आषाढस्य प्रथम दिवसे!! हे ऐकल्यावर सगळ्यात पहिले आठवते ते मेघदूत. महाकवी कालिदास यांची अजरामर लेखणी आणि त्याची पहिली ओळ. संस्कृत च्या असलेल्या ज्ञानाप्रमाणे समजून घ्यायचे असे ठरवत होते त्यातच कॉलेज मध्ये असताना शांता शेळके यांचा स्वैर अनुवाद हातात लागला. एक एक संस्कृत चे कडवे आणि मग त्याचा स्वैर अनुवाद. सुख म्हणजे नक्की काय असते, याचा शोध लागला त्यात.
एक यक्ष. आपल्या पत्नीपासून एक वर्ष दूर राहिलेला यक्ष. त्यातील आठ महिने पूर्ण झाले. आता राहिले शेवटचे चार. त्यात त्याला दिसतो आषाढाचा पहिला मेघ. मग काय. त्यालाच दूत बनवून तो आपले हितगुज सांगतो. आणि मग तो मेघ त्याच्या पत्नी चा माग काढत अलंकापुरी पर्यंत पोहोचतो. आता तो मेघ निघतो. हा मार्ग काव्यात दाखवताना कवीची रसिकता बघा. भौमितिक नकाशा प्रमाणे उज्जैन हे या मार्गात लागत नसून पण तो वाट वाकडी करून त्या मेघाला जाता जाता तिथे जायला सांगतो. हा मार्ग, ते निसर्गवर्णन वाचून असे वाटते की कालिदासाने रामपुरी ते अलंकापुरी हे मार्गक्रमण पावसाळ्यात स्वतः केले असावे आणि तिथले निसर्गवर्णन वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच त्या मेघाची वाट वाकडी करायला लावली असावी.
प्रियकराचा प्रेयसी ला निरोप म्हणजे मेघदूत. आषाढाचे सृजनाचे निसर्गवर्णन म्हणजे मेघदूत. यक्ष आणि यक्षपत्नी ची विरहात असलेली तळमळ म्हणजे मेघदूत. डोळे मिटून खंडकाव्याचे स्मरण केल्यावर एखादी सहल अनुभवल्यासारखे वाटणे म्हणजे मेघदूत. उज्जैन, अलंकापुरी इथे प्रत्यक्ष फिरून आल्याचा भास निर्माण होणे म्हणजे मेघदूत. भाषेवर प्रभुत्व, चपखल विशेषणे म्हणजे मेघदूत.
सध्या प्रत्येक मनुष्य मनावर मळभ आलेल्या अवस्थेत आहे. कोणी बोलून दाखवतो, कोणी उसने अवसान आणतो एवढाच काय तो फरक. पण सृष्टी चे सृजनाचे काम थांबलेले नाही. आजही एक मेघ निघाला आहे दूत बनून. आषाढस्य प्रथम दिवसे.! तो निघाला आहे, निसर्गाचा संदेश घेऊन. तरारलेल्या, नव्हाळी आलेल्या पानापानांतून अंकुरणाऱ्या कोंबांतून, उमलणाऱ्या फुलाफुलातून तो साद घालत आहे. हे मळभ लवकर दूर होईल अशी अशा करूया. आणि तोपर्यंत या निसर्गाच्या सृजनाचा आनंद घेऊया. या आषाढ सारी प्रत्येकाच्या मनात एक प्रसन्नता घेऊन येतील, एवढीच प्रार्थना करूया. आजच्या दिवशी. आषाढस्य प्रथम दिवसे.!
-- अवनी गोखले टेकाळे
ता. क. तुम्हाला जर असेच वेगवेगळ्या पुस्तकांची उजळणी करायची असेल तर पुस्तक वाचन या लेबल खाली असे लेख एकत्र करायचा प्रयत्न करत आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
No comments:
Post a Comment