स्त्री साठी हा शब्द फारच जवळचा.. प्रत्येक उंबरठा ओलांडताना तिला साथ लागते ती सखीची.. नाते तेच पण प्रत्येक उंबरठ्यावर तिचे पदर उलगडत जातात.. विषय बदलत जातात.. या प्रत्येक उंबरठ्यावर अडखळते ती स्त्री.. आणि सावरते ती सखी..
पहिला उंबरठा शरीराला ओल फुटण्याचा, मनाला मोगरे फुलण्याचा.. तिथे सखी हात धरते.. उंबरठ्यावर थोपवते.. समजावते.. सोहळा सोहळा होते.. तुमच्या सोबत तीही खुलत असते.. फुलत असते.. मोहरत असते.. ती तुमची सखी असते सगळी गुपिते माहीत असणारी.. ती सखी असते तुमच्या सारी पाटाच्या सगळ्या चाली माहीत असणारी.. ती सखी असते तुमचे सगळे सृजन अंकुरत असतानाची तुमची पहिली प्रेक्षक.. जिला माहीत असते दाद ही द्यावीच लागते..
पुढचा उंबरठा लग्नानंतर माप ओलांडताना चा.. परत स्त्री बावरते.. घाबरते.. मोहरते.. अष्टपुत्री साडी होते.. हिरवा चुडा होते.. काळे मणी होते.. परत सखी हात धरते.. कधी कान पकडते.. उंबरठ्यावर थोपवते.. समजावते.. सोहळा सोहळा होते.. परत एकदा तेच.. तुमची सगळी गुपिते तिला माहित असतात.. संसाराच्या सारी पटावरील पडलेले असो, चुकलेले असो सगळी दाने तिला माहित असतात.. तुमच्या चाली माहीत असतात.. ती सखी असते.. तुमचे सृजनाचे सोहळे साजरे करणारी तुमची पहिली प्रेक्षक.. तिला कळलेले असते दाद ही मनातून यावी लागते..
पुढचा उंबरठा शरीर कोरडे पडण्याचा, मन कातर होण्याचा, चिडचिड वाढण्याचा, एकटे वाटण्याचा.. इथे परत सखी येते.. उंबरठ्यावर थोपवते.. समजावते.. स्त्रीत्व पार पाडल्याचे समाधान पसरते तिच्याही चेहऱ्यावर.. ती सोहळा सोहळा होते.. परत एकदा तेच.. तुमच्या सगळ्या कटकटी, सगळे आनंद सगळी गुपिते तिला माहित असतात.. सारी पटाची काही प्यादी शेवटच्या घरात पोचलेली असतात.. काही प्यादी परत उलटी फिरून मूळ घरात परतलेली असतात.. डाव नव्याने मांडण्यासाठी.. सखी ला सगळे माहीत असते.. तुमचे सृजन पूर्णत्वाला पोचताना साजरे करणारी तुमची पहिली प्रेक्षक.. तिला जाणवलेले असते दाद ही द्यावी माणसाने.. चांगले असते तब्बेतीला..
पुढचा उंबरठा निर्णायक.. मन निवृत्त होण्याचा.. जुन्या आठवणीत रमण्याचा.. विरक्तीत परत अवळे बोर खावे वाटण्याचा.. आणि तेवढ्यात उंबरठ्यावर सखी येतेच हातात गाभुळलेल्या चिंचा घेऊन.. हाही उंबरठा तुमच्या सोबत ती सोहळा सोहळा होते.. परत एकदा तेच.. तुमचा सगळा पट तिच्या समोर तसाच मांडलेला असतो.. सगळी दाने आता खेळून झालेली असतात.. तिच्या मदतीने तुम्ही अलावरपणे उंबरठा ओलांडून हक्काच्या घरात पोचता.. परत कुठला उंबरठा न ओलांडण्यासाठी.. तुमचे सृजनचक्र पूर्ण होताना पाहणारी तुमची पहिली प्रेक्षक.. आता मात्र तिच्या तोंडून एक प्रसन्न दाद जाते.. तुमच्या सारी पाटाला.. आणि पटावरचे शेवटचे दान ती खेळते.. तुम्ही अडखळत थांबलेले असता उंबरठा ओलांडून.. ती येते मागोमाग उंबरठा ओलांडून .. हात पकडते.. सावरते.. समजावते.. सोहळा सोहळा होते..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment