Wednesday, June 3, 2020

मी एक डॉक्टर .. करोना patients ला treatment देतो..

माझ्या डॉक्टर मित्रांचे अनुभव ऐकून त्यांचा आवाज होण्याचा प्रयत्न केला आहे.. रेड्यावर आरूढ यमदेवाला रोखून धरण्याचे कार्य करणाऱ्या या योध्यांना समजून घेऊया.. त्यांना सहकार्य करूया.. अवनी गोखले टेकाळे   

*************************

मी एक डॉक्टर .. मला नाव नाही.. आहे फक्त माझ्या कामाचा परिचय.. करोना patients ला मी रोज treatment देतो.. नेमके काय आणि कसे व्यक्त करू कळत नाहीये.. नेमकी होणारी जीवाची घालमेल कशी मांडू कळत नाहीये.. 

रोज येणारे patient, त्यांच्या मनातली भीती कशी कमी करू कळत नाही.. कित्येक patient ठणठणीत बरे केले याचा आनंद मानावा का कित्येक व्हेंटिलेटर स्वतःच्या हातानी काढल्याचे दुःख व्यक्त करावे.. एक डॉक्टर म्हणून शरीरात असलेले मन कुलुपात बंद करून फक्त बुद्धीचा कस लावावा का अशा वेळेला? खरंच इतकं सोपं आहे का हे? फक्त positive विचार करावे असे स्वतःच्या मनाला आणि घरच्यांना समजवणारा मी किती वेळेला एकटा बाथरूम मध्ये जाऊन ढसाढसा रडलो असेन हे कसे आणि कोणत्या शब्दात सांगावे.. 

रोज PPE kit अंगावर वागवत असताना काही खाता पिता येत नाही.. अगदी लघवी ला सुद्धा कित्येक वेळा जाता येत नाही.. आठ आठ तास घशाला पडणारा शोष फक्त थुंकी गिळून कमी करावा लागतो.. कधी हे किट मिळतात तर कधी मिळत सुद्धा नाहीत.. मग येणारी संसर्गाची भीती त्यापेक्षा किट चा जीवघेणा त्रास पत्करावा वाटतो.. हे सगळे तुम्हाला सांगू का नको तेही कळत नाही.. 

कामाचा तणाव रोजच्या दिवसाला वाढत आहे.. माझ्या घरात सुद्धा वयस्कर आई वडील, लहान लेकरे, माझी सतत काळजी करणारी माझी बायको आहे.. कित्येक वेळा विलगीकरणाच्या नावाखाली यांना लांबून बघावे लागते तर कधी फक्त फोन वर बोलून समाधान बाळगावे लागते तर कधी फक्त आठवणीत दिवस काढावे लागतात.. जवळचे लोक सुद्धा हल्ली लांबच राहतात कारण मी एक डॉक्टर आहे.. हे सगळे तुम्हाला सांगावे का नको हे पण कळत नाही.. 

कित्येक वेळा लोकांचे वेगवेगळे challenge चालू असलेले कानावर येतात.. lockdown डायरी वाचायला मिळतात.. वेळेअभावी कधी स्वतःला या सगळ्यात भाग घेता आला नाही.. पण या सगळ्याला विरोध पण नाही.. जनतेने आम्हा करोना योध्यांसाठी ५ मिनिट टाळ्या वाजवल्या तेव्हा मन गदगदून आलं.. एक टाळी मी सुद्धा वाजवली माझ्यासाठी, माझ्या मित्रांसाठी.. एक टाळी नशिबाने दिली आम्हाला.. मी सुद्धा जमेल तेव्हा कविता करतो, चारोळ्या करतो, चित्र काढतो, गातो, कधी नाचतो.. लोक म्हणतात डॉक्टर बरे वेळ काढतात या सगळ्यासाठी.. सध्याच्या दिवसात मन प्रसन्न ठेवण्यासाठी ज्याला जे आणि जसे जमेल त्याने तसे करावे.. बाकी अजून काय बोलावे काहीच कळत नाही..  

माझ्याच कित्येक डॉक्टर मित्रांना, sisters ला quarantine होताना पहिले..स्वतः quarantine झालो.. कधी परिस्थितीशी दोन हात करत परत कर्तव्यावर रुजू झालो.. औषधे दिली.. घेतली.. माझ्या कित्येक covid positive मित्रांना प्राण गमवावे लागले.. या सगळ्यात नेमके मन, बुद्धी सगळ्याचा ताळमेळ घालत कसे रोज उभे राहावे कळत नाही.. 

मी एक हुशार डॉक्टर आहे.. माझा हातगुण चांगला आहे.. मी एक समजूतदार कुटुंबीय आहे.. असे माझे मलाच वाटत होते इतके दिवस.. परखड आणि स्पष्ट बोलणाऱ्या माझी जीभ आज मात्र चाचरत आहे.. स्वतःवर विश्वास आहे पण आणि नाही पण.. यमदेवाशी रोजच्या दिवसाचे भांडण घेतलेला मी एक डॉक्टर.. काय बोलावे.. बोलावे का नाही.. काहीच कळत नाहीये.. माझी बायको पण डॉक्टर आहे.. मानसोपचार तज्ज्ञ.. लोकांना वाढलेल्या मानसिक तणावामुळे सध्या तिच्याकडच्या appointment सुद्धा प्रचंड वाढत आहेत.. ती पण तणावाखाली आहे.. या परिस्थितीत मला तिची किंवा तिला स्वतःची "appointment" घ्यायला लागू नये.. एवढीच काय ती इच्छा.. बाकी काय बोलू..  काहीच कळत नाहीये.. 

सध्या कळते एवढे आणि एवढेच.. घरच्यांचे आणि स्वतःचे मन आपण सगळ्यांनी प्रसन्न ठेवूया.. डॉक्टर, nurse, सफाई कामगार, पोलीस यांच्याबद्दल कृतज्ञता ठेऊया.. देव, विज्ञान, संशोधन यांवर विश्वास श्रद्धा असू द्या.. आपण  सगळे झुंज देत आहोतच..  एका नवीन पहाटेची वाट बघणारे आपण एकाच नावेचे प्रवासी.. एकमेकांना साथ देत, सहकार्य करत मार्गक्रमण करू या.. 

-- अवनी गोखले टेकाळे 


No comments:

Post a Comment