Sunday, October 4, 2020

तगमग

हो नाहीच लिहिले खूप दिवसात.. का लिहावे? काय लिहावे? जेव्हा विचार सुसूत्र असतात तेव्हा ते कागदावर उतरतात.. कासावीस आणि आर्त भाव उतरतात का?? ठरवले होते lockdown च्या पहिल्या दिवशी.. फक्त सकारात्मक लिहायचे.. जसे लिहू तसे मन राहील हा भाबडा विश्वास.. म्हणून सकारात्मक लिहायचा ध्यास.. या दिवसात अवघड होते.. मग वेगवेगळे प्रकार केले.. कधी संस्कृत श्लोकांचे भाषांतर तर कधी वाचलेल्या पुस्तकांचे review, कधी वेगवेगळ्या छंद विषयी लिहिले.. झाले आता सगळे.. काही अंशी शांत प्रसन्न वाटले पण तेवढ्या पुरते.. मनाची तगमग जाईना.. मग आता वाटतंय हा शेवटचा प्रयोग करून बघू.. थोडी तगमग कमी होते का? काही विचार न करता लिहायला सुरुवात केली आहे.. चूक भूल द्यावी घ्यावी..

या काही दिवसात जवळचे ओळखीचे नात्यातले लोक कायम साठी निरोप घेऊन गेले.. या तगमग असणाऱ्या दुनियेच्या दूर दुसऱ्या टोकाला.. काही प्राणांशी झुंज देत आहेत.. एकाही ठिकाणी स्वतः हजेरी लावू शकले नाही.. नुसते मनात कल्लोळ.. सांत्वन करणारे फोन क्षुल्लक वाटतात अशा वेळी.. आपल्या सारखी छोटी व्यक्ती काय बोलणार आणि कसला आधार आणि कसले सांत्वन करणार.. नेमकी तगमग कसली? कारण नसताना अचानक डोळे भरून वाहू लागतात ते यातल्या नेमक्या कोणत्या आठवणीने?  या खारट पाण्यासोबत फक्त तगमग वाहत राहते..

कधी सहज म्हणून कोणाला केलेल्या फोन मधून कोण आजारी असल्याची बातमी मिळेल सांगता येत नाही..ओळखीचे एक सबंध कुटुंब डोळ्यासमोर उध्वस्त होऊन परलोकाला जाते तर भेटणार कोणाला आणि सांत्वन करणार कोणाचे? आपल्याच नात्यातल्या लोकांचे दिवस करायला, शेवटचे भेटायला जाऊ शकत नाही.. अशा वेळी होणारी तगमग व्यक्त करण्या एवढी शब्द संपदा नाही आपल्या जवळ.. शाळेतली मैत्रीण icu मध्ये आहे हे कळते तेव्हा त्या क्षणी आपण तळत असलेले अनारसे फक्त गौर पडला म्हणून गोड झाले असतील म्हणायचे आपण पण ते जिभेला गोड लागत नाहीत.. 

तरीही आपण जगत राहायचे.. तेलकट, तुपकट, गोड सगळे करून खायचे.. जिभेचे चोचले पुरवायचे.. आवश्यक कामांना बाहेर पडत राहायचे.. लांब असणर्यांशी फोन वर बोलत राहायचे.. पगार घेत राहायचे.. हप्ते किराणा भरत राहायचे.. काळजी घेत राहायचे.. काळजी करत राहायचे.. मास्क लावत राहायचे.. हात धुवत राहायचे.. मुळात काय जगत राहायचे.. जिवंत राहायचे.. शरीराने आणि मनाने.. ही तगमग अशीच सोबत घेऊन.. 

कशात रस वाटत नाही.. आत्महत्या का खून अशा बातम्यात नाही.. कुठल्या रेसिपी बघण्यात नाही.. रोज किती बाधित किती मेले हे आकडे ऐकणे कधीच सोडून दिले.. तो विषाणू manmade आहे का natural नाही फरक पडत या विचाराने.. ऑफिस ला जाणे जास्त चांगले का घरून काम करणे हे विचार पण सोडून दिले आहेत.. एक बधीर शरीर वावरत असते घर, अंगण, परस, माळवद आणि मग निळे जांभळे आभाळ.. त्यात सूर्य मग चंद्र.. कधी चतुर्थीचा कधी पौर्णिमेचा.. परत अमावस्या.. एवढेच वाटते की या नावेत आपण पण बसलो आहोत.. आपला नंबर यायची वाट बघत.. तो पर्यंत जगायचे ही तगमग अशीच सोबत घेऊन..

लिहिल्यावर मोकळे वाटते त्याचा हा परत एक प्रत्यय.. आता थोडे मन रिते झाले.. आता शांत गाढ झोप.. एवढे एकच वरदान गाठी पडलेले.. ते म्हणजे शांत गाढ झोप.. कधीही कुठल्याही परिस्थितीत..  बास अजून काय पाहिजे.. सध्या अन्न वस्त्र निवारा या बरोबर चौथी मानवाची मूलभूत गरज बनली आहे.. ती म्हणजे कणखर मन आणि शांत झोप.. कधीही कुठल्याही परिस्थितीत..

-- अवनी गोखले टेकाळे..

No comments:

Post a Comment