळभर हसणं..!!

शकू आणि शोभा (वय वर्ष ६०+)
सासूबाईंची माजलगावची बालमैत्रीण खूप वर्षांनी contact झाला.. आणि कुठे आहे काय करत करत लक्षात आले कि ते पण आता नवी मुंबईत रहातात.. मग काय mobile नंबर दिले घेतले.. आणि एक दिवस त्या मावशींचा फोन.. या श्रावणी शुक्रवारी ये ग सवाष्ण म्हणून.. नातवंड शाळेत जातात, मुलं कामावर.. मग आपण दोघीच घरात.. सणाचं निमित्त आणि आपल्या निवांत गप्पा होतील साठलेल्या.. आणि मग काय.. नव्या जुन्या गप्पांमध्ये पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि आभाळभर हसणं.. !!

गार्गी आणि काव्या.. (वय वर्ष ३)
गार्गी - मला बाऊ झालाय ना तर आज teacher नी सांगितलं class मध्ये.. don't touch her.. पण मी काव्या ला हात लावू दिSSलाSS.. ती माझी best friend आहे ना म्हणून.. तिनी हळूच हात लावला.. आणि मला दुखलं पण नाही..
खरंय आपल्या हळव्या जागेवर हात लावायचा हक्क फक्त best friend चाच.. चला, म्हणजे हे best friend प्रकरण पोचलंच तर पुढच्या पिढीपर्यंत..

कोण म्हणत लग्नानंतर मित्र वगैरे काही रहात नाहीत.. हे best friends नंतर कुटुंबाचाच एक भाग होतात आणि आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग.. ते फॅमिली फ्रेंड्स का काय म्हणतात तसे.. आणि भरभरून वाढत रहात आपलं कुटुंब.. वय बदलत जाईल त्याप्रमाणे भेटायची निमित्त बदलत जातात.. बोलायचे विषयही.. पण ओढ मात्र तीच..

काय मग वाचताना मनात आठवण आली ना कोणाची तरी.. तोच हो, तुमचा best friend forever..  मग जास्त वाट नका बघू.. भेटाच लगेच.. आणि शक्य तेवढं whats-app आणि fb वर नाही तर प्रत्यक्ष भेटून एक मिठी माराच.. बघा जमतंय का.. सांगा comments मध्ये तुमच्या BFF बद्दल..


Friday, October 11, 2019

संधिप्रकाश .. corporate च्या अंगणातला..

meeting संपल्यावर सहज खिडकीतून पाहिलं निघायच्या आधी.. काही पाऊस वगैरे नाही ना.. तर मस्त संधिप्रकाश पडलेला.. एकदम प्रफुल्लित, टवटवीत वाटलं.. खाली उतरून स्टेशन च्या दिशेनी जाताना campus नव्याने भेटला.. 
वातावरण सोनसरी पिवळसर.. सोनसरी रंग म्हणजे कसा तर pure च्या पाटल्यांसारखा one gram च्या गोठासारखा नाही.. सूर्याने लगबगीने जाता जाता color pallete ला दिलेला धक्का आणि  निळ्या सावळ्या कॅनव्हास वर अस्ताव्यस्त विखुरलेले रंग.. एकमेकात मिसळूनही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून असलेले.. गोलाकार buildings च्या मधोमध हिरवेगार landscape आणि त्यात फ़वारलेले तुषार सिंचन.. त्याच्या कडेनी प्रदूषण कमी करण्यासाठी लावलेले snake plant.. building नंबर ४ आणि ५ च्या मध्ये असलेले रातराणीचे झाड आभाळभर घमघमत होतं.. तिथून जाताना नकळत रेंगाळणारी काही पावलं बघून वाटलं आहे आहे.. मगाशी पडलेल्या पावसाचा ओलावा रुजला आहे थोडासा अजून इथल्याही मातीमध्ये.. बिल्डिंग ११ च्या बाहेर असलेल्या वडाच्या पारंब्या मातीत रुजलेल्या.. त्या सांगून गेल्या कि, तुम्ही यायच्या काही वर्षांपूर्वी अशी दिसत होती ही वास्तू, जंगलासारखी.. जाता जाता मस्त एखादा cutting चहा मारावा असा विचार करत बाहेर पडले campus च्या..
टपरी वरचे दृश्य बघून मात्र चहा प्यायची तीव्र इच्छा विरून गेली.. हवेत विरत चाललेल्या संधिप्रकाशासारखी.. काचेच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्याच्या बाहेरच्या चहा आणि पानटपऱ्या.. सिगारेट च्या वलयामागे हरवलेले formal shoes आणि high heels.. तुमच्या माझ्या वयाचेच.. धुरातून छेदत हा संधिप्रकाश पोचला असेल का यांच्या पर्यंत.. मागे वळून आपल्याच बिल्डिंग कडे बघताना जाणवलं.. हो, ही काचेची बिल्डिंग आहे..!!
संधिप्रकाश अनुभवणं क्षणिक.. दिवस मावळताना मिळालेले बोनस क्षण.. म्हणजे inning संपली वाटताना शेवटचा बॉल "no ball" पडावा.. त्यावर sixer जावी आणि परत हातचा एक बॉल मिळावा तसं काहीसं..  शेवटी निसर्ग काय सगळ्यांना सारखंच देत असतो.. तो क्षण टिपता आला तर आपला नाहीतर नंतर आहेच मिटत जाणारा दिवस..  
ट्रेन मध्ये हेच सगळे विचार करत होते.. एकीकडे लिहून काढत होते.. पण काही प्रश्नांची उत्तरं तशीच अपूर्ण अजूनही.. आणि उतरले तोपर्यंत आकाश काळेभोर.. black board वर duster मारून साफ करावे तसे.. स्टेशन च्या बाहेर पडताना एक काकू आकाशात पाहून म्हणाल्या आज चंद्र फार छान दिसतोय ना.. मन प्रसन्न झालं.. आपल्या भोवतीचे खळे तो फार दिमाखात मिरवत होता.. सगळे प्रश्न पुसत निर्व्याज पांढऱ्याशुभ्र प्रकाशातून द्वादशीचा चंद्र हसला थोडासा..

या आधी तुम्ही कधी रेंगाळला होतात निवांत संधी प्रकाशामध्ये.. comments मध्ये नक्की सांगा.. मॉल मधल्यासारखा "गारठा" नाही मिळाला तरी थोडासा "गारवा" नक्की मिळेल.. बघा जमतंय का… !!!

Follow posts on FaceBook also for regular updates -
https://www.facebook.com/goavanee

Follow on blogger also for regular updates -
https://avanigokhale.blogspot.com/

Friday, October 4, 2019

माझ्या घरातील कृष्ण..

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कृष्ण भेटत राहतो.. प्रत्येक वेळा भेटणारा कृष्ण वेगळा .. त्याला सामोरे जाणारे आपले रूपही वेगळे . कधी आपण यशोदा असतो, कधी राधा, कधी रुक्मिणी, कधी मीरा, कधी द्रौपदी.. एवढंच काय कधी आपण अर्जुन असतो, कधी राधेय, कधी उद्धव तर कधी स्वतः कृष्ण ही.. काहींना कृष्ण देव्हाऱ्यात रंगनाथ म्हणून दिसतो तर काहींना तो चालत्या बोलत्या माणसात.. पण भेटतो मात्र नक्की.. 
आपण लहान असतो.. शाळकरी मित्र जमवून हैदोस घालणारे.. त्यात आपल्या group चा leader आपला कृष्ण असतो आणि आपण आपले पेंद्या.. पण तो कृष्ण आपल्याला सामावून घेतो.. आपल्यामधल्या माणसाला हळूहळू प्रगभ करतो..  आता आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेज मध्ये येतो.. आपले विश्व बदलत जाते तसे मैत्रीच्या व्याख्याही.. पण त्या मित्रांच्या ग्रुप मध्ये पण काही मुलं खूप जबाबदार असतात.. घरच्यांचा पण त्यांच्यावर नितांत विश्वास असतो.. की ते आहेत ना सोबत मग जा बिनधास्त.. ही मुलं आपले मित्र तर असतातच.. पण त्याच बरोबर आपली काळजी सुध्धा घेतात..गैरफायदा तर सोडाच पण प्रसंगी टवाळ मुलांपासून आपल्याला जपतात सुध्धा.. अशा वेळी ते आपला कृष्ण असतात आणि अापण द्रौपदी.. 
आणि मग हळूहळू पंखात बळ येऊन पंख झेप घ्यायला बघतात.. आयुष्याला एक स्थैर्य यावं वाटत.. आपल्याला वाटायला लागत की आपणही कोणाची तरी राधा व्हावं, रुक्मिणी व्हावं.. आपल्या आयुष्यात त्या वेळेला आपला नवरा भेटतो कृष्ण म्हणून.. आपल सुखदुःख वाटून घेणारा हक्काचा सखा, सोबती.. 
आणि मग या रुक्मिणी ची नकळत यशोदा होऊन जाते.. आणि ताक घुसळत असताना तिचा कृष्ण/राधा लोण्याचा गोळा कधी येऊन फस्त करतात तिलाही कळत नाही.. त्या बाललीला बघण्यात ती गुंगून जाते.. कधी ती प्रेमळ तक्रारी करते तर कधी कौतुक सांगते.. पण ती सतत बोलते मात्र आपल्या लेकराबद्दलच.. 
घरचे सांभाळत उंबरठा ओलांडून ऑफिस मध्ये पाऊल ठेवतो आपण आणि सामना होतो तो corporate politics शी.. अशा वेळी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा, कणखर व्हायला शिकवणारा एखादा senior भेटतो.. तेव्हा तो कृष्ण असतो आणि आपण सारे अर्जुन..
मोठा भाऊ कामानिमित्त परदेशी.. घरच्यांच्या मनात काळजी, विरह, अभिमान, कौतुक सगळेच मिश्र भाव.. तो जाणार म्हणून उदास घराला सावरायची वेळ येते ती धाकट्या भावंडांवर.. अशा वेळी धाकटे भावंड उद्धव तर मोठा भाऊ कृष्ण..
कधीकधी आपणच खंबीर राहून सगळी सूत्रे हाती घ्यावी लागतात.. घराचा आधारस्तम्भ होऊन उभ राहायला लागतं.. अशा वेळी रथाची दोरी आपल्या हातात असते.. आणि या विशाल महाभारताचे तेव्हा आपणच असतो कृष्ण!!!


Tuesday, October 1, 2019

रियाझ, चंद्रघंटा आणि ती..

काल तिनी एका प्रसिद्ध कवी च्या मुलाखतीमध्ये ऐकले होते की गायक किंवा चित्रकार जसा रियाझ करतो तसे लेखकाने देखील रियाझ केला पाहिजे.. तेव्हा पासून तिच्या मनात ते वाक्य फिरत होते.. ती सारखा विचार करत होती कि आपण पण रोज रियाझ करायचा.. म्हणजे नेमके आपण काय काय करू शकतो.. तिनी ठरवलं रोज काहीतरी लिहिले पाहिजे.. काहीतरी वाचले पाहिजे.. रोजच्या धावपळीमध्ये थोडा वेळ स्वतःला दिला पाहिजे.. 
तिनी खास लवकर चा गजर लावला होता.. सकाळी जरा walk ला जाऊ उठून.. मग थोडा सूर्योदय वगैरे बघता बघता काहीतरी सुचेल कदाचित.. पण कसलं काय.. उठली आणि लक्षात आलं की आज कुसूम ची सुट्टी आहे.. (कुसूम म्हणजे तिची कामवाली.. मुलाला बरं नाही कळल्यावर हिनीच तर सांगितलं होतं तिला कि येऊ नको दोन दिवस कामावर.. आणि वर पैसे पण दिले होते दवाखान्यात जायला.. ) मग कसलं walk आणि काय.. ती उठली तेच kitchen मध्ये गेली.. गॅस वर एका बाजूला पोहे, मध्ये साबुदाणा खिचडी(हो घरात काही जणांचे नवरात्रीचे उपास होते ना..) आणि तिसऱ्या शेगडी वर भाजी शिजायला ठेवली आणि तिनी भांडी घासायला घेतली.. सगळ्यांचे नाश्ते, डबे तयार केले.. मुलांना तयार करून शाळेत सोडले आणि ती बसली ५ मिनिट निवांत.. नाश्ता आणि चहा घ्यायला.. पटकन पेपरमधल्या headline वर नजर टाकली.. आज नवरात्रीची तिसरी माळ.. देवाची थोडक्यात पूजा करून मग ऑफिस साठी आवरायला गेली ती.. 
मध्यम उंची, सावळा वर्ण, गडबडीमुळे जाड व्हायला वेळच मिळाला नाही म्हणून राहिलेला सडपातळ बांधा, केसांचा step cut, लाल plain सिल्क ची साडी आणि त्याला golden मोठे काठ आणि गोल्डन पदर.. नाजुकशी लाल टिकली.. कानात गळ्यात माणकांचा सेट आणि त्याखाली आलेले नाजूक मंगळसूत्र.. हातात मोती, माणिक असलेले नाजूक गोठ.. आणि हलकासा make-up.. म्हणलं तर traditional आणि म्हणलं तर professional.. क्षणभर ती थबकून स्वतःकडे बघत राहिली.. केसातल्या क्लिप मध्ये लावलेला गजरा आपल्या ऑफिस च्या काचेच्या बिल्डिंग मध्ये "जरा जास्तच होतंय का" हा विचार करत तिनी परत काढून पाण्यात घालून ठेवला आणि गळ्यात ऑफिस चे I-card लटकावून, खांद्याला लॅपटॉप बॅग टांगून निघाली ती.. एकीकडे विचार चालूच होते.. आज काहीही झालं तरी काहीतरी वाचायचं आणि काहीतरी लिहायचं.. रियाझ चुकला नाही पाहिजे.. मग पटकन एक कवितांचे पुस्तक टाकलेच तिनी बॅग मध्ये निघता निघता.. ट्रेन मध्ये पळत जाऊन window seat पकडू.. निवांत थोडे वाचले काही म्हणजे सुचेल काहीतरी लिहायला..
ट्रेन पळत पकडली खरी पण आज नेमके बसायचे सुख नव्हते.. एका हातात बॅग सावरत दुसऱ्या हातात छत्री(कोणी सांगावा पावसाचा भरवसा, ठेवावी निदान दसऱ्या पर्यंत सोबत म्हणून निघता निघता हातात घेतलेली) त्यामुळे वाचायचे राहून गेले.. शेवटी ट्रेन मधल्या बायकांबरोबर साडया, नवरात्र आणि recipe अशा विषयांवर गप्पा मारण्यात गुंग झाली ती.. 
ऑफिस मध्ये तर कसलाच विचार करायला वेळ नाही मिळाला तिला.. त्याच दिवशी प्रोजेक्ट deploy असल्यामुळे तिथे वेगळीच धूम.. बॉस च्या अंगात तर बाजीप्रभू संचारला होता.. गडावर तोफेचे बार ऐकू येईपर्यंत सगळे झुंज देत होते.. शेवटी एकदाचा code deploy झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.. मग success celebration म्हणून आणलेला pizza खाणे, फोटो काढणे सगळे सोपस्कार करून निघेपर्यंत अंधार पडला होता..
परत एकदा धावत पळत ट्रेन पकडली.. सगळ्या बायकांच्या मध्ये चेंगरून उभे असताना कमरेतून तळपायापर्यंत एक सणक गेली एकदम.. एकदम ताकद गेल्यासारखे झाले.. पायात गोळे आले.. तिनी तारीख आठवली परत एकदा आणि स्तब्ध झाली ती जागेवरच.. आता फक्त फार उशीर व्हायच्या आत घरापर्यंत पोहोचाव म्हणजे झाले..घरी पोचली तर तिचा चेहरा बघूनच नवऱ्यानी सरबत आणून दिले हातात.. त्यातच केवढी उभारी मिळाली तिला.. सगळे घर जेवण करून झोपाळले आणि मग तिनी डोळे मिटले..
हे रियाझ वगैरे काही आपल्याला झेपण्यातले काम नाही.. इथे श्वास घ्यायला उसंत मिळेना.. आणि त्यात कसले काय रोज लिहायला वेळ मिळणारे.. आणि सुचले तर पाहिजे काही.. आंबलेले अंग करंजी च्या आकारात गुंडाळून डोळे मिटून पडली ती.. आणि तिच्या डोळ्यासमोर लक्खकन दिसली.. लाल साडी नेसलेली, लाल भडक कुंकवाचा मळवट भरलेली चंद्रघंटा.. चेहरा थोडा ओळखीचा वाटला तिला.. सकाळी आरशात निरखून पाहिलेला चेहरा थोडासा असाच होता असं उगीचच वाटून गेलं तिला.. आणि काहीश्या उत्साहात तिनी आपले डायरी आणि पेन काढले.. एकटाकी लेख लिहून पूर्ण केला तिने.. तिच्या नकळत तिचा रियाझ चालूच तर होता दिवसभर.. सकाळी पाण्यात काढून ठेवलेला गजरा अजूनही तिच्याकडे बघून हसत होता.. 

Thursday, September 19, 2019

उध्दवा.. शांतवन कर जा.. !!

मध्वमुनीश्वरांची ही कविता वाचताना घडलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो.. श्रीकुर्ष्णाच्या वियोगाने धैर्य खचलेले गोकुळ वासी, गोकुळात जीव गुंतलेला असताना अपरिहार्य कारणाने तेथून निघालेला कृष्ण आणि गोकुळवासी जनांची समजूत घालायला निघालेला उद्धव..
खरेतर हे आपल्या आसपास कायम घडत असणारे प्रसंग आहेत.. आपल्या रोजच्या जगण्यात खूप वेळा आपल्या प्रिय व्यक्तींचा विरह सहन करायची वेळ येते.. आणि तो सहन करण्याची ताकद आपल्या मध्ये येते ती आपल्याला वेळोवेळी भेटणाऱ्या उद्धवांमुळे.. पण होते असे कि आपण तो विरह सहन करून खूप पुढे जातो पण या उद्धवाची आठवण काढणे कधीतरी राहून जाते..
तो आणि ती.. एक अतिशय खंबीर आणि कणखर जोडपे.. त्याचे पोस्टिंग काश्मीर बॉर्डर वरती झाले.. सीमा भागामध्ये घर परिवार नेणे सुरक्षित राहणार नाही म्हणून ती काही दिवस मुलाला घेऊन आपल्या माहेरी येऊन राहिली.. एक नाजूक मनस्थिती.. सतत वाटणारी नवर्याबद्दल काळजी, त्यातून आलेले हळवेपण, जीवाची होणारी तगमग आणि त्यातून झालेली चिडचिड सुद्धा.. पण तिच्या घरच्यांनी तिला खूप समजून घेतले.. तिच्यामधल्या कलागुणांना वाव दिला.. तिचे मन कसे चांगल्या गोष्टींमध्ये रमेल हे पहिले.. तिच्या भावाने तर घरी सगळ्यांना सांगितले होते कि आपल्यासाठी तिच्या मनाला उभारी देणे हीच देशसेवा.. पुढे दोन वर्षांनी त्यांची पोस्टिंग परत दुसऱ्या शहरात झाली जिथे पूर्ण फॅमिली घेऊन राहणे शक्य होते.. कधी बोलून दाखवले जाते तर कधी मनातच राहते.. पण त्या दिवसांची आठवण सगळ्यांनाच येते हे नक्की.. ते एक देशसेवेला वाहून घेतलेले जोडपे बाकी नावात काय आहे..
तो आणि ती.. सख्खे बहीण भाऊ.. भाऊ multinational company मध्ये.. carrier साठी भावाचे परदेशात जायचे ठरले.. आणि आई वडिलांसाठी खंबीर उभी राहिली ती.. मुलाच्या प्रगतीचे कौतुक आई वडिलांना होतेच पण मुलगा, सून, नातवंडे सगळ्यांचा विरह सहन करणे सोपेही नव्हते.. त्यात वयामुळे तब्बेतीच्या कुरबुरी चालूच असायच्या.. पण ती शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहायला होती.. त्यामुळे तिचा आधार होताच.. सासरच्या माणसांना जीव लावताना तिचे एक काळीज शेजारी आई वडिलांच्या भोवती पण घुटमळत असायचे.. भावाच्या मनात तिचे स्थान तितकेच भक्कम जितके आई वडिलांच्या मनात.. पण आपल्याच माणसाला बोलून काय दाखवायचे म्हणून कोणी व्यक्त केले नाही एवढाच काय तो फरक..
तो आणि ती.. आई आणि मुलगा.. मुलाच्या नकळत्या वयात अचानक वडील देवाघरी गेले त्याचे.. नेमके कोणी कोणाचे सांत्वन करायचे  हा प्रश्न सतत भेडसावायचा त्यांना.. हा विरह तर आयुष्यभराचा.. खचले तर दोघं होते आणि धीर तर दोघांना द्यायचा होता.. आई आणि वडिलांचा प्रेम विवाह.. त्यामुळे सगळे नातेवाईक दुरावलेले.. शेवटी ते दोघंच उभे राहिले एकमेकांच्या पाठीशी.. आणि घर बाहेर काढले त्यांनी दोघांनी मिळून.. दोघे उद्धव एकमेकांचे जन्मभरासाठी..
आयुष्यात एखाद्या टप्प्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीचा विरह सहन करावा लागतो.. कधी तो क्षणिक असतो.. कधी तो काही वर्षांसाठी असतो.. तर कधी आयुष्यभरासाठी.. या प्रत्येक प्रसंगात आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी असे उद्धव भेटत असतात.. त्यांच्या परीने सांत्वन करत असतात.. यथावकाश आपण त्या परिस्थिती मधून बाहेरही येतो.. पण कृतज्ञता कधी व्यक्त केली जाते तर कधी करायची राहून जाते.. पण मनात प्रत्येकाच्या राहते हे तेवढेच खरे..

Wednesday, August 7, 2019

Friendship day, सरस्वती आणि मी

मनात खोलवर असलेलं कागदावर उतरतं ते खरं लिखाण.. ते पोचतं समोरच्याच्या मनात.. रोज भेटणारी माणसं, भोवतालच्या घटना, वाचलेली पुस्तके एवढंच काय वेगळा आशय असणारे movies, ठेहराव असणारी गाणी हे सगळंच कुठेतरी समृद्ध करत जातात आपलं जगणं आणि आपलं लिखाणही.. 

मला शाळेच्या पेपर मध्ये निबंध लेखनात कधीच चांगले मार्क मिळाले नाहीत.. upsc चा अभ्यास करताना निबंध लेखन करताना तर खात्रीच पटली की आपला आणि लिखाणाचा दूरवर पण काही संबंध नाही.. पण दिलेल्या विषयावर लिहिण्यापेक्षा मनातून स्फुरणाऱ्या विषयावर लिहिलेलंच बहुतेक पोचत असावं कुठेतरी.. एकदा विचारांना स्थिरता आली कि शब्द कागदावर उतरायला वेळ नाही लागत.. अनुकूल परिस्थिती नाही लागत.. ट्रेन मध्ये चेंगरून उभे असतानाही लेख पूर्ण होऊ शकतो.. 

कॉलेज मध्ये कविता करणारे नवकवी rat-race मध्ये हरवून जातात.. पण हीच वेळ असते जेव्हा आपल्याला बाहेरचं जग कळतं.. आपले अनुभव समृद्ध होत जातात.. आणि याच सोबत आपल्यातला लेखक पण matured होतो हळूहळू.. आणि नेमकं याच वेळी आपण आपल्या या मित्राला विसरतो.. हा एक मित्र असा आहे जो भल्याबुऱ्या प्रसंगात आपल्या नेहमी सोबत असतो.. आपण साथ सोडली तरी तो उभा असतो काठावर ओथंबून आपली वाट बघत.. 

सरस्वती आणि शारदा यांची मानसपूजा करून (आता या दोघींमध्ये नेमका फरक काय आणि साम्य काय हे  परत कधीतरी..) मी आज friendship day च्या निमित्ताने या माझ्या जुन्या मित्राला परत साद घालत आहे.. माझ्यातल्या लेखकाला मला परत एकदा भेटायचे आहे.. बाकी विषय पुरवायला मुंबई समर्थ आहेच.. त्यामुळे आजपासून आता रोज.. माझा हा मित्र मला भेटेल अशी स्वतःकडूनच अपेक्षा.. पूर्वी डायरी - पेन होते त्याची जागा आता ब्लॉग्स नी घेतली आहे एवढाच काय तो फरक.. तुमच्या अभिप्रायांनी ही मैत्री अधिक दृढ होवो हीच इच्छा.. 

भेटत राहू मंथन या facebook page वरून किंवा माझ्या blogger च्या official website वरून!!!



Pls, कविता कोणावर केली आहे विचारू नको
कदाचित ती जवळपासच कोणावरतरी असेल,
कदाचित ती तुज्यामुळेही सुचली असेल॥
एकदा कडेला नजर फिरवून तर बघ,
एकदा वळुन आरशात स्वतःचा चेहरा तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू असा कसा विचार करू शकते विचारू नको
कदाचित जे घडतं रोज तेच लिहिलं असेल,
कदाचित तुज्याही आयुष्यात तेच घडत असेल॥
एकदा लोकांची दुक्ख ऐकून तर बघ,
एकदा स्वतःच्याच आयुष्यात त्रयस्थपणे डोकावून तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू नुसतीच स्वप्नात जगतेस का विचारू नको
कदाचित भविष्याची हीच सुरवात असेल ,
त्याच स्वप्नांना पूर्ण करणारा उद्याचा दिवस असेल॥
एकदा तुही स्वप्नात जगुन तर बघ,
एकदा त्यांना खर करण्याचा प्रयत्न तर करून बघ
कळलं तुला तर चांगलच आहे ....


Pls, तुला असं कसा सुचतं विचारू नको
कदाचित तेव्हा फुलांचा गंध दरवळत असेल,
कदाचित तेव्हा कोणी रागदारी गात असेल,
कदाचित तेव्हा कोणाचीतरी आठवण येत असेल॥
एकदा समुद्र किनारी जाऊन तर बघ,
एकदा चंद्र उगवताना रंगलेले आभाळ तर बघ,
अणि कोणालातरी त्यावेळी मनापासून 'miss' तर करून बघ॥
एखादा श्वास फक्त त्या 'miss' साठी घेउन तर बघ
एकदा तेव्हा तूही काहीतरी लिहून तर बघ॥


-- अवनी गोखले-टेकाळे 

Tuesday, July 16, 2019

Compost Kitchen

तसं गांडूळ खत लहानपणापासून घरी पाहिलेलं केलेलं असल्यामुळे कचऱ्यात कसा हात घालायचा असे प्रश्न आधीच सुटलेले होते.. आणि सासरी सुद्धा घराभोवती मोकळी जमीन, भरपूर झाडं आणि चहा झाला कि टाका चोथा कढीलिंबाच्या झाडाला असं वातावरण.. त्यामुळे compost ची basket घरी आणायला तसा काही विरोध व्हायचं कारण नव्हतं.. फक्त प्रश्न एवढेच होते.. असल्या गोष्टी ऐसपैस मोकळ्या जागेत करणं वेगळं पण मुंबई सारख्या ठिकाणी जिथे माणसांनाच राहायची जागा कमी पडते तिथे अजून कचऱ्याला राहायला जागा कशी करायची? घरात वासबीस आला तर? रोजच्या रोज उस्तवार होईल का? शेवटी ठरवलं करून तर बघू.. फारतर काय प्रयोग फसला तर फेकून द्यायला लागेल.. big deal .. 
छोटीशी चौकोनी बास्केट .. खेळती हवा रहायला चारही बाजूंनी आणि वरती असे नेट लावलेले(मच्छरदाणी ची असते तशी जाळी), एक छोटी bag compost खत, एका bag मध्ये coco peat (आपल्या भाषेत नारळाच्या शेंडीचं भुसकट) आणि हलवायला एक लोखंडी दांडकं.. बास्केट मध्ये खत पसरायचं आणि रोजचा स्वयंपाक घरातला ओला कचरा घालायला सुरवात करायची.. एकच नियम म्हणजे कचरा बारीक तुकडे करून घालायचा आणि प्रत्येक वेळेला कचरा घातल्यावर हलवायला विसरायचं नाही.. इतकं सोपं होतं ते..  
आता या basket मध्ये काय काय घालू शकतो - जेवण झाल्यावरचं पानातील खरकटं, शिळं अन्न उरलं असेल तर, भाज्यांची देठं, साली, टरफलं, चहाचा चोथा नं धुता.. थोडक्यात पेपर, प्लास्टिक आणि non veg waste सोडून बहुतेक सगळंच..
basket अर्धी भरेपर्यंत सारखी हलवायची तळापासून आणि त्यानंतर फक्त वरवर हलवायचं.. म्हणजे पूर्ण भरेपर्यंत खालचं अर्ध खत तयार असतं.. ते काढून घ्यायचं आणि परत वरती कचरा घालत राहायचं म्हणजे practically basket कधीच complete भरत नाही.. पण मी पाऊण basket भरल्यावर थोडासा ब्रेक दिला होता सरळ.. आणि मग तयार खत झाडात घालून फक्त तळात छोटासा layer ठेऊन परत पहिल्यापासून सुरु केलं होतं..
पहिल्यांदा trip ला जाताना थोडं tension आलं होतं कि आता याचं काय करायचं.. मग तसंच रामभरोसे सोडून गेलो.. आल्यावर बघितलं तर जायच्या दिवशी जसं होतं तसंच होतं.. म्हणजे वास पण येत नव्हता पण decomposition पण झाले नव्हते.. फक्त hang झाली होती system.. एक ढवळी मारून पुढचा कचरा घातल्यावर परत सुरु झाली.. त्यामुळे काही त्रासदायक वाटलं नाही.. 
सुरवातीला हौसेने सुरु केलेला आणि सोपा वाटलेला हा उद्योग तसा तितकाही सोपा नाही असं हळूहळू वाटायला लागलं.. एकतर रोजच्या रोज waste सुद्धा चिरत बसा.. आठवड्याच्या भाजीत २-३ पालेभाज्या आल्या तर खूपच साठतो कचरा.. कधी जास्त पाहुणे असल्यावर, फारच कंटाळा आला तर एखाद वेळा जातोही कचरा डस्टबिन मध्ये.. पण ठिके, जमेल ते दिवस आपले म्हणून सोडून द्यायचं.. असं करत करत दीड वर्ष झालंय आता उत्साह टिकवून ठेवलाय त्याला.. सगळे seasons अनुभवले आता त्या bacteria's नी.. 
तसा सहसा याला घाण वास येत नाही.. बास्केट open केल्या केल्या earthy smell (मातकट वास) आला आणि थोडं गरम जाणवलं कि समजायचं we are on right track .. घरी पूजा करत असतील तर त्याचं निर्माल्य आवर्जून घालावं म्हणजे त्या फुलांमुळे aroma छान येतो.. फक्त याचं एक तंत्र थोडं काळजीपूर्वक सांभाळायला लागतं.. खूप गिच्च ओलं झालं तर वास येऊ शकतो आणि कोरडं झालं तर decomposition होत नाही.. हा balance सांभाळायला coco peat .. खूप ओलं झालं आणि वास येतोय वाटलं तर लगेच घाबरून फेकून द्यायचं नाही.. सकाळ संध्याकाळ coco peat किंवा लाकडाचा भुस्सा घालून हलवायचं.. २ दिवसात back to normal येते.. आणि कोरडं होतंय वाटलं तर पाणी घालायचं.. 
लोकं खरंच खूप काही करतात eco friendly lifestyle maintain करण्यासाठी.. आपण त्यामानानी काहीच करू शकत नाही.. निसर्गाच्या जवळ जायचा आपल्याकडून एवढाच छोटा प्रयत्न..




Wednesday, July 3, 2019

Crafty Dhanee

Crafty dhanee ची सुरवात नेमकी का झाली हे आम्हालाही न उलगडलेलं कोड आहे.. घरी लावायला तोरण करायचं म्हणून पुण्यातल्या रामसूख market मधून मोत्याचे, मण्याचे खूप प्रकार आणले आणि तिथून सुरु झाले आमचे हे  वेड.. उगाच उत्साहानी आणलेल हे सामान खरंतर खूप दिवस कपाटाची धूळ खात पडला होतं.. मग धनश्री नि आणि मी काही pattern करून बघितले.. दरवाज्याचे लटकन, तोरण वगैरे.. त्याच दिवशी भिशी असल्यानी आम्ही गम्मत म्हणून सगळ्यांना ते नमुने दाखवायला नेले.. आणि नेलेले सगळे items तिथेच "खपले".

आपल्या creativity ला मिळालेली पहिली दाद बघून आमचा उत्साह अजून वाढला.. आणि मग आमचा मोर्चा आम्ही Crawford market कडे वळवला.. शनिवारी मोठ्या वाणसामानाच्या पिशव्या घेऊन आम्ही निघालो cst  ला ..  रंगीबेरंगी भुलेश्वर मार्केट हा एक प्रचंड वेड लावणारा प्रकार आहे.. भरलेल्या पिशव्या, रिकामे झालेले खिसे, थकलेले पाय आणि भुकेलेले पोट असे आम्ही थेट संध्याकाळी तिथून बाहेर पडलो.. भगत ताराचंद हे एक तिथे लाभलेलं वरदान आहे.. त्याच्याकडे जेवणात मिळणारी ताकाची बाटली हे energy booster आहे खूप मोठे.. तिथे थकवा घालवल्यावर भरलेल्या पिशव्या घेऊन ट्रेन मधली कसरत करत मानसरोवर ला आलो तर समोर splendor आमच्या वेडेपणावर हसत होती.. कारण हे सगळं bike वर कसं नेणार हा विचार तोपर्यंत केलाच नव्हता.. या सगळ्याला फक्त हौस किंवा अंगात फार खाज आहे असं म्हणू शकतो.. पण मग हळुहळू या प्रवासाची आम्हाला सवय झाली..

आता या आणलेल्या सामनाच करायचं काय आणि main म्हणजे कधी? दिवसभर दोघींना आपापल्या नोकरी/व्यवसायामुळे वेळ नाही आणि सकाळी उठून extra वेळ काढणं बापजन्मात जमलं नाही कधी.. त्यामुळे मग engineering चा formula use केला.. night मारणे.. आम्हाला motivate करत, मदत करत, गप्पा मारत बसायला आमचे नवरे आमच्या आधी तयार.. मग या मदतीत सुईत दोरा ओवण्यापासून, माळा करण्यापासून ते भेळ करेपर्यंत ची सगळी मदत आली.. देवघराची तोरणं, लटकन, दरवाज्याची तोरण, लटकन, मोत्याचे showpiece, तसबिरीचे हार असे अनेक प्रकार या flow मध्ये केले.. गणपतीच्या दिवसात हार करायला तर सगळेच घरातले सुया घेऊन बसलो होतो..

दोन engineer मुली नोकरी/व्यवसाय करून नंतर night out मारून नसते उद्योग का करत असतील हे प्रश्न पडलेही असतील सगळ्यांना. पण आम्ही नाही विचार केला.. ती धावपळ पण आम्ही खूप enjoy केली..   आपली हौस, छंद जेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीत हातभार लावतात .. आपल्या daily routine ला tangent मारून एक वेगळी दिशा देतात.. ते समाधान काही वेगळं असत.. सध्या दोघींना एकत्र वेळ होईपर्यंत आणि नवीन काहीतरी डोक्यात येईपर्यंत time please घेतला आहे.. पण भुलेश्वरच्या तिसऱ्या गल्लीत आम्ही कधीही डल्ला मारताना दिसलो तर time please सुटली अस समजायला हरकत नाही..

ता. क. - आता ही वर उल्लेख केलेली धनश्री माझी जाऊ आहे का बहीण  का partner in crime का मैत्रीण यावरती पुढच्या वेळी.. 

Friday, June 28, 2019

खेळ मांडला ..

समोर TV चालू होता.. छोटे सूरवीर गात होते.. त्यांची मेहनत त्यांच्या गळ्यातून आपल्या मनात उतरत होती.. आणि एक तार सप्तकातला आवाज काळीज चिरून गेला.. "खेळ मांडला.. " तो आवाज आणि ते गाणं.. मन एकदम आठ वर्ष मागे हरवून गेलं..
Office ची social activity होती.. एका blind school मध्ये शिकवायला जायचे होते.. तेव्हा प्रोजेक्ट second shift चा असल्यामुळे सकाळी एखाद तास काढणे सहज शक्य होते.. म्हणून मी आणि एका मैत्रिणीनी enroll केले.. थोडा उत्साह आणि थोडी साशंकता अशा संभ्रमात आम्ही पत्ता शोधत शाळेत जाऊन पोचलो.. नुकतच शाळेचं नवीन वर्ष सुरु झालेलं.. हवेत भरलेला पाऊस आणि ground वर football खेळणारी धमाल मुलं.. ही आमची शाळेशी झालेली पहिली ओळख.. सगळी मुलं सैराट फिरत होती आणि आम्ही भांबावून principle ची cabin शोधत होतो.. principle या नावाभोवतीच असं काही वलय आहे कि आत जाताना धडधड होतेच मग काम काही का असेना.. पण आत एक प्रसन्न व्यक्तिमत्व आमची वाट बघत बघत होत.. त्यांनी आम्हाला साधारण शाळेचं routine सांगितलं आणि आमची काय मदत त्यांना अपेक्षित आहे ते पण सांगितलं.. आठवड्यामध्ये ३ दिवस एक एक तास.. त्या वेळात त्यांना पुस्तक वाचून दाखवायची.. जमेल तेवढा संवाद साधत त्यांना बोलत करत विषय समजून सांगायचा.. माझ्या कडे नववी चा वर्ग आला होता.. सरांनी क्लास monitor ला बोलावून आमची ओळख करून दिली आणि मग मी त्याच्या मागोमाग निघाले..
तो मुलगा जो धूम पळाला तो direct second floor वरच्या वर्गात जाऊनच त्याने श्वास घेतला.. पावसानी निसरड्या झालेल्या corridor मधून आम्ही सावकाश चालत असताना तो मात्र वर्गात जाऊन त्याच्या bench वर बसला सुद्धा होता.. वर्गात जाता जाता सहज नजर फिरत होती सगळी कडे.. मला एकदम माझ्या शाळेची आठवण झाली.. असेच मध्यभागी पटांगण आणि चारी बाजूनी इमारत.. वर्गात धिंगाणा घालत आपल्याच विश्वात हरवलेली मुलं.. त्यांना मार्ग दाखवणारे शिक्षक.. पटांगणात चालू असलेले मैदानी खेळ..
पहिला दिवस तर ओळख परेडच चालू होती.. आणि हळू हळू कधी हे चेहरे ओळखीचे होऊन गेले कळलंच नाही.. त्यांना पण आता माझी सवय झाली होती.. मी काही न बोलता वर्गात जाऊन उभी राहिले तरी त्यांना ते आता समजायला लागल होत.. प्रचंड बोलकी असणारी हि मुलं.. बहुतेक सगळे तिथेच हॉस्टेल ला राहायचे त्यामुळे कायम एकत्र असायचे.. त्यांना सगळंच सांगायचं असायचं.. त्यांनी संध्याकाळी काय काय केलं.. कुठली पुस्तकं वाचली/ऐकली, कुठले खेळ खेळले, कशी मस्ती केली आणि त्यांच्या छंदांबद्दल सगळंच.. हे सगळं सांगून झाल कि मग आमचा अभ्यास सुरु व्हायचा.. पुस्तक वाचून दाखवत, त्याच्या अनुशंघाने गप्पा मारत विषय उलगडून दाखवायचा छोटा प्रयत्न.. सुरवातीला खूप जड गेल मला आपले विचार त्यांच्या पर्यंत पोचवणं.. पण मुळात त्यांना शिकायची आवड आणि शिकवायला येणार्यांची असणारी किंमत यामुळे हळू हळू ते tuning  जमत गेला.. आपण काय पुस्तक वाचून दाखवणारे यांना.. असच व्हायचं कधी कधी .. कारण tape recorder वर ऐकून ऐकून धडेच्या धडे पाठ होते त्यांचे.. languages , social sciences सोपे जायचे त्यांना.. science maths साठीच थोडी मदत हवी असायची.. त्यांना आलेल्या शंका सोडवणे हेच main काम होता..
त्यांची एक वेगळीच दुनिया होती.. हुशार, खोडकर आणि परिस्थितीची जाणीव असणारी अशी हि मुलं.. आपला कुठला छंद आपल्याला पुढे जाऊन दिशा देऊ शकेल का हे बघण्याकडे त्यांचा कल जास्त होता.. गायन, musical instrument वाजवण्याची आवड, गणपती मध्ये ढोल वाजवायला जाणे, चित्रकला. indoor / outdoor games प्रत्येकाचा छंद वेगळा.. आपल्याला जगण्याचे धडे देणारे हे छोटे शूरवीर..
आज या मुलांची नावं लक्षात नाहीत.. कोण काय करत असेल माहित नाही.. सतत touch मध्ये राहू म्हणत निघाले होते शेवटच्या दिवशी पण नाही जमलं नंतर परत जायला.. याचा guilt वाटतो हि कधी तरी.. पण त्यापेक्षा समाधान हे वाटत कि या दिवसात आपण त्यांना आणि त्यांनी आपल्याला काय दिलं.. शेवटच्या दिवशी सगळ्यांना पुढे येऊन बोलायला सांगितलं होत.. विषय तुमच्या आवडीचा.. तुम्हाला भावलेलं, अनुभवलेलं काहीही.. प्रत्येकाचं बोलणं स्पर्शून जाणारं आणि वर्णन तर इतकं चपखल कि डोळे मिटून उभा राहिल तरी आपल्या डोळ्या समोर चित्र उभं राहिल.. सगळ्यात शेवटी जो मुलगा उभा राहिला तो खूप छान गाणं म्हणायचा त्यामुळे बोलून झाल्यावर फर्माईश तर होणारच होती.. त्याची खूप गाणी आम्ही ऐकली होती .. स्पष्ट, गहिरा आणि ठेहराव असणारा आवाज.. तो क्षण थांबवून ठेवला त्यानी तसाच आणि तार सप्तकातला त्याचा आवाज काळीज चिरून गेला..

दावी देवा पैलपार पाठीशी तू रहा उभा..
ह्यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला ..!!!

Saturday, March 26, 2011

जीवन गाणे गातच राहावे...

College मध्ये एक junior सतत chocolates खायची.. विचारला तर म्हणे boyfriend नि ditch दिला आणि scientifically depression मधून बाहेर यायला chocolates ची मदत होते.. (boyfriend +ditch =chocolates and depression evaporates .. हे समीकरण सुटला तर pls explain ..) corporate ची छान हवा लागलेला बबन्या.. brand company मध्ये ६-७ वर्ष experience आणि कमावती corporate मधलीच बायको सोडून घरात दुसरा कोणी नाही.. सो वेगळा explanation द्यायला नको.. पण पगार पुरत नाही म्हणून depressed होते बिचारे.. असे अनेक depression के मारे भेटतात.. त्यांची कारण वयानुसार आणि ऐपती नुसार थोड्या फार फरकानी वेगळी असतात पण issue बनवून कुरवाळण्याची style तीच.. ( खरच एखाद serious reason असेल आणि depression आला असेल तर मान्य आहे अशा लोकांची चेष्टा करायचा नक्कीच हेतू नाहीये!!!)
भर दुपारी office च्या वाटेवर घडलेला एक प्रसंग बघितला.. छोटाच होता पण या पार्श्वभूमीवर appreciate झाला..
हातावरच पोट असणारा एक माणूस.. त्याच्या हातगाडी वर खच्चून कप बश्या रचलेल्या.. तो त्या विकत चालला होता.. समोरचा खड्डा त्याला दिसला नाही आणि हातगाडी उलटली.. सगळ्या कप बश्या चक्काचूर होऊन रस्त्यावर पडल्या..
एक क्षण तो शांत उभा राहिला ते सगळं पहात.. तो सगळा कचरा (आता त्याचा कचरा झाला होता!!) त्यांनी गोळा केला.. जवळच्या कचर्याच्या पेटी मध्ये फेकून दिला.. आणि एक छान smile देऊन तो रिकामी हातगाडी घेऊन पुढे चालायला लागला.. ती smile सगळं काही सांगून गेली..
दिवसभर कमावलं तरच रात्री खायचं अशा घरातल्या त्या माणसाला ही गोष्ट निश्चितच नुकसानकारक होती.. त्याचा माल तर विकला गेलाच नाही.. पैसा तर मिळालाच नाही आणि त्यात त्याला परत जाऊन मालाची खरेदी करायला लागणार होती.. फारसे saving नसल्यामुळे त्याला हा धक्का जाणवणार नक्की.. तो पर्यंत खाणार काय हा प्रश्न तर मनात असेलच.. पण त्याची गरिबी आणि त्याची परिस्थितीच त्याला हिम्मत देत होती कदाचित.. depression हा शब्द उच्चारायला लागतो तेवढा पण वेळ नव्हता त्याच्याकडे..काचेच्या नाजूक वस्तू विकण्याचा निर्णय घेतानाच त्यांनी या गोष्टी गृहीत धरल्या होत्या.. गेल्या past ला त्यांनी एका सेकंदात छान शी smile देऊन अलविदा केलं आणि क्षणात dynamically पुढचं planning करून तो लगेच पुढच्या कामाला लागला..
त्या smile मध्ये सलणारा काटा तर होताच पण परत उभा राहायचा निर्धार नक्कीच होता..

