Monday, May 10, 2021

स्मिता काकूंचे प्रसाद च्या वाढ दिवसा निमित्त मनोगत.

स्मिता काकूंचे प्रसाद च्या वाढ दिवसा निमित्त मनोगत. 

श्री स्वामी समर्थ 

रात्री प्रसाद ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि झोप लागली. सकाळी जाग आली व डोळ्यासमोर १० मे १९८० चा दिवस डोळ्यासमोरून सरकू लागला. मातृत्व लाभले तो दिवस.

असह्य वेदना सहन करत बाळाचा जन्म झाला. जवळ कोणीही नाही. आईचा व दत्त महाराजांचा धावा करत सोनेरी दिवसाचा जन्म झाला होता. जगामध्ये आईचा सन्मान बाळाने दिला होता. 

गर्भवती होते तेव्हापासूनचा काळ डोळ्यापुढे येत होता. यापूर्वी दोन गर्भपात झाले होते. यावेळेस मात्र मी स्वतःच डॉ. थेटे ना कल्पना देऊन उपचार केले होते. अम्मांना माझी पाळी आली नाही म्हणून कल्पना दिली होती कारण पूर्वी जे घडले ते पुन्हा घडू नये म्हणून. मनातील काही गोष्टी सांगण्यासाठी आईच नव्हती म्हणून सर्व काही अम्मांना  सांगावे लागत होते. स्त्री ला आई, बहीण व मुलगी असणे अत्यंत आवश्यक आहे. मनातील हितगुज फक्त यांनाच सांगता येते. 

गरोदर राहिले व शामकाकांचे लग्न ठरले. घरातील सर्व कामे चालू होती. जात्यावर दळण दळले तर बाळंतपण सोपे होते अशी भ्रामक कल्पना होती त्यामुळे निमूटपणे पालन सुरु होते. 

७ मे ला विवाह समारंभ पार पडला. दोन दिवस घरात खूप माणसे होती. आज सत्यनारायणाची पूजा होती. उत्साहाने सर्व कामे करत होते. पूर्वीपासून अम्मा व मी घरात लग्नाची कामे करत असल्यामुळे घरात कुठे काय ठेवले आहे याची माहिती मला होती. या धावपळीत मला त्रास व्हायला सुरुवात झाली. जुन्या विचारांचे लोक असल्यामुळे मी माझा त्रास फक्त प्रतिभा वहिनींना सांगितला. त्यांनी लगेच मला बीड ला आणले. लीला मावशी कडे ठेऊन त्या निघून गेल्या. लीला मावशी व मी डॉ. काळे बाईंकडे गेलो.  अजून खूप वेळ आहे तुम्ही घरी जा असे सांगितल्यामुळे परत घरी आलो. 

सत्य नारायणाची पूजा आटोपून हे बीड ला आले. रात्री मला दवाखान्यात नेण्यात आले. सकाळी ६.५० वाजता बाळ जन्माला आले. 

स्त्री जन्माची पूर्तता झाली. मला आई नसल्यामुळे माझी सर्व जबाबदारी अम्मांवरच होती. वडील त्यांच्या परीने आर्थिक व शारीरिक सहकार्य करत होते. 

बाराव्या दिवशी छोट्या प्रमाणात बारश्याचा कार्यक्रम झाला आणि नाव दत्त प्रसाद ठेवण्यात आले. आज प्रसाद चा ४१ वा वाढदिवस. परमेश्वरास व रामाईस नमस्कार करून माझ्या बाळास सुख, समृद्धी व दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना करते. माझ्या गुणी बाळाच्या कुटुंबावर रामाईची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहो. हीच प्रार्थना. 


-- सौ. स्मिता टेकाळे

No comments:

Post a Comment