Wednesday, May 27, 2020

श्रीसूक्त - स्वैर मराठी भाषांतर

अमृतवाणी च्या लेखमालेतील हे पुढचे स्वैर भाषांतर.. संस्कृत वरील माझे प्रेम एव्हाना लक्षात आले असेल त्यामुळे त्याविषयी आता परत नकोच.. लगेच स्तोत्राकडे वळूया.. 

थोडेसे मूळ लेखनाविषयी.. ऋग्वेदातील मूळ गाभ्यामध्ये नंतर समाविष्ट केलेले हे स्तोत्र.. अशा परिशिष्टांना "खिलसूक्त" असे म्हणतात.. म्हणजे आपण "appendix" कसे जोडतो कुठल्याही पुस्तकाच्या शेवटी तसेच काहीसे.. हे पंधरा श्लोकांचे सूक्त आहे.. म्हणूनच शेवटच्या श्लोकात सूक्त पंचदश (पंधरा) असा उल्लेख आढळतो.. हे पूर्ण स्तोत्र अग्निदेवता(जातवेद) आणि "श्री"देवी म्हणजेच लक्ष्मी यांच्या भोवती फिरताना दिसते.. लक्ष्मीचे वर्णन करताना सतत कमळ आणि सुवर्ण यांचा उल्लेख येत राहतो.. 
अर्थ सांगण्याचा खटाटोप यासाठी सुद्धा की या श्लोकात लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघी भगिनींचा उल्लेख येत राहतो.. यात लक्ष्मी चे आवाहन आणि अलक्ष्मी चा नाश व्हावा असे दोन्हीचे वर्णन आहे. संधी विग्रह नीट केला नाही तर अलक्ष्मी चा नाश होवो याच्या ऐवजी लक्ष्मीचा नाश होवो असे म्हणण्यात येते.. 

आता थेट श्लोकांकडे जाऊया.. संधिविग्रह आणि समास सोडवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.. ज्यामुळे अर्थ कळणे सोपे जाईल.. 

तरी सुरवात करायच्या आधी आपले नेहमीचे .. विद्यार्थी अजून संस्कृत शिकत आहे त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी.. 

ऊँ॥ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् । चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥

हे अग्निदेवता, सोन्यासारखा (हिरण्य) वर्ण असणाऱ्या, सर्व पापाचे हरण करणाऱ्या, सोन्या - चांदीची(रजत) आभूषणे परिधान करणाऱ्या, चंद्राप्रमाणे शीतल असणाऱ्या सोनसळी लक्ष्मीचे, माझ्यासाठी आवाहन कर. 

(येथे सोने म्हणजे सूर्याची तेजस्विता आणि चांदी म्हणजे चंद्राची शीतलता असा अर्थ अभिप्रेत आहे.)

तां म अवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥

हे अग्निदेवता, कधी दूर न जाणाऱ्या (अविनाशी) लक्ष्मीचे माझ्यासाठी आवाहन कर. तिच्याकडून मला हिरण्य(सोने), धन, गौमाता, अश्व, पुरुष(नातलग, मित्र, सेवक असा अर्थ अभिप्रेत आहे) लाभावेत. 

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद-प्रबोधिनीम्। श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवीर्जुषताम्॥

जिच्या रथयात्रेमध्ये सुरवातीला (पूर्वाम) अश्व, मध्यभागी रथ आहे, रथात देवी बसलेली आहे. हत्ती नाद करत आहेत. अशा देवीचे मी नमन करते आणि तिची कृपा लाभावी अशी अशा करते. 

कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्। पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम्।

जिचे हास्य प्रफुल्लित करते. जी सुवर्ण मखरात बसली आहे. जी स्वतः संतुष्ट आहे आणि दुसर्यांना तृप्त करून सोडते, कमळात बसलेली, कमळासारखा वर्ण असलेली ही लक्ष्मी देवी आहे. तिचे मी नमन करते. 

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । तां पद्मनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥

चंद्राची प्रभावळ भोवती असणारी श्रीदेवी यशस्विनी आहे. ती त्रिलोकात पुजली जाते. ती उदार आहे. त्या पद्मिनी ला मी शरण जाते. "अलक्ष्मी" चा नाश होवो.  


आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः। तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः।

अग्नीतून जन्म झालेल्या, सुवर्णाप्रमाणे रंग असणाऱ्या देवी च्या तपश्चर्यामधून बिल्व वृक्षाची निर्मिती झाली. त्याच्या फळामुळे माझे अंतरीचे अज्ञान आणि बाह्यरूपातील दारिद्र याचे निवारण होवो. 

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह। प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥

देवांचा सखा कुबेर कीर्ती आणि खजिन्यासहित माझ्याकडे येवो. या देशात माझा जन्म झाला तो देश मला कीर्ती आणि समृद्धी देवो. 

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्।।

क्षुधा, पिपासा, मळ यांनी युक्त(तहान, भूक, अस्वच्छता) अशा "अलक्ष्मी" चा मी नाश करतो. "अभूति", "असमृद्धी" यांना माझ्या घरातून लवकर बाहेर काढ. 

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्। ईश्वरीँ सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ।

जी गंधाचे महाद्वार आहे, जिच्यापर्यंत पोचणे कठीण आहे, जेथे नित्य समृद्धी नांदते. अशा प्राणिमात्रांच्या देवीचे मी आवाहन करते. 

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि। पशूनाँ रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः।

मनाची कामनापूर्ती, वाचेतील सत्यता जी देते. पशू, सुंदर रूप आणि अन्न जिच्यामुळे मिळते ती लक्ष्मी मला यश देवो. 

कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम। श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं॥

लोकांसाठी तू चिखल (कर्दम) पण तूच कमळ फुलवतोस. तू सतत माझ्यासोबत रहा. तुझ्यासोबत पद्म आणि पद्मिनी यांचे मी माझ्या कुळात आवाहन करते. 

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे। निच देवीं मातरँ श्रियं वासय मे कुले ।

आप (पाण्यातून) स्निग्धता, ओलावा (चिक्लीत) निर्माण होऊन तो माझ्या घरी वसू दे. तुझ्यासोबत श्रीदेवी चे मी माझ्या कुळात आवाहन करते. 

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह।

हे अग्निदेवता,  पुष्करिणी प्रमाणे (कमळाचा तलाव) रसपूर्ण असणाऱ्या, सृष्टीचे पोषण करणाऱ्या, सोनसळी वर्णाच्या, कमळाचा हार घातलेल्या, चंद्राप्रमाणे शीतल असणाऱ्या हिरण्याप्रमाणे असणाऱ्या लक्ष्मी चे मी आवाहन करते. 

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम्। सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह।

हे अग्निदेवते, सृष्टीला आद्रता (ओलावा) देणारी, कमळाचा हार घातलेली, सूर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी असणाऱ्या सोनसळी लक्ष्मी चे मी आवाहन करते. 

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम्॥ 

हे अग्निदेवते, कधीही दूर न जाणाऱ्या, जिच्यामुळे मला भरपूर धन, गायी, सेवक, घोडे मिळतील अशा लक्ष्मीचे आवाहन कर. 

यः शुचि: प्रयतो भूत्वा जुहूयादाज्यमंवहं । सूक्त पंचदशर्च च श्रीकाम: सततं जपेत ।।  

जो शुचिर्भूत भाविक प्रतिदिन तुपाने हवन करेल त्याचे मनोरथ पूर्ण होईल. लक्ष्मीची कामना करणार्याने ही पंधरा सूक्ते नित्य पठण करावीत. 

-- भाषांतर करणारी अवनी गोखले - टेकाळे !!

1 comment: