Tuesday, April 7, 2020

शब्दांचा जन्म

आज मी माझी शब्दांचा जन्म ही कविता सादर करत आहे.. 

शब्दांचा जन्म

तशी होतीच की चित्रलिपी, शब्द जन्माला येण्याआधी 
बोलायचे तेही खुणा करून, शब्द जन्माला येण्याआधी..
शब्दांचा जन्म नेमके काय साधून गेला??
जाता जाता समोरच्यावर एक घाव घालून गेला.. 

तसे कळायचे की तेव्हा पण चेहऱ्यावरचे भाव 
घ्यायचे की तेव्हा पण एखाद्या हृदयाचा ठाव
शब्दांनी नेमके काय तीर मारले?
समोरच्या काळजात कट्यारीसारखे घुसले.. 

एक अवनी, एक मानवजात, एक लिपी, एक खूण
एक होऊन एकमेकांचे जपत होते सारे ऋण
शब्द जन्माला आले आणि प्रांत सीमा रेखून गेले..
मानवाचे कपाळ त्याच्या मातृभाषेत गोंदवून दिले..

-- अवनी गोखले टेकाळे 

पुढची कडी जोडण्यासाठी मी चेतना ला आमंत्रित करते. 

No comments:

Post a Comment