मुळात संस्कृत वर प्रेम आहेच.. पण भाषांतर करायचा नाद लागला याच जरा हळवं कारण आहे.. म्हणजे झालं काय.. की lockdown मध्ये फक्त आणि फक्त positive लिहायचं असं ठरवलं.. दोन कारणांसाठी.. एक म्हणजे वाचणार्यांना थोडी सकारात्मकता द्यायची आणि दुसरं म्हणजे आपल्या लिखाणाचा आपल्या रोजच्या व्यावहारिक जगात कुठेतरी पडसाद पडत असतो.. आपण सकारात्मक लिहायचे आणि आशा करायची ते आपल्या जगण्यात उतरावे यासाठी..
पण याची दुसरी बाजू कशी नाकारू? ठरवले खरे पण भोवतालच्या परिस्थितीमुळे मन उदास होते बऱ्याच वेळा.. नशिबाने साहित्य आपल्या सोबत असल्यामुळे कंटाळा नाही आला एक पण दिवस.. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पण नाही पडला.. पण मनावरची मरगळ लिखाणात दिसू द्यायची नाही हे अवघडच.. उसने अवसान आणून काही छान छान लिहायला सुचेना.. वेगवेगळ्या वेबसाइट वर लिहीत होते पण काहीच सकारात्मक सुचेना म्हणून थांबले थोडेसे.. मग ठरवले थोडे दिवस नव्याने काही लिहिण्यापेक्षा जे ठेहराव असलेले संस्कृत श्लोक आहेत त्याचे स्वैर भाषांतर करावे..
संस्कृत म्हणलं की भलेभले लोक घाबरून एक पाय मागे घेतात.. त्यांच्यासाठी हे एक छोटेसे सुभाषित.. आठवी मध्ये संस्कृत च्या पहिल्या तासाला आमच्या दाणी बाईंनी शिकवलेले..
सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया ।
अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा न च कठिना ।।
ज्या भाषेचे वर्णन इतके सुंदर आहे ती भाषा आतून किती सुंदर असेल.. या गीर्वाण भाषेचा गोडवा, माधुर्य, लालित्य, अचूक व्याकरण, शब्दसंपदा सगळेच मोहून टाकणारे.. आस्तिक आणि नास्तिक याच्या पलीकडे जाणारे.. एक एक कडवे वाचून स्वतःच्या मनाला जसा लागेल तसा अर्थ लावत गेले.. मध्येच जे शब्द अडत गेले त्या शब्दांचे अर्थ शोधत गेले.. हरवत गेले त्या शब्दांमागे.. जगण्याला नवीन दृष्टिकोन मिळाला आणि माझे उद्दिष्ट साध्य झाले.. मनाला उभारी मिळत गेली.. मरगळ कमी होत गेली.. संपली असं नाही म्हणून शकत पण हो कमी होत गेली.. (आत्ताचा हा छंदा विषयी लेखमाला पण जुने छंद आठवून थोडी मनाची मरगळ कमी करायचा एक छोटा प्रयत्न..)
व्यंकटेश सुप्रभातम, शिव तांडव, महालक्ष्मी अष्टक, श्रीसूक्त, रामरक्षा.. जमेल तसे मराठीत स्वैर भाषांतर केले एक एक करत.. याचा काय उपयोग माहित नाही.. ऑनलाईन किंवा काही पुस्तकांमध्ये या सगळ्याचे अर्थ सापडतील सुद्धा.. मग कारण नसताना हा खटाटोप का कशासाठी माहित नाही.. पण मी आपले माझ्या मनाला जे वाटले, पटले, सुचले ते केले.. फक्त स्वतःसाठी.. पण तेही वाचणारे भेटले.. त्यांना थोडेसे वाचून प्रसन्न वाटले.. एका चुलत नणंदेने सांगितले तिला अर्गला आणि कनकधारा स्तोत्रांचे पण भाषांतर करून पाहिजे..
फक्त शब्दांवर, त्याच्या अर्थावर आणि मुळातच भाषेवर मनापासून प्रेम करणारी मी एक सामान्य व्यक्ती.. त्यात सुद्धा ती भाषा संस्कृत असेल तर थोडे जास्तच.. पहिले प्रेम असल्यासारखे.. या सगळ्या भावनेतून साहित्य उपासना करण्याचा प्रयत्न केला.. प्रत्येक शब्द आपल्याला खूप काही शिकवून जातो यात शंका नाही.. माझी सगळी केलेली भाषांतरे माझ्या ब्लॉग वरती अमृतवाणी या नावाखाली एकत्रित केली आहेत..
ताजा कलम - मला पूजेमधले नियम काही फारसे कळत नाहीत.. कुठल्या देवाला कुठल्या रंगाचे फळ, फूल आवडते ते लक्षात रहात नाही.. हळद कुंकू नेमके कुठल्या बोटांनी लावतात हे पण मी दोनवेळा करंड्याकडे बघते, एकदा समोरच्या माणसाकडे बघते आणि मग शेवटी त्या वेळेला ज्या बोटावर माझी भक्ती जडेल त्या बोटाने लावून टाकते.. दर दोन तीन तासांनी पोटभर खाल्ले नाही तर मला झूम बाबा झूम झाल्यासारखं वाटतं त्यामुळे उपास पण कधी जमले नाहीत.. उगाच वाटते पडायचे बिडायचे लोकल मध्ये लटकत असताना.. या सगळ्या बाबतीत माझे अज्ञान खूप जास्त आहे.. हे सगळं बरोबर का चूक माहित नाही.. पण आपलं आहे हे असं आहे.. सगळेच स्वर्गात गेले तर नरकात कोणीतरी एखादे वेडे बागडे पाहिजे ना.. त्यामुळे आपण आपले नरकाचे बुकिंग करून टाकले आहे चित्रगुप्ताला सांगून.. त्यामुळे कोणी काही म्हणले तरी बेहत्तर.. तर ते आस्तिक का नास्तिक या विषयावरून भांडू नका कंमेंट मध्ये.. आपण सगळेच सरस्वती आणि शारदेचे उपासक.. शब्द, लेखणी यांची पूजा भक्तिभावे करणारे.. तेवढेच घ्यावे या लेखातून.. हे आणि एवढेच काय ते.. त्यासाठीच हा अट्टाहास.. बाकी काय सांगू.. आत्ता थांबते इथेच.. ते अर्गला मधले काही शब्द अडले आहेत त्याचा अभ्यास करते थोडासा..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment