Tuesday, June 2, 2020

ओला वळीव..

तू स्मरणात आहे, तू अंतरात आहे..
ओल्या मृद्गंधाचा, श्वासात वास आहे..
चिंब भिजणारा, तू ओला वळीव आहे..
ओल्या थेंबातूनी हा, तुझाच भास आहे..

रेष एक गूढ काळी, आभाळी च्या भाळी..
हवा आज पावसाळी अन् भुईला नव्हाळी..
तरी एकाकी भिरभिरते आज या सायंकाळी..
तू स्मरणात फक्त उरला ही नशीबाची टाळी..

किती आठवावे तुला, किती साठवावे..
एक झलक तुझी तिला किती पुरवावे..
छेडलेला राग त्याला किती आळवावे..
कितीदा तानपुऱ्यावर मी मारवाच गावे..

तू सोडलेस मजला, तिथेच मी आहे..
बदलले नाव गाव, भाव तिथेच आहे..
चिंब भिजणारा तू ओला वळीव आहे..
ओल्या थेंबातूनी हा तुझाच भास आहे..

-- अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment