ऍथलेटिक्स चे भीष्माचार्य - राम भागवत
ऍथलेटिक्स ही सर्व खेळांची जननी मानली जाते. कोणत्याही खेळाचा पाया हा ऍथलेटिक्स असतो. त्या ऍथलेटिक्स मध्ये राम भागवत हे नाव गेली साठ वर्षे तळपत होते. तीन ऑक्टोबर १९३२ रोजी भागवतांचा जन्म जळगाव मध्ये झाला. वडील इन्कमटॅक्स मध्ये नोकरीला असल्यामुळे सततच्या बदल्यांमुळे पहिली ते तिसरी प्रिथिन्सिस स्कूल धुलिया तर सहावी पर्यंत डॉन बॉस्को हायस्कूल मुंबई येथे त्यांचे शिक्षण झाले. सातवीला पुण्यात पेरूगेट भावेस्कूल तर आठवी ते अकरावी ते नु. म. वि. प्रशालेत होते. शाळेमध्ये कोणत्याही विशिष्ठ खेळाचे मार्गदर्शन नव्हते. पण आट्यापाट्या व खो-खो ते खेळत असत. १९४८ साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला व त्यांचे क्रीडा जीवन बहरू लागले. कॉलेजच्या बास्केटबॉल टीमचे ते व्हाईस कॅप्टन होते. पुढच्याच वर्षी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत त्यांनी पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले तर १९५२ साली मद्रास येथे झालेल्या चौदाव्या नॅशनल गेम्समध्ये त्यांनी तेव्हाच्या मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी महाविद्यालयाचे तत्कालीन क्रीडा संचालक बा. प्रे. झंवर यांनी भागवतांचे क्रीडागुण हेरत त्यांना बास्केट बॉल मधून ऍथलेटिक्स मध्ये आणले व पुढे आयुष्यभर ते ऍथलेटिक्स मध्येच रमले. पाच फूट आठ इंच उंच उडी मारून त्यांनी त्या वर्षी आंतरमहाविद्यालयीन ऍथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीत पहिला क्रमांक पटकावला. १९६० सालापर्यंत त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या व मग स्पर्धात्मक निवृत्ती स्वीकारली. या दरम्यान पुणे विद्यापीठाची B. Sc. पदवी त्यांनी मिळवली.
याच वेळी १९६१ साली पतियाळा येथे राष्ट्रीय क्रीडा संस्थेमध्ये एक वर्षाचा प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम सुरु झाला. या कोर्ससाठी परीक्षेद्वारे पुण्यातून श्रीराम भागवत(ऍथलेटिक्स), मोरेश्वर गुर्जर(जिम्नॅस्टिक्स), मिनू गोलंकारी(हॉकी) व भालचंद्र भागवत(कुस्ती) यांची निवड करण्यात आली. या चारही जणांना मिळून देशाला किमान शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून पदके मिळविलेले खेळाडू तयार करून आपली निवड सार्थ ठरवली. आजही क्रीडा मार्गदर्शकांमधील चार एक्के अशी त्यांची ओळख आहे.
या कोर्स मुळे १९६१ साली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्यात N.D.S. Instructor म्हणून नोकरीस त्यांनी प्रारंभ केला. कालांतराने क्रीडा मार्गदर्शक या पदावर त्यांची नियुक्ती झाली व १९९२ साली याच पदावरून निवृत्त झाले. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खाते उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
शासकीय नोकरी व्यतिरिक्त राज्यात अनेक ठिकाणी जाऊन भागवतांनी मार्गदर्शन शिबिरे घेतली. ठाणे येथील सिंघानिया हायस्कूल चे प्राचार्य नागराज राव यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता हेरत त्यांना दत्तक घेतले व त्यांच्या क्रीडाविषयक कोऱ्या पाटीवर अथक परिश्रम घेऊन दोन वर्षात उंच उडी व पोलव्हॉल्ट सारख्या तुलनेने अवघड क्रीडाप्रकारात राज्य विजेते घडवण्याचे काम भागवतांनी केले. त्यातील सोमा माळीसारख्या खेळाडूने मार्च १९८८ मध्ये चंदिगढ येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरव प्राप्त करत भागवतांचे कष्ट सार्थकी लावले.
पतीयाळाने स्वतःची नॅशनल कोचेस स्कीम तयार केली. त्या अंतर्गत मेहेरचंद धवन जे १९३२ साली तिहेरी उडीसाठी ऑलिम्पिकला गेले होते व पुढे अखिल भारतीय ऍथलेटिक्स महासंघाचे व आशियायी ऍथलेटिक्स महासंघाचे सेक्रेटरी होते त्यांचेबरोबर भागवतांनी कोल्हापूर, महाबळेश्वर आदी ठिकाणी अनेक प्रशिक्षण शिबिरे घेतली. तसेच १९७६ साली १७ मे ते ३ जून या कालावधीत राष्ट्रीय शालेय कोचिंग कॅम्प मध्ये मुलांना उड्या मारण्याचे तंत्र शिकवत बहुमोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनाबरोबरच ऍथलेटिक्स मैदानाच्या आखणीसह स्पर्धा आयोजनाच्या सर्व तांत्रिक बाबींचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आयुष्याच्या अखेरीपर्यंत जगभरातून या संदर्भातील पुस्तके व नियतकालिके त्यांच्याकडे येत असत. त्याचा अभ्यास करून त्यांनी स्वतःला खेळाच्या तंत्रामध्ये अद्ययावत ठेवले होते. वयाच्या ८८व्या वर्षी सुमारे ४०० पाने होतील एवढा फक्त जम्प्स या विषयावर लिहिलेला ग्रंथ त्यांच्या तळमळीची साक्ष देईल. १८ एप्रिल २०२१ रोजी या ग्रंथाचे प्रकाशन करायचा मानस त्यांनी बोलून दाखवला होता.
राज्य शालेय स्पर्धांसाठी उस्मानाबाद, मुंबई, नाशिक, रत्नांगिरी, सातारा, नांदेड, सोलापूर, जळगाव आदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील असंख्य जिल्ह्यांमध्ये ट्रॅक ची आखणी करणे तसेच उड्यांची व फेकीची मैदाने तयार करणे, स्पर्धेसाठी तांत्रिक प्रोग्रॅम तयार करणे आदि कामे भागवतांनी वर्षानुवर्षे केली. त्यामुळे ४०० मीटर्स चा ट्रॅक आखणे व भागवत असे समीकरणच होऊन गेले. १९९२ साली ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले, तेव्हा पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथे क्रीडानगरी उभारण्याचे काम चालू होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार व क्रीडाखात्याचे डिरेक्टर मोहन फडतरे यांनी खात्यामध्ये 'राम और श्याम' या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या भागवत आणि गुर्जर या जोडगोळीवर क्रीडानगरी मध्ये कोणते क्रीडा साहित्य खरेदी करायचे याची जबाबदारी सोपवली होती. अनेक रात्री एक-एक वाजेपर्यंत सेंट्रल बिल्डिंग मध्ये जागून या जोडगोळीने तयार केलेल्या याद्या आजही देशात आदर्श मानल्या जातात. याचबरोबर पुण्यातील सणस मैदानावर तयार झालेल्या सिंथेटिक ट्रॅक च्या तांत्रिक नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर पालिकेने भागवतांवर सोपवली होती.
अनेक वर्षे अखिल भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या तांत्रिक समिती मध्ये पेपर सेटर व परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले, तसेच १९८२ साली पुण्यातील नेहरू स्टेडियम मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये तांत्रिक प्रमुख म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
उंच उडी व पोलव्होल्ट सारख्या अवघड क्रीडाप्रकाराचे तंत्र सहज सोप्या भाषेत समजावून सांगणारे अनेक क्रीडालेख त्यांनी वृत्तपत्रातून लिहिले, तसेच वर्षभर दैनिक सकाळ मध्ये 'तंदुरुस्ती' हे सादर लिहिले. १९७८ साली त्यांनी ऍथलेटिक्स हे पुस्तक मराठी भाषेत लिहिले. सदर पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्याने परवानगी नाकारली तेव्हा त्यांच्या कामाची जाण असलेल्या खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'श्रीराम भागवत' ऐवजी 'राम भागवत' असे लेखकाचे नाव लिही. मी मा. क्रीडामंत्र्यांची प्रस्तावना मिळवून देतो असा सल्ला त्यांना दिला. अशा रीतीने श्रीराम भागवतांचे ते राम भागवत झाले आणि याच पुस्तकाला केंद्रीय क्रीडा खात्याचा राष्ट्रीय स्तरावरील स्पोर्ट्स लिटरेचर चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पाठोपाठ पुढच्या वर्षी रमेश तावडे यांच्याबरोबर लिहिलेल्या 'मैदानी स्पर्धा आयोजन व नियोजन' याही पुस्तकाला राष्ट्रीय पातळीवरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. गेल्या ४० वर्षात भागवतांच्या पुस्तकाचा अभ्यास केल्याशिवाय महाराष्ट्रातील एकही क्रीडाशिक्षक त्याची परीक्षा उत्तीर्ण झाला नाही असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
सरकारी नोकरी करीत असल्यामुळे कोणत्याही संघटनेत कोणत्याही पदावर काम करायचे नाही असे तात्विक दृष्ट्या ठरवले असल्याने जिल्हा अथवा राज्य संघटनेच्या कोणत्याही पदापासून ते दूरच राहिले. कदाचित त्यामुळेच अनेकांना दादोजी कोंडदेव अथवा द्रोणाचार्य सारखे पुरस्कार मिळवून दिलेल्या भागवतांच्या वाट्याला असे पुरस्कार आले नाहीत, पण याची त्यांना कधीही खंत देखील वाटली नाही. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स संघटनेने पहिल्या जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. तर त्यानंतर महाराष्ट्रीय मंडळाने कै. कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
आयुष्यात एस. पी. कॉलेज मध्ये शिकत असताना झंवर सरांनी दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन, स्पाईक्स वापरण्याची त्यांच्यामुळे मिळालेली संधी, आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स महासंघाने गौरविलेले मुंबईचे जाल पारडीवाला तसेच गुरुवर्य एस.आर. पटवर्धन यांचेबरोबर काम करण्याची मिळालेली संधी तसेच त्यांच्या कार्याचा व शिस्तीचा भागवतांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या सर्वांचे ऋण ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत मान्य करीत. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांची मुलाखत मी घेतली होती तेव्हा ८५ व्या वर्षी सुद्धा 'अरे मी ऍथलेटिक्स चा विद्यार्थी आहे तज्ञ वगैरे कोणी नाही' अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. सखोल अभ्यास, पारदर्शी स्वभाव, साधी राहणी व स्पष्ट विचार असलेल्या ऍथलेटिक्सचा हा दीपस्तंभ १८ मार्च २०२१ रोजी पहाटे तीन वाजता काळाच्या पडद्याआड गेला. देशातील गेल्या पन्नास वर्षातील पिढ्या घडविण्याचे सरांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. अतिशय निस्वार्थीपणे त्यांनी केलेल्या या सेवेची त्यांच्या पश्चात तरी योग्य ती दखल घेऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूयात. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
वसंत अवधूत गोखले
(लेखक राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स पंच व मार्गदर्शक आहेत.)
No comments:
Post a Comment