Saturday, June 6, 2020

उमाळे .. तुझे माझे..

झालं कसं की या एका आठवड्यात आपण काहीच लिहिले नाही ना.. खूप विषय दिले होते कि.. वटपौर्णिमा येऊन गेली, environment day येऊन गेला, झालंच तर गेलाबाजार भूतदयेवर तरी काहीतरी लिहायला पाहिजे होत की.. पण नाहीच जमलं हो काही.. आपलं कसं आहे ना.. अचानक एखादी बातमी वाचून किंवा अचानक एखादा day आला म्हणून दुःखाचे, आनंदाचे किंवा भावनांचे उमाळे दाटून येतीलच असे नाही ना.. प्रत्येक वेळी हातात विषय मिळाला की काढ लिहून असे नाही जमत.. म्हणजे वटपौर्णिमा असेल कि लगेच वडाची गोष्ट, बालदिन आला कि लगेच शाळेच्या आठवणींचा पूर, एखाद्या प्राण्याच्या मृत्यूनंतर लगेच लेखणी ला भूतदयेचा सूर.. असे होतेच असे नाही.. mother's day ला आईविषयी उमाळे येऊन एकही कविता लिहायला जमली नाही आज पर्यंत.. याचा अर्थ या गोष्टी मनात पोचत नाहीत असे नाही पण लगेच लिहिले जातेच असे नाही.. हे म्हणजे trp साठी लिहिण्यासारखे आहे ना.. मग या लिखाणात, बातम्यात आणि daily soap मध्ये काहीतरी साम्य जाणवायला लागते.. आणि मग हात आवरते घ्यावे वाटतात..  

मुळात कलाकार हे लहरी असतात, विक्षिप्त असतात.. हे खरे आहे.. कला ही आतून स्फुरावी लागते.. त्याला वेळ काळ विषय असे बंधन नाही.. आम्ही सकाळी ८ ला नाश्ता करतो.. दुपारी १ ला जेवतो.. असे आपण सांगू शकतो.. पण आपण रोज रात्री ११ ते १२ लिहितो असे नाही सांगू शकत.. बऱ्याच वेळा सुचण्याची प्रक्रिया कधी कशी का होईल काहीच सांगता येत नाही.. पण माझ्या बाबतीत रात्र अर्धी संपल्यावर ती जास्त तेजीत होते हे खरे.. 

बऱ्याच वेळा आतून खरंच उफाळून येत.. आणि काहीही खाडाखोड न करता एकटाकी लिहून होत.. ते खरं लिखाण.. ते पोचत समोरच्या पर्यंत.. आणि मग येते ती दाद एकदम पोटातून काही आतबाहेर न ठेवता.. कधी कधी ते चालू घडामोडींशी संबंधित असतं तर कधी जुन्या आठवणी असतात.. कधी कधी मनातली एखादी सुप्त इच्छा बाहेर पडते.. तर कधी उगाच लेखणी सळसळते.. काही कारण नसताना ती उमटते.. आपले माध्यम होऊन.. 

कधीतरी एखादा विषय मिळतो.. प्रचंड विचार करून पण काहीच सुचत नाही.. अशा वेळी उगाच ओढून ताणून काहीतरी लिहू नये.. "pass" देऊन मोकळे व्हावे सरळ.. पण काही वेळा असं होत की एखादा विषय मिळतो आणि लक्षात येत की या विषयाशी संबंधित विचार मनाशी आधीच करून तयार आहेत.. आणि मग अशा वेळी जमत लिहायला.. 

लेख आणि कवितेत एक मूलभूत फरक आहे.. विचारांना स्थिरता मिळाली की लिहिला जातो तो लेख आणि घोंघावणाऱ्या वावटळ विचारातून लिहिली जाते ती कविता.. लेख लिहिण्यामागे एखादे कारण असते.. पण कवितेमागे ते बऱ्याच वेळा नसते.. बऱ्याच वेळा कविता लिहिल्यावर ती का लिहिली याचे उत्तर कुठलाच कवी नाही देऊ शकत.. ती भावना त्या क्षणी का आणि कशी प्रसवते हे कुठल्याही अल्गोरिथम मध्ये अजून न बांधता आलेले विश्व आहे.. वाचणाऱ्याने वाचावे.. आवडले किंवा नावडले तरी व्यक्त व्हावे पण कवीच्या मनाची खोली शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये.. 

कलाकाराला त्याचा वेळ द्यावा.. त्याला त्याचा विचार करू द्यावा.. त्याला त्याचा विषय निवडण्याची मोकळीक द्यावी.. आणि निर्मळ पणे पाझरू द्यावे एखाद्या झऱ्यासारखे.. दगडातून पाझरलेले, गढुळता नसलेले हे जिवंत झरे प्रकट होतील मनाच्या डोंगर दर्यातून.. आणि मग वाचकाने शांतपणे त्याच्या काठावर बसून मनमुराद आस्वाद घ्यावा.. त्याचा उगम, उंची, खोली याचा विचार न करता.. 

-- स्वतःचे उमाळे स्वतः तयार करणारी - अवनी गोखले टेकाळे 

No comments:

Post a Comment