Tuesday, May 25, 2021

छंदासाठी वेळ कसा काढायचा? - "Defragmentation of time"

ही आपली नेहमीची तक्रार. दैनंदिन रोजची कामे करून आपल्याला छंद जोपासावे वाटतात. पण वेळ मिळत नाही. तो कसा काढायचा ते कळत नाही. मग आपले नेहमीचे बहाणे सुरु होतात. पाहुणे, आलंगेलं, जॉब, मुलांच्या परीक्षा, सणवार, लग्नकार्य. हे बहाणे आपणच देत राहतो स्वतः ला. एवढ्यावर पण थांबत नाही आपण, आपल्या ओळखीत कोणी तिचे छंद आवडीने जोपासत असेल तर "तिचं बरंय ग, तिला काय जातंय असल्या गोष्टी करायला, तिला काय काम असतंय" असे टोमणे मारायला पण कमी करत नाही. पण हा विचार करायला पाहिजे खरं तर, की तिला हा वेळ कसा मिळत असेल? आपण जर दिवसातला थोडा वेळ स्वतःच्या छंदासाठी दिला तर आपण दिवसभरातील रोजची कामे पण उत्साहात करू शकतो. 

ज्यांना छंद या शब्दाचा अर्थ कळला त्यांना लॉकडाऊन मध्ये कंटाळा आला नाही, ते डिप्रेशन मध्ये गेले नाहीत. बाकी जर नसतील काही छंद तर वेळेत सावध व्हायला पाहिजे. नाहीतर संदीप खरे ची "कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो, आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो" हे विधान आपल्या आयुष्याची टॅग लाईन व्हायला वेळ लागणार नाही. 

डिफ्रॅगमेंटेशन आपल्या भाषेतला शब्द. एखादी गोष्ट सेव्ह करायची असते पण मेमरी फुल्ल असा मेसेज येतो. म्हणजे ती मेमरी नसतेच का? तर तसे नाही. पण ती तुकड्या तुकड्यात विखुरलेली असते. एकदम छोटे निरुपयोगी तुकडे. मग डिफ्रॅगमेंट हे बटण दाबले कि असे सगळे तुकडे एकत्र येतात आणि हार्ड ड्राईव्ह वरती स्पेस तयार होते. आपले काम आहे त्याच जागेत व्यवस्थित पणे होऊन जाते. 

आपल्या रोजच्या आयुष्यात पण असे खूप तुकडे तुकडे असतात वेळेचे. जे आपण एकत्र केले तर त्यातून आपल्याला "वेळ" मिळू शकतो. आपल्या रोजच्या रुटीन मधले असे हाशहूश करताना चे पाच पाच मिनिट गोळा करायला सुरुवात केली तर त्याचा एकत्रित पणे थोडा वेळ तयार होऊ शकतो आणि तो आपल्याला आपल्या छंदांसाठी वापरता येऊ शकतो.

लिहायचे आहे पण वेळ होत नाहीये? मग भाजी चिरताना, अंघोळ करताना, प्रवास करताना ज्या विषयांवर लिहायचे आहे, त्याचा विचार सुरुवात करायची. हळूहळू दिवसभरात पाच पाच मिनिट करत त्या विषयावर विचार करायला वेळ सापडायला लागतो. विचार करून पूर्ण होणं ही लिखाणातली महत्वाची गोष्ट. अशी तुकड्या तुकड्यात विचार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की रात्री सगळे झोपल्यावर काही कळायच्या आत आपला लेख कागदावर उतरलेला असतो आणि शांत झोप लागते. हीच गोष्ट एखाद्या प्रोफेशनल प्रेझेंटेशन ची. 

आधीच्या बायकांकडून ही management आपल्या पिढीने शिकण्यासारखी आहे. Multi tasking. tv समोर बसल्या तरी हात चालूच. मग एखादी स्वेटर साठीची सुई विणून होईल, गवार मोडून होईल, वाती वळून होतील, गव्हले काढून होतील. व्हाट्स ऍप चे फॉरवर्ड सतत वाचण्यापेक्षा मोबाइल मध्ये जर किंडल वरती एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक डाउनलोड करून ठेवले तर दोन दोन पान करत कधी पुस्तक वाचून संपेल कळणार पण नाही. पाहुणे राहायला आल्यावर वेळ होत नाही म्हणल्यापेक्षा रात्री जेवण झाल्यावर गप्पा मारता मारता त्यांनाच समोर बसवायचे. त्यांचेच एखादे स्केच करायचे किंवा त्यांना पियानो वाजवून दाखवायचा. तेही खुश आपण पण खुश. 

आपलं जग deadline वरती चालते. manager बोलला की हे काम आज सात वाजेपर्यंत पूर्ण करा की दुनिया इधर की उधर हो जाये काम पूर्ण झालेले असते सात वाजता. पण आपल्या छंदांना आपण काही deadline लाऊन घेत नाही. आणि म्हणूनच ते आपल्या मनाच्या काठावर बसून राहतात, वाट बघत. कधी आपण त्यांना वेळ देतो याची वाट बघत. करून तर बघा वेळेचे डिफ्रॅगमेंटेशन. आणि वेगवेगळे छंद जोपासायचा प्रयत्न करून पहा. धावपळीत पण वेळ निघत जाईल. माझा तर झाला ब्लॉग लिहून. तुमचे काय? काढा वेळ तुम्हाला आवडती गोष्ट  करण्यासाठी. आणि जरूर फोटो काढून पाठवा. इतरांनाही प्रोत्साहन देत रहा. 

-- अवनी गोखले टेकाळे  

ता. क. माझे छंदाविषयी बरेच काय काय लिखाण आहे. ते हळूहळू करत एकत्रित करायचा प्रयत्न करत आहे. ब्लॉग च्या उजव्या बाजूला hobbies या लेबल वरती या विषयातील सगळे लेख एकत्रित वाचायला मिळतील. 

1 comment:

  1. मस्तच...कंप्यूटरच्या माध्यमातून छंद पुर्ण करण्यापर्यंत उदाहरणे देवून केलेले लिखाण...

    ReplyDelete