Saturday, October 19, 2024

ठेहराव

ठेहराव..!!

दिवस charming असायला हवा तर ठेहराव हवाच. असं एक वाक्य सहज मागच्या ब्लॉग मध्ये लिहिलं होतं तर वाटलं की विषय मोठा आहे. या शब्दावर वेगळा ब्लॉग लिहायला पाहिजे. दिवसभरात एक तरी गोष्ट जी घर, ऑफिस, सणवार, लग्नकार्य, मुलांच्या परीक्षा, मोठ्यांची आजारपणं, पाहुणे या आपल्या day to day routine ला tangent गेली पाहिजे. जी आपल्याला प्रचंड energy देऊन जाते. ती गोष्ट म्हणजे ठेहराव. जगण्यातला आनंद परत मिळवून देतो तो ठेहराव. कशात असतो तो? एकदम छोट्या छोट्या क्षणात. मोठे काही मिळवायच्या नादात तो फक्त निसटून जायला नको. 

बुद्धिबळाचा डाव हरत आलेला असतो पण एक प्याद जे शांतपणे सात घर चालत जात ना, ते न मरता शेवटी नव्याने जिवंत होऊन वजीर बनतं आणि मात करतं. त्या नव्या वजीरात, त्या हुकुमाच्या एकक्यात तो ठेहराव असतो. कधी तो डोळे मिटून शांत बसल्यावर गुलजार च्या लिखाणात सापडतो तर कधी लताच्या आवाजात. कधी मेघमल्हार रागात तर कधी गिटार च्या बेस मध्ये. नारळी पौर्णिमेला कोकणात उधाण आलेल्या समुद्राची गाज ऐकताना खड्या आवाजात शिवतांडव म्हणताना तो असतो तर कधी लोहगडाच्या विंचू काट्यावर गारव्याने शहारताना हळुवार सुप्रभात म्हणताना तो असतो. कधी खिद्रापूर च्या कोरीव मंदिरात किरणोत्सर्ग बघताना तर कधी आकाशात चंद्राचे खळे पडताना. कधी पहाटेच्या दवात गवतात अनवाणी फिरताना तर कधी संध्याकाळी अनपेक्षित संधिप्रकाश पडल्यावर आकाशात जी रंगाची उधळण होते त्यात तो भेटतो.

घामाने चिंब भिजल्यावर नकोसे होते ना आणि मग एकदम ट्रेन मध्ये सोनचाफा दरवळतो, त्या गंधात तो असतो. कधी तो सोनसळी अमलताश उमलताना असतो तर कधी रात्रीच्या ब्रम्हकमळात. कविता लिहिताना वृत्तात बसत नाही म्हणून कमी जास्त शब्द करताना मूळ भाव पोचेनासे होतात कागदावर आणि मग शेवटी त्या बंधातून मुक्त होऊन मनातले विचार नकळत एकसंध उतरत जातात ना त्या गद्य मुक्तछंदात तो असतो. उन्हाने तगमग होत असताना एकदम श्रावणसर येऊन इंद्रधनुष्य उमटते आणि मागून मातीचा जो सुवास येतो ना त्यात तो असतो. अस्वस्थ चाललेल्या दिवसात झोक्यावर बसल्यावर तो जी लय देतो ना मनाला त्यात ठेहराव असतो आणि तोच मोटारसायकल चा speedometer गरकन फिरला की पण मिळतो. कधी तो भरतकामाच्या कशिदा टाक्यात मिळतो, कधी water colour च्या pallet मध्ये. कधी तो गावी अंगणात लावलेल्या आंब्याच्या झाडाखाली मिळतो तर कधी मुंबईच्या गॅलरी मधल्या छोट्याश्या कुंडीतल्या मधु मालती च्या रोपात सुध्धा उमलतो. कधी रवाळ तूप कढत आल्यावर तर कधी तो बरक्या फणसाच्या सांदणात असतो. ओवाळणी चे पैसे जमवून छोटा गल्ला साठविण्यात पण तो असतो आणि शेअर मार्केट मधल्या बेलगाम नशेत पण तो असतो. 

मित्रांसोबत गप्पांची रंगलेली मैफिल म्हणजे ठेहराव. आपल्याकडे निरखून बघताना त्याच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव मनात साठवून ठेवणं म्हणजे ठेहराव. पोटातून पहिल्यांदा बाळाने लाथ मारल्यावर झालेली जाणीव म्हणजे ठेहराव. लहानपणी भावंडांबरोबर गच्चीत भुताच्या गोष्टी ऐकताना न घाबरल्याची acting करणं म्हणजे ठेहराव. सोवळ्यात नैवेद्य केल्यावर सासूच्या चेहऱ्यावरचे सात्विक समाधान म्हणजे ठेहराव. पळती लोकल पकडणं आणि रात्री घरी पाऊल टाकल्यावर नवऱ्याने गरम ताट हातात देणं म्हणजे ठेहराव. गावच्या अंगणात हळव्या झालेल्या सासर्यांच्या मनाला जपण म्हणजे ठेहराव. आजीच्या पैठणी सोबत टपोऱ्या नथीच्या आकड्यात तो आजही गुंतलेला असतो. हे असे छोटे छोटे क्षण जगायला शिकवलं त्या घरच्यांचे संस्कार म्हणजे ठेहराव. 

नवरंग, नवरस, मन, भावना, निसर्ग, छंद, मित्रपरिवार, आप्तेष्ट या सगळ्याचा मिळून जो अर्क आपल्यात झिरपत असतो. तोच तो. आपला ठेहराव. पैशात न मोजता येण्यासारखा. निखळ. निर्मळ. आतल्या आवाजाचा ठाव घेणारा. ठेहराव.  

तुमच्यासाठी काय आहे या शब्दाचा अर्थ? कमेंट मध्ये लिहून सांगा आणि एकदा आपल्या आतल्या आवाजाला सांगा, रोजच्या धावपळीत त्याला सांभाळायचे फक्त. बाकी पुढच्या ब्लॉग मध्ये कुठला विषय वाचायला आवडेल तेही सांगा. भेटत राहूच माझ्या ब्लॉग पेज वर.
 
-- अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment