Saturday, July 16, 2022

शांता प्रिया - ताई आत्या!!!

झाडांना पाणी घातले. थोडी कोरडी चटणी करून ठेवली. थोडे अध्ये मध्ये नातवंडांना खायला लाडू करून ठेवले. बरीचशी तयारी होत आली. चला आता जायला हरकत नाही. ही काही ट्रीप ला जायची तयारी नाही बरं. तिला जायचे होते केमो साठी. मग आल्यावर थकवा येतो. जास्त काही करणे होत नाही. नवरा, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडं सगळे भरपूर करतातच व्यवस्थित. भरपूर काळजी घेतात. पण इतके वर्षाची सवय. ती कुठे चैन पडू देते. म्हणून ही लगबग. पूर्वीच्या बायका म्हणायच्या तसे, नेटका आणि टुकीने संसार केला तिने. ती. आमची थोरली आत्या. ताई आत्या. 

काही व्यक्ती शांत बसल्यावर निवांत असताना आपसूक डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात. अगदी प्रसन्न व्यक्तिमत्वा सहित. शांता आत्या अशीच. एक नाव शांता आणि दुसरे प्रिया. दोन्ही नावे समर्पक. अशीच उभी राहते ती डोळ्यासमोर. चैत्र गौरीसारखी. छोटीशी. गोरी पान. चिरतरुण. गालावर उठून दिसणाऱ्या खळीचा आयुष्यभर पुरेपूर वापर केला तिने. सतत पोट धरून हसत असायची. आणि समोरच्याला पण तेवढेच हसवायची. कानात रिंगा. छोटासा पोनी टेल. चापून चोपून नेसलेली साडी. आणि कपाळावर ठसठशीत टिकली. लगालगा चालायची. रेंगाळलेली सुस्तावलेली चाल कधीच पाहिल्याचे आठवत नाही. पुलं चे म्हैस मधले सुबक ठेंगणी चे केलेले वर्णन ऐकून नेहमी वाटायचे आत्या तरुणपणी अशीच दिसत असेल बहुतेक.

आजारी असताना शेवटी नाकात नळी घातलेली. सलाईन लावलेले. तर त्यावर पण "ही आमची हत्तीची सोंड येते ना मध्ये मध्ये." म्हणत खो खो हसत आपलाच आजार हलका फुलका करण्याची कला कुठून अवगत झाली असेल तिला? मागच्या वर्षी केमकर काकू भेटलेल्या. त्यांनी आत्या ची सांगितलेली आठवण म्हणजे बेड वर असताना शेवटच्या दिवसात रस्त्यावरून जाणाऱ्या काकूंना आवाज देऊन "आमच्या आळूची बागेतली पाने वाढलेली दिसतायत हो भरपूर. घेऊन जा थोडी जाता जाता वड्या करायला" असा आवाज देणारी आत्या. इतकी ती एकजीव झाली होती त्या वास्तूत. 

आत्या आठवते तिच्यासोबत बंगला आठवतो. आम्ही कायम राहायला जायचो ते आठवते. हौद आठवतो. नारळाची झाडं आठवतात. तारेचे कुंपण आठवते. नवीन खोली वाढवल्यावर बांधलेला तिथला कठडा आठवतो. गच्ची आठवते. आणि या प्रत्येक ठिकाणी तिचा असलेला प्रसन्न वावर आठवतो. सुमेध दादाचे लग्न आठवते. तेव्हा खेळलेले जजमेंट आणि त्याचे पॉइंट्स अजून माझ्या शाळेच्या एका वहीच्या मागच्या पानावर आहेत. ती वही मध्ये सापडली आवरा आवरीत आणि आठवणी त्याच्या सोबत. आत्या, काका, दादा, वहिनी सगळ्यांसोबत केलेल्या ट्रीप आठवतात. दिवे आगर ला प्रिया ताक रुचकर आहे ग थोडेच घे, तुमच्याकडे कोकण असून नारळ थोडा कमीच घालतात का म्हणणारे काका. आई उंदीर म्हणत रात्री दचकून उठलेला सुमेध दादा. एकावेळी दोन फुल सुजाता मस्तानी खायची आत्या. वरती म्हणायची धर्मेंद्र म्हणता आले नाही पाहिजे इतकी जीभ आईस क्रीम ने जड झाली पाहिजे. आणि पोट धरून हसायची. भरभरून जगणारी आत्या आठवते.

माणसाची श्रीमंती कशावरून ठरत असेल? या प्रश्नाचे उत्तर आत्या गेली त्या दिवशी मिळाले. स्मशान भूमीत गेल्यावर बाहेर दुसरीच एक अंत्ययात्रा होती. आपण कोणाला काही बोलू नये. वेळ कधी कशी येईल काय सांगावे पण जेमतेम चार दोन माणसे. विधीला आवश्यक तेवढीच. तिथून आतल्या भागात गेलो. आत्या होती तिथे. भलामोठा हॉल गच्च भरून. माणसाला माणूस चिकटून. जागा नसलेले बाहेर थांबलेले. या दोन विरोधी दृश्यात जगाचे अंतिम सत्य कळले. त्या क्षणी आत्या जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होती. भरभरून प्रेम करणाऱ्या तिच्या गोतावळ्यात ती सुखी समाधानी होती.

तशी आठवण खूप वेळा येते. अश्विन च्या लग्नात प्रकर्षाने येत होती. प्रत्येकालाच. आत्या हवी होती. नातवाचे लग्न बघायला. नवीन पिढीचे पहिले लग्न. ती फुलाफुलांनी सजवलेली झालर बघून आत्याने एखादा खतरनाक डायलॉग मारला असता आणि आपण आजे सासू होणार आहोत हे विसरून पोट दुखेपर्यंत हसत राहिली असती. खरंच त्या दिवशी आत्या पाहिजे होती. मन भरून आशीर्वाद द्यायला. सुचेता ताई, अरविंद काकांसोबत त्यादिवशी आत्या हवी होती. 

आठवणी खूप आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा प्रश्न रामदासांना पडला कारण तेव्हा आत्या नव्हती त्यांच्या समोर. तिचे ते पोट दुखेपर्यंत प्रसन्न हसणे पाहून त्यांना असा प्रश्नच पडला नसता. कदाचित एक मनाचा श्लोक कमी असला असता ग्रंथात!!!

*************

ता. क. 
लिखाणात सुसूत्रता, बांधणी नेहमी पेक्षा कमी पडली असेल कदाचित. जसे डोळ्यासमोर येत गेले तसे लिहित गेले. मध्येच नुसतेच विचार करत बसले. परत थोडे लिहिले. म्हणून पण असेल कदाचित. 



No comments:

Post a Comment