आज घराची पहाट थिरकली ती घुंगरांच्या तालावरच.. पलक बेभान होऊन नाचला.. आणि नाचतच राहिला.. एकेकाळी नकार देणारे डोळे आता फक्त भरून वहात होते..
*********************
पलक तसा लहान पणापासून अभ्यासात हुशार.. कायम पहिला नंबर गाठणारा.. शिक्षकांचा मान.. घरच्यांना अभिमान.. त्यात दिसायलाही देखणा.. तो जाताना कुठल्या मुलीने नजर वळवून पाहिले नाही असे झाले नाही कधी.. तसे पलक ला छंदही अनेक.. गाणे म्हणू नका, ट्रेकिंग म्हणू नका, swimming म्हणू नका.. सगळ्यात पुढे.. तसं तर नावं ठेवायला कुठे जागा नाही.. पण त्यातल्याच एका छंदाने त्याच्या शांत निवांत आयुष्यात वादळ घोंगावले.. पलक ला नृत्याची अफाट आवड.. नुसती आवड असते की बऱ्याच मुलांना.. गाणी लावून थिरकतात की बरीच पावलं.. पण पलक तेवढ्यावर थांबणार नव्हता.. त्याला पायात घुंगरू बांधून classical dancer व्हायचे होते.. त्यातच carrier करायचे होते.. आणि घरात पहिली ठिणगी पडली ती तिथेच.. "आपल्या घरात पुरुषांनी पायात घुंगरू बांधून नाचायला परवानगी नाही" असे म्हणत घरच्यांनी घुंगरू माळ्यावर टाकून दिले..
"हे उसासे तुझे भिंतीत कोंडलेले..
हे प्राक्तन तुझे भाळी गोंदलेले…"
पलक चा आक्रोश चार भिंतीत बंद झाला.. आणि शेवटी त्याने जगरहाटी स्वीकारली.. शिकून मोठ्या कंपनी मध्ये नोकरीला लागला.. पुढे जाऊन संसाराला लागला.. पण माळ्यावरचे घुंगरू त्याच्यातल्या कलाकाराला अस्वस्थ करत होते..
**********************
अचानक नियतीचे चक्र फिरले.. संचार बंदीने सगळ्यांना महिनाभर घरी बसवले..थोडेच दिवसात पलक ची छोटी मुलगी आराध्या घरी बसून कंटाळली.. तिचे मन गुंतवण्यासाठी पलक हरतऱ्हेने प्रयत्न करत होता.. त्याच्यामधला दबलेला कलाकार हळूहळू जागा होत होता.. आणि त्यात मुलीने एक दिवस माळ्यावर चढण्याचा हट्ट धरला.. तिचे कुतूहल जागृत होत होते माळ्यावर वेगवेगळ्या ठेवलेल्या गोष्टी बघून.. आणि त्यात तिचे लक्ष गेले पलक च्या घुंगरांवर.. भळभळती जखम परत एकदा उघडी झाली.. पलकच्या मनाने परत एकदा बंड पुकारले.. यावेळी त्याला साथ द्यायला सज्ज होती छोटी आराध्या.. आणि परत एकदा हळूच घुंगरू माळ्यावरून खाली आले..
आज घराची पहाट थिरकली ती घुंगरांच्या तालावरच.. पलक बेभान होऊन नाचला.. आणि नाचतच राहिला.. एकेकाळी नकार देणारे डोळे आता फक्त भरून वहात होते..
No comments:
Post a Comment