Monday, April 27, 2020

शिव तांडव स्तोत्राचे मराठी मध्ये स्वैर भाषांतर..

या वर्षी काहीतरी नवीन संस्कृत पाठांतर करायचे असे ठरवले होते(त्याचे कारण पुढच्या वेळी कधीतरी).. मग लय, ठेका, परिणाम कारक शब्दरचना आणि मुळात संस्कृत भाषेवरचे प्रेम या सगळ्यांनी शिव तांडव पर्यंत आणून सोडले.. त्यातून हे स्वैर भाषांतर घेऊन आले आहे.. जे काय समजले उमजले ते मांडत आहे.. विद्यार्थी अजून शिकत आहे त्यामुळे चू. भू. द्या. घ्या.. 


जटाटवी-गलज्जल-प्रवाह-पावित-स्थले गलेऽव-लम्ब्य-लम्बितां-भुजंग-तुंग-मालिकाम्  डमड्डमड्डमड्डम-न्निनादव-ड्डमर्वयं चकार-चण्ड्ताण्डवं-तनोतु-नः शिवः शिवम् ॥१॥ 

घनदाट जटांमधून गंगाजळ वाहत आहे.. गळ्यामध्ये लांब लांब विळखे घालून साप बसला आहे.. डमरू चा डमडम निनाद कानात घुमत आहे.. महादेव महाभयंकर तांडव नृत्य करत आहे.. असे शिव शंकर आमचे कल्याण करो.. 

जटा-कटा-हसं-भ्रमभ्रमन्नि-लिम्प-निर्झरी- -विलोलवी-चिवल्लरी-विराजमान-मूर्धनि . धगद्धगद्धग-ज्ज्वल-ल्ललाट-पट्ट-पावके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥२॥

संभ्रमित होऊन आवेशाने फिरणारी गंगा विस्तीर्ण जटांमध्ये आपल्या लाटांनी वेलबुट्टी काढत आहे.. महादेवाच्या कपाळावर सतत अग्नी धगधगत आहे.. मस्तकावर चंद्र विराजमान झाला आहे.. अशा महादेवांबद्दल माझ्या मनात आदरयुक्त प्रेम उत्पन्न झाले आहे.. 

धरा-धरेन्द्र-नंदिनीविलास-बन्धु-बन्धुर स्फुर-द्दिगन्त-सन्ततिप्रमोद-मान-मानसे . कृपा-कटाक्ष-धोरणी-निरुद्ध-दुर्धरापदि क्वचि-द्दिगम्बरे-मनो विनोदमेतु वस्तुनि ॥३॥ 

शैलपुत्री पार्वती सोबत विलास करताना तिच्या नेत्रकटाक्षांनी त्यांचे चित्त प्रसन्न होते.. त्यांचे कृपा कटाक्ष अवघड संकटांनाही दूर ठेवते.. अशा नभाचे वस्त्र धारण करणाऱ्या महादेवांची आराधना करताना माझे मन आनंदित होते..

जटा-भुजंग-पिंगल-स्फुरत्फणा-मणिप्रभा कदम्ब-कुंकुम-द्रवप्रलिप्त-दिग्व-धूमुखे  मदान्ध-सिन्धुर-स्फुरत्त्व-गुत्तरी-यमे-दुरे मनो विनोदमद्भुतं-बिभर्तु-भूतभर्तरि ॥४॥ 

जटांना सळसळणारा नाग विळखा घालून बसला आहे.. त्याच्या फण्यावरील मण्याच्या तेजाची, कदंब आणि कुंकवाच्या रंगाची उधळण दिशारूपी वधूच्या मुखावर होत आहे.. मदमस्त हत्तीचे कातडे महादेव पांघरून बसले आहेत.. जे समस्त प्राणिमात्रांचे आधार आणि संरक्षक आहेत अशा महादेवांची आराधना करताना माझे मन आनंदित होत आहे..

सहस्रलोचनप्रभृत्य-शेष-लेख-शेखर प्रसून-धूलि-धोरणी-विधू-सरांघ्रि-पीठभूः  भुजंगराज-मालया-निबद्ध-जाटजूटक: श्रियै-चिराय-जायतां चकोर-बन्धु-शेखरः ॥५॥ 


सहस्त्र नेत्र असलेल्या इंद्रासोबत इतरही समस्त देवतांनी आपल्या मुकुटातील फुले महादेवांच्या चरणावर अर्पण केली आहेत.. त्या फुलातील परागकणांची धूळ त्यांच्या चरणाला स्पर्श करत आहे.. भुजंगराजाच्या विळख्याने त्यांची जटा बांधली गेली आहे.. असे चंद्रशेखर चिरंतन वरदान देत राहोत..

ललाट-चत्वर-ज्वलद्धनंजय-स्फुलिंगभा- निपीत-पंच-सायकं-नमन्नि-लिम्प-नायकम्  सुधा-मयूख-लेखया-विराजमान-शेखरं महाकपालि-सम्पदे-शिरो-जटाल-मस्तुनः ॥६॥ 


ललाटावर धगधगणाऱ्या अग्नी ने त्यांनी कामदेवाला भस्म करून टाकले.. इंद्रादी देवांचे गर्व हरण केले.. ज्यातून सतत अमृत पाझरते अशा चंद्राला मस्तकावर धारण केले.. गळ्यात कवट्यांचा हार घातलेल्या शंकराला आमचे वंदन..

कराल-भाल-पट्टिका-धगद्धगद्धग-ज्ज्वल द्धनंज-याहुतीकृत-प्रचण्डपंच-सायके  धरा-धरेन्द्र-नन्दिनी-कुचाग्रचित्र-पत्रक -प्रकल्प-नैकशिल्पिनि-त्रिलोचने-रतिर्मम ॥७॥ 

भाळावर धगधग करणाऱ्या ज्वाळांनी पाच बाण ज्याचे शस्त्र आहेत अशा मदनाला भस्म केले.. हिमालय कन्या, शैलपुत्री पार्वती हिच्या स्तनाग्रांवर नक्षी काढणाऱ्या त्रिलोचन शंकरांपुढे मी नतमस्तक आहे..

नवीन-मेघ-मण्डली-निरुद्ध-दुर्धर-स्फुरत् कुहू-निशी-थिनी-तमः प्रबन्ध-बद्ध-कन्धरः  निलिम्प-निर्झरी-धरस्त-नोतु कृत्ति-सिन्धुरः कला-निधान-बन्धुरः श्रियं जगद्धुरंधरः ॥८॥ 


अमावास्येच्या रात्रीतील काळ्या नवीन मेघमंडळांप्रमाणे ज्यांची सावळी मान आहे.. ज्याने गजचर्म धारण केले आहे.. गंगेला शिरावर धारण केले आहे.. सर्व कलांचे स्थान आहे अशा जगाचा भार वाहणाऱ्या महादेवांकडून मलाही संपन्नता प्राप्त व्हावी..

प्रफुल्ल-नीलपंकज-प्रपंच-कालिमप्रभा- -वलम्बि-कण्ठ-कन्दली-रुचिप्रबद्ध-कन्धरम् . स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकछिदं तमंतक-च्छिदं भजे ॥९॥ 

पूर्ण उमललेल्या कृष्ण कमळाप्रमाणे,  विश्वासामान सावळा ज्याचा कंठ आहे; मदनाचा,  त्रिपुरासुराचा, जगाच्या बंधनांचा, दक्ष यज्ञाचा, गजासुराचा, अंधकासुराचा ज्याने नाश केला आहे.. त्या यमावर नियंत्रण ठेवणाऱ्या महादेवांपुढे मी नतमस्तक आहे..

अखर्वसर्व-मंग-लाकला-कदंबमंजरी रस-प्रवाह-माधुरी विजृंभणा-मधुव्रतम् . स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्त-कान्ध-कान्तकं तमन्तकान्तकं भजे ॥१०॥ 


कल्याणमय, अविनाशी महादेव कलारूपी कदंबाच्या मोहोरातील मधुर रसाची लालसा ठेवून रुंजी घालणाऱ्या भ्रमराप्रमाणे आहेत.. त्यांनी मदनाचा, त्रिपुरासुराचा, जगातील बंधनांचा, दक्षयज्ञाचा, गजासुराचा, अंधकासुराचा नाश केला आहे.. अशी यमदेवावर नियंत्रण असणाऱ्या महादेवांपुढे मी नतमस्तक आहे..

जयत्व-दभ्र-विभ्र-म-भ्रमद्भुजंग-मश्वस- द्विनिर्गमत्क्रम-स्फुरत्कराल-भाल-हव्यवाट् धिमिद्धिमिद्धिमिध्वनन्मृदंग-तुंग-मंगल ध्वनि-क्रम-प्रवर्तित प्रचण्डताण्डवः शिवः ॥११॥ 


वेगाने फिरणाऱ्या सापाच्या फुत्कारातून, कपाळावर धगधगणारा अग्नी पसरत आहे.. धिमिध धिमिध असा मृदंगाचा आवाज क्षणाक्षणाला वाढत जात आहे.. त्या तालावर तांडव नृत्य करणाऱ्या महादेवांना माझे नमन असो..

दृष-द्विचित्र-तल्पयोर्भुजंग-मौक्ति-कस्रजोर् -गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्वि-पक्षपक्षयोः . तृष्णार-विन्द-चक्षुषोः प्रजा-मही-महेन्द्रयोः समप्रवृतिकः कदा सदाशिवं भजे ॥१२॥ 


दगडाची तसेच मुलायम शय्या, गळ्यात सर्पाची तसेच मोत्यांची माळा, मौल्यवान रत्न किंवा मातीचे ढेकूळ, सुहृद किंवा विरोधक, राजा तसेच प्रजा, गवत किंवा कमळावर समान दृष्टी, अशा सर्वांना सामान वागणूक देणाऱ्या महादेवाचे मी नित्य पूजन करते..

कदा निलिम्प-निर्झरीनिकुंज-कोटरे वसन् विमुक्त-दुर्मतिः सदा शिरःस्थ-मंजलिं वहन् . विमुक्त-लोल-लोचनो ललाम-भाललग्नकः शिवेति मंत्र-मुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् ॥१३॥ 

गंगा काठच्या झोपडीत राहून निष्कपट होऊन, डोक्यावर नियमित हात जोडून, स्त्रीच्या चंचल लोचनांपासून मुक्तता मिळवून मंत्रोच्चार करत मी अक्षय सुख प्राप्त करेन..

इमम ही नित्यमेव-मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन्स्मरन्ब्रुवन्नरो विशुद्धि-मेति-संततम् . हरे गुरौ सुभक्तिमा शुयातिना न्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनम् ॥१४॥


या उत्तम शिव तांडव स्तोत्राचे नित्य पठण आणि श्रवण करून सर्व प्राणिमात्र पवित्र होतील.. योग्य मार्गाने जाऊन शंकराच्या चिंतनाने देहाला मुक्ती मिळेल..

-- अवनी गोखले टेकाळे.. 

1 comment:

  1. खूप खूप छान लिखाण झाले आहे.
    श्लोक आणि त्याखाली लगेच भाष्य
    यामुळे समजून घेणे अधिक सुलभ झाले..✍👌👌

    ReplyDelete