तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. सारे सूर कानात फेर धरून घुमत राहतात.. पंचप्राण पांचजन्य शंख फुंकत राहतात.. माझा कोमल निषाद ही तूच कान्हा आणि माझा तारसप्तकाचा शडज ही तूच कान्हा.. ग्रीष्मात तू पाहिलेस तरी मनात मेघमल्हार वाजायला लागतो कान्हा.. तेवढा तुझा ताल पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!
तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. तुझी रणनीती एकलव्यासारखी शिकावी वाटते.. सगळ्या अडचणी सोप्या वाटायला लागतात.. आपसूक मार्ग निघत जातात.. माझे प्रश्न ही तुझ्यामुळेच आणि उत्तर ही तूच कान्हा.. मी कणखर झाले तुझ्यामुळे.. लढायला शिकले तुझ्यामुळे.. विराट दर्शन झाले तुझ्यामुळे.. माझ्या आयुष्याचा अठरावा अध्याय बनून माझ्या शरीरात भिनत रहा.. तेवढी तुझी शिकवण पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!
तू फक्त अवती भोवती रहा कान्हा.. तेवढं पुरे.. तू प्रत्येक वेळा वेगळ्या व्यक्तीत वेगळ्या रूपात भेटत राहतोस.. आणि माझी रूप बदलत नेतोस.. कधी मी तुझी रास रचणारी राधा होते.. कधी तुझी मरेपर्यंत साथ देणारी रुक्मिणी होते.. कधी लेकराला मायेने लोणी साखर भरवताना यशोदा होते.. कधी अडचणीत सापडलेली द्रौपदी होते.. कधी तुझ्याच अनंतात विलीन झालेल्या जीवलगांची आठवण आळवणारी मीरा होते.. तू बदलत जातोस आणि मीही.. प्रत्येक टप्प्यावर त्या त्या रुपात भेटत रहा कान्हा.. तेवढी तुझी ओढ पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!
तुझ्या पांचजन्य शंखात.. तुझ्या मुरलीत.. तुझ्या मोरपिसात.. तुझ्या नीलवर्णात.. तुझ्या गीतेत.. तुझ्या विराट रुपात.. तुझ्या रासलीलेत.. हे मोहना .. हे कान्हा.. हे कृष्णा.. हे मधुसूदना.. हे माधवा.. माझे अस्तित्व तुलाही जाणवत असेल का.. माझा अध्याय संपवताना मी येईन.. समुद्राच्या दिशेने चालत राहीन आत आत.. तेव्हा शेषशाही रुपात तू भेटशील ना मला.. तेवढं अंतिम भेटणं पुरे.. हे कान्हा.. तू अवती भोवती राहशील ना..!!!
No comments:
Post a Comment