तिच्या डोळ्याखालचे काजळ त्याच्या राखाडी नेत्रात..
त्याच्या गालावरची खळी तिच्या स्वप्नातल्या चित्रात..
तिने घेतलेला खोल श्वास..
त्याने घेतलेला अबोल ध्यास..
तिच्या गळ्यातून तळपायात उतरत जाणारा आवंढा..
त्याच्या नजरेचा पडत चाललेला राखाडी वेढा..
जाणवत राहते खूप काळ.. भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!
तिच्या मनात घातलेला मोरपिशी रंगाचा पिंगा..
नकळत त्याच्या वस्त्रांवर चितारलेला..
तिच्या गालावर घातलेला गुलाबी रंगाचा दंगा..
त्याच्या अनवट राखाडी नेत्रांवर मंतरलेला..
मनभर पसरलेले मोरपीस अन् रंगपंचमी चे उधाण..
देवघरात मंतरली, चंदन उगाळून झिजली सहाण..
जाणवत राहते खूप काळ.. भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!
त्याची राखाडी दाढी.. त्याचे राखाडी केस..
त्याच्या राखाडी नजरेची तिला पडलेली वेस..
कसले हे भास? कसले आभास?
मुरल्या सावळ्या नात्याची नवी राखाडी रास..
त्या गुंतलेल्या, चिवट, न विरणाऱ्या उणिवा..
का मोहरणाऱ्या, थरारणाऱ्या राखाडी जाणिवा..
जाणवत राहते खूप काळ.. भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!
त्या सटवाई ने कोरले आहे कधीच..
त्या सावळ्याची ती राधा आधीच..
त्याच्या भाळावर तिचे नाव..
तिच्या तळव्यावर त्याचे गाव..
फाल्गुनात भरून आलेले आभाळ..
अन् अवचित पालवी फुटलेला माळ..
जाणवत राहते खूप काळ..
भरून आलंय आभाळ..
त्याचेही.. तिचेही..!!!
-- © अवनी गोखले टेकाळे
" मनभर पसरलेले मोरपीस
ReplyDeleteअन् रंगपंचमीचे उधाण
त्याच्या भाळावर कोरलेले तिचे नाव
आणि ( मेंदीच्या नक्षीऐवजी) तिच्या
तळव्यावर त्याचा गाव..
फाल्गुनात भरून आलेले आभाळ
अन् अवचित पालवी फुटलेला माळ!"
अशा अनेक प्रतिकांमधून उलगडलेली भावकविता
वाचकाला एका वेगळ्या भाव-विश्वात गुंतवून ठेवते..!