Saturday, June 25, 2022
महालक्ष्मी
Thursday, June 23, 2022
"अ"लक का लक
Wednesday, June 22, 2022
काय मग, ठरवलं का?
Monday, June 13, 2022
शब्द संचय - घर
घराचे प्रकार
घर - आलय, गृह, सदन, निकेतन, निवास, भवन, धाम
झोपडी - खोपा, कुटी
पर्णकुटी - बांबू, काठ्या, पाने यांनी बनवलेली झोपडी, कुडाची घरे
इमारत - अनेकमजली वास्तू
गगनचुंबी इमारती - गगनाला भिडतील अशा शहरातील उंच इमारती
कौलारू घरे - जास्त पावसाच्या प्रदेशातील उतरत्या छपराची घरे
माळवदाची घरे - सपाट छप्पर असलेली कमी पावसाच्या प्रदेशातील घरे
चौसोपी वाडा - चारी बाजूंनी व्हरांडे असलेला वाडा
चिरेबंदी वाडा - चिरांचे बांधकाम असलेला वाडा
घराचा बाह्यभाग -
ओसरी - घराच्या पुढच्या बाजूला असणारी बांधलेली जागा. हिला समोरून भिंत नसते. शेतातले गडी माणसांचे चहा पाणी करायची जागा. आल्या आल्या विसावा घ्यायची जागा
माजघर - ओसरी आणि मूळ घर याच्या संबंधित असणारी बांधलेली जागा.
बाळद / लादणी - धान्य साठवणी ची जागा
सोपा - व्हरांडा
अंगण - घरासमोरची मोकळी जागा
वृंदावन - तुळशीची रोपे लावायला बांधलेली जागा
सोपं - घरासमोरच्या पायऱ्या
पडवी - मागच्या बाजूचा बांधलेला व्हरांडा
परस - घरामागची रिकामी जागा
वाडी - परसाच्या मागे असलेली मोठी बाग
आड - घराच्या बाह्य भागात असलेली छोटी घरगुती विहीर
पोहरा - विहिरीतून पाणी शेंदायला गोल बुडाची बादली सारखी वस्तू
रहाट गाडगे - विहिरीवर बसवलेले गोल चक्र म्हणजे रहाट आणि गाडगे म्हणजे मडके. मडके दोरीला बांधून ते चक्राला बांधलेले असते. पाणी शेंदायला उपयोग होतो
दोण - विहिरीतले पाणी लाटून यात साठवले जाते.
कुंपण - घराची वेस ठरवणारी अंगणाच्या भोवतीची रचना. काटेरी/बांधीव/झुडूप किंवा बांबू पासून बनवलेली
परसदार - परसाच्या मागचा दरवाजा
दिंडी दरवाजा - घराच्या समोरचा दरवाजा
वेगवेगळ्या खोल्या
बैठक - घरातल्या आणि आल्या गेल्याला ऊठ बस करता येईल अशी पहिली खोली
शयनागार - शयन कक्ष
स्वयंपाक घर - मुदपाक खाना, भटार खाना
देवघर - देवासाठीची स्वतंत्र खोली
विटाळशी/बाळंतिणीची खोली - बाजूला बसलेल्या किंवा बाळंतीण बायकांसाठी ची खोली
न्हाणीघर - स्नानगृह
तळघर - घराच्या खाली असलेली खोली. साठवणी चे सामान ठेवायला. हल्ला झाला तर लपून बसायला किंवा तिथून दुसऱ्या गल्लीत बाहेर पडायचे गुप्त रस्ते काढलेले असायचे.
मोरी - धुणं भांडी करायची जागा
कोठीघर - स्वयंपाक घराला लागून असलेली खोली. जास्तीचे साठवणी चे सामान ठेवायला
पोट माळा, माळा - खोलीच्या वर काढलेली जागा. जास्तीचे सामान ठेवायला
घरासंबंधित रचना
कोनाडा - माजघर आणि शयन गृह याच्या भिंतीत केलेली, छोट्या गोष्टी ठेवायला केलेली जागा.
