तिला आवडते म्हणून..का? तर फक्त तिला आवडते म्हणून..
त्या घराच्या सारिपटावर प्रत्येक दान तिला हवे तसे पडलेले..
नागमोडी वळण, टुमदार घर.. त्यांचे तिच्यावाचून अडलेले..
घराचे कौलारू छप्पर पण त्यांनी तिला हवे म्हणून घातलेले..
तिच्या अवखळ अल्लड स्वभावासहित आपलेसे मानलेले..
तिच्या आवडीचा सोनचाफा अंगणात आजही बहरतोय..
बकुळ थकलेला आता, फक्त तिची वाट बघत लगडतोय..
घरातील भिंतीत, परसात अजूनही तिचा श्वास घुमतोय..
त्या वास्तूचा वास्तूपुरुष आजही तिला तथास्तु म्हणतोय..
का? त्या घराने इतका जीव का लावला? अन् तिने घराला?
का श्वास इतका गंधाळला? का गुंतत, रुतत, बहरत गेला?
ही जीवघेणी थट्टा का? कशासाठी?
घराला तिची आस अजूनही..
तिला घराचे भास अजूनही..
माहित आहे तिलाही.. त्यांनाही..
पण..
हा पण आत खोल जिव्हारी लागलेला..
तिला रूतू नये काटा म्हणून गुलाबच लावायचा टाळलेला..
सख्या, ती हरू नये म्हणून डाव मांडायचाच रे तू टाळलेला..
आज..
तिचे पाय थबकलेले.. हात मळवट भरण्यात गुंतलेले..
तिचे प्राक्तन.. तिचे मूळ.. आता पैलतीरावर रुजलेले..
तरी.. ती अढळ.. ती सढळ..
ती डोळ्यातला एक चुकार ओघळ..
तिला आठवतेय अजूनही..
चिखल होऊ नये म्हणून अंगणात केलेली ती पन्हळ..
पूर्वी तिच्या स्वप्नातला राजकुमार होता तो..
"ते" होते त्याचे घर.. तिचे घर..तिची माणसं..
आता ती पैलतीरावर.. सुखात आहेच ती..
समाधानी.. कारण ती कर्तव्यात चुकली नाहीच..
आता तिला या वळणावर मागे बघायचे नाहीच..
आता नाते बदलले.. अर्थ बदलले.. काळ लोटला..
पुलाखालून आता खूप पाणी वाहिले..
आता तर .. तेही माहेरच वाटते तिला..
माहेरी गेल्यावर.. गावच्या गल्ल्यात फिरताना..
एकदा.. फक्त एकदा.. दुरून का होईना..
ते गोकुळ सुखात बघायची फक्त सुप्त इच्छा..
तिने लावलेल्या सोनचाफ्याला न्हाऊ घालायची इच्छा..
तो सुगंध ओंजळीत घ्यायचाय तिला फक्त एकदा..
त्या मातीला घट्ट मुठीत घ्यायचे आहे फक्त एकदा..
सगळ्या माणसांना डोळे भरून पाहायचे एकदा..
बयो नियती.. तिने शेवटचे श्वास घ्यायच्या आधी..
तिची शेवटची इच्छा ललाटावर कोरून ठेव बयो..
एकदा.. फक्त एकदा..!!!
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment