Monday, June 21, 2021

"बाप" मुलं

आपण बाप माणूस म्हणतो ना. तशी ही दोन "बाप मुलं". मोठी मुलगी वय वर्ष २० आणि धाकटा वय वर्ष १८. नुकतीच सज्ञान, सुजाण झालेली दोन लेकरं. अचानक प्रौढ, प्रगल्भ झालेली दोघं भावंडं. बाप अचानक या दुनियेतून शरीराने निघून गेला. काही कळायच्या आत. दीड महिना झाला. पण जाता जाता एक चमत्कार म्हणजे आपली ऊर्जा दोन्ही मुलांमध्ये सामावून गेला. ते म्हणतात ना, बापाला कितीही दुःख झालं तरी रडायची परवानगी नसते. तसं काहीसं या मुलांचं झालंय. आई वर दुःखाचा डोंगर कोसळलेला. ती दुःखी कष्टी. तो डोंगर मुलांनी अलगद तोलून धरलेला. कुठून आली असेल ही ऊर्जा? म्हणूनच वाटलं की बापाने जाताना ऊर्जा सामावून दिली दोन्ही मुलांमध्ये. 

मुलांनी सगळं केलं. दवाखाना, हेलपाटे, धावपळ. मानसिक, शारीरिक आधार देणं. आणि मग खांदा देणं, दिवस करणं. सगळंच. दुःख याचं की आई इतकी कोलमडलेली की बिचारी लेकरं तिच्या कुशीत शिरून मोकळीच झाली नाहीत अजून. व्यक्तच नाही झाली अजून. ती फक्त सावरत आहेत आईला. तिची बिचारीची चूक नाहीच. ४५ वर्ष हे काही नवऱ्याचं संसार सोडून जायचं वय नक्कीच नव्हतं. 

एकच वाटतं. lock down संपल्यावर मुलांना लवकर त्यांचे जिवाभावाचे मित्र भेटावेत. काही वेळेला जे घरात व्यक्त होता येत नाही ते मित्रांच्या समोर व्यक्त होता येतं. त्यांच्या कुशीत शिरून मुलांनी धाय मोकलून, हमसून हमसून रडावं. मोकळं व्हावं. साचलेल्या भावनांचा निचरा व्हावा. आणि मग परत एकदा बाप माणसाने भरभरून दिलेल्या ऊर्जेत अलगद मिसळून जावं. 

आजचा father's day या दोघांसाठी dedicated. खूप खूप मोठे कर्तृत्ववान व्हालच. खंबीर तुम्ही आहातच. बाप माणसाने रडायचे नसते असे काही नाही लेकरांनो. समाजाने बापावर अकारण घातलेला बांध आहे तो. तो तोडून व्यक्त व्हा. हळवे व्हा. बोलते व्हा. मोकळे व्हा. 


-- अवनी गोखले टेकाळे 




No comments:

Post a Comment