छत - छप्पर
माळवद - कठडा नसलेले छप्पर
वळचण - छताखालील जागा
रसंधीची जागा - अडचणीची जागा
कडी कोयंडे - साखळीसारखी रचना असलेली कडी आणि ती अडकवायला गोलाकार रचना
कौले - बांबू च्या छतावर घातलेली कौले. साधी/मंगलोरी. मंगलोरी जास्त टिकाऊ आणि मजबूत
पन्हाळे - छतावर पडलेलं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी केलेली जागा
पत्र पेटी - अंगणातील मुख्य दरवाज्या शेजारी लावलेली पेटी
जिना/सोपान - वरच्या मजल्यावर जायला पायऱ्या
गच्ची - छत
गवाक्ष - खिडकी, तावदाने
कवाडं - दार, दरवाजा
झरोका - खोलीच्या वरती खेळती हवा, उजेड यायला केलेली सोय
माडी - वरचा मजला
पहिला माळा, दुसरा माळा - पहिला मजला, दुसरा मजला
अडसर/अडणी - जाड लाकडाचा एका भिंतीतून दुसऱ्या भिंतीत ढकलायचा ओंडका
देवळी - कंदील, दिवे ठेवण्यासाठी खोलीत केलेली सोय
खुंटी - कपडे लटकवायला केलेली दाराच्या मागे सोय
हौद - पाणी भरायला बांधलेली रचना
पावठाण - पायरी
उंबरठा - खोलीच्या दारात प्रवेश करण्याची जागा
*************
ता. क.
स्वयंपाक घर, घरात वापरले जाणारे सामान याचा शब्द संचय खूप मोठा आहे. तो वेगळ्या भागात देण्यात येईल.
-- अवनी गोखले टेकाळे
Tuesday, June 7, 2022
पाऊलवाट
आपल्या नजरेसमोर असावीत फक्त कालची आपलीच पावले.
त्यांचा मागोवा घेतच आजचे पाऊल टाकायचे.
हे आणि एवढेच खरे.
आपले ध्येय ही तेच, साथीदार ही तेच, साक्षीदार ही तेच.
प्रत्येक व्यक्तीच्या पावलांची दिशा त्यांच्या आधीच्या रस्त्याप्रमाणे ठरलेली असते.
आपण दुसऱ्याच्या पावलावर पाऊल टाकायला गेलो तर ते जमेलच असे नाही.
पण आपल्या कालच्या पावलावर अधिक प्रभावी पणे आजचे पाऊल पडणे जास्त महत्वाचे.
एक दिवस आपला इच्छित पैलतीर दिसेलच आपल्याला.
आणि मग मागे वळून एकदा बघायचे फक्त.
त्र्ययस्थ नजरेने आपसूक तयार झालेली पाऊलवाट निरखायची फक्त.
भले भले थबकलेले दिसतील ऐलतीरावर. भांबावून.
हा तीर पार करणे सोपे नव्हते कधीच.
जिद्द, हिम्मत, मेहनत, मेधा, इच्छा यांचे एकत्रित ठसे उमटलेले दिसतील.
आपल्याच पाऊलवाटेच्या शेजारी अजून एक पाऊलवाट. जीवन साथीदाराची.
पसरेल मग चेहऱ्यावर आपोआप शांत, निरागस, समाधानी भाव.
आंतरिक शक्ती ची प्रभावळ उमटेल शांत चेहऱ्याभोवती.
आपण अधीन व्हावं. आपल्या पावलांनी मागोवा घेत जावं.
श्री महासरस्वती चा. श्री आदीशक्ती चा.
मागे वळून बघताना लक्षात येईल. श्री महालक्ष्मी आपसूक आलेली असेल.
आपल्या भगिनींचा विरह सहन न होऊन.
हे आणि एवढेच खरे.
आपल्या पाऊलवाटेचा आता एक महामार्ग झालेला असेल.
अनेक पावले त्या पाऊलवाटेची कास धरून पैलतीरावर येताना दिसतील.
त्यांना तिथेच थांबवत एकदा सांगावे. जिथून आपण सुरुवात केली होती.
आपल्या नजरेसमोर असावीत फक्त आपलीच पावले.
त्यांचा मागोवा घेतच आजचे पाऊल टाकायचे.
हे आणि एवढेच खरे.
-- अवनी गोखले टेकाळे
Tuesday, May 10, 2022
फोडणीचे वरण/आमटी/सार
Thursday, April 21, 2022
भावना...
Tuesday, April 12, 2022
Intraday Options Trading- अर्थातच!!! 📉📈
Monday, March 14, 2022
पुनश्च हरी ओम
Thursday, February 24, 2022
फासा
ते नाही का. आपण शाळेत असताना खेळायचो. तोच खेळ. कानगोष्टी. त्यात कसं होतं ना. सगळ्यांनी गोल करून बसायचं. एका व्यक्तीने एक वाक्य बोलायचं दुसऱ्याच्या कानात. त्याने तिसऱ्याच्या. आणि मग जो सगळ्यात शेवट बसलेला व्यक्ती असतो त्याने ते मोठ्याने सांगायचे. मग बघायची गम्मत की खरे वाक्य काय होते आणि त्याचे शेवटी काय झाले. म्हणजे आपल्याला शिकवतात लहान असतानाच हा खेळ. पण आपण तो समजून घेत नाही. अगदी जाणते होईपर्यंत. सावरले पाहिजे वेळेत. ओळखले पाहिजे त्या व्यक्तीला. आपल्या बोलण्याचा ध चा मा करून आपल्या पाठीमागे दुसऱ्याच्या कानात सांगून कधी आपल्याला टपली मारून जाईल आणि आपला गैरफायदा घेऊन स्वतः ची पोळी खरपूस भाजून घेईल सांगता येत नाही.
तीच गोष्ट बुध्दी बळाची. वजीर आणि त्याच्यामागे एखादा प्यादा. एवढे पुरते चेक मेट व्हायला. समोरच्या वजिराला चार हात लांब ठेवलं पाहिजे. आणि आपल्या वजिरावर विश्वास ठेऊन त्याला जपून ठेवला पाहिजे शेवट पर्यंत.
आणि मग शिकलेला सारीपाट. अंतिम सत्य. हिम आच्छादित शिखरावर उमा महेशाने मांडलेला भव्य सारीपाट. तिथे पोचायचे आणि त्या दोघात आपण विलीन व्हायचे. खूप लांबचा प्रवास आहे. जन्म मृत्यु चा पूर्ण फेरा.तोपर्यंत आपल्या परीने खेळत राहायचे. भातुकली चा डाव मांडत राहायचे. हरण्या जिंकण्या पेक्षा खेळत राहणे महत्त्वाचे. शिकत राहणे महत्त्वाचे. शेवटी फासे टाकणारी नियती. आपण फक्त प्यादे होऊन दान पत्करत जायचे.
-- अवनी गोखले टेकाळे
Thursday, February 3, 2022
ती सीमा. तो रमेश.
Saturday, January 22, 2022
#माझे काम, माझा अभिमान
#माझे काम माझा अभिमान
Monday, January 17, 2022
खोली
Thursday, January 13, 2022
कोण तो आमचा?
Wednesday, January 12, 2022
"अर्थातच" Bullish!!!
Share market ची ऐशीतैशी. ब्लॉग च नाव? "अर्थातच" Bullish!!!
ही "त्यांची" गोष्ट. त्यांना नाव नाहीच काही. तुमच्या आमच्यातलेच ते. सामान्य, मध्यम वर्गातले. टुकीने संसार करणारे. त्यांचीही काही स्वप्न आहेत. छोटीशी. आणि ती स्वप्न पूर्ण करायला धावणाऱ्या त्यांचीही गाठ पडते अर्थातच "अर्थाशी". वित्त, अर्थ हे झाले मोठ्या माणसांचे शब्द. त्यांना कळतो तो सामान्य बोलीभाषेतला शब्द - पैसा!!
ते शिकत असतात ना शाळेत, कॉलेज मध्ये. तेव्हा त्यांचे सगळ्यात कुठल्या विषयाशी वाकडे असते तर ते अर्थशास्त्र या विषयाशी. Debit credit हे शब्द त्यांना दुरून पण ऐकले की पळून जावे वाटते. असे ते. आणि मग शिक्षण संपल्यावर त्यांच्या लक्षात येते ज्याच्यापासून इतके दिवस पळत होतो त्याच्यापासून सुटका नाहीच आता. आणि मग बरेच पर्याय हिंडून फिरून कधी ना कधी येतातच ते इकडे. Share Market!! ९ ते ३.३० मध्ये चालणारी ही झगमगती जादुई दुनिया.
एका रेषेत चालणाऱ्या दोन मुंग्या समोरासमोर आल्यावर काहीतरी बोलून पुढे जातात. तसे दोन ट्रेडर्स समोरासमोर आल्यावर bullish, bearish, nifty, sensex, put, call, options, futures, ipo, दोन लॉट- चार लॉट अशा अगम्य भाषेत काहीतरी बडबड करतात. त्याच्यासोबत सतराशे साठ कंपन्यांची नावं घेतात. आणि बाकीचे त्यांच्याकडे एलियन कडे बघावे तसे तसे बघत असतात.
त्यांना वाटत असतं. shares म्हणजे पैसे बुडाले. shares म्हणजे फार वेळ देऊन करायची गोष्ट. आमच्याकडे तेवढा वेळ नाही. सकाळी ना मला डबे करायचे असतात. सकाळी ना मला आवरून ऑफिस ला पोचायचे असते. सकाळी ना मुलाला शाळेत सोडायचे असते. आमच्याकडे गुंतवायला तेवढे पैसे नाहीत. आमच्याकडे ना आज पैसे आहेत पण उद्या मला ते लगेच परत लागू शकतात मी पाच पाच वर्ष लॉक करून ठेऊ शकत नाही पैसे. आम्हाला ना त्यातले काहीच कळत नाही. आमचे हे करतात बाई असलं काहीतरी, मी नाही लक्ष घालत. असे एक नाही अनेक मुद्दे. अनेक कारणं ते देत असतात. कधी दुसर्यांना. कधी स्वतः ला. पण तरी त्या प्रत्येक वेळेला मनातून एक सुप्त इच्छा असतेच. काय आहे तरी काय हे प्रकरण.
आणि मग हिम्मत करून, याला त्याला विचारून, सतरा लोकांचे डोके खाऊन, गुगल करून शेवटी उतरतातच ते ही मैदानात. काठाकाठाने चालत चालत कधी ते धापकन पाण्यात पडतात त्यांना पण कळत नाही. गटांगळ्या खात खात शेवटी जीव मुठीत धरून पोहतातच ते. आणि मग काही दिवसांनी ते पण intraday, equity, derivatives, small cap, mid cap असे शब्द बोलायला लागतात.
जाणकारांच्या सोबत बसून अवश्य शिकून घ्यावे अशी गोष्ट. वेळ नाही म्हणून share market बघत नाही म्हणणार्यांनी फक्त डिमॅट अकाऊंट काढून घ्या. app mobile मध्ये टाकून घ्या. whats app जितक्या वेळा दिवसभरात उगाचच ओपन करतो तितक्या वेळा उगाचच ते app उघडून बघा. निफ्टी ला परत एकदा वयात आलेलं पाहून पाहून एखादा ट्रेड करायची आपोआप इच्छा होईल. झालीच इच्छा तर तुम्हीही या गोष्टीचा आणि पर्यायाने "त्यांचा" आपोआप एक भाग बनत जाल.
त्यांची गोष्ट तर सांगितली. पण मी कोण? "त्यांच्यातलीच" एक.
"अर्थातच" अवनी गोखले टेकाळे
आज काही जागतिक ट्रेडर्स डे वगैरे नाही बरं. असले डे बी आपण पाळत नसतो. खूप दिवस या विषयवार ब्लॉग लिहायचा होता. आज वेळ मिळाला इतकंच.
Tuesday, December 28, 2021
मोल अनमोल (१०० शब्दांची काल्पनिक रूपक कथा)
Sunday, December 26, 2021
समुद्र.. अंतिम श्वास..!!
हे सागरा. तुझी ओढ घेऊन येतेच तुझ्या पर्यंत. परत परत येतच राहणार तुझ्या विसाव्याला. प्रत्येक वेळी वय वेगळे. विचार वेगळे. लहरी वेगळ्या. तू तोच. अथांग. अमर्याद. प्रत्येक तरंग सामावून घेणारा.
माहित आहे तुला. तुझ्याशी बोलायला नाही तर तुला ऐकायला येते तुझ्याकडे. वेळाकाळाचे भान न राहता भरती ओहोटी चे चक्र अनुभवायला येते इथे. तुझी गाज ऐकायला येते इथे. फक्त तू बोलतोस, मी विचार करायच्या पलीकडे जाऊन एका निर्वात पोकळी मध्ये असते फक्त तुला ऐकत. तुझ्या सोबत शेष ही अनुभवते आणि अनंत ही.
डोळे मिटायचे आणि अनुभवायची प्रत्येक लाट तुझ्या गाजेतून. डोळे उघडून फक्त मोजायची. एक.. दोन.. तीन.. आठवी लाट मोठी भरती कडे नेणारी. परत सुरू.. एक दोन.. तीन.. किती मोजले.. किती तास मोजले.. माहित नाही..
