1. तूर डाळीचे साधे गोड वरण - हळद, हिंग थोडा गूळ घातलेले. वरण भात तूप मीठ लिंबू. सगळ्यात महान जेवणाचा बेत.
2. डाळ वांग - शिजवलेली तूर डाळ आणि वांगी घालून केलेली आमटी
3. कोकणी पद्धतीची ओले खोबरे, गोडा मसाला, कोथिंबीर, आमसूल, गूळ घालून केलेली आमटी. याच पद्धतीने चिंच गुळाची आमटी पण करता येते.
4. सांबार - सांबार मसाला आणि असतील त्या सगळ्या भाज्या, चिंच गूळ घालून केलेले सांबार
5. रस्सम - रस्सम मसाला, चिंच गूळ वापरून वरून तूप जिरे, हिंग, कढीपत्ता, सुकी मिरची ची फोडणी
याचं प्रकारे चिंच ऐवजी आमसूल/टोमॅटो वापरून पण करू शकतो
6. एसर आमटी - हा मराठवाडी प्रकार आहे. वेगवेगळ्या धान्यांचा आणि डाळींचा भाजून मिक्स भरडा काढलेला असतो. यात दळताना काळा मसाला मिक्स केलेला असतो. कांदा किंवा लसणीची फोडणी आणि काळा मसाला घालून केलेली आमटी झटपट आणि झणझणीत होते
7. Premix सांबार - भाजलेल्या डाळी, सांबार मसाल्याचे पदार्थ, मिरची, धने, जिरे एकत्र दळून आणायचे. करताना नुसते गरम पाण्यात कालवून झटपट फोडणी टाकायचे. याची वरण फळ/डाळ बाटी पण खूप टेस्टी होतात.
8. मेथी/ पालक/ चुका/अंबाडी चे वरण
9. दाल तडका/पळी फोडणी - लोखंडाच्या पळी मध्ये/छोट्या कढल्यामध्ये लसूण, लाल मिरची, कढीपत्ता, थोडे तीळ, हिंग, कोथिंबीर घालून फोडणी करायची. आणि ती पळी डायरेक्ट गरम वरणात घालायची.
10. चिंचेचे/आमसुलाचे/टोमॅटो चे सार - थोडा गूळ, आणि तूप जिऱ्याची फोडणी देऊन केलेले सार. आमसूल ऐवजी कोकम सरबताचे आगळ वापरले तरी चालते. झटपट सार होते
11. चाकावताची/पालकाची ताकातली पातळ पालेभाजी - ताकाला थोडे बेसन लावायचे. बारीक चिरलेला चाकवत, आणि तूप, जिरे, मिरची ची फोडणी. पातळ भाजी मध्ये भिजवलेली हरबरा डाळ आणि शेंगदाणे
12. सांडग्याची आमटी - सांडगे तळून घ्यायचे. आणि लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो फोडणीत घालायचे आणि पाणी घालून त्यात सांडगे शिजवायचे.
13. डुबुक वड्याची आमटी - बेसन मळून त्याचे छोटे गोळे करायचे. आणि त्याची आमटी करायची
14. उडदाचे घुटे - उडीद डाळ थोडी भाजून घ्यायची. कुकर ला शिट्ट्या मारून घ्यायची. आणि लसूण, हिरव्या मिरची ची फोडणी द्यायची
15. मसूर डाळीची आमटी
16. पंच डाळीची आमटी - तूर डाळ, हरबरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, मूग डाळ या सगळ्या डाळी एकत्र करायच्या. आहेत त्या सगळ्या भाज्या घालायच्या आणि मग त्याची आमटी करायची.
17. हिरव्या मुगाची आमटी - हिरवे मूग कुकर ला शिट्टी मारून घ्यायचे. थोडे भरडून त्याची आमटी करायची
18. मटार/तूर/ओले हरबरे यांची आमटी - थंडीच्या दिवसात ताजे मिळणारे मटार/तूर/घाटे यांची आमटी छान होते. तेलावर लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि तूर परतून घ्यायचे. मिक्सर ला भरड काढून घ्यायचे आणि मग आमटी करायची.
19. कुळीथाचे पिठले - कुळीथ पीठ पाण्यात कालवून घ्यायचे आणि लसणीची फोडणी देऊन पिठले करायचे. हे पातळ असते बेसन पिठल्यासारखे घट्ट नसते. सर्दी झाली असेल तर कोकणातला रामबाण उपाय.
20. बेसन पिठले
21. कढी - कढी नेहमीचीच. पण त्यात season प्रमाणे गाजर, पडवळ घालून करता येते.
22. अळूचे फदफदे - अळू , चिंच गूळ, काजू खोबऱ्याचे काप, हरभऱ्याची भिजवलेली डाळ, शेंगदाणे इतका सगळा माल मसाला घालून पण आपली भाजी पुणेरी कार्यालयात मिळते तशी होत नाही. कारण ते लोकं जिलेबीचा थोडा पाक घालतात त्यात.
ता. क.
अजून काही वेगळे प्रकार तुम्ही करत असाल तर कॉमेंट मध्ये share करा. आणि यात नमूद केलेले एसर, सांबार किंवा वरणाचे premix विकत पाहिजे असेल तरी कळवा. कसंय, आपला बॉल, आपली बॅटिंग या rule प्रमाणे, आपला ब्लॉग आपले प्रमोशन.
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment