Tuesday, June 7, 2022

पाऊलवाट

आपल्या नजरेसमोर असावीत फक्त कालची आपलीच पावले. 

त्यांचा मागोवा घेतच आजचे पाऊल टाकायचे. 

हे आणि एवढेच खरे. 


आपले ध्येय ही तेच, साथीदार ही तेच, साक्षीदार ही तेच. 

प्रत्येक व्यक्तीच्या पावलांची दिशा त्यांच्या आधीच्या रस्त्याप्रमाणे ठरलेली असते. 

आपण दुसऱ्याच्या पावलावर पाऊल टाकायला गेलो तर ते जमेलच असे नाही. 

पण आपल्या कालच्या पावलावर अधिक प्रभावी पणे आजचे पाऊल पडणे जास्त महत्वाचे. 

एक दिवस आपला इच्छित पैलतीर दिसेलच आपल्याला. 

आणि मग मागे वळून एकदा बघायचे फक्त. 

त्र्ययस्थ नजरेने आपसूक तयार झालेली पाऊलवाट निरखायची फक्त. 

भले भले थबकलेले दिसतील ऐलतीरावर. भांबावून. 

हा तीर पार करणे सोपे नव्हते कधीच. 

जिद्द, हिम्मत, मेहनत, मेधा, इच्छा यांचे एकत्रित ठसे उमटलेले दिसतील. 

आपल्याच पाऊलवाटेच्या शेजारी अजून एक पाऊलवाट. जीवन साथीदाराची. 

पसरेल मग चेहऱ्यावर आपोआप शांत, निरागस, समाधानी भाव. 

आंतरिक शक्ती ची प्रभावळ उमटेल शांत चेहऱ्याभोवती. 

आपण अधीन व्हावं. आपल्या पावलांनी मागोवा घेत जावं. 

श्री महासरस्वती चा. श्री आदीशक्ती चा. 

मागे वळून बघताना लक्षात येईल. श्री महालक्ष्मी आपसूक आलेली असेल. 

आपल्या भगिनींचा विरह सहन न होऊन. 

हे आणि एवढेच खरे. 


आपल्या पाऊलवाटेचा आता एक महामार्ग झालेला असेल. 

अनेक पावले त्या पाऊलवाटेची कास धरून पैलतीरावर येताना दिसतील. 

त्यांना तिथेच थांबवत एकदा सांगावे. जिथून आपण सुरुवात केली होती. 

आपल्या नजरेसमोर असावीत फक्त आपलीच पावले. 

त्यांचा मागोवा घेतच आजचे पाऊल टाकायचे. 

हे आणि एवढेच खरे. 


-- अवनी गोखले टेकाळे 


1 comment:

  1. आपल्या इच्छा-आकांक्षा, त्या पूर्ण करण्याची जिद्द..आपल्या परिश्रमाचं फलित म्हणजे पायवाटेचा झालेला राजमार्ग!
    त्यावर उमटलेल्या पाउलखुणा आपल्याच असल्या तरी त्याचं अनुकरण एखाद्यास त्याच्या उन्नतीसाठी प्रेरणा देत असेल, तर ती पाऊलवाट..तो महामार्ग अनुसरण्याची मुभा असावी! कारण तो त्याच्या साठी प्रेरणास्त्रोत असतो.
    चुकलेल्या गलबताला दीपस्तंभाचाच तर आधार असतो..तो दीपस्तंभ आपण व्हावं..अत्तदीप भव..!

    ReplyDelete