Saturday, May 27, 2023

संकोच

संकोच..

संकोच वाटला पाहिजे थोडा तरी.. त्यालाही.. तिलाही.. आयुष्य सरळ सोपं होऊन जातं.. त्याने तिच्याकडे पाहिले, तो जवळून गेला, त्याचा स्पर्श झाला, तो बोलला, तो हसला, तो चिडला, तो रडला, तो अस्वस्थ झाला.. हे सगळेच तिला जाणवत राहते अनंत काळ.. याच गोष्टी त्यालाही जाणवत राहतात तिच्या बाबतीत आणि मग त्यातून तयार होतो तो त्याचा, तिचा संकोच.. हा संकोच असला पाहिजे.. एका सीमा रेषेवर थबकून राहायला भाग पाडतो तो संकोच.. एका मर्यादेत बांधून ठेवतो तो संकोच.. तो संकोच लांघून पुढे गेले तर शरीर वाहवत जायला वेळ नाही लागणार पण तो लांघायचे प्रयत्न पूर्वक थांबवतो तो त्याचा, तिचा संकोच..!! 

तो लांबून येत असतो.. ती त्याला डोळे भरून पाहत असते.  तो जसा जवळ येतो तशी ती पार भिंतीच्या बाजूला सरकते.. उगाच त्याचा गडबडीत चालताना धक्का लागला तर.. त्यालाही ते जाणवते.. तोही जरा जास्तच जपून पुढे निघून जातो.. चुकून लागू शकणारा धक्का सावरतो तो तिचा संकोच..!!

नेहमी हातवारे करत बोलणारा तो नाजूक क्षण समोर आल्यावर मात्र हात आवरून, बाजूला सरकून, खाली मान घालून तिच्यासमोर उभा राहतो.. हळव्या क्षणी तो अधीर झाला नाही हे पाहून तिचा हरवत चाललेला धीर परत येतो.. त्या हळव्या क्षणाला सावरतो तो त्याचा संकोच..!!

तो तिला निरखून बघताना तिचे लक्ष जाते.. तिची धडधड वाढते.. तो तिचे वाढलेले श्वास मोजत तसाच धीटपणे उभा राहतो आरपार बघत.. समोर उभ्या पुरुषाकडे ती परत बघायचे टाळते आणि तिच्यातली स्त्री मान खाली घालून डोळे मिटून घेते.. तिच्या शांत होत जाणाऱ्या ओलसर धडधडी सोबत त्याचीही नजर परत शांत निर्मळ होत जाते. त्याच्या धीटपणाला सावरतो तो तिच्या मिटलेल्या डोळ्यातला संकोच..!!

पाणी पिताना तिच्या हातातले बाटलीचे झाकण पडते खाली. अशा वेळी लगेच तत्परता दाखवायची असते या नियमानुसार तो लगेच वाकून झाकण उचलतो आणि झाकण धरलेला हात तिच्या पुढे करतो.. ती नजरेने ते झाकण टेबलवर ठेवायचा इशारा करते.. ती गालातल्या गालात हसते.. आणि तो लाजतो.. एक पुरुष आपल्यासमोर लाजतोय हे ती बेभान होऊन बघतच राहते.. तो क्षण निसटत्या स्पर्शाच्या पलीकडे पोचतो आणि कित्येक पटीने अधिक थरारून सोडतो.. त्याच्या लाजण्यातून बहरत जातो, तिचा मोहरणारा संकोच..!!

सगळ्या जगाशी गप्पा मारत सुटणारे, तोंड भरून हसणारे ते दोघं.. सगळ्यांसमोर ते एकमेकांशी बोलतातही पण जुजबी.. दोघेच नेमके एकमेकांच्या समोर आल्यावर मात्र ते काहीच बोलत नाहीत.. ते हसत नाहीत.. ते नजर चुकवत पण नाहीत.. चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेऊन ते फक्त एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत पुढे जातात.. त्या क्षणात काळ थांबलेला असतो त्यांच्यासाठी.. त्या चार नजरांना, त्या शांततेला तेव्हा हजार जिव्हा फुटतात आणि प्रचंड बोलका असतो त्यांचा संकोच..!!

कित्येक लहान मोठे मोहाचे क्षण येत राहतात.. त्याच्या आणि तिच्या आयुष्यात.. संकोच त्या क्षणांना स्पर्शाच्या, शब्दांच्या पलीकडे घेऊन जातो आणि अमर करतो.. शब्द विरतात.. स्पर्श पुसट होतात.. पण त्याच्या पलीकडे पोचलेले उत्कट शाश्वत भाव कायम स्वरुपी सोबत राहतात.. नजरेतून अंतर्मनात कोरलेले अनुभव चिरंतन होतात.. अशा नात्याला नाव द्यावे वाटत नाही.. आणि नाव न मिळाल्यामुळेच ते तुटायची भीती पण राहत नाही.. आणि मग निरभ्र आकाशात, ताठ मानेने उंच भरारी घ्यायचे जो बळ देतो.. तो असतो त्याचा आणि तिचा संकोच!!!

-- अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment