Thursday, April 9, 2020

भरलेल्या आभाळाला एक सोनेरी किनार लावूया.. !!

माझ्या प्रिय लेखक आणि आणि कवी मित्रांनो,

आज पर्यंत आपल्या सगळ्यांना हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला असेल.. का लिहिता? लिहिता तर लिहिता मग वेगवेगळ्या ग्रुप वर का पोस्ट करता? तुम्हाला स्वतःचे कौतुक करून घ्यायचे असते का? जे सगळे जगतात तेच तुम्ही लिहिता त्यात वेगळं लिहायची आणि publish करायची काय गरज.. 

एकतर लेखन ही कला आहे, प्रतिभा आहे आणि ती सादर करायचा प्रत्येक कलाकाराला पूर्ण हक्क आहे.. आणि त्याहून महत्वाचा एक वेगळा दृष्टिकोन सद्य प्रतिस्थितीत मांडावा असे वाटते.. 

जेव्हा समाज एका स्थित्यंतरातून जात असतो तेव्हा त्या घटनेचे वर्णन, त्या वेळेला घडणारे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्तरांवर होणारे बदल, सामान्य जनमनात उमटणारा पडसाद त्या वेळच्या लिखाणातून जाणवत असतो.. किंबहुना तो जाणवावा.. त्याबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन आपण द्यावा.. आत्ताच्या वाचकांना त्यातून काही स्फूर्ती, प्रेरणा मिळावी आणि पुढच्या काही वर्षांनी हे लिखाण एक इतिहासाची नोंद असावी.. 

जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.. निराशेचे मळभ मनावर असताना, बंद खोलीत बसून एक सुंदर निसर्ग वर्णन करणारी कविता लिहिण्याची प्रतिभा फक्त कवी कडे असते.. ते वाचून थोडा वेळासाठी वाचकांनाही निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा आनंद तुम्ही देऊ शकता.. 

हो! हे फक्त तुम्ही करू शकता.. सामाजिक बांधिलकी जपण्याचे खूप मार्ग आहेत.. सेवा करायची आहे.. ज्याला जशी जमेल तशी करावी..  आपण या प्रकारे पुढे येऊया.. आपल्या परीने समाज प्रबोधन करूया.. सध्या फक्त  सकारात्मकता देऊया.. !! भरलेल्या आभाळाला एक सोनेरी किनार लावूया.. !!

-- अवनी गोखले टेकाळे !!

No comments:

Post a Comment