Monday, June 13, 2022

शब्द संचय - घर

घराचे प्रकार 


घर - आलय, गृह, सदन, निकेतन, निवास, भवन, धाम 

झोपडी - खोपा, कुटी 

पर्णकुटी - बांबू, काठ्या, पाने यांनी बनवलेली झोपडी, कुडाची घरे 

इमारत - अनेकमजली वास्तू 

गगनचुंबी इमारती - गगनाला भिडतील अशा शहरातील उंच इमारती

कौलारू घरे - जास्त पावसाच्या प्रदेशातील उतरत्या छपराची घरे

माळवदाची घरे - सपाट छप्पर असलेली कमी पावसाच्या प्रदेशातील घरे  

चौसोपी वाडा - चारी बाजूंनी व्हरांडे असलेला वाडा 

चिरेबंदी वाडा - चिरांचे बांधकाम असलेला वाडा 


घराचा बाह्यभाग - 

ओसरी - घराच्या पुढच्या बाजूला असणारी बांधलेली जागा. हिला समोरून भिंत नसते. शेतातले गडी माणसांचे चहा पाणी करायची जागा. आल्या आल्या विसावा घ्यायची जागा 

माजघर - ओसरी आणि मूळ घर याच्या संबंधित असणारी बांधलेली जागा. 

बाळद / लादणी - धान्य साठवणी ची जागा 

सोपा - व्हरांडा 

अंगण - घरासमोरची मोकळी जागा 

वृंदावन - तुळशीची रोपे लावायला बांधलेली जागा 

सोपं - घरासमोरच्या पायऱ्या 

पडवी - मागच्या बाजूचा बांधलेला व्हरांडा 

परस - घरामागची रिकामी जागा 

वाडी - परसाच्या मागे असलेली मोठी बाग 

आड - घराच्या बाह्य भागात असलेली छोटी घरगुती विहीर 

पोहरा - विहिरीतून पाणी शेंदायला गोल बुडाची बादली सारखी वस्तू 

रहाट गाडगे - विहिरीवर बसवलेले गोल चक्र म्हणजे रहाट आणि गाडगे म्हणजे मडके. मडके दोरीला बांधून ते चक्राला बांधलेले असते. पाणी शेंदायला उपयोग होतो 

दोण - विहिरीतले पाणी लाटून यात साठवले जाते. 

कुंपण - घराची वेस ठरवणारी अंगणाच्या भोवतीची रचना. काटेरी/बांधीव/झुडूप किंवा बांबू पासून बनवलेली 

परसदार - परसाच्या मागचा दरवाजा 

दिंडी दरवाजा - घराच्या समोरचा दरवाजा 


वेगवेगळ्या खोल्या 

बैठक - घरातल्या आणि आल्या गेल्याला ऊठ बस करता येईल अशी पहिली खोली 

शयनागार - शयन कक्ष 

स्वयंपाक घर - मुदपाक खाना, भटार खाना 

देवघर - देवासाठीची स्वतंत्र खोली 

विटाळशी/बाळंतिणीची खोली - बाजूला बसलेल्या किंवा बाळंतीण बायकांसाठी ची खोली 

न्हाणीघर - स्नानगृह 

तळघर - घराच्या खाली असलेली खोली. साठवणी चे सामान ठेवायला. हल्ला झाला तर लपून बसायला किंवा तिथून दुसऱ्या गल्लीत बाहेर पडायचे गुप्त रस्ते काढलेले असायचे. 

मोरी - धुणं भांडी करायची जागा 

कोठीघर - स्वयंपाक घराला लागून असलेली खोली. जास्तीचे साठवणी चे सामान ठेवायला 

पोट माळा, माळा - खोलीच्या वर काढलेली जागा. जास्तीचे सामान ठेवायला 


घरासंबंधित रचना 

कोनाडा - माजघर आणि शयन गृह याच्या भिंतीत केलेली, छोट्या गोष्टी ठेवायला केलेली जागा. 

छत - छप्पर 

माळवद - कठडा नसलेले छप्पर 

वळचण - छताखालील जागा 

रसंधीची जागा - अडचणीची जागा 

कडी कोयंडे - साखळीसारखी रचना असलेली कडी आणि ती अडकवायला गोलाकार रचना 

कौले - बांबू च्या छतावर घातलेली कौले. साधी/मंगलोरी. मंगलोरी जास्त टिकाऊ आणि मजबूत 

पन्हाळे - छतावर पडलेलं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी केलेली जागा 

पत्र पेटी - अंगणातील मुख्य दरवाज्या शेजारी लावलेली पेटी 

जिना/सोपान - वरच्या मजल्यावर जायला पायऱ्या 

गच्ची - छत 

गवाक्ष - खिडकी, तावदाने

कवाडं - दार, दरवाजा 

झरोका - खोलीच्या वरती खेळती हवा, उजेड यायला केलेली सोय

माडी - वरचा मजला 

पहिला माळा, दुसरा माळा - पहिला मजला, दुसरा मजला 

अडसर/अडणी - जाड लाकडाचा एका भिंतीतून दुसऱ्या भिंतीत ढकलायचा ओंडका   

देवळी - कंदील, दिवे ठेवण्यासाठी खोलीत केलेली सोय 

खुंटी - कपडे लटकवायला केलेली दाराच्या मागे सोय 

हौद - पाणी भरायला बांधलेली रचना 

पावठाण - पायरी 

उंबरठा - खोलीच्या दारात प्रवेश करण्याची जागा 


*************


ता. क. 

स्वयंपाक घर, घरात वापरले जाणारे सामान याचा शब्द संचय खूप मोठा आहे. तो वेगळ्या भागात देण्यात येईल. 


-- अवनी गोखले टेकाळे 

No comments:

Post a Comment