Sunday, February 20, 2011

कांदे पोहे...

रामराया जन्माला ती वेळ.. (प्रत्येक वेळेला रामाला का मधे आणायच ते कळलेल नाही अजून.. पण प्रसिद्ध लेखक अशी सुरवात करतात.. म्हणून मग आपण पण..).. m .tech ची परीक्षा चालू होती.. मैत्रिणीकडे अभ्यासाला जायचं म्हणून घाईनी पुस्तकं गोळा करत होते सगळी.. तेवढ्यात एक तात्या आणि त्यांच्या "अग" घरी आले... मी पहिल्यांदाच पाहत होते त्या दोघांना.. त्यामुळे मी आपली मनात whose who चा reference लावत आणि एकीकडे data mining चा(दुसर्या दिवशी चा पेपर) विचार करत "आत या" म्हणाले.. येऊन general २-४ वाक्य होतायत तेवढ्यात!!.. उंची छान आहे ग.. लग्नाच बघत आहेस का? (घरी मी एकटीच होते त्यामुळे त्यांनी direct मलाच विचारला.. मला हा प्रश्न पहिल्यांदाच face करायला लागत होता.. आणि पहिल्यांदा भेटल्यावर काय करतेस? वगैरे असल्या क्षुल्लक गोष्टी आम्ही विचारतच नसतो बहुतेक.. direct लग्न करणार का? बापरे! हे भलतच data mining सुरु झाला.. कोण आहेत हे दोघं तेच कळेना आधी.. त्यात माझ्या लग्नाची उठाठेव यांना कोणी करायला सांगितली?)

हो नाही उत्तराची वाट न बघता पुढचा bomb आलाच.. माझे दोन्ही पुतणे लग्नाचे आहेत.. आठवत आहेत ना तुला? (अहो तात्या पहिल्यांदा भेटतोय आपण.. आधी मला तुम्ही कोण हेच आठवलेला नाहीये अजून.. तेच आठवत आहे सध्या तरी.. ते आठवला की मग पोचू पुतण्यांच्या पर्यंत..) मी आपली तात्या पाणी आणते वगैरे बोलून विषय बदलायला बघत होते.. पण तात्या आहेत तिथेच.. अग असं काय करतेस मनू च्या लग्नात(लग्न सोडून बोला हो!!) नाही का... (आता ही नवीन मनू नावाची मुलगी कोण? पण नशीब, आठवला लगेच.. yes!! कोकणातल्या विलु काकाच्या बायकोच्या भावाची मुलगी.. मनू चा लग्न म्हणजे मी शाळेत असेन..( त्या बालवयात समोर आलेली व्यक्ती मुलगा आहे कि मुलगी हे कळण्या इतपतच बौद्धिक विकास झाला असेल फारतर.. त्याहून फार काही जास्त अक्कल आली नव्हती तेव्हा.. आता मी काय तेव्हा त्या पुतण्यांकडे "निरखून ठेऊ नीट, स्वभाव बघून ठेऊ, पुढे कधीतरी स्थळ म्हणून येतील समोर" अशा समजुतीनी बघितला असावा अशी अपेक्षा होती का या तात्यांची? मला कोणीतरी दोन तेलकट शेंबडे चेहरे अंधुकसे आठवून गेले.. (ई अरे!! त्या मुलांना माझी अशी ओळख सांगितली तर त्यांना पण तेव्हाची तेलकट "मी" आठवेन दोन वेण्या आणि झोपळे आणि ground वर धुडगूस घालून रापलेला चेहरा.. किती बोर..).. एवढा करून ते अंधुक चेहरे म्हणजेच नक्की ती मुला का हे पण समजेना.. )

हो तर भेटून घे दोघांना.. तात्या काही मुद्दा सोडेनात.. तुला दोघांपेकी एक तरी आवडेलच..(पहिल्या ओळखीत माझ्या बद्दल काय पण confidence आला होता त्यांना!! आवडेलच!! माझा स्वभाव काय? माझी आवड काय काही संबंधच नाही याचा ..आवडेलच म्हणे!! त्याच कारण आणि त्यांचा स्पष्टीकरण पुढच्या वाक्यात कळलं..) "दोघं अमेरिकेत चांगल्या पगारावर काम करतात.. तुम्हाला मुलींना अजून काय settlement पाहिजे?" (अजून पण तात्यांना मी काय करते, मला काय वाटत ते माहितच नाही आणि गरजही वाटली नाही विचारायची..) आणि दोघं उंच पण आहेत भरपूर.. (परत उंची!!.. आल्या आल्या विषय तिथूनच सुरु झाला होता.. तात्या अहो एवढाच एक criteria आहे का लग्नाचा.. काय त्रास आहे? आणि मला आवडला मुलगा तर तो बुटका असेल माझ्या पेक्षा तरी चालेल!!).. दोघं येतातच आहेत या महिन्यात.. तेव्हा भेटून घेशील दोघांना.. (परत तेच.. आणि मला कळेना या तात्यांच्या प्रत्येक वाक्यात "दोघं" का बरं येत आहे? एकाबरोबर दुसर्या पुतण्याची बघाबघी .. कहर आहे हा तर.. हे कसला package म्हणायचं? )

असे अजून काही रोमांचकारक(?) dialog झाल्यावर(म्हणजे ते बोलत होते कौतुक त्यांच्या पुतण्यांचा आणि मी आपली घड्याळ बघतेय.. माझा data mining खड्यात चालला होता!!) मग त्यांनी अति उत्साहानी मला आपल्या दोन्ही पुतण्यांचे फोटो दाखवले .. उच्च पदवी विभूषित पुतण्यांच्या डोळ्यावर जरा चष्मा वगैरे एवढाच काय तो बदल.. तेलकट चेहरे जसे होते तसेच.. त्यात काही बदल नाही.. मला आठवलेले चेहरे एकदम correct .. माझ्या डोक्यात data mining जास्तच फिरायला लागला होता.. त्यामुळे हे सगळं बोलणं चालू असतानाच एकीकडे त्यांना चहा केला.. झटपट होतील म्हणून पोहे केले एकीकडे.. निघताना त्यांनी सस्नेह आमंत्रण दिला.. या हो घरी सगळे.. (पुढच्या महिन्यात "दोन्ही पुतणे" आल्यावर!! हे सांगणे न लागे )

आणि मग लक्षात आला.. कांदे पोहे ची झलक मिळायला सुरवात झाली आहे.. आता असे कोणीही तात्या कधीही भेटू शकतात.. :( :)