प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चंद्राघंटेति कूष्मांडेति चतुर्थकं ।
पंचमं स्कंदमातेति षष्ट्म कात्यायनी च ।
सप्तमम् कालरात्रेति महागौरीति च अष्टकं ।
नवमम् सिध्दीदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तीता: ।
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हण्य एव महात्मना ।।
देवी असते का खरंच? तिने खरंच महिषासुराचा वध केलेला का? माहित नाही.. पण देवीची नऊ नावे नीट वाचल्यावर प्रत्येक स्त्री च्या आयुष्याचा सोहळा नऊ भागात कथन केल्यासारखा वाटतो.. आपल्या भोवती फेर धरणाऱ्या, रोज भेटणाऱ्या, आरशात दिसणाऱ्या या नवदुर्गा.. माझ्यासाठी नवरात्रीचा उलगडलेला अर्थ तुमच्यासमोर मांडत आहे.. बाकी ओटी भरणे, नमस्कार, पूजन, हळदी कुंकू हे सगळे त्या स्त्री च्या प्रती आदर व्यक्त करण्याचे साधन आणि निमित्त फक्त.
१. शैलपुत्री - पर्वतराज हिमालयाची कन्या. एका बापाची नवजात कन्या
२. ब्रह्मचारिणी - ब्रह्मपद प्रदान करणारी. ब्रह्मचर्याचे पालन करणारी शिक्षण घेणारी कन्या.
३. चंद्रघंटा - माथ्यावर चंद्र धारण केलेली, सुगंध आणि चेतना लहरींची अनुभूती देणारी लग्नाची आस लागलेली चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी
४. कुष्मांडा - आपल्या हसण्याने ब्रह्मांड निर्माण करण्याची इच्छा असणारी स्त्री. मातृत्वाची चाहूल लागलेली स्त्री
५. स्कंदमाता - कार्तिकेय / स्कंद याची माता. मातृत्वाचा सोहळा अनुभवणारी स्त्री
६. कात्यायनी - धर्म, काम, मोक्ष सर्वांची अनुभूती देणारी प्रगल्भ स्त्री
७. कालरात्री - असत्य, पापी लोकांविरूद्ध निडरपणे आवाज उठवणारी, मर्दन करायला सज्ज झालेली चामुंडारूपातील स्त्री
८. महागौरी - संसार समर्थपणे करून मोहत्याग केलेली सफेद वस्त्र परिधान केलेली मोक्षाच्या दिशेने निघालेली स्त्री
९. सिध्दीदात्री - सर्व सिद्धी देणारी. स्त्रीचे सोहळे अनुभवून सिद्धी प्राप्त झालेली अंतिम सोहळ्याच्या दिशेने निघालेली स्त्री
या प्रत्येक रूपावर लिहिण्यासारखे खूप आहे. पण कधी कधी सगळेच लिहिण्यापेक्षा वाटते वाचताना प्रत्येक रूपापाशी थबकावे.. थोडे भोवती फिरून बघावे कोणी सापडते का? हा सोहळा नऊ वाक्यात संपणारा नाही आणि नऊ दिवसात पण संपणारा नाही.. आयुष्य पुरून उरेल..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment