वेल्हाळ.
शब्दाची पहिली ओळख. न कळत्या वयात आरती म्हणताना तोंडात बसलेले महादेवाचे समर्थांनी केलेले वर्णन. ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. पण आरत्या समजून घ्यायच्या आत पाठ होतात. आणि एकदा पाठ झाल्या की अंगवळणी पडतात. अर्थ सुंदर असूनही उलगडायचे राहून जाते बऱ्याच वेळा...!!
शब्दाची खरी ओळख. जैत रे जैत. असं एखाद पाखरू वेल्हाळ. ना धो महानोर यांनी ओळख करून दिलेला आणि स्मिता पाटील हिने पडद्यावर प्रत्यक्ष अर्थ उलगडून दाखवलेला. अजून काय पाहिजे. साध्या रुक्ष वेडा या शब्दाला लडिवाळ रूप मिळाले ते इथे. उडणाऱ्या चिमण्यांपेक्षा आणि पळणाऱ्या कोंबड्यांपेक्षा या वेल्हाळ पाखराने आम्हाला तरी जास्त नादावले खरे. अनेक वर्षांनंतर सुधा ऐकावेसे वाटते, पहावे वाटते आणि लिहावेसे वाटले यातच सगळे आले. असो. ज्याची त्याची आवड...!!
खूप वर्षानंतर या शब्दाला परत जिवंत केले ते सविता दामोदर परांजपे मधल्या वेल्हाळा गाण्यात. कालिंदी च्या तटावरी.. येशील रे.. वेल्हाळा!!. वैभव जोशी चे कातर शब्द आणि पडद्यावर साक्षात सुबोध भावे. शब्दाचा अर्थ समजायला अजून काय पाहिजे. वेल्हाळा.. तुला पाहते रे..!!
आज इतके विचार यायचे कारण दोन दिवस झाले चित्रचारोळी साठी एक चित्र डोक्यात बसले. त्यात हा शब्द वापरायचा आहे. पण आमच्या अडाणी डोक्याची मजल वेल्हाळ ला पाल्हाळ चे यमक जोडण्या इतपतच. त्यामुळे यमक काही जुळेना. पण त्या नादात या शब्दाभोवती पिंगा घातला गेला हे ही नसे थोडके..!!
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment