स्मिता काकूंच्या संग्रहातून - २५/५/१९९९
स्त्री जीवनात कोणकोणत्या भूमिका करते. सर्वप्रथम मुलगी नंतर पत्नी, सून, आई आणि शेवटी सासू. सासूची भूमिका फारच कठीण असते.
या भूमिकेच्या प्रवासात स्त्रीच्या मनातील भावना कशाप्रकारे परिवर्तित होत असतात व त्या भावनांना ती किती आनंदाने बदलत असते त्याचबरोबर स्वतःलाही बदलून घेत असते याचे वर्णन या कवितेत केले आहे. ही १९९८ साली दिवाळी विशेष अंकात छापून आलेली कविता संग्रहित केली आहे.
'स्त्री जन्माची जीवनगाथा' - "वैभवी" दीपावली महिला विशेषांक' १९९८
माता पित्याची सोनकळी
बाल्यामधली भातुकली
आजी नातीची लाडीगोडी
कौमार्यातली फुलवेडी
मधूनच स्मरायची थोडी थोडी
पण नाही कशात गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।१।।
मिळता बक्षिसे विद्यार्जनी
कौतुक केले आप्तजनी
जग जिंकण्याची ईर्षा मनी
पण नशिबाने टोला देताक्षणी
निराशेतूनही आशेला जगवायचं
पण नाही कशात गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।२।।
यौवनातली आकांक्षा
पती प्राप्तीची अभिलाषा
समान हक्काची अपेक्षा
पदरी पडती उपेक्षा
मनीच खंतावणं झाकायचं
नाही कशात गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।३।।
गृहस्थाश्रमी पदार्पण
सर्वस्वाचे समर्पण
मग विवाह बंधनात शिरायचं
नशिबावर सर्वस्व सोपवायचं
मिळेल त्यात समाधान मानायचं
आनंदात जीवन फुलवायचं
अन कर्तव्य कर्म निभवायचं
मग श्रीराम जयराम म्हणायचं ।।४।।
आता वंशवृद्धीची वेळ आली
जीवघेणी यातना अनुभवली
स्त्री जन्माची कसोटी दिली
अन बाळाच्या दर्शना आसुसली
आता त्यागाचं जीवन जगायचं
त्यातच सार्थक मानायचं
पण नाही कशात गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।५।।
आता गृहिणी धर्माचे पालन
करी अतिथ्यांचं अवलंबन
आबाल वृद्धांचं समाधान करीत
शेगडी पासून देवडी पर्यंत धावायचं
पण 'केलं' असं नाही म्हणायचं
मुकाट्याने सर्व सोसायचं
तटस्थ जीवन जगायचं
पण नाही कशात गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।६।।
आता प्रौढत्वाची जोखीम
अन मुलाबाळांचे संवर्धन
त्यांना मायेच्या शब्दांनी गोंजारायचं
शिस्तीच्या शब्दांनी बोलवायचं
सर्वस्व ओतून करायचं
करता करता झिजायचं
अन चीज झालं म्हणायचं
पण कशात नाही गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।७।।
आता आयुष्याची माध्यान्ही
व्याही विहिणीची देणीघेणी
किती केलं तरी पडतील उणी
दुर्लक्षून योग्य तेच करायचं
बोलून श्रेय नाही घालवायचं
गोड बोलून सर्वांना जिंकायचं
पण नाही कशात अडकायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।८।।
संसाराच्या सारीपाटावर खेळायचं
फक्त दान कसबान टाकायचं
काडीपासून हळूहळू जोडायचं
गाडीभरून दानधर्म खर्चायचं
भोग सोडून त्यागी बनायचं
मग परमार्थाकडे वळायचं
अन अलिप्त जीवन जगायचं
पण कशात नाही गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।९।।
आता बघता बघता साठी आली
मुलांची राज्ये सुरु झाली
सारी जीवनमूल्ये बदलली
आता दुसऱ्या स्थानावर सरकायचं
डोळे उघडे ठेऊन सारं पाहायचं
खटकल्या बाबींना टाळायचं
आणि गुणांचं कौतुक करायचं
कुणी विचारलं तरच सांगायचं
अन निवृत्त जीवन जगायचं
अन हळूच त्यातून सटकायचं
श्रीराम जयराम म्हणायचं ।।१०।।
आता दिसू लागला पैलतीर
मनी वाटे हुरहूर
आसवांचा वाहे महापूर
कारण मायेचा गुंता अनावर
तरी विवेकाने भावनांना आवरायचं
पण नाही कशात गुंतायचं
हळूच त्यातून सटकायचं
अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।११।।
आता ठरलेलं विधिलिखित ओळखायचं
झालं गेलं विसरायचं
क्षमस्व म्हणायचं
अन सर्वांना सांभाळा सांगायचं
सुकृताचं गाठोडं बांधायचं
अन परतीच्या प्रवासाला लागायचं
कृतार्थ जीवन संपवायचं
आणि आनंदात अनंतात विसावायचं
मग इतरांनी श्रीराम जयराम म्हणायचं ।।१२।।
-- सौ. स्मिता टेकाळे (प्रतिभा राऊतमारे)
ता. क. स्मिता काकूंच्या संग्रहातील सर्व लिखाण हे 'स्मिता काकूंच्या संग्रहातून' या लेबल खाली एकत्रित वाचायला मिळेल. ब्लॉग च्या उजव्या भागात वेगवेगळी लेबल लावून सर्व साहित्याचे वर्गीकरण केले आहे त्यात सापडेल.
Link - तुमचेच रहाट - गाडगे माझ्या लेखणीतून..: स्मिता काकूंच्या संग्रहातून (avanigokhale.blogspot.com)
No comments:
Post a Comment