पाच चाळीस चा त्याचा अलार्म..
पाच मिनिट त्याचा स्नुझ चा चार्म..
मोजून पाच मिनिटातच उरकायची..
उरली स्वप्न गोळा करून ठेवायची..
इतके वर्ष हे रोज असंच घडणार..
रोज तो अचूक सात सतरा पकडणार..
यंत्राने गुरफटलेला यांत्रिक तो..
मांत्रिक? त्याला कुठे आहे का जागा?
त्याचे त्यालाच अजून माहित नाही..
तसे तर त्याला बरेच काही माहित नाही..
बापाने तुळशी च्या लग्नाला गावी बोलावले..
बाळकृष्ण सोबत याला पण बोहल्यावर चढवले..
याच्या आयुष्यात काहीच फरक नाही पडला..
डबेवाला जाऊन फक्त घरचा डबा हातात पडला..
त्यादिवशी परत एकदा तेच रहाट गाडगे..
रोजचे तेच वाटेतले खाच खळगे..
पाच चाळीस चा त्याचा अलार्म..
पाच मिनिट त्याचा स्नुझ चा चार्म..
पण..!!
पहिल्यांदा ऑफिस मध्ये लेट मार्क लागला..
आमचा गडी त्यादिवशी धक्क्याला लागला..
निघालाच होता त्या दिवशी पण तो वेळेत..
पण..!!
त्या दिवशी दारातून बाहेर पडताना..
त्याने पहिल्यांदाच मागे वळून पाहिलेले..
अवघे नभांगण त्याच्या समोर अवतरलेले..
डोळा भरले काजळ तिच्या देहभर पसरलेले..
अंगांगात रोमारोमात चांदणे बहरलेले..
मांत्रिकाने आपले जाळे अचूक फेकलेले..
तिची आर्त, निश्र्चयी, नजर सक्त..
तिने नजर उचलून पाहिले फक्त..
आरक्त...!!!
कोणाचं काय तर कोणाचं काय. नऊ महिन्यापूर्वी ची गोष्ट. आम्हाला नवरात्रीत चौथ्या माळेला पेढे मिळाले. आणि आजची कथा सुफळ संपूर्ण. अजून काय पाहिजे.
No comments:
Post a Comment