सगळ्यात आवडते मराठी गाणे? एक नाही सांगता येत, खूप आहेत. पण मानाच्या गणपती मध्ये जसे मंडई आणि दगडूशेठ तसे मानाच्या मराठी गाण्यांमध्ये "जेव्हा तुझ्या बटांना" आणि "पाहिले न मी तुला'. ही दोन गाणी पाहिजेतच. असो. गाण्यांबद्दल खूप आहे लिहिण्यासारखे. त्याबद्दल विशेष एकदा. परत कधीतरी. आज मात्र फक्त जेव्हा तुझ्या बटांना.
लॉकडाऊन आणि करोना बद्दल खूप बोललो, आता नको बोलूया. पण तरी या लॉकडाऊन नी काय दिले असे कोणी विचारलेच तर पहिले उत्तर "केस" परत दिले. त्याबद्दल मंडळ आभारी आहे. सध्या बाहेर पडल्यावर छान केस वाढलेल्या मुली दिसायला लागल्या आहेत परत. परत म्हणजे, आम्ही शाळेत असताना हेच कॉमन होते. मधल्या दहा पंधरा वर्षात दुर्मिळ झाले होते.
शाळेत असताना काय बिशाद होती केसांची गळण्याची? चोपून तेल लावलेले, मधोमध मागेपर्यंत पाडलेला भांग, दोन वेण्या, रिबीन लावून एकदम टोकापर्यंत घातलेल्या. आणि मग इकडची वेणी तिकडे, आणि तिकडची इकडे. झोपाळे!! आठवडा भर एवढे शिस्तीत बांधलेले केस शनिवारी रात्री उलगडले जायचे. रात्रभर तेल चोपडून रविवार सकाळ शिकेकाई ने केस धुवायचा कार्यक्रम. शिकेकाई मधली रिठ्याची भरड कितीही केस धुतले तरी सोमवारी दोन वेण्या घालताना केसात थोडीशी सापडायचीच.
आणि मग कॉलेज चे वारे लागले. कॉलेज ने खूप काही दिले, पण काय गमावले? तर या दोन वेण्या गमावल्या आणि मग गम्मत निघूनच गेली केसांची. अभ्यास वाढला तसे आधी गळायला लागले म्हणून, मग सोयीच्या नावाखाली आणि मग फॅशन म्हणून कात्री लागली. आणि मग lab मध्ये, PL मध्ये केस गोल गोल गुंडाळून वरती एखादा क्लच बांधून टाकायचा. आणि बाहेर जाताना मोकळे सोडायचे. या नादात पार वाट लागली केसांची. लग्नानंतर तर मुंबई. धूळ, ट्रेन, प्रदूषण, पाणी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे इतर कामांच्या नादात दुर्लक्ष.
करोना आल्यापासून पार्लर नाही. कटिंग नाही. ऑफिस चे काम घरी बसून. तेल मालिश चा भर. घरी केलेले जास्वंदी चे आणि कढीपत्त्याचे तेल. डोके धुताना अंगणातल्या लिंबाचा रस. चोपून घातलेली एक वेणी. फरक एवढाच की शाळेत असताना दोन वेण्यांमधल्या एका वेणीची जाडी होती तेवढी आता एक वेणी ची जाडी झाली आहे, एवढे गळाले आहेत. पण हरकत नाही. देर आये दुरुस्त आये. शाळेची आठवण येतेय. परत वाढायला लागलेत मस्त. आता अंबाडा येतो केसांचा. सकाळी एकदा अंबाडा घालून टाकला की दिवसभर घरातली कामं करत करत, लॅपटॉप बडवायला आपण मोकळे.
आता एवढे कौतूक का या केसांचे आणि ते पण आत्ता? हल्ली तीस ची घंटा वाजली की केस कधी पण चंदेरी व्हायला लागतात. त्यामुळे पांढरे व्हायच्या आत लांब सडक काळे केस एकदा मिरवून घ्यावे म्हणते. आपल्या जगण्याकडून अपेक्षा फार माफक आहेत. त्यातली ही एक अपेक्षा. मातीत मांडी घालून बसले की उठल्यावर केसांना लागलेली धूळ झटकायला लागेल एवढे केस वाढवायचे आहेत. आधी होते तसे. परत एकदा. पांढरे व्हायच्या आधी. नंतर मग आहेच "बाला".
ता. क. या लिखाणात काही साहित्यिक मूल्य नाहीत. तसेच ज्यांना केस वाढवणे हे स्त्री पुरुष समानतेवर घाला वाटतो, किंवा बंधनात बांधल्यासारखं वाटतं अशा नारीवादी महिलांनी या लेखाच्या थोडे दूरच राहून आपल्या वाटेने चालत राहावे. काय आहे, हल्ली तोंडातून ब्र काढायची पण भीतीच वाटते. आपण काहीतरी सहज लिहायला जावे आणि कोण कधी कसले झेंडे घेऊन येईल काय सांगावे. बाकी ज्यांना आपल्या केसांचे कौतूक करायचे आहे त्यांनी मात्र विचार करा. आणि "बाला" व्हायच्या आत एकदा वाढवून बघाच. परत काही नंतर रुखरुख वाटायला नको.
-- "अवनी गोखले टेकाळे"
No comments:
Post a Comment