Sunday, May 24, 2020

"दिल लातूर लातूर" झाले रे..

उन्हाळ्यातील थोडक्या पाण्याची थोडक्यात गोष्ट… अवनी गोखले टेकाळे 

*******************

पाण्याचा दिवस

माणूस बसेल अशी थोरली तीन पिप भरलेली
चार बादल्या, रांजण, घागर ओसंडून वाहिली
स्वयंपाकघर आज आमचे पाणी पाणी झाले रे
पाणी भरून आमचे "दिल लातूर लातूर" झाले रे..

तीन हौदात तीन टँकर पाणी ओसंडून वाहिले
दहा बादल्या, सगळे टप पिप टिप सांडलेले
मोरी परस आज आमचे पाणी पाणी झाले रे
पाणी भरून आमचे "दिल लातूर लातूर" झाले रे..

चादरी, पिप, डबे , फरशी सगळे धुवून काढले रे
झाडे, अंगण, लेकरे, परस पाईप खाली नहाले रे
ओसरी अंगण आज आमचे पाणी पाणी झाले रे
पाणी भरून आमचे "दिल लातूर लातूर" झाले रे..

****************

पाणी येऊन गेल्यावर पंधरावा दिवस

पिप, हौद, बादल्या, रांजण सगळे सगळे संपले रे
शेवटची माझी घागर पण अर्धीच आज राहिली रे
बटाटा रस्सा पेक्षा आज सुकीच भाजी पानात रे
पाण्याच्या आठवणीने "दिल लातूर लातूर" झाले रे..

अर्ध्या बादलीत होते आमची रोजचीच अंघोळ रे
भांडी विसळलेल्या पाण्यावर लिंबोणी तरारते रे
भेगा भुई ला खोलवर आणि जगणे ही भेगाळले रे
पाण्याच्या आठवणीने "दिल लातूर लातूर" झाले रे..

धरेखालील पाणीही उपसून उपसून आटले रे
दरवर्षी नजर आभाळी, पदराला निराशाच रे
देव घेतले ताम्हणात पण पळी आज कोरडीच रे
पाण्याच्या आठवणीने "दिल लातूर लातूर" झाले रे..

डोळा भरले पाणी सुध्धा सांडू देणार नाही रे
कोरडी नजर, कोरडी त्वचा, कोरडेच जगणे रे
आमची तक्रार, आमचा आवाज कुठेच पोचत नाही रे
पाण्याच्या आठवणीने "दिल लातूर लातूर" झाले रे..

अवनी गोखले टेकाळे

2 comments:

  1. लातूरच्या पाण्याच्या आठवणी खूप हृदयस्पर्शी..

    ReplyDelete