तशी भावना आपल्या मावशी आजी ची मुलगी. राहायला जवळच भागवत हॉल पाशी. सण समारंभ लग्न कार्य याला भेट व्हायची. जाता येता भेटलो तर बोलायचो. या नात्याच्या व्यक्तीशी जेवढी असायला पाहिजे तेवढी आपुलकी होतीच. पण या पलीकडे खरं सांगायचं तर याहून जास्त काही नव्हतं. भेटल्यावर आनंद होईल पण भेटलो नाही तर रुखरुख लागेल असं पण काही नव्हतं. पण तरी धक्का खूप जोरात बसला. ती गेल्यापासून या एका वर्षात खूपदा विचार आले मनात. माहित नाही का.
कसं असतं ना. आपल्या नकळत एक checklist मनात ठसलेली असते. ठराविक वर्षापर्यंत शिक्षण, ठराविक वर्षी लग्न, ठराविक वर्षी लेकरं, ही लिस्ट पुढे जाऊन ठराविक वर्ष जगल्यावर मग मृत्यू. आपण कोणीच अमारपट्टा घेऊन नाही जन्माला आलो. कधी ना कधी काहीतरी व्याधी होणार. कधी ना कधी आपलाही नंबर लागणार. पण कधी? याचं एक गणित नकळत आपल्या मनात ठसलेल असतं. आणि ते जेव्हा कोलमडत तेव्हा ठेच लागते. अकाली मृत्यू झालेले लोक चटका लाऊन जातात ते यामुळे.
अर्धवट संसार, अडनिड्या वयाचा नवरा, लहान लेकरं म्हणून जास्त जाणवलं असेल कदाचित. ती वेळ हळवी होती म्हणून जास्त जाणवलं असेल कदाचित. कारण दुसऱ्या लाटेत असे खूप अडनिड्या वयाचे लोक वारले. जवळचे, ओळखीतले, नात्यातले. किंवा. ती आपल्या पिढी ची होती म्हणून जास्त जाणवलं कदाचित!!
आज भावना ची आठवण आली त्यासोबत सगळेच जुने दिवस आठवले. आपण बऱ्याचदा आपल्या नादात,आपल्या कामांमध्ये असतो. आपण सगळे रोज एकमेकांना फोन करून मुद्दाम काय मग कसं चालू आहे असं विचारत नसू कदाचित. सगळे आपापल्या दुनियेत सुखी आहेत ना. आणि आपल्याला ते माहित आहे ना. बास. तेवढं पण पुरत बऱ्याच वेळा. आपल्यात जे नातं आहे ते मनापासून आहे, ते सहवासातून आहे. आणि त्याच कारण आपण लहान असताना आपल्या मोठ्या लोकांनी आपल्याला सतत भेटायची संधी दिली. कधी सुट्ट्या, कधी लग्न कार्य, कधी सणवार, कधी उगाच पिक्चर ला, टाइमपास करायला, night out करायला, पत्ते कुटायला, गप्पा ठोकायला, गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला आणि बरंच काही.
भावना ची आठवण काढत आपल्यापैकी कोणी रडत नाही बसणार पण क्षणभर बेचैन वाटतच. उगाच वाटलं. थोडेसे जुन्या आठवणीत रेंगाळत एखादी night out करू सगळे. रात्रीचे पोलीस येऊन शिट्ट्या मारेपर्यंत धिंगाणा करू मस्त. निमित्त काही का असेना. आपण एकत्र येऊन दुसरे काय करणार.
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment