प्रिय मैत्रीण,
लिही म्हणजे कसं. कोणासाठी म्हणून नाही. लाईक, शेअर subscribe साठी नाही. स्वतः साठी. तुझ्या भोवती असलेल्या तेजासाठी. सत्वासाठी. तुला वाटल तर स्वतः पुरत ठेव. नको देऊ आम्हाला वाचायला. किंवा वाटले तर दे. ती तुझी मर्जी. पण लिहीत रहा.
तुझ्या मनातली घालमेल, तगमग, उलाढाल मांडत रहा. स्वतः च्या शब्दांनी स्वतः च्या मनाला उभारी देत रहा. अस्थिर मनाला स्थिर शब्दांनी सावरत रहा. मार्ग शोधत रहा. तुला खूप प्रश्न पडतील. तुझ्याकडे उत्तरे असतील ही. नसतील ही. लिहिताना तुझ्या नकळत एखाद्या वाक्यात तुला एक वाटेवर धरलेला कंदील दिसेल. त्याच्या ओढीने, त्याच्या दिशेने चालत रहा. उत्तरे त्या वाटेवर नक्की सापडतील सखे. म्हणून म्हणते लिहीत रहा.
सृजनशील मुलीला काय सुखावते माहीत आहे? तिचे स्वतः चे सृजन. त्याच्या कुशीत ती हेलपाटे खाते. रडते. कोसळते. आणि तेच तिला परत तोलून धरते. अधिक उंच जाण्यासाठी मार्ग दाखवते. आणि मग ती भरारी घेते आपल्या पिल्लांसाठी. उंच आकाशात. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे. ती भरारी तिच्या पिलांसाठी फार आवश्यक असते. कारण तिच्याच आधारावर ते मार्गक्रमण करत असतात. तेजाकडे. त्या तेजसाठी लिहीत रहा.
स्वतः ला सावर सखे. तुझी लेकरे तुझ्या कुशीत शिरायला असुसली आहेत. तू खंबीर हो. त्यांना पदराखाली घे. मायेच्या या उबदार सावलीत ती दोघं निश्चिंत विसावतील तेव्हाच शांत होईल. तुझ भिरभिरणारे मन. आणि मग शांत प्रसन्न अधिक तेजस्वी होईल ते तेज, तुमच्या भोवती तुमच्या नकळत अदृश्य रुपात अस्तित्वात असलेलं. त्या तेजासाठी लिहीत रहा.
आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत तुझ्या सोबत. कधीच एकट समजू नको. एक हाक मार. एक फोन कर. आम्ही सगळ्या लगेच येतो तुझ्यासाठी. तू म्हणशील तेव्हा. बोलावंसं वाटेल तेव्हा, रडावसं वाटेल तेव्हा आणि मुख्य म्हणजे या वेळी तुला खळखळून हसवायला आम्ही येत आहोत. हसशील ना सखे. तुझ्या गालावर खळी पडते का ग? पहिल्यांदा भेटलो तेव्हा पहायचं राहिलं. यावेळी दाखवशील ना.
खूप बोलावंसं वाटत आहे सखी. परत भेटलो की बोलूच. तोपर्यंत असे बोलत राहू.
-- तुझी वेडी, थोडी आगाऊ, तू मोठी असून पण तुला बेधडक नावाने हाक मारत असलेली तुझी मैत्रीण
अवनी गोखले टेकाळे
अ प्र ति म..लाघवी शब्दांचीच वीण..
ReplyDeleteशब्द न् शब्द प्रेरणादायी..ऊर्जादायी..!
हो, लिहित रहावं, स्वानंदासाठी..आत साठलेली, भळभळणारी वेदना बाहेर पडते..मनावरचा भार हलका होतो..इतरांसाठी नाही, काही गोष्टी स्वान्तसुखाय म्हणून करायच्या असतात..!
अवनी ताई, खूप छान चिंतन..✍👌👌🦋🦋
Thank you
Delete