तुझ कसं आहे ना. तू ओळखतोस मनातलं. त्यामुळे सुख. बोलायला लागतच नाही तुझ्याशी. शांत बसून राहायचं. मनातले संभ्रम आपसूक मिटतात. मार्ग मिळतात. प्रश्न सुटतात. आणि मग एक क्षण येतो. काहीच विचार येत नाहीत. आधी वाटायचं अशक्य आहे. विचारा शिवाय मन म्हणजे मृत्यू अवस्था. पण नाही. तुझ्या सोबत ती निर्वात पोकळी अनुभवता येते. यापेक्षा अजून नशीबाची गोष्ट काय. घर दार संसार कुटुंब नोकरी आप्त मित्र सगळ्याच्या पलीकडल काहीतरी. फक्त तूच तो. सगळं गुपित माहिती असलेला. माडाच्या बनातून पलीकडे पोहोचलो की पसरलेला अथांग तू.
तूच तो. अगस्तीन्नी गिळलेला. तूच तो. सरीतेला भिडलेला. तूच तो. शशांकाकडे पाहत उसळलेला. तूच तो. नारळी पौर्णिमेला उधाण आलेला. तूच तो. ज्याला बघून स्वातंत्र्यवीरांचा प्राण तळमळला. तूच तो. ज्याने स्वतः ला घुसळून मंथन घडवून आणले. तूच तो. नरहरी आणि श्री लक्ष्मी यांना आसरा द्यायची ताकद असणारा. तूच तो.
तू असशील का रे सोबत. अंतापर्यंत. तुला काय सांगायचे. नाळ ही तू, माहेर ही तू, प्रेम ही तू, प्रणय ही तू. साक्षात्कार ही तू, विश्र्वरूप ही तू. सगळे जाणणारा तू. आम्ही फक्त ऐकायचे. या अवनी वरचा कार्यभार संपला की परत येणार तुझ्या कुशीत. किनाऱ्यावर पावले उमटवत चालत राहणार आत आत तुझ्या पोटात. मोजत राहणार. पहिली लाट. दुसरी लाट. तिसरी लाट. आता आठवी लाट सगळ्यात छोटी. ओहोटी लागलेली. किनाऱ्याची प्रत्येक वस्तू ओहोटी ला आत आत घेऊन चाललेला तू. आणि दूरवर शंख ध्वनी. तुझी गाज कानात घुमत आहे का पोहचत आलो आत आत अंतिम ध्येया पर्यंत. शेषशाही श्री विष्णू. पायाशी श्री महालक्ष्मी. आणि भोवती अथांग पसरलेला. तूच तो. हे उदधि, हे पयोधि, हे निरनिधि. तुझी ओढ घेऊन येतेच तुझ्या पर्यंत. अथांग. अमर्याद. प्रत्येक तरंग सामावून घेणारा. तूच तो. सागरा. तुझ्या कुशीत हे पूर्ण समर्पण. सामावून घेशील ना. तुझ्या पोटात अंतिम श्वास घेऊन देशील ना.
-- अवनी गोखले टेकाळे
Thursday, October 14, 2021
Deepfake का आधुनिक मारीच राक्षस (Cyber च्या विळख्यात - 3)
Thursday, October 7, 2021
Data Mining (Cyber च्या विळख्यात - २)
नमस्कार मित्रांनो. या नवरात्रात एक अनोखा उपक्रम. Information Technology तुमच्या आमच्या आयुष्याचा नकळत भाग झालीच आहे. तर तिला सन्मानाने स्वीकारू या. जे वापरत आहोत त्याचा अर्थ समजून घेऊ या. मराठीत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे सोप्या भाषेत प्रत्येक माळेला एका नवीन विषयाची मराठीत थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि दसऱ्याला सीमा उल्लंघन करून पुढचे पाऊल टाकायला सज्ज होऊया.
Mining चा मराठीत अर्थ खाणकाम करून उपयुक्त वस्तू मिळवणे. ही आहे आपल्या माहितीची खाण. वेगवेगळ्या सोशल मीडिया वरती आपली माहिती सेव्ह होते त्याची खाण. एक माणूस, एक घटना म्हणजे एक डेटा. असे करोडो डेटा एकत्र येऊन तयार होतो तो database. आणि याच्या अभ्यासातून, याच्या mining मधून तयार होतात वेगवेगळे नियम.
Data mining मधली दोन उदाहरणे सांगतो. खरीखुरी घडलेली. कुठे ना कुठे वाचलेली. अभ्यासलेली. अर्थ, निष्कर्ष ज्याला जसे लावता येतील तसे लावावेत.
एक आटपाट नगर. नगरात एक जोडपे. त्यांना एक कॉलेज मध्ये जाणारी मुलगी. घराजवळ general store. कायम खरेदी तिथेच. अचानक store मधून त्यांना प्रेग्नन्ट बायकांविषयी प्रबोधन करणारी, आवश्यक असणाऱ्या वस्तूंना अधोरेखित करणारी पॅम्प्लेट्स घरी यायला लागली. Pregnant कोण? आई का कॉलेज मध्ये जाणारी मुलगी? शक्यता दोघींची नव्हती. त्यांनी कंप्लेंट केली. पॅम्प्लेट्स बंद करायला लावली. Store वाले confident. माहिती चुकीची? शक्यच नाही. आम्ही पक्क्या माहिती च्या आधारावर बोलतो, तुम्ही खात्री करून घ्या. आणि थोडक्या दिवसात कॉलेज मध्ये जाणारी मुलगी प्रेग्नन्ट असल्याचे लक्षात आले. घरच्यांना कळण्याच्या आधी store वाल्यांना कळलेच कसे? Data mining जगतातील खळबळ उडवून देणारी घटना. Data mining Algorithms चा effectiveness prove करणारी घटना. तर झाले काय होते? Store मध्ये खरेदी ला आलेल्या व्यक्तींचा आणि खरेदी केलेल्या वस्तूंचा एक पॅटर्न बनवला जायचा. त्यावरून rules तयार केले जायचे आणि परत तो व्यक्ती खरेदी ला आल्यावर काय खरेदी करेल याचे आडाखे बांधले जायचे. त्या pattern मधून लक्षात आले होते की pregnant ladies च्या section मध्ये नकळत ती मुलगी रेंगाळत होती.
दुसरे सोपे उदाहरण द्यायचा प्रयत्न करते. आपण बर्गर खायला हॉटेल मध्ये गेलो. तिथे आपल्याला वेगवेगळे combo packs दिसतात. बर्गर सोबत fries आणि cold drink असा अतिशय कॉमन combo pack दिसेल. तर हे ठरवते कोण आणि कसे? तर आपण खातो. payment करतो तेव्हा बिल generate होते. अशी लाखो बिल्स मिळून database तयार होतो. या बिल मध्ये साधारण पॅटर्न कळून येतो की कुठले दोन पदार्थ एकत्र खायला लोकांना आवडतात. त्याप्रमाणे हे rules वापरून मेनू ठरवले जातात.
तर ही नुसती झलक. ते बिल तयार करतात. ते cctv वापरतात. त्या सायबर च्या विळख्यातून तयार होत असतो तो database. आणि त्याचा अभ्यास करून बनते तुमच्या आमच्या जगण्याची एक चालती बोलती कुंडली. ती म्हणजे mining.
घाबरायला नको. पण सावध राहायला हवे. अभ्यास करत राहायला हवे. मागच्या ब्लॉग मध्ये एक प्रश्न विचारला होता ना. की तुम्ही मैत्रिणीशी चॅट वर बोलत आहात की मला अम्ब्रेला पॅटर्न चा ड्रेस घ्यायचा आहे. आणि नेमका तुम्हाला शॉपिंग साईट्स वर अगदी तुम्हाला हवा तसाच ड्रेस पहिल्या नंबर वर दिसतो. या काही निव्वळ योगायोग नसतो बरं. तो जुळवून आणलेला योगायोग असतो.
तर शेवटाकडे येताना शारदीय नवरात्राच्या पहिल्या माळेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. उद्या दुसऱ्या माळेला येतो नवीन उदाहरणे घेऊन. पुढच्या नऊ दिवसात काय वाचायला आवडेल ते सांगा. आणि आता जाता गम्मत म्हणून कंमेंट्स मध्ये सांगून जा की या ब्लॉग मधून वाचक म्हणून तुम्ही आणि ब्लॉगर म्हणून आम्ही काय data mining केले असेल बरं?? आणि शेवटचे एक. या ब्लॉग ला लगेच adsense नी ऍड लागली. automatic. आणि ती पण data mining शीच संबंधित. आता बोला!!!!!
खाली दिलेल्या लिंक वर या विषयातील सर्व लेख एकत्रित वाचू शकता.
तुमचेच रहाट - गाडगे माझ्या लेखणीतून..: Cyber च्या विळख्यात (avanigokhale.blogspot.com)
-- अवनी गोखले टेकाळे