आर्त आणि हेलावून टाकणारे काहीतरी हमखास कवितेचे रूप घेऊन येते. पक्की बांधणी असलेले विचार लेखाच्या स्वरूपात येतात. कधी खूप मोठी गोष्ट लिहाविशी वाटते. सुरू होते, होते पण एका भागात संपतच नाही. त्यातल्या पात्रांशी आपण समरस व्हायला लागतो. आपसूक त्याचे एकामागे एक भाग लिहिले जातात. आणि दीर्घकथा होते. लेखणी वर प्रभुत्व मिळाले, कमीत कमी शब्दात अचूक आणि मोठा आशय पोचविण्याची कला अवगत झाली की मग अलक जमून येते. हे सगळे इतके सहज सोपे नैसर्गिक असावे. ओढून ताणून अट्टाहासाने लिहिलेले वाचकाच्या मनाचा ठाव नाही घेऊ शकत. सुगरणीने लोणचे पण घालून बघावे आणि घरी पिझ्झा पण करून बघावा. तसे लेखकाने सर्व लेखन प्रकार हाताळून बघावेत. पण त्यात सहजता असावी. जशी कवितेत गेयता असावी तशी लेखातही लय असावी. ती येते फक्त सातत्य टिकवल्याने.
रोज जगा. रोज अनुभव घ्या. रोज लिहा. लिहिलेले किमान शंभर वेळा स्वतः वाचा. काना, मात्रा, वेलांटी, व्याकरण, शब्द रचना. आणि मग पूर्ण चिरफाड स्वतः केल्यावर मग इतरांना वाचायला द्या. आपण घराबाहेर पडताना आरशात मागून पुढून बघतोच ना. तसेच असते हे. उगाच सगळी घाई गडबड लिखाणात चांगली नाहीच पण वाचायला देताना तर अजिबातच नाही.
लिखाणाचा मूळ गाभा दोन भागात असतो. एक आपल्याला आलेले अनुभव. आणि एक म्हणजे आपण वाचलेली पुस्तके. या दोन्हींची छाप आपोआप आपल्या लिखाणात पडते. ती तशीच पडू द्यावी. बरेच लिहिणारे शून्य वाचन करतात. ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. दुसरे म्हणजे विषयाचे वैविध्य. त्यासाठी स्वतः ला कष्ट करून तसे अनुभव गाठीशी घ्यायला लागतात. मग ते आपसूक उतरतात लेखणीतून. आणि मग अशा वैविध्यपूर्ण लिखाणाला स्त्री, पुरुष, लहान थोर सर्व वयोगटातला वाचकवर्ग आपसूक मिळतो.
सगळे मोठ्या मोठ्या भाग वाल्या दीर्घ कथा लिहितात तर आपण पण तेच केले पाहिजे असे नाही. सगळे अलक लिहितात म्हणून आपण लिहिले पाहिजे असे नाही. आपले विचार मुक्तछंद उतरू द्यावे एका लयीत. आपल्या ठसक्यात, आपल्या बाजात, आपल्या शब्दात. असे लेख चोरता येत नाहीत. कारण त्यावर आपल्या शैली चा कॉपीराइट असतो. जसे कौस्तुभ केळकर यांचे लेख. पहिल्या वाक्यात कळून जाते हेच ते नगरवाला. छोटी छोटी वाक्य आणि नावीन्यपूर्ण विशेषण वापरलेली. मग खाली नाव लिहा नाहीतर नका लिहू छाप पहिल्या वाक्यात त्यांनी सोडलेली असते. तीच तऱ्हा सोळा डबे वाल्या म्हाळसा कांत यांची. पहिल्या वाक्यात कळते हे प्रशांत कुलकर्णी.
अशी शैली निर्माण करायला खूप चिकाटी लागते. सातत्य लागते. शब्द संपदा. आणि लागतो तो सरस्वती चा वरदहस्त. या साहित्य दिंडीचे आपण सर्वच वारकरी. कोणाला नावे ठेवण्याचा हेतू नाही. मी कोणी लेखक पण नाही. पण वाचक म्हणून काय वाचायला आवडेल याचा अभ्यास पक्का असलेली एक वाचक म्हणून थोडे लिहिले एवढेच.
-- अवनी गोखले टेकाळे
👍
ReplyDeleteGood
ReplyDelete